फोटोशोषण !

Submitted by A M I T on 22 January, 2013 - 23:46

समस्त अनुकुल ग्रह माझ्या कुंडलीत येऊन 'रमी' खेळत जरी बसले तरी माझे फोटो चांगले येणं अशक्य ! माझा चेहरा अमोल पालेकर छापाचा असताना फोटोत तोच चेहरा रझा मुराद छापाचा कसा होतो? हे मला आजवर न उकललेलं कोडं आहे.

परवाच कुठल्याशा फॉर्मवर चिकटवण्यासाठी पासपोर्ट साईज फोटोची गरज पडली, म्हणून मी 'पांढरकामे फोटो स्टुडिओ'त दाखल झालो. मी सहज स्टुडिओत डोकावून पाहीले. पांढरकामे एका जोडप्याचे फोटो काढत होते. स्टुडिओत लाकडाची एक मोठ्ठी चंद्रकोर होती, त्या चंद्रकोरीवर ते जोडपे रती-मदनाची पोज घेऊन बसले होते. नील आर्मस्ट्राँगनंतर चंद्रावर पाऊल ठेवणारे हे बहुधा दुसरे !
त्या मदनाची रती वजनाने इतकी अवाढव्य होती, की ती जर निंबोणीच्या झाडामागे लपणार्‍या खर्‍याखुर्‍या चंद्रावर बसली असती तर तो चंद्र धुमकेतूसारखा येऊन पृथ्वीवर आदळला असता, यात 'रती'भरदेखील शंका नाही.

आतील फोटोसेशन आटपेपर्यंत बाहेरील टेबलावरील जाड काचेतून दिसणारे फोटो पाहत असताना एका फोटोने मला बुचकळ्यात टाकले.
दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवून आणि एका हातात गुलाबाचं फुल घेवून पांढरकामे फुल्ल बॉलीवूड स्टाईलने कतरीना कैफला प्रपोज करत होता !
हे पाहून ट्राफीक हवालदाराने आपल्या शिट्टीत हवा भरल्यावर त्या शिट्टीतील तो खडा जसा आतल्या आत 'भांगडा' करू लागतो, तसा माझा मेंदू कवटीतल्या कवटीत 'भांगडा' करू लागला.

फिल्मफेअर वा तत्सम मासिकांतून छापून आलेला कतरीनाचा फोटो एकांतात दोनेक सेकंद छातीशी धरतानाही 'आपल्याला कुणी पाहत तर नाही ना?' असं म्हणत मी आजुबाजुला पाहून खात्री करून घेतो, तिथं हा पांढरकाम्या भलताच 'दबंग' निघाला.

इतक्यात आतून धाड्कन आवाज आला आणि मी नुकत्याच कल्पिलेल्या प्रसंगाची मला उप'रती' झाली.

चांद्रमोहीम अयशस्वी ठरल्यानंतर पांढरकामे तणतणत बाहेर आले. आता त्यांना दुसरी चंद्रकोर ऑर्डर करावी लागणार होती. पती-पत्नींसोबत नवी चंद्रकोर विकत आणण्यासाठी लागणार्‍या पैशांबाबत झालेल्या किरकोळ धुसफुसीनंतर ते नव्या गिर्‍हाईकाकडे अर्थात माझ्याकडे वळले.

"पांढरकामे, सलमानच्या आधी आपणच बाजी मारलीत !" माझ्या मनाला अपार यातना देणार्‍या त्या फोटोवर बोट ठेवत मी म्हणालो.
"सगळी फोटोशॉपची किमया !" पांढरकामेंनी फोटोतली 'गोम' सांगितली.

मागे कधीतरी एका सलूनच्या दुकानाबाहेर असलेल्या फलकावर त्याच दुकानातला न्हावी चक्क अजय देवगणचे केस कापतोय, असा फोटो पाहील्याचं मला एकदम आठवलं.

