कर्वा जॉईन झाला तेव्हा मी काही कामासाठी स्टोअरमध्येच बसलेलो होतो. एखादी बेक्कार आग भडकलेली असली की आम्ही मार्केटिंगवाले स्टोअरमध्ये येऊन बसायचो. आम्हाला बघितले की काँट्रॅक्टवरचे लेबर तुफान वेगात काम सुरू करायचे. त्या दिवसांंमध्ये अश्या कंत्राटी कामगारांची भरती सुरू होती. दहापाच गरजू एकीकडे दाटीवाटीने बसलेले होते. समोर चाललेले काम पाहून त्यांना अंदाज येत होता की त्यांना काय करावे लागू शकेल. बायमेटॅलिक मेन बेअरिंग, कॉन रॉड बेअरिंग आणि थ्रस्ट वॉशर्सचे पॅकिंग! प्रत्येक आयटेमचे विशिष्ट संख्येत सेट्स लावणे, ते सेट विविध पॅकिंगमध्ये गुंडाळणे, मग ते बॉक्समध्ये ठेवणे आणि शेवटी सील आणि स्टँप! प्रत्येक स्टेपला दोन, दोन कामगार होते. एक सुपरवायझर इतिहास संशोधक एखाद्या खंडहरामध्ये अभ्यासू नजरेने फिरतात तसा फिरत होता. सत्तावीस वर्षांच्या तपस्येनंतर त्याला नुसते वीस वीस फुटांवरून समजत होते. इथे सिंप्सन पडलंय, तिथे सुंदरम कुजलंय, पलीकडे आयशर सडलंय, उजवीकडे व्होल्टास आचके देतंय वगैरे! त्या सुपरवायझरचे नांव, आडनाव वगैरे त्यालाही आठवत नसावे. सगळे त्याला अन्ना म्हणत होते. स्टोअरचे हेड चौगुले जागेवर नसले तर तिथून राऊंड मारणारे व्ही पी सुद्धा अन्नाशी तह करायचे पॅकिंग किती व्हायला हवं ह्याचे. अन्ना तोंडाला येईल ते आकडे आणि कारणे सांगायचा. व्ही पी त्याला अवाच्या सवा टारगेट देण्याचा निष्फळ प्रयत्न करून पाहायचे. महिन्याच्या शेवटी सिस्टीम सेलची तीच व्हॅल्यू दाखवायची जो आकडा अन्नाच्या तोंडून बाहेर पडलेला असायचा. जर जास्त दाखवली तर तो फरकही अन्नाने शेवटच्या दिड दिवसात मोठ्या मनाने मान्य केलेल्या अॅडिशनल टारगेटमुळे पडलेला असायचा. प्रॉडक्शनकडून डब्ल्यु आय पी ला आणि डब्ल्यू आय पी कडून एक्साईज बाऊंडला किती आणि कोणते मटेरिअल आले ह्याचा सेलशी सुतराम संबंध नसायचा. डिस्पॅच तेच व्हायचे जे अन्नाला डिस्पॅच करायचे असायचे.
अन्ना स्टोअरमध्ये मुरारबाजीसारखा फिरून सगळ्यांचा आवेश वाढवत होता. दहापाच गरजू बेकार काम मिळेल ह्या आशेने एका बाकड्यावर बसलेले होते. मी चौगुलेंच्या समोर बसून न्यू हॉलंडची अर्जन्सी किती भयंकर आहे ह्याचे वर्णन करत होतो. आणि कर्वा?
लालभडक रंगाचा शर्ट, काळी ढगळ पँट, देह निश्चल, चेहरा दगडी, घारे डोळे हुषारीने ओतप्रोत आणि आवाज अतिशय घोगरा! रंग सावळा! वय सुमारे वीस असावे.
कर्वा चौगुलेंच्या पुढे उभा होता. चौगुले त्यांना येत असणारे छप्पन्न फोनकॉल्स घेत होते. मध्येच माझ्याकडे बघत घाईघाईने होकारार्थी माना हालवत 'अरे अन्नाला बोलवा रे, न्यू हॉलंडचे काय झाले म्हणाव' म्हणत होते. ही सूचना कोण ऐकत आहे हेही त्यांना माहीत नव्हते. मध्येच ते कर्वाकडे बघत होते. शेवटी एकदा त्यांना सलग पाच सात मिनिटे मिळाली आणि त्यांनी कर्वाची मुलाखत सुरू करायचे ठरवले. तेवढ्यात दार धाडकन् लोटले गेले आणि तपस्वी अन्ना आत प्रवेशला. अचानक त्या केबीनला प्रचंड अर्थ प्राप्त झाला. स्टोअरचे प्रमुख काम आता कुठे डिस्कस होणार होते. चौगुलेंनी अन्नाला बसूही दिले नाही.
"अन्ना, न्यू हॉलंड अर्जंट आहे"
"बिग एन्ड नाग्यापाशी आहे अजून"
"चारशे सेट्स आलेत म्हणतोय हा तर?" - चौगुलेंनी माझा हवाला दिला. मी आवेशाने तोंड उघडणर तेवढ्यात अन्ना..
"ही मिशीय ना मिशी? अर्धी ठेवून काम करेन महिनाभर, बिग एन्ड आलेले असले तर"
"च्यायला त्या नाग्याच्या" - मी नाग्याचा केलेला उद्धार!
आता चौगुले आणि अन्नाची इतर घनघोर चर्चा सुरू झाली. खरे तर न्यू हॉलंडसाठी मी आता नागासमोर नृत्य करायला हवे होते. पण तेवढ्यात चहा आला आणि मी चह अघेऊनच जायचे ठरवले. दोन, तीन मिनिटांनी अन्ना तीरासारखा निघून गेला आणि चौगुलेंनी कर्वाला पहिला प्रश्न विचारला.
