२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग २

Submitted by वेदांग on 20 June, 2016 - 05:22

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - पुर्वार्ध
http://www.maayboli.com/node/58713

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग १
http://www.maayboli.com/node/58938

=========================================

काल दमलो असल्यामुळे मस्त झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता उठलो आणि शौचमुखमार्जन करून तयार झालो. सायकली काढून त्यावर खोगीरं चढवली आणि बाहेर येऊन उभे राहिलो. काल श्री. पाटीदारांनी प्रेमाने बजावल्याप्रमाणे आम्ही त्याची वाट बघत होतो. ५ मिनिटात श्री. पाटीदार आले. त्यांच्यासोबत बाहेरच्या हॉटेल मध्ये चहा घेतला आणि निघालो. सणकून थंडी होती तरी आम्ही मैय्या च्या काठावर स्नान करायची इच्छा श्री पाटीदारांकडे व्यक्त केली. श्री. पाटीदार आम्हाला “कंपनी” म्हणून आमच्यासोबतच येत होते. थोडेच अंतर गेल्यावर नावडा टोडीला एक फाटा लागला. श्री. पाटीदार आम्हाला थांबवुन म्हणाले “ यहासे ४ किलोमीटर अंदर जावो, आपको शालिवाहन राजा ने बांधा हुवा शिवजी का मंदिर मिलेगा, वहीसे मैय्या बहती है.” मनापासून धन्यवाद म्हणून निरोप घेतला आणि निघालो. कोण कुठचे आम्ही, ना ओळख ना पाळख, तरी कसलीही अपेक्षा न ठेवता किती आपुलकीने मदत केली. सर्व मैय्याची कृपा. नर्मदे हर|

कसरावद – बडी माता मंदिराच्या बाहेर श्री. पाटीदार यांच्या सोबत

फाट्यापासून आत गेलो आणि साधारण ४ किमी वर मंदिर दिसलेच. परिसर प्रचंड मोठा होता. मंदिराच्या पलीकडूनच मैय्या वाहत होती. आम्ही सायकली लावून खोगीरं काढेपर्यंत मागून खणखणीत आवाज आला “काय परिक्रमा करताय का? या इकडे चहा प्यायला.” अशी अनपेक्षित मराठी आरोळी ऐकून आम्ही सर्वजण उडालोच. मागे वळून बघितले तर ६५-७० वर्षांचे सद्गृहस्थ आमच्याकडे बघून स्मित करत होते. बघताक्षणी आपलेपणा वाटावा असे व्यक्तिमत्व. अत्यंत तेजस्वी आणि प्रसन्न चेहेरा, छातीपर्यंत रुळणारी पण व्यवस्थित विंचरलेली पांढरी दाढी मानेवर रुळणारे तसेच पांढरे केस आणि अंगावर फक्त सोवळे. आम्ही कुतूहलाने त्यांच्या जवळ गेलो. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. त्यांचे नाव “भंडारी बाबा”. मंदिराच्या समोरच एक अगदी छोटा आश्रम आहे त्याचे हे महंत. पहिल्यांदी आम्हाला तो आश्रम दिसलाच नव्हता. बाबा आम्हाला आत घेऊन गेले आणि बसायला जागा दाखवली. बाबांचा जन्म इकडचाच पण बरीच वर्षे महाराष्ट्रामध्ये राहिल्यामुळे मराठी अस्खलित बोलतात. अगदी “ण” ला “ण” आणि “ळ” ला “ळ”. तिकडच्या एका सेवेकऱ्याने लगेचच थर्मास मध्ये चहा भरून आणला आणि भरपूर चहा प्यायला दिला. बाबा म्हणाले “तुम्ही स्नान करा आणि शंकराचं दर्शन घ्या, तो पर्यंत मी स्वयंपाक करतो, जेवूनच जा.” मी विचार केला ‘आत्ता जेमतेम ७ .३० वाजतायत इतक्या सकाळी जेवण?’ त्यावर माझे बाबा भंडारी बाबांना म्हणाले कि “जेवणाचा घाट घालत बसू नका, आम्ही स्नान करून लगेचच निघणार आहोत, तुमच्याकडे चहा घेतलाच कि, जेवायला परत येऊ.” पण भंडारी बाबा बहुदा ऐकण्याच्या मूड मध्ये नसावेत. म्हणाले “तुम्ही स्नान करा...पण तुम्हाला जेवल्याशिवाय काय सोडणार नाही मी. आणि तुमची वेळेची अडचण असेल तर त्याची काळजी करू नका, मी तासाभरात जेवण तयार करतो.” आता काही इलाज नव्हता. आम्ही मुकाट्यानी मैय्यावर स्नानासाठी गेलो. बाहेर थंडी होती पण मैय्याचे पाणी कोमट होते. मन तृप्त होईपर्यंत स्नान केले.

