कुटुंबासह किल्ले मकरंदगड

Submitted by योगेश आहिरराव on 29 October, 2015 - 04:12

कुटुंबासह किल्ले मकरंदगड

या विजयादशमीला महाबळेश्वर भागात सीमोल्लोंघन करायचे ठरले. मग काय लगेच कोयना-जावळीच्या भागात असलेल्या मकरंदगडावर शिक्कामोर्तब केले.
मी, साथीला आमच्या सौ.अश्विनी , मुलगी चार्वी आणि नारायण अंकल व त्यांच्या सौ.उषा नारायण.
विजयादशमीच्या दिवशी कुटुंबकबिल्या सोबत सकाळी साडेआठला कल्याणहून निघालो. ऐन सणाचा दिवस असल्यामुळे असेल कदाचित पण रस्ता पूर्ण रहदारी मुक्त होता, कसलीच वर्दळ नव्हती. दुपारी एक-दिड च्या सुमारास पोलादपूरच्या पुढे पायटा कापडे खुर्द या गावातल्या मंदिरापाशी थांबलो.

सोबत आणलेले दुपारचे जेवण केले.
पुढे गाडी आंबेनळी घाट चढू लागली, समोरच प्रतापगड बराच ऊंच भासत होता.

आणखी जरा वर आल्यावर डावीकडे तानाजी मालुसरे यांचे उमरठ गाव दिसले. पलीकडे दुरवर रायरेश्वर, कोळेश्वर च्या पुसट रांगा, मंगळगड, महादेव मुर्हा आणि आर्थर सीट ची डोंगररांग नजरेस पडली.

जानेवारीत आमचा दुर्ग मित्र 'जितेंद्र बंकापुरे' सोबत केलेल्या ' कुडळी- अस्वलखिंड- कामथाघाट-महादेव मुर्हा- चंद्रगड- ढवळ्या घाट- आर्थर सीट ' ट्रेक ची आठवण झाली.
पुढे अर्ध्या तासातच पार गावाच्या फाट्याहून गाडी उजवीकडे घेतली. सुरूवातीलाच २-३ किमी रस्ता अत्यंत खराब अवस्थेतला होता, मग पुढे जरा बरा डांबरी रस्ता लागला. पारसोंड गावातल्या श्री रामवरदायिनी देवीच्या दर्शनाला थांबलो. मंदिर परिसर खुपच प्रशस्त आणि सुंदर.

एव्हाना सांयकाळचे साडेचार झाले होते, वेळ कमी होता. पार गावापासून साधारणपणे १२-१३ किमी वर हातलोट व चतुरबेट ही मकरंदगडाच्या पायथ्याची गावं आहेत.
हातलोट गाव हे गडाच्या उत्तरेला वसलेले आहे. इथून दिड -दोन तासात मकरंदगडाचा माथा गाठता येतो. आम्ही मात्र कुटुंबकबिल्या सोबत असल्याने गाडी जेवढी पुढे नेता येईल या उद्देशाने चतुरबेट हून घोणसपूर मार्गे जाण्याचे ठरविले होते. पार गाव सोडल्यानंतर ५ किमी वर उजव्या हाथाला हातलोट फाटा दिसला तिकडे न वळता तसेच पुढे ३ किमी वर चतुरबेट साठी उजवीकडे वळालो.

थोडे अंतर जाताच कोयना नदीवर बांधलेला अजुनही उत्तम अवस्थेत असलेला शिवकालीन पुल लागला तो ओलांडून सायंकाळी साडेपाच च्या सुमारास चतुरबेट गावात पोहचलो.
गावातच घोणसपूर रस्ता व त्याची अवस्था चौकशी केली.
चतुरबेटहून घोणसपूरपर्यंत छोटी गाडी जाऊ शकेल असा जंगलातला रस्ता आहे, अंतर ५.५ किमी. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर सर्वांना सोबत घेऊन एवढे अंतर पायी चालणे, हे गणित थोडे अवघडच होते. विचारपूस व चौकशी झाल्यानंतर मी आणि अंकलने ठरविले, जितके पुढे जाता येईल तितके अंतर गाडीने जाऊया.
गावापासून निघाल्यावर दिड दोन किमीवर मकरंदगड घोणसपूर गावाची कमान लागली. कच्चा रस्ता हळूहळू गाडी घाट चढू लागली. अतिशय अरूंद रस्ता त्यात दोन्ही बाजूला बिलगूनच झाडी झुडपे. एके ठिकाणी कच्चा रस्ता संपून चक्क मातीचा रस्ता लागला, तो सुध्दा बहुतेक ठिकाणी खचलेला आणि प्रचंड ओबडधोबड.


