पाचोळा -३ अन्तिम

Submitted by स्टीव रॉजर्स on 16 June, 2016 - 05:35

आतुन कसली तरी अगम्य गुणगुण ऎकु येत होती.त्या विक्रुत आवाजाने डोके जड व्हायला लागले.कसातरी आधार घेत मी खोलीत डोकावलो, आणि ह्रदय एक क्षणासाठी थांबलेच.खोलीत मिणमिणता प्रकाश पसरलेला होता, अख्खी खोली पानांनी भरलेली होती.त्याच प्रकाशात एक बाई दोन पाळण्यात फावड्याने ती पाने भरत होती.मध्येच ते पाळणे पुढे मागे करत होती
,मेंदू कुरतडुन निघाल्यासारखा वाटला, भयंकर ओरडलो,पण तोंडातून आवाज आलाच नाही,तेवढ्यात त्या आक्रुतीने मागे पाहीले.चेहरा? परमेश्वरा. . . . चेहरा नव्हताच, सर्वत्र माती,पाने चिकटलेली होती. मी धडपडत मागे फिरलो, आणि एका खोलीत शिरलो.धाडकन दरवाजा लावून टाकला. दरवाजालाच चिकटून थरथरत उभा राहीलो.थंडीने अंग कापत होते.
.
.
.

तेवढ्यात मागे परत काहीतरी हालचाल सुरु झाली.कोणतरी फावडे जमिनीला घासत होते.हम्हम्हम्हम गुणगुण आता जवळ जवळ येत होती

फावड्याची खरखर माझ्यामागे पोहोचली होती. मी तसाच थरथरत उभा होतो. मागे कोणीतरी घुमत होते. एक एक पाऊल जवळ येत होते. माझे पूर्ण शरीर आता बर्फ खालेले होते.दातखीळ बसलेली होती. मागे वळून पाहण्याची हिंमतच नव्हती. पायतले त्राण गेले आणि मी खाली कोसळलो.पडताना पँट च्या खिशातुन काहितरी आवाज करत खाली पडले. ती गणपतीची मुर्ती होती.(मगाशी घाइगडबडीत मी ती परत खिशात ठेवली होती) मूर्ती पडताच क्षणी उष्णतेचा एक लोट अंगावर येऊन गेला.प्रचंड किंकाळ्यांनी ती अभद्र खोली दणाणून गेली.मी कसाबसा हात लांब करुन ती मुर्ती हातात घेतली. किती वेळ गेला समजले नाही. आता मागे कुणीच नव्हते.बाहेर पडायची हिंमत नव्हती. ती अगम्य बडबड सुरूच होती. केव्हातरी अती ग्लानी ने डोळा लागला असावा.