"नांव काय तुझं?"
"कर्वा"
"कर्वा?"
"हां साहेब"
"कुठे काम केलंय का आधी?"
"हा साहेब! जगताप हॉस्पिटलात मामा होतो"
"मामा?"
"हा"
"म्हणजे तू आधीच मामा बनलेला आहेस. ते काम का सोडलं?"
"पगार नाय वाढवला"
"किती मिळायचे?"
"सोळाशे"
"सोळाशे? इथे तर तेराशे मिळतात"
"चालंन"
"असं कसं चालंन? कमी नाही का हा पगार?"
"कामच नाय ना पन सध्या"
"मग उद्या तुला सोळाशेचं काम मिळालं की तू चालला, हो का नाही?"
"नाही, करंल इथंच"
"सेकंड शिफ्ट मिळेल"
"म्हन्जे?"
"दुपारी दोन ते रात्री दहा"
"हा"
"कुठे राहायला तू?"
"दापोडी"
"किती शिकलाय?"
"अकरावी फेल"
"घरी कोण कोण असतं?"
"आई, वडील आणि थोरला भाऊ"
"तो काय करतो?"
"तो डायव्हर आहे"
"पॅकिंगचं काम जमेल का?"
चौगुलेंनी मुलाखतीत विचारलेला हा प्रश्न किती मूर्खपणाचा आहे हे त्यांना आधी माहीत असते तर त्यांची जीभच रेटली नसती. कर्वाने उत्तर दिलं.
"हा! जमंन"
"जमंन? जमंन तर मग जमंन आम्हालाही. त्या अन्नाला भेट. आत्ता वाजलेत दहा! घरी जाऊन ये. जेवून खाऊन. येताना अर्ज आणायचा, शिक्षणाचं काय असेल आणि आधीच्या कामाचं काय असेल ते आणायचं. पत्ता वगैरे नीट लिहिलेला पाहिजे. दुपारी दोनला काम शिकायला सुरुवात करायची. बरोबर डबा आणायचा. साडे सात ते आठ सुट्टी असते जेवणाची. रविवारी सुट्टी. पण महिना अखेरीला सुट्टी नसते. त्याचा मग नंतर ऑफ मिळतो. काय? जा आता"
कर्वाच्या चेहर्यावर आनंदाचा लवलेश नव्हता. लांबवर बसलेल्या सर्व गरजूंपेक्षा मला मात्र कर्वा किंचित वेगळाच आहे हे जाणवले. कर्वामध्ये काहीतरी होते. निघून जाताना कर्वाने चौगुले आणि मला एक एक सलाम केला आणि गेला. गेला तो थेट अन्नाकडे गेला. पाच, दहा मिनिटे अन्नाशी बोलून त्याला बाहेर जाताना मी पाहिले. तोवर इतर गरजूंची रांग चौगुलेंच्या केबीनबाहेर लागलेली होती. मी उठलो आणि नागाकडे निघालो. जाताना वाटेत मला न्यू हॉलंडचे दोन बॉक्सेस दिसले. अन्नाचे माझ्याकडे लक्ष होतेच. त्या बॉक्सेसकडे हात करून मी 'हे काय आहे अन्ना' असे विचारण्यासाठी तोंड उघडणार तेवढ्यात अन्ना म्हणाला....
"मार्केट आहे, पाच मायक्रॉन"
बॉक्सेस आफ्टर मार्केटचे होते. मी ओई आणि ओईआर बिझिनेस बघत होतो. त्यामुळे माझ्यासाठी ते बॉक्सेस तर नव्हतेच, पण मुळात ते पाच मायक्रॉननी अन्डरसाईझही होते. टेक्निकलीही मला चालले नसते. मी गटार टाळून जावे तसे ते बॉक्सेस टाळून पुढे गेलो. आफ्टर मार्केट म्हणजे नुसता प्रॉफिट, जणू की क्वॉलिटीला काही किंमतच नाही. त्यामुळे मी आणि माझी टीम आफ्टर मार्केटला अगदी सामान्य समजायचो.
कर्वा डोक्यातही राहिला नाही. आम्ही मार्केटिंगवाले दिवसातून एक राऊंड अख्ख्या प्लँटमधून मारायचो. बरेच शोध लागायचे. स्टोअरमध्ये हे दिसलं, मारुतीचं टूलिंग कासवावर बसलं आहे, प्रिमिअरचे वॉशर्स रिजेक्ट होणारेत, एटीएक्सची पुढची पट्टी बारा दिवस येणार नाही, प्लॅनिंगच्या सुळेने दाढी काढली, अंबादासची चलनं चुकली आहेत अशी कित्येक बिंगे फुटायची. मग वर येऊन इमेलचे तडाखे द्यायचे. लोकं घाबरूनच असायचे मार्केटिंगला! अर्जन्सी असेल किंवा महिना अखेर असेल तर आमच्या दिवसातून दोन राऊंड्सही व्हायच्या. मन्थ एन्डला तर बराच वेळ खालीच असायचो आम्ही!