शालिवाहन येथील शिव मंदिर

महेश्वर संस्थान

महेश्वर संस्थान

शालिवाहन च्या समोरच्या तीरावर अहिल्याबाई होळकरांचे संस्थान अर्थात महेश्वर गाव आहे. अहिल्याबाईंनी बांधलेला किल्ला या तीरावरून फारच भव्य आणि सुरेख दिसत होता. स्नान करून आम्ही परत मंदिरापाशी आलो आणि शंकराचे दर्शन घेतले. मंदिर अगदीच साधे आहे आणि प्राचीन सुद्धा वाटत नाही. त्यामुळे हे मंदिर शालिवाहन राजाने बांधले असेल याची खात्री नाही. दर्शन झाल्यावर आम्ही मैय्याची आरती केली व मी आणि बाबांनी रुद्र म्हणले. मंदिराच्या बाहेर आलो तोच एक वल्ली माणूस भेटला. आम्हाला बघून गाणं म्हणायला लागला आणि नाचायला लागला. मग त्यानंतर शीर्षासन करून दाखवले. आणि परत गाणी म्हणत नाचायला लागला. मग इति काका पण रंगात आले आणि ते सुद्धा गाण्यांवर नाचायला लागले. हा खेळ जवळपास १०-१५ मिनिटे चालू होता. शेवटी आम्ही निघालो आणि भंडारी बाबांच्या आश्रमात येऊन बसलो. थोड्याच वेळात जेवण तयार झाले. चविष्ट डाळ (आमटी), जाड पण अत्यंत मऊ रोटी आणि भात असा बेत होता. भूक लागली होतीच. लगेचच जेवायला बसलो. आमच्या समोरच भंडारी बाबा रोट्या करत होते. पोळ्या इतक्या सुरेख आणि कुठल्यातरी सुगरण बाई ने कराव्या तशा गोल गरगरीत होत्या. मी थक्कच झालो. बारकाईने लक्ष देऊन बघितले तेव्हा लक्षात आले. बाबा ३-४ पोळ्यांना पुरेल एवढी कणिक घेत, त्याचा गोळा करून २-३ वेळा कोरड्या पिठात बुडवत आणि अशा खुबीने रोटी लाटत की लाटता लाटता रोटी आपोआप गोल फिरायची. आणि त्यामुळे एकदा पोळपाटावर ठेवलेल्या पोळीला ते डायरेक्ट तव्यावर ठेवायच्या वेळीच हात लावायचे. पोळी फिरवण्यासाठी हात लावायची भानगडच नाही. बाबांना डाळ – रोटी वर आडवा हात मारता मारता मनातून साष्टांग नमस्कार घातला. २-३ पोळ्या खाल्ल्यावर पोट तुडुंब भरले. भात फक्त नावापुरता घेतला. मग बाबांना नमस्कार करून निरोप घेतला आणि सायकलींजवळ आलो. परत एकदा खोगीरं बांधली आणि टांग मारून पुढे निघालो. घड्याळात बघितले तेव्हा ९.३० वाजून गेले होते.