जाग आली तेव्हा सूर्याची किरणे खोलीतुन आत आलेली होती.अाता तिथे सगळे सामान्य होते .माझ्या हातात ती मुर्ती अजूनही घट्ट पकडलेली होती. तसाच भेलकांडत उठलो. खोलीत नजर टाकली.सर्व उंची सामानाने ती भरलेली होती. एका कोपर्यात प्रचंड शिसवी पलंग होता. वर महागडे झुंबर होते. ठिकठिकाणी उंची नक्षीकाम केलेले आरसे होते.जमिन पूर्ण लाकडी होती. बरीच चांदीची भांडी होती.आता मळलेले पण एकेकाळी अतिशय सुंदर असणारे पडदे होते, लोड तक्के काय नव्हते तिथे.चित्रपटात दाखवतात तसे खानदानी द्रुष्य होते,पण आता त्यावर धुळीची पुटे चढलेली होती.एका खांबावर एक मोठी फ्रेम लावलेली होती. मी जवळ जाउन त्यवरची धुळ फुसली.एका अत्यंत लावण्यवतीचे ते तॆलचित्र होते. मागे एक रूबाबदार वाटणारा,पण डोळ्यात क्रुर हावभाव असलेला तरुण होता( येस हे देशमुखांच्या तारुण्यातले चित्र असावे) सोबत दोन अतिशय गोंडस मुली होत्या. सर्वजण पारंपारिक वस्त्रात होते. खाली चित्रकाराची सही आणि तारीख होती,त्यावरची धुळ पुसून तारीख वाचली आणि हादरलोच ,१८४५ साल होते. पुन्हा पुन्हा तो चेहरा मी तपासून पाहीला, ते देशमुखच होते. कस शक्य आहे?कदाचित ते देशमुखांचे पणजोबा असतील, पण त्यांच्या हनुवटीखाली असलेली ती जन्मखूण ती ही तशीच होती.मी ज्या देशमुखांना साठीचे समजत होतो ते वयाने दिडशे वर्षांपेक्षाही जास्त होते? गुंतागुंत वाढत चाललेली होती.बाजूच्या लाकडी टेबलांमध्ये काही मिळतय का म्हणुन शोधाशोध केली. तिथे एक जुनाट पेटारा सापडला, आजुबाजुचा अदमास घेत हळूच तो ओढून उघडला, आत अनेक मोडी आणि मराठीतली कागदपत्रे होती. एका जमिनीच्या संदर्भातल्या कागदावर सही दिसली. "दादा देशमुख १८३४" आता संशयाची खात्रीच झालेली होती. त्या चित्रात देशमुखच होते.हे कसे शक्य होते, एखादा माणुस १५० च्या वर कसा काय जगू शकतो,बरे जगला तर इतका हिंडता फिरता? प्रश्नांची यादी वाढत चालली होती.
"तुला सांगितलेले वर येऊ नकोस म्हणुन " देशमुखांचा चरचरीत आवाज आला आणि मी एकदम दचकलो, हातातली कागदपत्रे खाली पडली. दारात देशमुख उभे होते. हातातली काठी खाली आपटत हळूहळू चालत ते पुढे आले, तसा मी घाबरुन उभा राहीलो
मानवी मन खूप हट्टी असते नाही? जे करायला मज्जाव केला जातो, तेच करायला ते तडफडत असते.या प्रकरणात तूर्तास तुला भय नाही असे सांगितलेले होते.तरी तु वर आलास,या खोलीत आलास म्हणजे बरीच शोधाशोध देखिल केलेली दिसतेय.आँ?

नाही म..म्हणजे काल रात्री वर कोणीतरी व..वर.. म्हणजे. ते

माझ्या तोंडातून शब्दच फुटणे बंद झाले होते, देशमुखांची नजर. बापरे, त्यांचे लालडोळे विचित्रच लकाकत होते.त्यातली बुबुळे आता काळ्या मण्यांसारखी लहान मोठी होत होती.

काय होते वर? कोण दिसले तुला? काय म्हणतोय मी इकडे बघ.

आवाज फार लांबून यायला लागला. खोली हळूहळू धुसर व्हायला लागली, डोक्यात कलकलायला लागले. आजुबाजुचे आकार वितळायला लागले.आधारासाठी धडपडत बाजुला सरकलो आणि पडलोच. आता अख्खी खोली धुराने भरुन गेल्यासारखी वाटत होती. देशमुखांचे फक्त लाल डोळे तेवढे दिसत होते. ते जवळ जवळ येत होते.लाल काळी वलय मोठी मोठी व्हायला लागली. काहीतरी आजुबाजुला वावरायला लागले.काळ्या सावल्या.धुरात सत्य असत्याची सिमारेषा धुसर व्हायला लागली.तोंडात कडु चव पसरायला लागली.आणि मी खाली कोसळलो

