रमन राघव २.० - Welcome back Anurag Kashyap ! - (Movie Review - Raman Raghav 2.0)

Submitted by रसप on 25 June, 2016 - 02:40

इतर लोकांनी काय व कसं लिहिलं आहे मला माहित नाही. पण ह्या सिनेमाबद्दल लिहित असताना मी जाणीवपूर्वक त्याच्या कथानकाबद्दल लिहिणे टाळणार आहे. कारण जर कथानकाची तोंडओळख जरी करून दिली, तरी सिनेमाचं वेगळेपण समजून येऊ शकेल आणि ते होऊ नये, प्रत्यक्षात पाहत असतानाच हे वेगळेपण आश्चर्याचा धक्का देऊन जावं, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे जर कुणाला स्टोरी जाणून घ्यायची असेल, तर मी आधीच क्षमा मागतो !

वरील प्रास्ताविकातून हे तर समजून आलंच असेल की 'रमन राघव २.०' म्हणजे अनुराग कश्यप व कंपनीने टाकलेली कुप्रसिद्ध सिरीयल किलर रमन राघव उर्फ सिंधी दलवाई वर बेतलेली बायोपिक टाईप पाटी नाही. ती तशी नसणार हे मला त्याचे ट्रेलर पाहूनच वाटलं होतं. ट्रेलरमध्ये नवाझुद्दिन एका लहान मुलाला बांधून ठेवून त्याला बोलत असतो की, 'क्या नाम है तेरा ? 'पाकिट !' तू छोटा है ना, इस लिये पाकिट. कल आपन कोई पुछेगा की तेरेकू क्यू मारा. तो आपन बोलेगा, आपन ने सिरफ पाकिट मारा!' १९६५-६६ च्या आसपास मुंबईत अनेक खून केलेल्या रमन राघवने कधी कुणाला ओलीस धरलं नव्हतं. सिनेमा मूळ रमन राघवपेक्षा वेगळा आहे ह्याचा ह्याहून मोठा क्ल्यू हा की ट्रेलरमधून समजून येतं की ही कहाणी जुन्या काळातली नसून आजची आहे आणि सिनेमाच्या शीर्षकात '२.०' सुद्धा आहे.

मग 'रमन राघव २.०' काय आहे ? कशाबद्दल आहे ?

हा सिनेमा म्हणजे केवळ एक कथन नाही. ते एक विश्लेषण आहे. एक थिअरी त्यात मांडली आहे.
मानसिक अस्थैर्यामुळे खून करत सुटणे, ही आपल्या अंत:प्रेरणेसमोर आपल्याच सद्सद्विवेकाने पत्करलेली बिनशर्त शरणागती असते. ही प्रेरणा जितकी प्रखर असेल, तितकंच तिला शरण जावं लागणं हे अटळ असतं. तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाची एक अंत:प्रेरणा (Drive) असतेच. ती जर सकारात्मक, कलात्मक, रचनात्मक, विधायक वगैरे असेल आणि वेळीच तिला ओळखलं तर उद्धार होतो. पण जसं प्रकाशाचं अस्तित्व मान्य करणं म्हणजेच अंधाराचंही अस्तित्व स्वीकारणं आलं, तसंच हीच अंत:प्रेरणा नकारात्मक, विध्वंसक वगैरेही असू शकते, हेही मान्य करायला हवं. भले, ते अमानुष असेल, मानसिक अस्थैर्य असेल, तरी 'आहे' व 'असू शकतं' हे सत्य बदलत नाही. मग अश्या अज्ञात, अनाकलनीय, विचित्र प्रेरणेपासून दूर जाण्यासाठी एक दुबळं मन इतर काही पर्याय शोधत राहतं. नशा, सेक्स, वगैरे. ते मन खरं तर 'आपली प्रेरणा काय आहे' ह्याचा शोध घेत असतं.

कई चेहरे हैं इस दिल के न जाने कौनसा मेरा

अशी काहीशी त्याची अवस्था, समस्या असते.
सरतेशेवटी, अटळ विधिलिखिताप्रमाणे जेव्हा आपली अंत:प्रेरणा समजून येते आणि तिला मन शरण जातं, तेव्हा कुणी 'ऑटो शंकर' बनतो, कुणी स्टोनमॅन आणि कुणी 'रमन राघव'.