श्री भंडारी बाबांसमवेत

नावडा टोडी पासून उजवीकडे वळून आम्ही खलघाट च्या रस्त्याला लागलो. आता थंडी कमी झाली होती त्यामुळे अंगावरचे गरम कपडे काढून ठेवले. खलघाट च्या २-३ किमी अलिकडे श्रीरामाचे अत्यंत सुरेख आणि प्रेक्षणीय मंदिर आहे. बाहेरूनच ते मंदिर इतके सुंदर वाटले की आत जाण्याचा मोह आवरता आला नाही. मंदिराचा परिसर प्रचंड मोठा आहे आणि राम-लक्ष्मण आणि सीता मैय्याच्या सुरेख मुर्त्या आहेत. तिथेच देवी, हनुमान आणि राधा-कृष्णाच्या सुद्धा मुर्त्या आहेत. मन प्रसन्न झाले. दर्शन घेऊन १० मिनिटे बसलो आणि लगेचच निघालो. थोडे पुढे गेल्यावर आम्हाला मुंबई-आग्रा हायवे लागला. आम्ही अंदाजाने डावीकडे वळून रस्ता धरला. मऊ लोण्यासारखा रस्ता होता. सुसाट निघालो. साधारण १० किमी झाल्यानंतर आमच्या लक्षात आले की आम्हाला जी गावे लागणे अपेक्षित आहेत ती येतच नाहीयेत. मग आम्ही एका धाब्यावर थांबून व्यवस्थित चौकशी केली तेव्हा लक्षात आले की आपण विरुद्ध बाजूला आलो आहोत. आता १० किमी परत उलटे जायचे हे लक्षात आल्यावर जाम चिडचिड झाली. पण दुसरा पर्याय नव्हता. त्याच धाब्यावर थंडगार ताक पिऊन परत त्याच दिशेला निघालो. बरुफाटक आल्यावर खजुरी फाट्याला आत वळालो. आत वळालो आणि अत्यंत खराब रस्ता सुरु झाला. प्रचंड खडबडीत रस्ता आणि भरपूर खड्डे. पोपटच झाला आमचा. बराच वेळ रस्त्यावरून जात होतो तरी रस्ता संपेचना. शेवटी कंटाळा आला. वाटेत छोटे गाव दिसले तिकडे थांबून सामोसा, जिलबी, फरसाण आणि चहा असा दणकून नाश्ता केला. जिलबी गुळाच्या पाकातली होती. पहिल्यांदाच खाल्ली पण चांगली लागली. पोटभर खाऊन झाल्यावर पैसे द्यायला गेलो तर हॉटेल मालक पैसे घेईना. खूप आग्रह केला पण तरी तो ठाम होता. शेवटी नर्मदे हर म्हणुन निघालो.

श्रीराम मंदिर

श्रीराम मंदिर

श्रीराम मंदिर

श्रीराम मंदिर

राधा-कृष्ण

हनुमान

श्रीराम मंदिर

रस्ता अजुनही परीक्षा घेत होता. पुढे राजपूर नावाचे गाव लागले. तिकडे पुढच्या रस्त्याची चौकशी केली तेव्हा असे कळले कि पुढचा रस्ता असाच खराब आहे आणि त्याशिवाय एक घाट सुद्धा आहे. थोडा वेळ थांबुन चर्चा केली आणि शेवटी राजपूरलाच राहायचा निर्णय घेतला. पुढे साधारण १० किमी पर्यंत गाव नव्हते आणि रस्ता पण खराब, शिवाय तेव्हा संध्याकाळचे ५ वाजून गेले होते. आमची चर्चा चालू असतानाच आमच्या भोवती बराच मोठा घोळका जमा झाला. आम्ही घातलेली हेल्मेट, ग्लोव्हज, गॉगल, शूज आणि जर्सी अशी सगळी आयुधं पाहून बरेच वेळा असा घोळका आमच्या भोवती जमा व्हायचा. त्यांना राहण्याच्या सोयीबद्दल विचारले असता त्यांनी साईबाबा-संतोषी माता मंदिर सुचवले. सुदैवाने आम्ही जिकडे थांबलो होतो तिथुनच मंदिराकडे जायला रस्ता होता. आम्ही सर्वजण मंदिराच्या आवारात गेलो. मंदिर बऱ्यापैकी मोठे आहे. आम्ही आमचे सामान ठेवले आणि कपडे बदलून दर्शन घेतले. वेळ होता म्हणून इती काका सायकलची साफ सफाई करायला लागले ते पाहुन सर्वजण त्यांचे अनुकरण करू लागले. नंदू (घाटपांडे) काका सायकल साफ करत असताना त्यांच्या लक्षात आले कि त्यांची सायकल पंक्चर झाली आहे. मागचे टायर चपटे झाले होते. मग पंक्चर काढून आम्ही जरा विश्रांती घेतली. संध्याकाळी ७-७.३० च्या सुमारास श्री. सनंदन द्विवेदी नावाचे गृहस्थ आले. त्यांनी खाण्याची विचारपूस करून आम्हाला कळविले कि मंदिरातच तुमची जेवणाची सोय केली आहे. मंदिराच्या महंतांनी तुमचा स्वयंपाक केला आहे. तरी तुम्ही संकोच न करता जेवण करा असे सांगून निघुन गेले. आम्ही संध्याकाळची आरती करेपर्यंत जेवणाची वर्दी आलीच. वांग-बटाटा भाजी, रोटी, डाळ आणि भात असा बेत होता. पोटभर जेवून आमच्या झोपण्याच्या जागी आलो तोच श्री. द्विवेदी परत येऊन म्हणाले. “वैसे तो मुझे आपको भोजन के लिये बुलाने कि बडी इच्छा थी, पर बाबाजी ने इधर आपके लिये पेहेलेसे भोजन का प्रबंध किया था. पर अब मेरी ये इच्छा है के आप कल सुबह हमारे घर नाश्ते के लिये आ जावो. मुझे और मेरी पत्नी को बडा आनंद होगा”. आम्ही त्यांना धन्यवाद म्हणालो आणि आमची लवकर निघण्याची अडचण सांगितली. त्यावर त्यांनी सकाळी ६ वाजता नाश्ता तयार ठेवण्याची तयारी दाखवली. त्यांना उगाच त्रास नको म्हणुन आम्ही नाही म्हणालो पण ते ऐकेनात. शेवटी त्यांना हो म्हणून आम्ही स्लीपिंग bag मध्ये शिरलो. आजचा दिवस काही मनासारखा नव्हता. आमचे १०० किमी चे टार्गेट पूर्ण झाले नसल्यामुळे उद्या जोर लावायला लागणार होता. उद्या काही झाले तरी आजची कासार भरून काढायची असे ठरवून आम्ही सर्व झोपी गेलो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलयं. शिव मंदिरातून घेतलेला किल्ल्याचा फोटो सुंदर आहे. तो रेखीव भव्य किल्ला आणि समोरची शांत स्थिर नर्मदा नदी.
कित्ती सुंदर जागा आहेत आपल्या देशात!