मात्र कर्वा दिसू लागला होता. अन्नाकडून नागाकडे जाताना मधे एका बेचक्यात कर्वा बसलेला असायचा. अन्ना बाकीच्या सगळ्या कामगारांवर करडी नजर ठेवत प्रचंड झापाझापी करत बोलायचा. पण कर्वाला उद्देशून तो एक शब्द बोलल्याचे मी कधी पाहिले नाही. कर्वा जिथे बसायचा त्याच्यामागे भिंतीला एक भगदाड होते. हे भगदाड कशाने तरी अर्धवट झाकलेले असायचे एवढेच. सगळे काही पॉश असावे ह्यासाठी लाखो रुपये खर्च करणार्या कंपनीने हे भगदाड का दुर्लक्षित ठेवले होते हे माहीत नव्हते. त्या भगदाडातून बाहेर पडलेली खडी दिसायची. ही खडी जणू तेथला अविभाज्य भाग बनलेली होती. मी एकदोनदा कर्वाला त्या भगदाडावरचे अर्धवट कव्हर बाजूला करून बाहेर थुंकताना पाहिले होते. तेव्हा मला समजले की कर्वा तंबाखू चघळतो. कर्वा उभाच असायचा. त्याच्यासमोरच्या टेबलवर अव्याहत विविध बेअरिंग्ज येत राहायची. त्याने स्वतःचा असा एक चार्ट तयार केलेला होता. त्या चार्टनुसार तो पॅकिंग करत सुटायचा.
कोणाशी बोलणे नाही, कोणाकडे बघणे नाही, काहीच नाही. मशीन चालावे तसे कर्वाचे हात चालत असायचे. सुरुवातीला आम्हाला कोणालाच काहीच वाटले नाही. पण एक दिवस मार्केटिंगमध्ये हळूच कोणतरी सहज म्हणाले.
"खालचा कर्वा पाहिला का स्टोअरचा? मिनिटाला तीन सेट लावतो कायनेटिकचे"
मग नंतर कधीतरी कोणालातरी चौगुलेंना फोनवर सांगताना ऐकले.
"अहो अर्जन्सी आहे म्हंटल्यावर कर्वासारख्याला लावायला पाहिजे ना साहेब त्या कामावर"
मग काही दिवसांनी एका वीकली मीटिंगला चौगुलेंना वर बोलावले. ते बाहेर गेले होते म्हणून अन्नाला बोलावले तर तोही चहा प्यायला गेलेला होता. शेवटी चक्क कर्वाला वर बोलावले. कर्वाने ती अॅडमिन बिल्डिंग आणि त्यातील मार्केटिंगचे ते आलिशान, पॉश ऑफिस पहिल्यांदाच पाहिले. त्याच्या चेहर्यावर चाचरलेपण नव्हते पण अनोळखी मात्र होती नजर त्याची. चौकशी करून तो थेट मीटिंगरूममध्ये आला. त्याचा अवतार पाहून जी एम नी सिनियर मॅनेजरलाच सुचवले त्याच्याशी बोलायला. त्यांनी माझ्याकडे पाहिले. मी कर्वाला विचारले.
"आज २८ तारीख आहे. आज किती व्हॅल्यू होईल?"
शप्पथ सांगतो, कोणतेही उत्तर अपेक्षित नव्हते. अपेक्षित होते ते हे की कर्वा प्रचंड सटपटेल, अन्नासाहेबांना विचारून सांगतो म्हणेल किंवा बावळटासारखा बघतच बसेल. कर्वाने हुषार पण दगडी नजर माझ्या नजरेत गुंतवत प्रचंड घोगर्या आवाजात उत्तर दिले.
"एकवीस सत्तर"
मीटिंगमधल्या जी एम सकट अकरा माना कर्वाकडे वळल्या. ह्या पोर्याकडून काही उत्तर अपेक्षित करणे हीच आपली घोडचूक आहे ह्या गृहीतापासून ते 'हा व्हॅल्यू सांगू शकतो आणि इतकी ठामपणे?' येथपर्यंतचा भावनिक प्रवास अर्ध्या क्षणातच झाला सगळ्यांचा! कर्वा तसाच उभा, पुतळ्यासारखा! आता माझ्यासमोरच आव्हान उभे ठाकले. एक तर त्याने सांगितलेली व्हॅल्यू अशी होती की ती 'काहीच्या काही' नव्हती. पण ती पाहिजे तितकी पण नव्हती आणि अगदीच कमीही नव्हती. प्रॉब्लेम असा होता त्या व्हॅल्यूचा की साली ती फार म्हणजे फारच रिअॅलिस्टिक व्हॅल्यू होती. आणि त्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम हा होता की जॉईन होऊन ज्याला दोन महिने झाले आहेत त्या ह्या गबाळ्या कर्वाने तो आकडा अश्या ठामपणे उच्चारला होता की मीटिंगमधील व्हॅल्यू ह्या विषयावरची सगळी चर्चाच आटोपणार होती. वेगवेगळ्या डेसिग्नेशनची ज्युनियर आणि सिनियर माणसे व्हॅल्यू कशी वाढेल ह्यावर घनघोर चर्चा करत असताना, एकमेकांवर दोषारोप करत असताना, शेवटच्या क्षणी काय गेमा टाकता येतील ह्यावर डोके लढवत असताना आणि मनात सगळ्यांना साधारण आकडा माहीत असताना तेथे येऊन ह्या नगण्य माणसाने चपराक मारावी तसा आकडा उच्चारला होता, एकवीस सत्तर!
मी विचारले.
"कशी काय एकवीस सत्तर? ओईच्या डीओच साडे सहाच्या आहेत"
"हा! आन् मार्केटच्या साडे सतराच्या! टोटल चोवीस! त्यातला अठरा लाखाचा माल बाऊंडमध्ये आलाय, सहा लाख आज येनार न्हाई, कालच्या तीन सत्तरच्या डी ओ पेंडिंग हायेत, त्यांचा माल आज येगळा आलेलाय, टोटल एकवीस सत्तर"
"हे सगळे तुला कसे माहीत रे?"
