७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - तयारी.

Submitted by मनोज. on 16 June, 2016 - 12:35

मनरावने लेहवारी केली तेंव्हा भरपूर इनो घेतले होतेच. कांही गोष्टी ती लेखमाला वाचतानाच ठरवल्या गेल्या. एक म्हणजे बुलेट घेणे, दुसरी म्हणजे त्यावरून भरपूर भटकणे आणि एकदा लेहला जाणे.

तर पहिल्या दोन गोष्टी ठरल्याप्रमाणे पार पडल्या. लेहला जायचे जायचे असे विचार सतत सुरू होतेच, वरवरची माहिती काढणे, मार्ग कसा असेल त्याचा अंदाज घेणे आणि तेथे काय काय बघायचे याची सतत उजळणी सुरूच होती. मात्र इतकी रजा मिळेल का हा मुख्य प्रश्न होता. एका अर्जंट प्रोजेक्टमुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुफान काम करावे लागले. त्यावेळी दीड महिन्यात एखादी आठवड्याची सुट्टी मिळाली असेल. त्यावर उतारा म्हणून एक मोठी सुट्टी मंजुर झाली आणि पुन्हा लेहचे वेध लागले. या दरम्यान मित्रांचा एक ग्रूपही जमला होता. सुरूवातीला पांच जण तयार झाले होते; शेवटी रोहित, विजय आणि मी असे तीन जण जाण्याचे फायनल झाले.

गाडीचे पुणे-लेह-पुणे प्रवासाच्या अनुषंगाने खास सर्विसिंग करून घेतले. बेअरींग्स, प्रॉकेट्स, क्लच केबल, ब्रेक पॅड वगैरे पार्ट्स बदलून घेतले. आम्ही तिघांनी प्रॅक्टीस म्हणून एक ४०० किमीची राईडही केली. इतके मोठे अंतर कापण्याच्या दृष्टीने गाडीमध्ये किरकोळ बदल करणे आवश्यक होते.. आनंदरावांच्या मित्राकडे गाडीसाठी बकेट सीट बसवून घेतली. एक हवा तसा बॅक सपोर्टही मिळाला. (हा सपोर्ट मागच्या सीटसाठी उपयोगी आहे पण मला सामान ठेवण्यासाठीही याचा उपयोग झाला) योगेश बापट, कपिलमुनी त्यांच्या त्यांच्या मित्रांचे अनुभव सतत सांगत होते.. मनरावशी बोलणे सुरू होतेच. मनरावच्याच मदतीने रूट प्लॅनींग झाले आणि सामानाची यादी करणे सुरू झाले.

लेह ला जाण्यासाठी सोबत घेतलेल्या वस्तू आणि त्या मिळतील ती पुण्यातील ठिकाणे.

  1. LS2 आर्मर जॅकेट, रेन लाईन आणि विंटरलाईन सह (प्रो बाईकर शोरूम कँप)
  2. Pro Biker नी गार्ड (प्रो बाईकर शोरूम कँप)
  3. स्टीलचा टो असलेले भक्कम शूज (मकाटी स्टोअर्स कँप)
  4. थंडीचे आणि साधे पायमोजे.
  5. एक साधे चप्पल / फ्लोटर्स - संध्याकाळी भटकताना वापरण्यासाठी.
  6. ३ प्रकारचे हातमोजे १) डॉक्टर लोक्स वापरतात ते सर्जिकल ग्लोव्हज २) थंडीसाठीचे लोकरी हातमोजे ३) प्रो बाईकर राईडींग ग्लोव्हज. (हे सर्व प्रत्येकी २ नग - एक वापरण्यासाठी आणि एक बॅकप म्हणून)
  7. बलक्लावा आणि राईडींग मास्क.
  8. किमान २ गॉगल्स (मी दिवसाचे ३ आणि रात्रीचा एक गॉगल सोबत नेला होता).
  9. गरम वातावरणात वापरण्यासाठी ड्रायफिट टीशर्ट आणि थंडीसाठी पूर्ण हातांचे टीशर्ट.
  10. थर्मल वेअर्स.
  11. थंडीचे जॅकेट.
  12. एक भक्कम सॅडल बॅग (पीक स्टोअर्स भवानी पेठ.)
  13. एक बॅकपॅक / सॅक.
  14. सॅडल बॅग आणि सॅकचे रेन कव्हर.
  15. सॅक बांधण्यासाठी स्पायडर / ऑक्टोपस
  16. २ सेलोटेप - एक मोठ्ठा, बॉक्स पॅक करण्यासाठी वापरतो तसा आणि एक वायरमन कडे असतो तसा.
  17. दोरी / रोप.
  18. सर्व आवश्यक औषधांनी सज्ज असलेला फर्स्ट एड बॉक्स.
  19. आवश्यक ते सर्व क्रीम / फेसवॉश वगैरे वगैरे.
  20. पेपर स्प्रे (किंवा डिओ / मूव्ह सारखे स्प्रे पण पेपर स्प्रे सारखे वापरू शकता - गरज लागल्यास)
  21. गाडीची सर्व ओरिजिनल कागदपत्रे. (ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, इन्शुअरन्स, पीयुसी)
  22. आयडी प्रूफ आणि अ‍ॅड्रेस प्रूफ आणि वरील सर्व कागदपत्रांच्या किमान ५ प्रती.
  23. गाडीची दुसरी किल्ली (शक्यतो सोबत असलेल्या मित्राकडे द्यावी)
  24. गाडीला आवश्यक असणारे पाने, स्क्रू ड्राईव्हर्स आणि टायर उघडण्यासाठी लागणारी हत्यारे.
  25. गाडीचे आवश्यक ते स्पेअर्स आणि जादाची क्लच केबल आणि अ‍ॅक्सलरेटर केबल.
  26. जादाच्या (टायरमधल्या) ट्युब आणि पंक्चर काढण्याचे सर्व सामान.
  27. चेन ऑईलींग करण्यासाठी वेगळे ऑईल.
  28. पेट्रोल साठी कॅन. हा साधासा कॅन कुठेही मिळतो मात्र कॅन घेण्याचे शेवटचे ठिकाण मनाली समजावे. पण मी पुण्यातून नेला होता. (मनाली-लेह रस्त्यावर टंडी येथे शेवटचा पेट्रोल पंप आहे त्यानंतर ३६५ किमी कोणताही पेट्रोल पंप नाहीये त्यामुळे येथे ५ ते १० लिटर वेगळे पेट्रोल घ्यावेच लागते.)
  29. भरपूर प्रमाणात सुकामेवा, बाकरवडी, चिवडा, लाडू आणि चिक्की. हे सामान जवळजवळ दुप्पट प्रमाणात घेतले होते. मुख्यतः काश्मीर आणि लेह लदाख ला भेटलेल्या सैनिकांसाठी भरपूर साठा जवळ बाळगला होता.
  30. वेगवेगळ्या आकाराच्या भरपूर प्लॅस्टिक पिशव्या (शक्यतो झिप लॉक वाल्या)