अहाहा..... अगदी तुमच्या बरोबरच आमचीही नर्मदा परिक्रमा होणार तर... Happy
इथे फोटोसहित देत असल्याबद्दल धन्यवाद. Happy

शिव मंदिर आणि किल्ला - कसलं भारी लोकेशन आहे !
ते शेवटचं राम-सीता मंदिर किती स्वच्छ आहे, आणि गर्दी पण नाही.
. सर्व ठिकाणी तुम्हाला आपुलकीचा , माणुसकीचा प्रत्यय येतोय ते वाचून देखील अगदी मस्त वाटतंय. मस्त लिहिताय

फोटो एकदम मस्त आहेत...आणि असे वाटते कि आपली पण नर्मदा परिक्रमा पूर्ण होणार...
आपल्या महाराष्ट्रत असे कधी मंदिर होणार ?

खुप छान लिहिताय! .
श्रीराम मन्दिर सुन्दरच आहे. परिसरही छान!

महेश्वरच्या आठवणी ताज्या झाल्या. डिसेंबर मधे महेश्वर, सहस्त्रधारा, उज्जैन, इंदौर , ओंकारेश्वर अस जाउन आलो होतो. नविन वर्षाची सुरुवात नर्मदामाईच्या दर्शनाने व्हावी अशी इच्छा होती. आणि तशीच झालीही.
वरच्या ४थ्या महेश्वर घाटाच्या फोटोत उजवीकडे गुलाबी उंच बिल्डीन्ग दिसतेय ते राज पॅलेस हॉटेल, तिथेच आमची रूम होती. महेश्वरला एकदम स्वस्ताई आहे.

vadang ,

cycle parikrametil sarvat lahan sadasya !!! punha ekada ya lekha mule maiya (narmad) Bhetnar yacha khup anand hotahe. Narmade Har !!!! pudil lekhachi sarvanpramane mala pan utsukata lagali ahe !!!

तुम्हा सर्वांकडून मिळालेल्या भरभरून प्रतिसादामुळे मी कृतकृत्य झालो. यामुळे मला लिहिण्याची प्रेरणा मिळते. मी काही लेखक नाही. जे अनुभवले आहे ते शब्दात उतरवायचा प्रयत्न करतो. पुढचे भाग टाकत जाईनच. असाच लोभ असू द्या. मनापासून धन्यवाद.

वेदांग

वेदांग,

हाही भाग मस्त झाला आहे,. फोटो एकदम सुंदर आले आहेत. श्रीराम मंदिर आणि महेश्वर चे फोटो खुपच आव डले . पुढील भागाच्या प्रतिक्षेत. जरा लवकर टाक ण्याचा प्रयत्न करण्याची विनंती.

लिखाणाचा ओघ मस्त आहे. सुंदर अनुभव आणी सुंदर शब्दांकन!

एक व्याकरणात्मक सुधारणा सुचवतो:

"सुरेख मुर्त्या आहेत. तिथेच देवी, हनुमान आणि राधा-कृष्णाच्या सुद्धा मुर्त्या आहेत." मूर्ती मधला ऊकार दीर्घ आहे आणी मूर्ती चं अनेकवचन मूर्ती च होतं.

.

खूप मस्त वर्णन. मीही सोबत परिक्रमा करतेय, प्रत्यक्ष कधी कारेन तेव्हा याच आठवणी सोबत असतील, नजर या जागा शोधतील.