**

जाग आली तेच भणभणणार्या डोक्याने, प्रचंड गरगरत होतं,डोळ्यांसमोर अजुन ती लाल वर्तुळे फिरत होती, आजुबाजुला मिट्ट काळोख पसरलेला होता.मी असाच फरशीवर पडलेला होतो.दगडी फरशी, ओली. कुठेतरी पाण्याचा आवाज येत होता. दमट वातावरण होतं, कसलातरी अनोळखी असा वास येत होता.मी उठायचा प्रयत्न केला पण पायाला साखळी बांधलेली होती. भितीची लाट अंगावर आली.मी खच्चुन ओरडलो, मला वाचवा, मला सोडवा इथून, माझ्याच आवाजाचे कित्येक प्रतिध्वनी माझ्यावरच आदळले.कसला तरी फडफडण्याचा आवाज आला,दुसर्याच क्षणी हजारो वटवाघळे माझ्या डोक्यावरुन उडायला लागली ,मी अजुनच ओरडायला लागलो. पाच एक मिनिटांनी तो प्रकार थांबला.मी कुठल्यातरी तळघरात होतो. कसलातरी मशिन चालवल्यासारखा आवाज येत होता, काहितरी सरकवल्यासारखा. त्या कुबट वासानेच गरगरायला लागलेले होते,अचानक कोणीतरी आजुबाजुने सरकले, मी परत धडपडलो,मागे भिंत होती,तिचा आधार घेउन अंधारात डोळे फाडत बघण्याचा प्रयत्न करायला लागलो.माझ्या आजुबाजुला कोणीतरी वावरत होते, काहीतरी अमानवीय, काळ्या कभिन्न अंधारातही काही लवलवत्या सावल्या आकार घेताना दिसत होत्या.इतक्यात कुठुन तरी क्षीण प्रकाश दिसायला लागला,कोणाची तरी चाहुल लागली, बहुतेक कुणीतरी पायर्या उतरत होते.ग्लानी इतकी आलेली होती की काहीच समजेनासे झालेले होते,काही क्षणातच तो प्रकाश जवळ जवळ यायला लागला, ते देशमुख होते, एका हातात कंदील घेउन ते समोर उभे होते,चेहर्यावर भेसुर हास्य होतं.अतिशय दुर्गंधी पसरलेली होती. देशमुखांचा आधीचा बिचारा,आजारी वयोव्रुद्ध माणसाचा मुखवटा आता गळुन पडला होता.समोरचा देशमुख आता वेगळाच होता.
तुला काय वाटले,वाड्यात मी नसलो म्हणजे तु मोकळा की काय? देशमुख जीभ लपलप करीत खिदळला. तुझ्या प्रत्येक हालचालींवर माझ्या हस्तकांची नजर होती.हे बघ ते,असे म्हणुन देशमुखाने डावा हात वर केल्यावर त्या काळ्या सावल्या आजुबाजुने फिरायला लागल्या. इतक्यातच तुला काही समजु द्यायचे नव्हते. पण गोष्टी माझ्या आवाक्याबाहेर जायला लागल्या, त्याचा बंदोबस्त करण्यासाठीच मला बाहेर जावे लागले,तोवर इथे तु गडबड करणार हे ठाउक होतेच मला. पण सगळे तोडगे घेउनच आलोय सोबत. ह्या खेपेला माझा विधि पूर्ण होणारच. या देशमुखाच्या जीर्ण शरीरातुन मुक्ती.
देशमुखाचे विक्रुत खिदळणे टिपेला पोचलेले होते.काय घडतेय काहीही समजत नव्हते.पायातल्या बेड्या निघता निघत नव्हत्या.

देशमुख बोलायला लागला,

तु इतका हुषार निघशील असे वाटले नव्हते,बराच टिकलास. एका अर्थी बरेच झाले. आधीचे माझे बळी "तिला" घाबरुनच मरण पावले.मेल्या नंतरही माझ्या मार्गात अडथळा बनुन राहीली होती.पण आता मी तिला आणि तिच्या मुलींनाही ताब्यात आणलय हे बघ म्हणुन देशमुखांनी हातातली पुड एका कोपर्यात टाकली. भसक्कन गुलाबी रंगाच्या आगीचे एक वर्तुळ तयार झाले. त्या वर्तुळात, उजेडात मला ती परत दिसली. भयाण!!!! जागच्या जागी गोल गोल फिरत होती, तिच्या सोबत त्या दोन मुली, नुसतीच पांढरी पडलेली चिपाडं. कुठला विक्रुत खेळ सुरु होता देवा हा?
मला ,मला जाउद्या. दया करा मी विनवणी करायला लागलो.