"शंभर रूपयांत तुम्ही कतरीनासोबत बॅटमिंटन खेळू शकता आणि दोनशे रूपयांत तुम्ही तिच्या गालाचा मुका घेऊ शकता." पांढरकामेंना कसला 'कैफ' चढला होता? देव जाणे !
एखाद्या अट्टल मद्यप्याच्या एका बाजूस रम आणि दुसर्‍या बाजूस विस्की ठेवल्यावर तो जसा विचारात पडेल, तसाच मी गहन विचारात बुडालो.
"बोला बॅडमिंटन की मुका?" पांढरकामेंनी माझ्या विचारांत खंड पाडला.
"पासपोर्ट साईज फोटो." असं म्हणून मी 'मुका'ट्याने आत शिरलो आणि फोटो काढून घेण्यासाठी मांडलेल्या टेबलावर अंग चोरून बसलो.
सहज म्हणून स्टुडिओत नजर फिरवली तेव्हा मला तिथे लाकडी घोडा, लाकडी कार, लाकडी मोटरसायकल, लाकडी होडी (अहो, होडी लाकडाचीच असते म्हटलं ! कायतरीच आपलं..!) आणि तुळसदेखील चक्क लाकडी दिसली.
इलेक्ट्रीक बोर्डावरील दोन बटने दाबून पांढरकामेंनी स्टुडिओत छत्रीसारखे दिसणारे काहीतरी होते, त्यातील दिवे पेटवले आणि मी एकदम 'प्रकाशझोतात' आलो.
फोटो काढून घेताना माझा चेहरा इतका गंभीर असतो की, इथं जणु अणुकरार अथवा ग्लोबल वॉर्मिंग याविषयी चर्चा चाललेली असावी.
पांढरकामेंनी माझी हनुवटी पकडून माझी मान कधी खाली कधी वर कधी किंचीत उजवीकडे कधी डावीकडे अशी चहुदिशेस फिरवून अखेर 'स्थिर' केली आणि आपला एक डोळा मिटून दुसरा डोळा क्यामेर्‍याच्या दुर्बिणीला लावला.
"स्माईल !" असं म्हणून पांढरकामेंनी आकाशात वीज चमकते, तसा क्यामेर्‍यातून एक लख्ख प्रकाश चमकवला.
फोटो 'धुवून' आल्यावर जेव्हा मी ते पाहीले तेव्हा माझा हिरमोड की काय म्हणतात? तो झाला. एखाद्या फ्लॅटच्या दरवाज्याबाहेर मी उभा असताना आतून कुणी दाराला असलेल्या भोकातील दुर्बिणीतून मला पाहील्यास मी तसा दिसेन असेन कदाचित !

माझे 'परेड सावsssssssssध्धान' अवस्थेतले फोटो पाहून मायबोलीवरील माझ्या एका मित्राची प्रतिक्रिया मोठी गमतीदार होती. तो म्हणाला होता, "तूझे फोटो निघत असताना आसपास 'जन-गण-मन' चालू होते काय?"

इतरांचे सुंदर आणि प्रसन्न फोटो पाहीले की मला उगीचच गलबलल्यासारखे होते. अगदी प्रवासाहून आलेल्या मित्रांच्या फोटोतील करामती पाहील्या मला त्यांचं मोठं कौतूक वाटतं.
कुणी आयफेल टॉवरच चिमटीत पकडलाय, तर कुणी कुतुबमिनारलाच ढकलतोय. एका महाभागाने तर 'तो सुर्य गिळतोय' असा फोटो काढून घेतला होता. तो फोटो पाहून मी पवनपुत्र मारूतीच्या त्या आधुनिक आवृत्तीला मनोमन अभिवादन केले.

आजतागायत काढलेल्या माझ्या निम्म्याहून अधिक फोटोंत आपणांस माझे डोळे भगवान बुद्धांप्रमाणे 'मिटलेलेच' आढळतील.

काहीजणांना फोटो काढून घेण्यात कोण मौज वाटते, तो एक फोटोग्राफरच जाणे? फोटो काढून घेण्याचा त्यांचा उत्साह अवर्णनीय असतो.
माझी आत्या गावातल्या बहुतेक सगळ्या लग्नात हजर असते आणि त्या प्रत्येक लग्नाच्या अल्बममधील जवळजवळ बहुतेक फोटोंत कुठल्या ना कुठल्या कोपर्‍यात ती हटकून दिसतेच दिसते. लग्नातील फोटोत तर आपला निदान हात अथवा साडीचा किमान पदर तरी यावा, यासाठी अशी मंडळी विलक्षण धडपडत असतात. त्यासाठी मग मुद्दामच क्यामेर्‍यासमोरून इकडून तिकडे फेर्‍या मारताना मी अनेकवेळा पाहीलयं.

माझ्या लग्नातील फोटोसेशन हे एक निराळं प्रकरण आहे.
फोटोग्राफरने मला आणि यज्ञकुंडाभोवती माझ्यासोबतीने सात चकरा मारून नुकत्याच झालेल्या माझ्या पत्नीला निरनिराळ्या पोज घ्यायला लावून अक्षरशः काव आणला होता.
कधी एकच कोका-कोलाच्या बाटलीत दोन स्ट्रॉ टाकून आम्हां दोघांना एकाच वेळी प्यायला सांगत होता (त्यावेळी आमच्या सौ.नी स्ट्रॉद्वारे पाणीउपसा यंत्रासारखा घटाघट कोला प्राशन केलेला मला आठवतो. मी मात्र 'कोल्ह्याला द्राक्ष आंबट' ही म्हण सोईनुसार 'कोल्याची ढेकर वाईट' अशी करून मुकाट मॅन्गोला मांगवला आयमीन मागवला.) कधी माझ्या गळ्यात सौ.ला आपले चांदण्याचे हात टाकायला सांगत होता, कधी सौ.ला आपले डोके माझ्या खांद्यावर ठेवायला सांगत होता, तर कधी..... एक ना दोन.
वर आणखी आमच्या उत्साही सौ.च्या हौसेखातर मी सौ.ला 'होम मिनिस्टर'सारखं उचलून घेतलेला फोटो काढून घेण्यात आला. (त्यावेळी नेमका क्यामेर्‍यातील रोल संपला होता आणि फोटोग्राफर क्यामेर्‍यात नवा रोल टाकेपर्यंत एरवी हापीसात निव्वळ पेन हे अवजार उचलणार्‍या मला इथे मात्र कुदळ हे अवजार उचलायला लागल्यामुळे माझे हात प्रचंड 'पेन' होत होते. पुढे पुढे हेच कुदळ आमच्या चाळीत 'भांडकुदळ' म्हणून प्रसिद्ध पावले, हा भाग निराळा.. ! )