वरचे सगळे सामान वेगवेगळ्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये तर कांही अत्यावश्यक सामान / खाद्यपदार्थ एकावर एक अशा दोन तीन पिशव्यांमध्ये व्यवस्थीत गुंडाळून व वरती रबरबँड ने पक्के जखडून घेतले होते.

वरचे सगळे सामान बॅगेत भरून आणि बॅग गाडीला बांधून एक १५-२० किमीची राईड केली आणि बॅग नीट बसत आहे का ते चेकवले.

निघण्याची तारीख शेवटपर्यंत नक्की होत नव्हती. शेवटी २६ मे ला प्रोजेक्ट पूर्ण झाल्याची घोषणा झाली आणि २७ ला निघण्याचे ठरले..!

चला तर मग.. जॅकेट चढवा, हेल्मेट घाला आणि लेहवारी साठी सज्ज व्हा..!!!

.........

(क्रमशः)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनाली पासून लेह करणारे बरेच बघितले... थेट पुण्याहून /\
सामानाची यादी बघुन हवा निघाली राव.. जबरदस्त मोहिम दिसतेय...

भरपूर प्रमाणात सुकामेवा, बाकरवडी, चिवडा, लाडू आणि चिक्की. हे सामान जवळजवळ दुप्पट प्रमाणात घेतले होते. मुख्यतः काश्मीर आणि लेह लदाख ला भेटलेल्या सैनिकांसाठी भरपूर साठा जवळ बाळगला होता. >>> कसली भारी आयडीया आहे!!

लेख आवडलाच, पुढच्या भागाची वाट बघणे चालू.

वर्णन तर भारी आहे..... वस्तुंचि यादी मस्त. बाकी येऊद्यात... Happy
फोटो दिसत नाहीयेत Sad

कांही गोष्टी ती लेखमाला वाचतानाच ठरवल्या गेल्या. एक म्हणजे बुलेट घेणे, दुसरी म्हणजे त्यावरून भरपूर भटकणे आणि एकदा लेहला जाणे.
>>>

आणि तिसरी त्यावर वृत्तांत लिहून आमची जळवणे Wink

किंवा उकसवून प्रोत्साहन देणे असेही बोलू शकतो Happy

खूप छान लेख!!
केव्हढी तयारी करावी लागते . सामानाची आणी मनाची सुद्धा .. अगदी कल्पना आली.
फोटोज पण सुरेख आहेत. बापरे!!खारडोंगला पास ची केव्हडी उंची आहे.. श्वासाचा त्रास होतो का तिकडे??
एक सजेशन.. प्रत्येक फोटोज ना क्रमांक टाकून, त्या त्या फोटोतील जागेबद्दल काही कॅप्शन्स टाकलेत तर अजूनच बहार येईल पाहायला..

सुरुवात मस्तं झालीये.. पुढचा वृत्तांत वाचायची उत्सुकता वाढलीये Happy

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

वर्षू - हा टीजर भाग असल्याने फक्त निवडक असे फोटो दिले आहेत. पुढील भागापासून कॅप्शनसह फोटो येतीलच.