अरे तु अमर होणार आता वेड्या! ! तुझ्या अात्म्याला या नश्वर शरीरातुन मी मुक्त करणार आहे, हे शरीर काही वर्ष तरी माझ्या कामी येइल, देशमुख तोंड वेंगावुन बरळला.

खुप वर्ष या देशमुखाच्या शरीरात राहीलो. मोठी चूक झाली.

को.. को.. कोण आहेस तु? भयाने माझ्यावर आता पूर्ण कब्जा केलेला होता.

देशमुखाच्या चेहर्यात आता बदल व्हायला लागले होते, आता त्याची त्वचा पुर्णच सुरकतुन गेलेली होती ,डोळ्यांच्या खोबण्याच शिल्लक राहिल्या होत्या.

मी? मी अंगराळ, नेतेस्तु जगातला एक सम्राट. इथल्या काही कोटी वर्षापूर्वीपासुन आमचे विश्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. काळाच्या कुठल्यातरी धाग्यावर तुमची प्रुथ्वी आणि आमचे विश्व समांतर आले.त्याच वेळी आम्ही इथल्या जगात प्रवेश केला.इथल्या सगळ्याच रचना,मिती भिन्न होत्या, कसातरी आमचा टिकाव लागला.आम्हाला अशी शरीरे नाहीत.आमचे खरे रुप कदाचित तुला दिसणार नाही.पण तुम्हाला प्रवास करायचा तर जसे वाहन लागतेच,तसाच वापर जगण्यासाठी आम्ही तुमच्या शरीराचा करतो.पण मुख्य अडचण अशी की तुमचे शरीर खुपच क्षणभंगुर आहे. जेमतेम काही वर्षेच तग धरते. सतत बदलावे लागते.तुमच्याच पुर्वजांनी लिहिलेले अनेक ग्रंथ मी अभ्यासले,मानवी शरीराचा अभ्यास केला( तो मी त्या कपाटांमध्ये पाहिलाच होता) आमचा काळ आणि इथला काळ यात सांगड घालता चिरकाल टिकणारे वाहन मला हवे आहे , आजही ठराविक रात्री जेव्हा काही नक्षत्र ठराविक रेषेत येतात आमच्या विश्वात आम्हाला ठराविक काळासाठी प्रवेश करता येतो.

मग तु इथल्या भाषेत कसा काय बोलतो आहेस? मी विचारले

हा हा फारच मामुली प्रश्न, मी फक्त या शरीरात चॆतन्यरुप आहे, माझ्या भावना यातला मेंदू आपोआप तुमच्यापर्यंत पोचवतोच,तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण या प्रुथ्वीवरचे सर्वात उत्कृष्ट यंत्र आहे हे शरीर.