"आपल्याच हातून जातंय ना सगळं"
मी मान डोलावत त्याला 'जा' अशी खुण केली. प्रामाणिकपणे सांगतो, अठ्ठावीस तारखेच्या व्हॅल्यूची चर्चाच संपली. चर्चा एकोणतीसची सुरू झाली. आज 'एकवीस सत्तरच' होणार हे सर्वांनी मनाशी मान्य केले. पाचच मिनिटांनी चौगुले घाईघाईने आत आले. त्यांना जी एम ने विचारले.
"चौगुले, व्हॉट इज टूडेज एक्स्पेक्टेड?"
"सर, आय अॅम ट्रायिंग फॉर ट्वेन्टी थ्री! डब्ल्यू आय पी ला सांगून ठेवलंय मी"
"गुड, तुझा तो कोण माणूस मगाशी आला तो काहीतरी एकवीस, बावीस म्हणत होता"
"कोण आल होता रे?" - चौगुलेंनी मला विचारले.
"कर्वा"
"कर्वा????"
चौगुलेच उडाले. ह्या मीटिंगला कर्वाला बोलावण्याची अक्कल कोणाची असावी हे त्यांना समजेना! त्यांनी उत्तर दिले.
"नाही नाही, कर्वा काय सांगतो, मी करतोय तेवीसचा प्रयत्न"
आता कर्वाचे काही खरे नव्हते. खाली गेल्यावर चौगुले त्याची तासणार हे आम्हाला माहीत होते. खरे तर आता आमच्याकडे काहीच काम नसल्यामुळे मीटिंग आणि चहा झाल्यावर मी आणि चौगुले एकत्रच खाली गेलो. खाली गेल्यावर चौगुलेंनी पहिल्यांदा अन्नाला बोलावले. अन्नाने लांबून हात करत सांगितले की तो आत्ता चर्चेत वेळ घालवण्यास उत्सुक नाही. अन्ना चौगुलेंना असे काहीही बोलू शकायचा आणि चौगुलेंना ते झक मारत ऐकावे लागायचे. अन्नाला युद्धभूमीवरून दोन मिनिटांसाठी विथ ड्रॉ करण्याचा काय परिणाम होईल हे कोणालाच सांगता आले नसते. शेवटी उचकलेल्या चौगुलेंनी कर्वालाच बोलावले. कर्वा येऊन दगडी चेहर्याने उभा राहिला. त्याच्या घार्या डोळ्यात कसलेही भाव नव्हते. त्याच्या अंगाला ऑईल, घाम आणि तंबाखू असा एकत्र वास येत होता.
"काय रे कर्वा, तुला वर जाऊन व्हॅल्यू सांगायला कोणी सांगितलं?"
"निरोप आला वर बोलावलाय म्हणून"
"अन् तू काय सांगितलंस?"
"आज एकवीस सत्तर होईल म्हनालो"
"विचारलं होतंस मला?"
"तुम्ही कुठे व्हते इथे?"
"गाढवा मी इथे असतो तर तुला वर बोलावले असते का?"
"न्हाईच की, पन विचारल्यावं सांगायला तं पायजेल ना"
"एकवीस सत्तर बित्तर काही नाही, तेवीस पन्नासच्या खाली पॅकिंग झालं तर पगार कापीन तुझा"
"हा"
कर्वा 'हा' म्हणून निघून गेला. त्याच्या त्या 'हा' मध्ये आज्ञाधारकपणा होता की उपरोध कोण जाणे! रात्री साडे नऊला फायनल रन घ्यायच्या सूचना आल्या आणि तमाम पब्लिक स्टोअरमध्ये धावलं! अर्धा तास रन चालला होता. पॅकिंग बंद झालं होतं कारण नागाकडून फीडच येत नव्हता. नागाचा फीड केव्हाच आटोपलेला होता. कर्वा आणि इतर अनेक कामगार केवळ थांबवलं होतं म्हणून थांबले होते
अर्ध्या तासाने रन उरकला आणि प्रिंट घेऊन देशपांडे चौगुलेंच्या केबीनमध्ये आला. तिथे चौगुलेंबरोबर आधीच जीम, सिनियर मॅनेजर, मी, दोन्हीकडच्या टीम्स आणि अन्ना असे उभे होते. केबीनच्या दरवाजातून आत येतानाच देशपांडेने ओरडून व्हॅल्यू उच्चारली.
"एकवीस सत्तर झालंय साहेब"
कैक....कैक चेहरे पाहण्यासारखे झाले होते. त्यातील चौगुलेंचा सर्वाधिक! खालोखाल अन्नाचा! केबीनमध्ये एकच सन्नाटा पसरला होता. तेवढ्यात कसा कोण जाणे, कर्वा प्रवेशला आणि दारातूनच चौगुलेंना म्हणाला....
"साहेब, नागाकडून फीड नाय, नायतर कंप्लीट क्येलं आस्त, जाऊ का, एकवीस सत्तर बोललो तेवढं केलं"
चौगुलेंचा इगो सगळ्यांसमोर दुखावला गेला. तो उघडपणे न दाखवता बोटांनीच कर्वाला जायची खुण करत त्यांनी नागाला फोन करून झापायला सुरुवात केली. एकेकजण काढता पाय घेत बाहेरच्या टपरीकडे चहा घ्यायला निघाला. माझ्या डोक्यात कर्वा घुमत राहिला.