या विलक्षण त्रासदायक प्रकाराला लोकं फोटोसेशन का म्हणतात? ते मला आजही कळलेलं नाहीए. माझ्या लेखी या प्रकारास 'फोटोशोषण' याखेरीज दुसरं योग्य नाव असुच शकत नाही.

लग्नानंतर काही दिवसांनी घरी सुटकेसच्या आकाराचा आणि प्रचंड वजनाचा अल्बम येऊन पडला. या अल्बमला स्थलांतरीत करण्यासाठी कुठे चाकं आहेत का? ते आधी मी पाहू लागलो. अल्बमला चाकं नव्हती. म्हणजे आता प्रत्येकाला अल्बममधील फोटो अल्बमची स्थापना झालेल्या ठिकाणी येऊन पाहणे, सक्तीचं झालं. हे हल्लीचे अल्बम ग्रंथांसारखे महाकाय का असतात? हे कळायला मार्ग नाही.

मी आणि सौ.नी त्या अल्बमची दोन-तीन वेळा पाहणी केली. तेव्हा आमच्या असं लक्षात आलं, त्या अल्बममधील प्रत्येक फोटोत एक सुंदर तरूणी दर्शन देत होती. प्रत्येक फोटोत आपली शुभ्र दंतपंक्ती दाखवणारी ही तरूणी कोण? अशी विचारणा आम्हां उभयतांत झाली. पण ना ती वधुपक्षातील होती ना वरपक्षातील...अखेर तिला 'अपक्ष' ठरवून आम्ही उभयतांनी एकमेकांच्या 'तोंडी' न लागण्याचा निर्णय घेतला.

आमच्या लग्नात त्या फोटोग्राफरचं आणि त्या तरूणीचं सुत जुळलं आणि लवकरच त्यांचं 'शुभमंगल' झालं, ही माहीती गोपाळने त्यादिवशी पुरवली.

"त्या फोटोग्राफरच्या लग्नातले फोटो कुणी काढले असतील रे गोपाळ?" मी असला आचरट प्रश्न विचारताच गोपाळ त्याच्या वहीनीने त्याच्यासाठी टाकलेला चहा तसाच टाकून पळाला.

"अहो हा फोटो काही धड आलेला नाही." माझं मुंडकं नसलेला फोटो दाखवत सौ. म्हणाली.
"असं कसं म्हणतेस धड आलेला नाही ! मला तर या फोटोत केवळ माझं 'धड'च दिसतयं." माझा हा 'धड'धाकट विनोद सौ.ना कळला नाही.
माझं मुंडकं उडाल्याच्या दु:खाच्या तुलनेत सौ.ना हा विनोद कळला नाही याचं दु:ख अधिक होतं.
फोटोग्राफरांमध्येदेखील 'खाटीक' ही जमात अस्तित्वात असावी, हा नवा शोध मी तेव्हा लावून टाकला.

हल्ली कुणी माझा फोटो काढण्याचा प्रयत्न करताना दिसला की, मी आपल्या चेहर्‍यावर लागलीच मनोज कुमारांसारखा हात ठेवून देतो.

आताशा मी माझं प्रतिबिंब केवळ आरशात पाहायचं ठरवलयं, कारण आरसा खोटं बोलत नाही म्हणतात !

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटोग्राफरांमध्येदेखील 'खाटीक' ही जमात अस्तित्वात असावी, हा नवा शोध मी तेव्हा लावून टाकला. > Lol

माझा चेहरा अमोल पालेकर छापाचा असताना फोटोत तोच चेहरा रझा मुराद छापाचा कसा होतो? हे मला आजवर न उकललेलं कोडं आहे.>>> Lol

भारी लिवलंय . Happy

हे मी वाचलच नव्हतं... भारी जमलय. माझा छान (??) फोटो काढता येणारा फोटोग्राफर अजून जन्माला यायचाय.

मला तर या फोटोत केवळ माझं 'धड'च दिसतयं.
सावधान!!!!!
काही वर्षांनंतर सौ. सर्व लोकांसमोर "आमच्या यांना डोकेच नाही, मी बिचारी गरीब भोळी, मला दया आली म्हणून मी लग्न केल" असे म्हणेल नि हा फोटो दाखवेल पुरावा म्हणून..

तर शक्य तितक्या लवकर तो फोटो नाहीसा करा.

Pages