मग मात्र निर्णय घेऊन गाडी त्या जंगलातच एका कडेला उभी केली. सामान गाडीतून काढून पिट्टू पाठिवर चढविले आणि घोणसपूर गावाकडे कूच केले.

काही वेळातच सुर्यास्त झाला, संधीप्रकाशात आणि नंतरच्या चंद्रप्रकाशात जावळी कोयनेच्या जंगलातून कुटुंबकबिल्या सोबत जाणे हा एक वेगळाच अनुभव होता.

रात्री आठ वाजेच्या सुमारास घोणसपूरात दाखल झालो. शिवाजी जंगम यांच्या घरी मुक्काम टाकला. फ्रेश झाल्यावर त्यांच्या अंगणात पथारी पसरली, काय ती शांतता, चंद्रप्रकाशात जंगल भलतेच गूढ भासत होते मध्येच वार्याची एखादी झुळूक सुखावून जात होती, दुरवर महाबळेश्वरचे लाईट मिणमिणत होते. एकदम झकास वातावरण.

दुसर्या दिवशीची सकाळ पण तितकीच प्रसन्न. सर्व आवरून मकरंदगडाकडे निघालो. घोणसपूर हे गाव गडाच्या पूर्वेला आहे. वीस पंचवीस जंगम घरांचे हे गाव, इथली बहुतांश तरूण मंडळी महाबळेश्वर, सातारा व मुंबई येथे कामाला आहेत. ( सांगायचे झाले तर कोथळीगडाच्या पायथ्याला जसे पेठ गाव आहे तसेच हे घोणसपूर )

गावाच्या मागून मुख्यवाट किल्ल्यावर गेली आहे, वाटेतच गावातले श्री भैरी मल्लिकार्जून मंदिर आहे.

याच मंदिराच्या मागून एक वाट हातलोट गावात उतरते. आम्ही मंदिराच्या डाव्या बाजूच्या वाटेने गडाच्या सोडेंवरून चढाई करत.

उजव्या हाथाला वळसा घेऊन मोडक्या पायर्यावरून छोट्या सपाटी वर आलो. इथेच एक देवाची मुर्ती आहे.

इथून उजवीकडची वाट सरळ पाण्याच्या टाक्याकडे जाते तिथून सरळ वर चढते. आणि डावीकडची सोंडेवरून सरळ माथ्यावर मंदिराकडे जाते. आम्ही डावीकडच्या वाटेने गेलो, वाटेत बरिच छोटी फुल झाडे जागोजागी दिसली, छोट्या चार्वीला तर किती फुले घेऊ अशी अवस्था होती.

'बाबा हे फुल, बाबा हा दगड' असेच चालु होते. माथ्यावर पोहचताच समोरच मल्लिकार्जून मंदिर आणि नंदी दिसले.

माथ्यावरून नजारा बाकी अप्रतिम.....

खाली घोणसपूर गाव, बर्यापैकी शाबूत असलेले जावळीचे घनदाट जंगल, कोयनेच्या जलाशयाची झलक, समोरच महाबळेश्वरची अजस्त्र रांग, उत्तरेला दिमाखात उभा असलेला 'प्रतापगड'.

दक्षिणेला कांदाट खोर्यात सर्वात ऊंच उठलेला 'पर्वत', त्याच्या मागे किचिंतसा उजवीकडे झुकलेला 'चकदेव' यांना पाहून तर मागच्या डिसेंबरात केलेल्या 'आंबिवली- शिडीडाक- चकदेव-शिंदी-महिमंडणगड-पर्वत-वळवण-आंबिवलीघाट' या ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या.

चकदेवचे चौकेश्वर शिवालय तसेच पर्वतचा अविस्मरणीय मुक्काम सर्वच एक नंबर…

खऱच सह्याद्रीतल्या ट्रेकचे हे क्षण कायमचे मनात घर करून ठेवतात. असो तर तसेच पश्चिमेला जगबुडी नदीच्या खोर्यातील महिपत-रसाळ-सुमार ही रांग तसेच अवघड अशी कोंडनाळ नजरेस पडते.