'रमन राघव २.०' ह्या मानसिकतेचा ठाव घेतो. Which is like never before.

raman_raghav02_1c.jpg

अनेक कारणं, वैशिष्ट्यं आहेत, ज्यामुळे 'रमन राघव २.०' एक खूपच वेगळा सिनेमा ठरतो.

१. वर सांगितल्याप्रमाणे त्या मानसिकतेचा ठाव घेणं.

२. हे कथानक त्रयस्थ व तटस्थपणे केलं गेलं आहे. सांगणारी व्यक्ती कोण चांगलं, कोण वाईट हे सांगत बसत नाही. कोण कसं आहे, हे फक्त दाखवून दिलं जातं.

३. सिनेमा थरकाप उडवेल, पण त्यासाठी नग्न हिंसाचार दाखवत नाही. जसा अनुराग कश्यपनेच 'गँग्स ऑफ वासेपूर १ आणि २' मध्ये दाखवला होता.

४. 'कहानी'मध्ये बकाल कोलकाता जितकं प्रभावीपणे दाखवलं होतं, तितक्याच प्रभावीपणे इथे 'मुंबई' दिसते. 'आमीर'मध्ये मुंबईचा हे कळकट चेहरा दाखवला होता. इथलं मुंबई चित्रण फक्त कळकटपणावर न थांबता कळकटपणाच्याही आत शिरुन त्याची व्याप्ती दाखवतं. ही मुंबई ह्या कथानकातलं एक महत्वाचं पात्र आहे. ती नसेल, तर ही कहाणीही नसेल.

५. 'बॉम्बे वेलवेट' मधून अनुराग कश्यपला नक्की काय म्हणायचं होतं, ते समजलं नव्हतं. तो एक धक्काच होता. फियास्को होता. त्यानंतर 'रमन राघव २.०' येतोय. पीछेहाट होत चाललेल्या सैन्याने निकराने जोरदार मुसंडी मारुन शत्रूची दाणादाण उडवावी, त्या जिद्दीने अनुराग कश्यपने पुनरागमन केलं आहे.

६. 'बॉम्बे वेलवेट'चा सहलेखक 'वासन बाला' इथलाही सहलेखक. कश्यपप्रमाणे 'बाला'चंही हे एक प्रकारे रिडम्प्शनच. सिनेमात मांडलेल्या थिअरीची कल्पना करणं, तिच्यावर बुद्धीनिष्ठ विचार करुन तिला मूर्त स्वरुपात आणणं ह्यासाठी कश्यप-बाला ह्या लेखकद्वयीला सलाम !

७. हा सिनेमा एक जबरदस्त थ्रिलर असला तरी मांडणीत कुठलीही गुंतागुंत नाही. सुटसुटीत मांडणी नेहमीच बाळबोध नसते आणि क्लिष्ट मांडणी नेहमीच वैचारिक नसते. कथा वाहत्या पाण्यासारखी अगदी नैसर्गिक प्रवाहीपणे पुढे सरकत जाते.

८. नवाझुद्दिन सिद्दिकी जेव्हा वाईट काम करेल तेव्हा ती बातमी असेल. ट्रेलरमधूनच त्याने त्याच्या भूमिकेची सायकोगिरी दाखवून दिली आहे आणि सिनेमातून तर सप्रमाण दाखवून देतो की 'आत्तापर्यंत जे पाहिलंत ते तर फक्त ट्रेलरच होतं !' त्याची भूमिका अमानुष, कपटी आणि विकृत व्यक्तीची आहे. हे सगळं सादर करताना he leaves no stone unturned.

९. 'मसान'मधून आपली छाप सोडलेला 'विकी कौशल' आपल्या दुसऱ्या सिनेमात पुन्हा एकदा दमदार काम करतो. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या नवाझुद्दिन सिद्दिकीसारख्या ताकदीच्या अभिनेत्यासमोर ह्या अननुभवी नवोदिताचा कसा टिकाव लागेल, ह्याचं उत्तर सिनेमा देतो. लोक बहुतेक तरी ह्या सिनेमाला 'नवाझुद्दिनचा सिनेमा' म्हणून लक्षात ठेवतील आणि विकी कौशल अनसंग राहील. पण माझ्या मते 'रमन राघव २.०' चे नवाझुद्दिन आणि विकी हे दोन पाय आहेत आणि सिनेमा लंगडा नाही.