कस्टमर कंप्लेन्ट्स सेल म्हणजे सीसीसी किंवा नुसतीच सेल! ही सेल हा एक भयानक प्रकार होता सगळ्यांसाठी, मार्केटिंगसकट! एक तर ही यायची मार्केटिंगच्याच अंडर, पण मार्केटिंगबाबत असलेल्या तक्रारीही ह्या सेलमध्येच अॅड्रेस व्हायच्या. ह्या सेलचे दर पंधरवड्याला रिपोर्टिंग असायचे. दिड तासाचे प्रेझेंटेशन आणि दोन तासांनंतर संपूर्ण रिपोर्ट इमेलवर सगळ्या डिपार्टमेन्ट्सना! हॅवॉकच असायचा तो! कशात कोणाचे नांव निघेल आणि का ह्याचे प्रत्येकाला टेन्शन! मार्केटिंगने वेळेत उत्तर दिले नाही येथपासून ते क्वॉलिटी रिजेक्शन, लॉजिस्टिक्समधील मर्यादा, टाईमली डिलिव्हरीज, प्राईस आणि पॅकिंगचे घोळ असे सर्व प्रकार त्यात यायचे.
पण ह्या सेलच्या गेल्या दोन महिन्यांमधील चार प्रेझेंटेशन्समधील एक सूक्ष्म फरक चौथ्या प्रेझेंटेशनला सगळ्यांच्या टाळक्यात घुसला. पॅकिंगच्या मिस्टेक्स नगण्य झाल्या होत्या. सगळ्यात मोठ्या चुका, म्हणजे ह्या कंपनीला त्या कंपनीचा माल जाणे, एका बेअरिंग ऐवजी त्याच कंपनीचे दुसरेच बेअरिंग जाणे किंवा ओई बेअरिंगऐवजी अन्डरसाईझ बेअरिंग जाणे ह्या तीन प्रकारच्या मोठ्या चुका जवळपास संपल्याच होत्या. आणि ह्या तीनही चुका होण्याची शक्यता असलेले टेबल कर्वाचे होते. एकमेकांशी एक शब्दही न बोलता अख्ख्या कंपनीतील लोकांना एका रात्रीत कर्वाचे महत्व पटले. स्टोअरच्या चौगुलेंनी त्या दिवशी नागाचा सेक्शन, मार्केटिंग आणि स्टोअर ह्या सगळ्यांना कंपनीच्या खर्चाने सामोसे आणि चहा दिला. कर्वाला एक पेन सेट आणि एक घड्याळ बक्षीस दिले. कर्वाने तेही दगडी चेहर्याने स्वीकारले.
आता कर्वा चांगलाच नजरेत भरला लोकांच्या! आता येता जाता लोक चौगुले आणि अन्नासकटच कर्वाशीही थोडेसे बोलायला लागले. ह्यात अगदी ज्युनियर लेव्हलपासून ते सिनियर मॅनेजर लेव्हलपर्यंत सगळे येऊ लागले. त्याच्याशी बोलताना प्रत्येकजण त्याला न्याहाळायचा.
कर्वाचे दोन्ही हात अखंड चालत असायचे. तो वर मान करून तुमच्याशी बोलतानासुद्धा दोन्ही हातांनी परफेक्ट पॅकिंग करत असायचा. मशीनच झाला होता तो एक! त्याच्या त्या जादुई हालचाली खुद्द अन्नाही थबकून पाहत उभा राहात असे. इतर पोरे तर केव्हाच त्याला नेक्स्ट अन्ना मानायला लागलेली होती. अन्ना नसेल तेव्हा ती पोरे कर्वालाच शंका विचारायची. होती ती त्याच्या बरोबरच जॉईन झालेली, पण त्याला मानू लागली होती. अन्ना नसेल तेव्हा चौगुलेही कर्वाला आत बोलावून काय काय विचारायचे. कर्वा फॅक्ट्स सांगायचा. त्यावर विश्वास ठेवावा लागायचा. अन्नाची जशी कमांड होती स्टोअरवर तशी हळूहळू कर्वाची पण यायला लागली. अर्थात, दोघांमध्ये फरक होता. अन्ना हा एम्प्लॉयी होता, कर्वा कॉन्ट्रॅक्च्युअल!
कर्वाच्या मागचे भगदाड आता थोडे अधिक उघडे झाले होते. आता तेथून कर्वा बिनदिक्कतपणे बाहेर थुंकत होता. आधी त्याला थोडी भीती असायची. पण आता त्याला भीती राहिलेली नव्हती.
पुढच्या तीन चार महिन्यांत असे झाले की व्हॅल्यूचा अंदाज कर्वाकडून घेऊन मग चौगुले वर कमिटमेन्ट द्यायला लागले. अर्थात, ते तसेच्या तसे आकडे नव्हते सांगत. पण बेसिक अंदाज ते कर्वाकडूनच घ्यायचे. इतकेच काय तर येताजाता लोकं कर्वाला 'आज किती व्हॅल्यू होईल' विचारायचे. कर्वा त्यावर एक्झॅक्ट आकडे सांगायचा. दोन बहात्तर, सहा चौतीस, पॉईंट ऐंशी वगैरे!
कस्टमर कंप्लेन्ट्स सेल आता पॅकिंग मिस्टेक्सची स्लाईड बदलतच नव्हती. चुकाच नाही होत तर वेगळे काय लिहायचे? तेथे मिसमॅचचे परसेंटेज झिरो बघण्याची सवय झाली होती मॅनेजमेन्टला! पूर्वीचे दिवस आठवून चौगुले आणि अन्ना खासगीत सगळ्यांना सांगू लागले होते.
"चांगला माणूस मिळालाय आपल्याला कर्वा! झिरो एरर बेसिसवर काम करतो. आधी एस्कॉर्ट्सचा भाटिया किंवा मल्ल्या येऊन ठाण मांडायचे तेव्हा धडकीच भरायची. च्यायला कसल्या कसल्या कंप्लेन्ट्स असायच्या साल्यांच्या? गांजा प्यायलेलीच पोरं जशी काही कामाला ठेवायचो आपण! ह्या कर्वाला पर्मनन्ट केला पाहिजे."