तर मी कुठे होतो? हा तर आमच्या विश्वातला प्रवेश काही काळासाठी उघडला की आमच्या शक्ती,आमची साधने घेउन आमच्यासारखेच नेतेस्तु मधले इतर सम्राट त्यांच्या हस्तकांना घेउन इथे उतरतात.इथल्या प्रत्येक गोष्टीत आम्हाला शिरता येते.पण पण काही ठराविक जागाच त्यासाठी लागतात अजुन तरी, आमचे क्षेत्र आम्ही वाढवत चाललेलो आहोत.कारण आता "ते "येण्याची वेळ झालेली आहे.सुरवातीला काही मिनिटे आम्हाला तुमची शरीरे वापरताना त्रास झाला.म्हणजे तुमची अनेक वर्षे बरं का. आम्हाला तुमच्या मेंदूचा वापर करता यायचा नाही तो म्रुत व्हायचा. त्याशिवाय शरीरे किती टिकणार? आता तोही मुद्दा निकालात निघालात. आम्हाला तुम्हाला न दिसणार्या चॆतन्यावर तुम्ही ज्याला आत्मा म्हणता त्यावरही सत्ता गाजवता येते.
इतक्यात त्या गुलाबी वर्तुळात परत हालचाल दिसायला लागली, भयानक किंकाळ्या ऎकायला यायला लागल्या. ही या देशमुखाची बायको आणि मुली.या देशमुखावर मी तुमच्या कोकणातल्या एका गढित ताबा मिळवला.माझा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला ज्यात मला एखादे मानवी शरीर त्याच्या आठवणींसकट मिळाले.पण याच्या बायकोला नंतर नंतर माझ्यावर संशय यायला लागला.इकडचे देशमुख घराणे फार नावाजलेले होते,पण तेही धुळीला मिळाले.माझे चालणारे प्रयोग हेच कारण होते. गावकरी घाबरुन फिरकेनासे झाले.मलाही तेच तर हवे होते, पण एकदा एका शरीरावर प्रयोग करत असताना ह्या बाईने मला माझ्या मूळ रुपात पाहीले.आणि मुलींसकट तिलाही संपवले आणि समोरच्या वडाखाली पुरुन टाकले.मुलींना विहिरीत टाकुन दिले.आता मला माझे प्रयोग निर्धास्त करता येणार होते.पण काहीतरी गडबड झाली.ती बाई आणि मुली परत वाड्यात दिसायला लागल्या.यावेळी त्यांची ताकद वाढलेली होती.सरळ सरळ माझ्यावर हल्ले व्हायला लागले.देशमुखाचे शरीर मला टिकवायचे होते.ती बाई कुठल्या मितीत होती तेही कळत नव्हते. तुझ्यासारखे अनेक बळी तिनेच संपवले.मला या शरीरातुन बाहेर पडणे शक्य होत नव्हते.कारण बाहेर देखिल प्रयत्न केला तरी ही माझा पिच्छा सोडायला तयार नव्हती.उलट लोकांचा संशय वाढला असता. इथेच राहुन हिचे चॆतन्य संपवणे हाच एक मार्ग होता.शेवटी कालच उपाय सापडला,जो तु बघितलास. आता ही बंदिस्त झालिये. तुझे शरीर आता काही वेळातच माझे होणार.मला "त्यांच्या" आगमनाची तयारी करायला ताकद मिळणार.
देशमुखाचे भेसुर हास्य आणि त्या वर्तुळातल्या किंकाळया ह्यांनी वेडाचे झटके आल्यासारखे व्हायला लागले. हा देशमुख इतका वेळ काय बरळत होता मला काहीच कळत नव्हते,पण याला ठार वेडा विक्रुत म्हणावे तर समोर जे काही घडतय तेही भयंकर होते. माझा जीव आता काही क्षणांचाच सोबती होता.