१०. बॉक्स ऑफिसवर जमवलेला गल्ला हे दर्ज्याचं द्योतक असत नाही. कुठलाही पुरस्कारसुद्धा दर्ज्याची हमी देत नाही. 'खानावळी'चे आचरट चाळे बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमवत असले आणि अनाकलनीय व कंटाळवाणे 'कोर्ट'सारखे रटाळ सिनेमे पुरस्कारांची लूट करत असले तरी इथेच अगदी वेगळा विचार करुन त्यालाही प्रभावीपणे मांडणारे कलंदरही आहेत. असे सिनेमे खोऱ्याने पैसा ओढणार नाहीत किंवा पोत्यात पुरस्कार भरून घेऊन जाणार नाहीत. ते फक्त बराच काळ लक्षात राहतील आणि ते लक्षात राहावेत इतकीच त्यांची अपेक्षाही असेल.

'रमन राघव २.०' एक असा थरार आहे, जो मी विसरू इच्छित नाही. बहुतेक तरी मी परत तो पाहणार नाही कारण पहिल्यांदा पाहतानाचा जो जबरदस्त धक्का आहे, तो दुसऱ्यांदा पाहताना कदाचित बसणार नाही.
मला डायल्युशन नकोच आहे.

रेटिंग (द्यायचंच असेल तर) - * * * * *

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/06/welcome-back-anurag-kashyap-movie...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे! असे सिनेमे थेट्रात बघवत नाहीत मला.
चांगलं लिहिलंय.

बाकी तुम्ही काय 'कोर्ट' ला विसरत नाहीत Happy

अरे बापरे! पहिल्यांदाच ५ तारे Happy

रसप यांना ५ तारे द्यायला भाग पाडलेला सिनेमा पाहण्याची उत्सुकता आहे Happy तसेच नवाजुद्दीन आवडता अभिनेता असल्यामुळे बघण्याचे चान्सेस जास्त आहेत

मला बघायचा आहे पण हा त्या रामन राघव बद्दल नाही, हा माझ्यासाठी धक्काच आहे.

तो काळ प्रत्यक्ष बघितलेला कदाचित मी एकटाच असेन आता मायबोलीवर. त्या काळात आम्ही मालाड पूर्वेला होतो. अनेक रहिवासी रात्र रात्र जागून पहारा देत असत, तरी तो पकडला जात नव्हता. त्या काळात मिडीया एवढा प्रभावी नव्हता तरीही त्याची दशहत होतीच.

पुढेही, त्याचा संदर्भ आलाच, कारण त्याने चेंबूरला ज्या वंदे मातरम बिल्डींग जवळ हत्या केली होती, ती माझ्या शाळेच्या जवळच होती.

बॉम्बे व्हेलव्हेट मात्र मला पटला नव्हता !

ट्रेलर पाहिलेला थेटरात तेव्हाच थरार जाणवलेला. आज जमलं तर पाहीन. बाहेर बदाबदा पाऊस कोसळतोय, त्या वातावरणात फिट होईल एकदम.

विठ्ठल, मी इतकाही जुना नाहीए.
पण त्याच्यासारखाच एक पत्थरमार नव्वदीच्या आसपास की त्याआधी आला होता, तो आठवतोय. फुटपाथवर झोपलेल्यांच्या डोक्यात दगड घालायचा. तो टकलू होता असं कळल्यावर सकाळी ट्रेनमध्ये अगदी फर्स्टक्लासच्या डब्यात दिसणारा हट्टाकट्टा टकलू तो खुनीच वाटायचा.

८०-९०च्या दशकात असा एक माथेफिरू होता. अंधेरी मरोळ चकाला इ वेस्टर्न लाईन वर त्याची बरीच दहशत होती.

हा बघणार हे ट्रेलर बघितल्यावरच ठरवलं होत..
नवाझुद्दीन आवडता.. त्यामुळे मिस करण्याचे चान्सेस २% एवढेच..

@भरत,

तुम्ही म्हणताय तोच 'स्टोनमॅन.'

त्याच्यावरही एक सिनेमा आला होता. 'द स्टोनमॅन मर्डर्स'. केके मेनन आणि अरबाज खान होते त्यात. पाहिला नाही, पण पाहायचाय तोसुद्धा.

स्टोनमॅन कधीही पकडला गेला नाही, त्या खूनांच्या मागचं गूढ कधीच उकललं गेलं नाही.