वगैरे वगैरे!
पॅकिंग एरर्सच्या कंप्लेन्ट्स सगळ्यात घाणेरड्या कंप्लेन्ट्स! अगदी लाजच निघायची कंपनीची! महिंद्राला एस्कॉर्ट आणि अशोक लेलँडला एच एम टी! चेहरेच ओशाळायचे अशी कंप्लेन्ट आली की पूर्वी! आता कर्वाच्या पुढच्या स्टेपच्या पॅकिंगला असलेल्या मुलांच्या हातात रेडिमेड सेट्स येत होते. त्यांना फक्त बॉक्सेसमध्ये ते घालायचे आणि वर सील आणि स्टँप! कर्वा आधीच बाकीच्या सगळ्या बॉक्सेस मैलाअर ठेवून यायचा. एस्कॉर्ट चालू आहे म्हणजे फक्त एस्कॉर्ट्सच्याच बॉक्सेस राहायला हव्यात नजरेत! कर्वाच्या हातात माल सोपवला की नागा नि:श्वास सोडायचा. तोपर्यंतचे चेकिंग त्याच्याकडे असायचे. ज्या अर्थी कर्वाने माल स्वीकारला त्या अर्थी आपण काम बरोबर केले असे आता नागा मानू लागला होता.
अधेमधे अन्नाला कर्वाचा मत्सरही वाटायचा असे आम्हाला जाणवायचे. आम्ही अन्नाची खेचायचोही त्यावरून! पण अन्ना तेथे जवळपास तीन दशके होता. त्याच्यामते आम्ही कालची पोरेच होतो. पण अन्ना अलीकडे खेकसू लागला होता कर्वावर! त्याच्या चुका काढायचा प्रयत्न करायचा. पण कर्वाची काही चूक व्हायची नाही.
शेवटी झाकण निघत निघत कर्वाच्या मागचे ते भगदाड पूर्ण उघडे पडले. बाहेर ही खडी नुसती! त्यावर कर्वाच्या पिचकार्यांच्या खाणाखुणा! आता कर्वाकडे पाहिले की तो खडीवरच उभा असल्यासारखा दिसायचा. त्याचा चेहराही दगडासारखाच थंड आणि भावनाहीन! त्यामुळे भगदाड उघडे पडल्यापासून प्लॅनिंगच्या सुळेने त्याला 'दगडी कर्वा' असे नांव ठेवले.
दगडी कर्वा आता कस्टमरकडच्यांनाही माहीत होऊ लागला. नेहमी येणारे कस्टमर बरेचदा थांबून त्याच्या लयबद्ध हालचाली थक्क होऊन पाहात राहायचे. कन्व्हेयर बेल्ट असावा तसा दगडी कर्वा त्याच्याकडे आलेला माल स्मूथली पॅक करून पुढे सरकवत राहायचा.
बारा महिन्यांमध्ये दगडी कर्वाने किरकोळ रजा घेतल्या असतील. बाकी नियमीत! दगडी कर्वाकडे अधिक जबाबदारी द्यावी असे फार वाटायचे सगळ्यांना! पण एक तर अन्ना अजून होता, दुसरे म्हणजे दगडी कर्वाला त्याच्या जागेवरून हटवला की दुसरं पोरगं चुका करणार! तिसरं म्हणजे दगडी कर्वाला स्टॉअरमधून बाहेर जाऊ द्यायला चौगुले तयार होणे शक्यच नव्हते.
दगडी कर्वालाही माहीत होते की त्याला दगडी कर्वा म्हणतात. एकदा तर आमच्या आफ्टर मार्केटच्या एका मॅनेजरच्या उपस्थितीत चक्क जी एम च थांबले आणि त्यांनी दगडी कर्वाला लांबून हाक मारली.
"ए दगडी कर्वा, इधर आ"
दगडी कर्वा नेहमीपेक्षा किंचितच अधिक लगबगीने पण दगडीच चेहरा ठेवून त्यांच्याकडे गेला.
"अन्नाको बोल आज टेल्को का डेव्हलपमेन्टवाला बेअरिंग आनेवाला है, उसका पॅकिंग पडवळसे मांग के लेना"
"लाया साहब वो पॅकिंग मै पडवळ साहबसे, लेकिन बेअरिंग दोन दिनमे नही आयेगा"
जी एम उडाले.
"क्यों?"
"मारुती अर्जंट लगाया है"
मारुतीचा प्लँट बंद पडला तर प्रकरण कुठे जाईल ह्याची आमच्या सिक्युरिटीलाही कल्पना असायची. जी एम शांतपणे शॉपकडे चालत गेले.
हळूहळू दिवस, आठवडे आणि महिने गेले. वर्ष संपले आणि दगडी कर्वाचे कॉन्ट्रॅक्ट एक वर्षाने एक्स्टेंड केले गेले. बाकीच्यांचीही झाली. पण दगडी कर्वाला पाचशे रुपये अलाऊन्स जास्त मिळाला. दगडी कर्वाच्या चेहर्याचा दगड जराही हालला नाही.
पण एक गोष्ट झाली तेव्हा मात्र दगडी कर्वा सरकला. फारच सरकला.