आता ओरडून मदत मागण्यात सुद्धा काही अर्थ नव्हता.देशमुखातल्या त्याने टाळी वाजवली आणि आजुबाजुने सावल्या सरकायला लागल्या. मला खेचतखेचत तळघरातल्याच एका खोलीत नेण्यात आले . तो विचित्र दर्प अजुनच दाट झाला. हलका गुलाबी काळपट प्रकाश पसरलेला होता.मेणासारखी लिबलिबित विचित्र यंत्रे सुरु होती, मधोमध एक चॊथरा होता.त्यावर अनेक आक्रुत्या कोरलेल्या होत्या.आजुबाजुला बघवतही नव्हतं, कुठले कुठले आकार वावरत होते. त्या चॊथर्यावर मला टाकले गेले. वरती एक धुरांड्या सारखा पाईप होता, तो थेट वर पर्यत गेलेला होता, वरचे आकाश त्यातुन दिसत होते.बांधलेल्या अवस्थेत बसणे अशक्य होत होते.मी परत एकदा मदतीसाठी ओरडून पाहीले पण आवाज येतच नव्हता.
आजुबाजुचे सगळेच आवाज थांबले,एक निर्वात पोकळी निर्माण झाली देशमुख एकटक माझ्याकडे पहात समोर उभा होता.आता कसली वाट पाहात होता तो? आजुबाजुचे आकार क्षणाक्षणाला बदलत होते. इतक्यात जोरदार आवाज झाला,आणि वरतुन वादळाचा झंझावात आत घुसला, इतका की देशमुखाचे जीर्ण शरीर त्या वार्याने फेकले गेले. तसाच खदाखदा हसत देशमुख उठला, लंगडत लंगडत माझ्याजवळ आला, त्या पोकळीतुन त्याने वर पाहीले, म्हणाला बघ वर, आमची स्रुष्टी! मी वर पाहीले एक चंद्रासारखाच गुलाबी ग्रह दिसत होता,त्यातुन गुलाबी किरण उत्सर्जित होत होते, चांदणे पडल्याप्रमाणे तो प्रकाश आता माझ्यावर पडला,देशमुख काहीतरी अगम्य भाषेत गुणगुणायला लागला.माझ्या डोक्यातली कलकल वाढायला लागली, आजुबाजुचे वातावरण तापायला लागले. बरगड्या तुटतील इतका ताण छातीवर पडायला लागला,माझा म्रुत्यु मला दिसायला लागला.मी डोळे मिटून घेतले.इतक्यात जोरदार आवाज होऊन सर्व बंद खिडक्या तुटून पडल्या, पाचोळ्याची वावटळ आत घुसली,सगळी पानेच पाने देशमुख पुन्हा वेडावाकडा फेकला गेला. खिडकीतुन तीच बाई पुन्हा वेडीवाकडी आत शिरायला लागली. चेहर्याकडे बघवत नव्हते. एका उडीत तिने देशमुखाला गाठले. एव्हाना देशमुख सावरलेला होता, त्याने पुन्हा हाताची काहीतरी मुद्रा करुन ते वर्तुळ करायचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही. टाळी वाजवल्या सोबत त्याचे हस्तक तिच्यावर झेपावले,पण लाल किरणाचा अजुन एक झोत त्यांच्यावर पडला आणि एका क्षणात त्यांचा गुलाबी धुर झाला. दोन तरुणांनी खिडकीतुन आत उडी मारली.तोवर तिने देशमुखाचा खेळ संपवला, त्याच्या जीर्ण शरीराने साथ सोडली, त्यासोबत त्यातुन एक सावली बाहेर पडली.इतक्यात ती ही बाई सुद्धा अद्रुष्य झाली.वरचा ग्रह देखिल दिसणे आता थांबलेले होते. एका तरूणाने माझे हातपाय सोडवले, दुसर्याने डोळे मिटुन हातांच्या काही मुद्रा केल्या आणि चुकचुकत मान हलवली. ताण असह्य होऊन समोरचे सगळे दिसेनासे झाले.