आधी मुंबईत काही खून झाले होते आणि नंतर कोलकात्यातही. हेही नक्की ठरवता आलं नाही की दोन्ही ठिकाणचे खून करणारी व्यक्ती एकच होती की नाही.

५ तारे म्हणजे ४ पकडू शकतो कारण नवाझुदीन असल्यावर तुम्ही एक एक्स्ट्राचा देता
ट्रेलर पाहिला नाही अजून, आता बघून येतो आणि मगच ठरवतो..
परीक्षण कम लेख छान लिहिलाय

ऋन्मेऽऽष | 25 June, 2016 - 15:42 नवीन
५ तारे म्हणजे ४ पकडू शकतो कारण नवाझुदीन असल्यावर तुम्ही एक एक्स्ट्राचा देता

>> Lol

मला नीट आठवत असेल, तर वंदना गुप्ते च्या नवर्‍याने त्या रामन राघव चे वकिलपत्र घेतले होते. त्याला फाशी होऊ शकली नाही. मानसिक रुग्ण ठरवले गेले होते त्याला. देवीचा आदेश येतो, म्हणून मी खून करतो असे तो म्हणत असे.

त्या काळात दूरदर्शन नव्हतेच. मिडीया म्हणजे केवळ वर्तमान पत्र आणि आकाशवाणी, तरीही माझ्या पर्यंत या
बातम्या पोहोचल्या ( माझे वय ३ वर्षे ) आणि भिती वाटली, म्हणजे बघा.

त्या काळात खाजगी नेपाळी गुरखे असायचे. ते रात्री दांडुका आपटत गस्त घालायचे. त्याला पण तू जपून रहा रे, असे आईने सांगितलेले स्पष्ट आठवतेय.

ट्रेलर परत एकदा बघितला..
संपताना त्याच्या खिडकीत उभ राहुन चाललेला ओरडा आणि नंतर एकदम शांत होऊन काहीतरी न्याहाळणं.. कसतरी होत बघितल्यावर.. वेडगळं..

दिनेशदा,

दहशत तर इतकी जबरदस्त होती की त्यानंतर जवळजवळ दोन दशकांनी माझा जन्म झालेला असला, तरीही 'रमन राघव' बद्दल मला खूप आधीपासून माहित आहे. कारण कधी न कधी, कुणा न कुणाकडून त्याविषयी ऐकलं गेलंच आणि नंतर वाचलंही थोडंफार.

दोन आठवड्यांपूर्वी 'दिव्य मराठी'ची 'रसिक' पुरवणी अर्ध्याहून अधिक 'रमन राघव'बद्दल होती. त्यांनी त्यात असंही लिहिलं होतं की, 'अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने.....' वगैरे. (ते वाचून मनातल्या मनात हसलो होतो कारण मला खात्री होती की हा कश्यपचा गुगली आहे. सिनेमा रमन राघवबाबत नसणारच !) त्यात ह्या केसशी संबंधित काही जणांच्या मुलाखती होत्या. राघवला पकडणारे अ‍ॅलेक्स फियालो, राघवचे सरकारी वकील, त्याने शेवटचे खून जिथे केले तिथले एक रहिवासी वगैरे लोकांच्या मुलाखती होत्या. केससंबंधी थोडीफार माहिती होती. तसंच इतरही काही सिरीयल किलर्सबद्दल माहिती होती. ही सगळी माहिती त्यांनी इंटरनेट व विकीवरून उचलली असावी. कारण बव्हंशी सगळंच माहित होतं. मात्र इंटरनेट विशेष न वापरणाऱ्या लोकांपर्यंत ह्या पुरवणीच्या निमित्ताने ती सगळी माहिती पोहोचली असाव,, हे चांगलं.

दिनेशदा, माझ्या लहानपणी पण मी रामन राघवबद्दल अनेकदा ऐकले होते. वन्दना गुप्तेच्या नवर्‍याने ही केस घेतली होती ही बातमी नविन आहे माझ्यासाठी.
तसेच आणखी एक हादरवुन टाकणारी केस त्या नन्तरच्या काळात दिल्लीत झाली होती. गीता आणि आकाश्/सन्जय या भाऊबहिणीची! मला वाटत रंगा- बिल्ला केस!