अन्नाची रिटायरमेन्ट घोषित झाली. एक्स्टेन्शनची प्रोव्हिजन रद्द होण्याचे दिवस होते ते! भल्याभल्यांना एक्स्टेन्शन मिळू शकत नव्हते. अन्ना तर सुपरव्हायझर! अन्नाची रिटायरमेन्ट डेट ठरली तसे मग सेन्ड ऑफचे ठरू लागले. अन्नाची अनुपस्थिती जाणवणार नव्हती असे नाही, पण दगडी कर्वा असल्यामुळे कोणाला चिंता नव्हती. आणि चौगुलेंनी एक घोषणा केली. ही घोषणा करण्याची सूचना त्यांनाही वरूनच आलेली होती. नियमाप्रमाणे पॅकिंगची सूत्रे कायमस्वरुपी कर्मचार्याकडे दिली जाणे बंधनकारक होते. वरून आलेल्या सूचनेनुसार चौगुलेंनी जाहीर केले की ह्यापुढे अन्नाच्या जागी नागा काम पाहील आणि आजपासूनच अन्ना आपला चार्ज ट्रान्स्फर करेल.
झाले! दगडी कर्वा सरकला. भयंकर सरकला. ज्या नागाच्या अनंत चुका काढून आपण पॅकिंग सेक्शनची अब्रू वाचवायचो तो केवळ एम्प्लॉयी आहे म्हणून आपला साहेब ठरणार हे दगडी कर्वाला मान्य होईना! प्रथम दगडी चेहर्याने, नंतर भावनिक होऊन आणि शेवटी सडेतोडपणे आवेशपूर्ण बोलत त्याने चौगुलेंनाच धाक घातला.
"आत्ता त्यो चार्ज घेतोय तोवर ठीक हाये, यकदा अन्ना गेले आनि तो इन्चार्ज झाला की मी हितं न्हाई थांबायचा साहेब, आधीच सांगतोय"
चौगुलेंनी त्याला परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की अरे बाबा तू एम्प्लॉयी नाहीस, आम्ही एक कंपनी म्हणून ही जबाबदारी तुझ्याकडे देऊ शकत नाही, वगैरे! पण दगडी कर्वा ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता.
शेवटी तो दिवस उगवला. साश्रू नयनांनी सर्वांनी अन्नाचा आणि अन्नाने सर्वांचा निरोप घेतला. अन्नाला मोठमोठ्या भेटी दिल्या गेल्या. त्याला न्यायला त्याची मुलगी आलेली होती.
अन्ना गेला आणि दिड तासाने शिफ्ट संपवून दगडी कर्वाही निघून गेला. मात्र दगडी कर्वा दुसर्या दिवशी आलाच नाही. खरे तर, तो दुसर्या दिवसापासून आलाच नाही. गेला तो गेलाच! केवळ एक विशिष्ट माणूस साहेब म्हणून पटत नाही ह्या कारणाने तिरिमिरीत नोकरी लाथाडणारा दगडी कर्वा अजबच वाटत होता सगळ्यांना!
आणि आठव्या दिवशी बाँब पडला. कस्टमर कंप्लेन्ट सेलच्या प्रेझेंटेशनमध्ये अनेक महिन्यांनी प्रथमच 'पॅकिंग एरर' दिसली. आजवर येथे लाल रंगाचे काही दिसायचेच नाही. सवयच नव्हती कोणाला. अचानक तेथे लाल रेघा, लाल वर्तुळे दिसली. क्षणार्धातच सगळ्यांना दगडी कर्वा आठवला. सगळ्यांनी एकमेकांकडे सूचकपणे पाहिले. तेवढ्यात सेलची राधा भोसले म्हणाली.
"अतिशय लाजिरवाणी कंप्लेंट! आजवर मिसमॅच बेअरिंग्ज किंवा अन्डरसाईझ बेअरिंग्ज जायची. ह्यावेळी एस्कॉर्टने अक्षरशः आपल्याला शेअर ऑफ बिझिनेस घटवण्याची धमकी दिली आहे. कारण ह्यावेळी त्यांच्या कन्साईनमेन्टमधून त्यांना बेअरिंग्ज नव्हे, तर दगड मिळाले आहेत दगड"
दगडी कर्वाने दाखवलेला इंगा फार महागात पडला.
======================
-'बेफिकीर'!
सुरुवातीला स्टोरी काहीच कळली
सुरुवातीला स्टोरी काहीच कळली नाही. पण नंतर वाचत वाचत पुर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. अप्रतिम लिखाण. लिहित रहा. छान लिहलय. विशेष म्हणजे दगडी कर्वा चे दगडी हावभाव.
मस्त बेफिकीर! हे पण
मस्त बेफिकीर! हे पण व्यक्तिचित्रण छान जमलय. बाकीच्या व्यक्ती पण छान उभ्या रहातात.
तुम्ही ही व्यक्तिच्चित्रणे
तुम्ही ही व्यक्तिच्चित्रणे भारी लिहिता. बरेचदा मला त्या कथेत/चित्रणातले मुख्य पात्र हाताला लागत नाही, ते बरेचदा सपक होते. म्हणजे ते वाईट चित्रित झालय असं नाही, पण त्यातला जीव कमी वाटतो. काही चित्रणे खास आहेत. असो. तो मुख्य उद्देश नाही या पोस्टचा.
जो माहौल उभा करता फॅक्टरीचा, तिथली बोंब, कस्टमर सेल्स वाल्यांची मानसिकता, पर्चेसवाल्यांचा वेगळा ठेका, स्टोअर्सवाले ते अस्सल असते. तसेच कॉलनीतल्या लोकांवरच्या चित्रणातले सुद्धा वातावरण जे उभे करता ते. तुमचे निरिक्षण तुफान आहे. मागे एका कथेत तो क्रँक शाफ्टसाठी महिंद्राचा बायर येऊन बसतो आणि प्रॉडक्शन/कस्टमर सेल्सवाला त्याला मॅनेज करतो ती पण अस्सल होती.
या वरच्या कथेत मला सगळ्यात जास्त आवडले ते कर्वाच्या मागचे भगदाड. ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व बनून आले आहे या चित्रणात.