************************************************

वाड्यात आता आम्ही तिघे बसलो होतो.म्हणजे मी झोपलेलो होतो.मला सपाटुन ताप भरलेला होता.ते दोन तरुण माझ्यापाशी बसलेले होते.त्यांनी चहा करुन आणलेला होता
त्यांनी त्यांची ओळख करुन दिली.एक उंच निंच पण शांत चेहर्याचा होता दुसरा हसतमुख होता.

हा रुद्र, आणि मी जयदीप.

आता घाबरु नकोस तु सुरक्षित आहेस. मी या देशमुखावर बरेच दिवस लक्ष ठेवुन होतो जयदीप म्हणाला. कारण वरवर देशमुखाचे कातडे पांघरलेला हा त्यांच्यातलाच होता.पुण्यात हा थोडक्यात निसटला, खरे तर मुलाखतीसाठी मीही आलेलो होतो,पण माझा संशय आल्याने त्याने तुला सोबत घेतले आणि ताबडतोब मुक्काम हलवला.तुमच्या मागोमाग मी ही इथे गावात आलो.आणि सर्व माहिती काढली तेव्हा बर्याच वाईट गोष्टी कानावर आल्या .देशमुखांच्या बायकोच्या आणि मुलींच्या बद्दल देखिल कुजबूज होतीच.हा देशमुख इतकी वर्षे जिवंत कसा हे कोणाला माहीत नव्हते,त्याला ओळखणारी जुनी पिढी कधिच गेलेली.
नविन लोकांना काही माहित असण्याचे कारणच नव्हते.देशमुख तुला वाड्यात सोडुन पुन्हा गेला तेव्हा मला त्याच्या मागे परत जावे लागले.पण तोवर मी रुद्र यांना भेटलो. तो शांत तरुण फक्त हसला. जयदीप सोबत मी ही इकडे येऊन गेलो, आल्या आल्या ही जागा अतिशय वाईट आहे हे लगेचच समजले.काही अघोरी शक्ती येथे वावरताना जाणवल्या .त्यांच्या बंदोबस्तासाठी मला तयारी करावी लागणार होती,म्हणुन तुला इथे सोडून जाणे भाग पडले,त्यांना तु जिवंत हवा होतास, त्यामुळे तुझ्या जीवाला इतक्यात तरी धोका नव्हता,पण तुझ्या धाडसाला मानायला हवे त्या बाईच्या आत्म्यापासुन तु तग धरलास.

तो .. तो.. नक्की कुठे गेला? माझी भिती अजूनही गेलेली नव्हती.

त्याने भले आपल्या स्रुष्टीचा अभ्यास केला असेल, सजीव निर्जिव द्रुष्य अद्रुष्य गोष्टींवर ताबा मिळवलेला असेल.पण अजूनही कित्येक मिती, योनी त्याच्या आकलनाच्या बाहेरच्या आहेत.मी त्याला अशा ठिकाणी पाठवले आहे की ज्याची त्याने कल्पनाही केलेली नसेल.किंवा त्याचे पुढे काय होईल हे माझ्याही कल्पनेच्या पलीकडचे आहे.
तुम्ही दोघे कोण आहात?मी विचारले.

इतकी घाई कशाला ?सगळे सांगू,आता आपल्याला निघायला हवे. गाडी बाहेर उभी आहे, जयदीप हसुन म्हणाला.
तुफान वार्यात टेकडीच्या खाली गाडी वेगाने उतरताना वाड्याभोवती पाचोळ्याने पिंगा धरलेला होता.

( तूर्तास समाप्त)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

( तूर्तास समाप्त) >>> म्हंजी?

मस्त मज्जा आली वाचायला.. लिहीत रहा असेच. Happy

पहिले दोन भाग जास्त आवडले..
हा ठिक होता..
लवकर संपवली .. त्यातही संपवली याबद्दल धन्यवाद _/\_
पुलेशु Happy

चांगला प्रयत्न आहे. धारपांच्या ३-४ गोष्टी एकत्र केल्यागत वाटत आहेत. पैकी पाचोळ्या-फावड्याचा उल्लेख 'पानगळ' गोष्टीत (पुस्तकः अनोळखी दिशा खंड ३) होता. केअरटेकर-विहिरीत मारलेली बायको हे कथानक 'सोबत' (पुस्तकः अनोळखी दिशा खंड ३) या गोष्टीसारखं आहे. तिसर्‍या भागातलं देशमुखांचं वर्णन 'दस्त' मधले दस्त किंवा 'समर्थांना आव्हान' पुस्तकातल्या गंगाधररावांसारखं आहे.

हं जुळतेय खरी पायस..
विशाल छानच लिहितो भयकथा.. मला खुप आवडते त्याची स्टाईल..
बेफींची सावट वाचा कुणी नसेल वाचली तर.. तीपन सुपर्ब आहे..

पायस, हो रे! ही आठवत नव्हती. धारपांच्या पुस्तकांची पारायणं झाली आहेत त्यामुळे त्या गोष्टी पट्कन लक्षात आल्या Happy