ते 'सप्रेम' आणि शेवटचा मेसेज " While you were watching this video, i was watching you" हा मेसेज पण खतरनाक आहे. Lol

हो आर्या, ती रंगा बिल्ला केस.. ती बहुतेक रस्त्यावर लिफ्ट मागितल्यावर पुढे आक्रित घडली त्याचीच ना ?

उल्हास नगरला, एका मुलीला ( बहुतेक रिंकु नाव होते तिचे ) दहावीचा पेपर देत असतानाच जिवंत जाळले होते.. त्या मुलाचे नाव हरिश होते बहुतेक..

रामन राघवच्या काळाच्या आसपासच, मंदा पाटणकर खुन खटला गाजला होता. तो हल्ला दिवा ते मुंब्रा स्टेशन च्या दरम्यान झाला होता आणि त्यानंतरच लेडीज डब्ब्यात पोलिस तैनात करण्यात आले.

सहज आठवल्या या केसेस. काहीही व्हिज्यूअल्स डोळ्यासमोर नाहीत, तरी अस्वस्थ करतात त्या. या वर चित्रपट आले तरी मला बघवणार नाहीत.

उल्हास नगरला, एका मुलीला ( बहुतेक रिंकु नाव होते तिचे ) दहावीचा पेपर देत असतानाच जिवंत जाळले होते..
>>>>
हो, बहुतेक रिंकू पाटील पुर्ण नाव. बरेच जुने प्रकरण असावे. या रामन राघवन सारखेच ऐकून आहे.

विकी म्हणतोय रामन राघव खटल्याचा निकाल १९७० मध्ये लागला. शिरीष गुप्तेंचं वय तेव्हा काय असेल? नेटवर एक लेख मिळाला .त्यांनी १९७२ साली सनद मिळवली असं दिसतंय.

वर मी एका प्रतिसादात नमूद केलेल्या 'दिव्य मराठी'च्या रसिक पुरवणीत रमन राघवच्या वकिलांचा व डॉक्टर - ज्यांनी तो मानसिक रुग्ण असल्याचा निर्वाळा दिला त्यांचा - लेखही होता बहुतेक. (डॉक्टरांची मुलाखत तर नक्की, वकिलांबाबत नॉट शुअर. पण त्यात नामोल्लेख नक्कीच असेल कुठे तरी.)

इंटरनेटवर 'दिव्य मराठी रसिक रमन राघव' असे काही सर्च केल्यास ती पुरवणी ऑनलाईन वाचता येईल. त्यातल्या एका लेखाचे शीर्षक 'वन टाईट स्लॅप' होतं बहुतेक.
(मला ऑफिसात रिस्ट्रिक्टेड अ‍ॅक्सेस असल्याने मी लिंक देऊ शकत नाही. क्षमस्व.)

इथे पहिल्या खटल्याच्या बातमीचा फोटो आहे. त्यात वकील आणि न्यायमूर्तीही आहेत.
http://www.bbc.com/news/world-asia-india-34719646

http://indianexpress.com/article/lifestyle/life-style/the-monsoon-murders/

१९८७ मध्ये हायकोर्टाने फाशी कमी करून जन्मठेप केली तेव्हा वकील कोण होते याचा उल्लेख मिळाला नाही.

दिनेशदा, रिंकू पाटील प्रकरणावरून अजुन काही जुनी गाजलेली प्रकरणे आठवली.
जोशी/अभ्यंकर खुन प्रकरण - जक्कल, सुतार, इ. - पुणे
मंजुश्री सारडा खुन प्रकरण - तिचा नवरा - पुणे
मानवत हत्याकांड- हे काय होते आठवत नाही बहुतेक मांत्रिक लहान मुलांना बळी देत असे.

अंजना बाई गावत आणि तिची मुलगी
कित्येक लहान मुलांचे क्रूर बळी घेतले
फाशीची शिक्षा झालेली

या सर्वांवर एक एक सिनेमे यावेत..
बर्‍याच केसेस माहिती नाही यातल्या.. एक एक जण मेन्शन करत असल्यामुळे शोधकाम वाढतयं..

जक्कल सुतार यांनी केलेले खुनसत्र फार गाजले होते.
यावर एक मराठी चित्रपट पण आला होता "माफीचा साक्षीदार" ज्यात नाना पाटेकरने काम केले आहे.

मानवत हत्याकांडावर पण एक मराठी चित्रपट आला होता "सर्वसाक्षी"

Pages