टण्या +१ या प्रकारच्या कथा
टण्या +१ या प्रकारच्या कथा आवडतात तुमच्या.
कथा आवडली. तो शेवटी दगड भरतो
कथा आवडली. तो शेवटी दगड भरतो हे मात्र त्याच्या रंगवलेल्या एकंदर स्वभावाशी विसंगत वाटले. तुमच्या इंडस्ट्रिअल पार्श्वभूमी वापरून लिहिलेल्या सर्व कथा आवडल्या. ते वातावरण अगदी हुबेहूब उभे करता.
आवडला, दगडी कर्वा.
आवडला, दगडी कर्वा.
भारी हे!! एक व्यक्ति
भारी हे!!
एक व्यक्ति चित्रणाचं पुस्तक लिहायचं मनावर घ्या बेफि.!!
चांगला आहे दगडी
चांगला आहे दगडी कर्वा
कॉर्पोरेट्/शॉपफ्लोअर कल्चर नेमकेपणाने मांडण्याचे कौशल्य विशेष!
टण्या, जीएस +१. अजून थोडा
टण्या, जीएस +१.
अजून थोडा सफाईदार हात फिरवायला हवा होता कथेवरुन असे वाटले.
डिटेलिंग भारी
डिटेलिंग भारी आहे!
व्यक्तीचित्र आवडलं.
आवडला, दगडी कर्वा. >> + १
आवडला, दगडी कर्वा. >> + १
सर्व वाचक व प्रतिसाददात्यांचे
सर्व वाचक व प्रतिसाददात्यांचे आभार. टण्या ह्यांचे विशेष आभार! धन्यवाद.
भारी लिहिलंय. आवडलं. तो शेवटी
भारी लिहिलंय. आवडलं.
तो शेवटी दगड भरतो हे मात्र त्याच्या रंगवलेल्या एकंदर स्वभावाशी विसंगत वाटले +१
मस्त!!! नेहमीप्रमाणेच जबरदस्त
मस्त!!! नेहमीप्रमाणेच जबरदस्त व्यक्तिचित्रण.
बेफीजी, तुम्ही केलेली
बेफीजी, तुम्ही केलेली व्यक्तीचित्रणं सुरेख असतात.
अतिशय सुरेख ! वाचताना सारखा
अतिशय सुरेख ! वाचताना सारखा कर्वाच्या लयबद्ध हालचालींचा आवाज येत होता यातच कथेचं प्रभावीपणे कळतं. दंडवत स्वीकारा मालक __/\__
बेफिकिरजी... तुमच कोरर्पोरेट
बेफिकिरजी... तुमच कोरर्पोरेट लिखाण समजायला थोड कठीण जात पण मजा येते वाचायला.... खुप छान व्यक्तीचित्रण ..
छान कथा आमच्याकडेही "सचिन"
छान कथा
आमच्याकडेही "सचिन" नावाचा शिपाई आहे.
तो सकाळी हजेरीबुक जमा करायला जातो त्यावरुन आम्ही अचुक वेळ सान्गु शकतो
मस्त लिहीलीय कथा. एक्दम माहोल
मस्त लिहीलीय कथा. एक्दम माहोल उभा केलात.
मस्त उतरलाय दगडी
मस्त उतरलाय दगडी कर्वा.
ट्ण्या +१
व्यक्तिचित्रण आवडलं. जीएस +१
व्यक्तिचित्रण आवडलं.
जीएस +१
एकदम झकाssस! फक्त यातली
एकदम झकाssस! फक्त यातली तांत्रिक भाषा कळायला अवघड गेली. ती टाळून वाचलं तरी गुंतून जायला होतं. कामावर प्रेम करणारी आणि बिनचूक काम करणारी माणसं अशीच `सरकलेली` असतात. आणि तसं सरकलेलं असल्याशिवाय एवढ्या पर्फेक्टली काम होतच नाही राव!
आवडला, दगडी कर्वा.
आवडला, दगडी कर्वा.
टण्याच्या पूर्ण पोस्टला
टण्याच्या पूर्ण पोस्टला अनुमोदन. अशा प्रकारच्या कथा जबरदस्त उतरताहेत.
जबरी व्यक्तिचित्रण बेफी.
जबरी व्यक्तिचित्रण बेफी. तुमचा हातखंडा आहे त्यात.
इंडस्ट्रीच्या काही व्याख्या कळल्या नाहीत. पण कोई बात नही. जे पोहोचायचं ते पोहोचलं नीट.
आवडले
आवडले व्यक्तिचित्रण,
शुभेच्छा.
As
As usual....व्यक्तिचित्रणामध्ये तुमच हात धरणारा कुणी ही नाही मायबोली वर असे म्हण्टलं तर ते वावगं ठरु नये बेफि..
तुमचा तो पानसे आणि हा दगडी कर्वा, खुपशी साम्यं असून ही दोन सगळ्यात भारी कॉर्पोरेट व्यक्तिचित्रण आहेत असं मा वै. म.
-प्रसन्न
मस्त चित्र उभ केलय व्यक्ती
मस्त चित्र उभ केलय
व्यक्ती आणि वातावरणाचंही
नवीन प्रतिसाददात्यांचा आभारी
नवीन प्रतिसाददात्यांचा आभारी आहे
लेख खूप आवडला !! खरं तर तुमचे
लेख खूप आवडला !!
खरं तर तुमचे सर्वच लेख आवडतात , यामध्ये ही तुमची लिखाणाची मांडणी आणि त्याचे स्वरूप पाहता खूप दांडगा अनुभव पाठीशी बाळगून आहेत तुमी .
Pages