महिपतगडाचा खरा विस्तार पहावा तर तो इथूनच, काय अवाढव्य पठार लाभले आहे. गडावरून पाय निघेणाच, काय काय आणि किती पाहू अशी आमची सर्वांची अवस्था होती. ऊन डोक्यावर चढू लागले होते, सोबत आणलेला खाऊ फस्त करून गड उतरायला सुरूवात केली.

मंदिराच्या मागून एक वाट पाण्याच्या टाक्याकडे उतरते. हेच ते पिण्याच्या पाण्याचे टाके.

पुढे हिच वाट वळसा घेऊन आधी सांगितल्या प्रमाणे वाटेतल्या देवाच्या मुर्तीजवळ येते. थोडक्यात एका वाटेने चढून दुसर्या वाटेने उतरलो. देवाच्या मुर्ती पासून सरळ खाली मुख्य वाटेने गावात आलो. दुपारचे जेवणाआधी गावातल्या मंदिर परिसरात रेंगाळलो, खुपच शांत व रमणीय. जेवणानंतर काहीवेळाने मी व अंकल आम्ही जंगम काकांना सोबत घेऊन 'कोंडनाळ' पहायला निघालो. देशावरचे घोणसपूर ते कोकणातले बिरमणी यांना जोडणारी अवघड घाटवाट. गडाला उजव्या बाजूला ठेवत पदरातून सरळ वाट पश्चिमेकडे सरकते. वाटेत बर्यापैकी जंगल आहे, मध्येच धनगराचा झाप दिसले. खऱच एवढ्या रानावनात एकटे रहाणारे हे धनगर कुटुंब. मला तर नेहमीच यांच्याविषयी वेगळेच कुतुहल वाटते. थोडे पुढे गेल्यावर वाट डावीकडे उतरणीला लागली, प्रचंड घसारा व ठिसुळ दगडी. खाली गेल्यावर सामोरे आले ते भले मोठ्ठाले सरळसोट उतरलेले सह्याद्रीचे पश्चिम कडे, वार्यामुळे सह्यधार अक्षरश: कापली गेली आहे. नाळेची उतरण व रौद्रता पाहून क्षणभर धडकीच भरली.

जंगम काकांच्या सांगण्यानुसार, सध्या नाळेत बरिच पडझड झाली आहे, मागच्या काही महिन्यात कोणाचेही येणे-जाणे इथून झाले नाही. गावकरांच्या मदतीने ते तो मार्ग पुन्हा व्यवस्थित करणार आहेत. हल्ली चतुरबेटहून गाडी रस्त्याने जाणे होत असल्याने गावकरी पण या अवघड वाटेने जाणे सहसा टाळतात. त्यामानाने पलीकडचा हातलोट घाट जास्त वापरता आहे.
भरपूर वेळ तिथेच रेंगाळलो, पुन्हा कधीतरी नाळेने उतरणार असे मनोमन म्हणून गावात परत आलो. पुर्ण दिवस मजेत गेला होता, छोटी चार्वी तर चांगलीच रमली होती.

निघायचा तिसरा दिवस उजाडला, काय माहित तिथून निघावे असे वाटतच नव्हते. चौघांची अवस्था थोडीफार सारखीच होती. परत येण्यासाठी निघावे तर लागणारच.

खऱच सह्याद्रीचा त्यातही अशा खास ट्रेकचा निरोप घेण हे फार अवघड काम, कशी तरी मनाची समजुत घालून जंगम काकांचा निरोप घेतला.

दिड तासात गाडी उभी केलेल्या जागी आलो. पुन्हा सामान गाडीत टाकून, सावकाशपणे अर्ध्या तासात चतुरबेटला आलो. पुढे वाटेत कोयना नदीच्या पुलाजवळ गाडी उभी केली. अंघोळीचा ठराव मंजुर झाला. अंघोळ झाल्यावर शरीरात वेगळीच तरतरी आली. तासाभरात पार फाट्याला एका हॉटेलात दुपारचे जेवण घेतले, पुढे पोलादपूर मार्गे परतीचा प्रवास सुरू झाला, महाडच्या अलीकडे शिवथरघळी साठी उजवीकडे वळालो. वेळ हाथाशी होता, म्हटले चला बरीच वर्षे झाली शिवथर घळीत येऊन.

शांत निवांत पणे दर्शन घेतले. मग ताज्या मनाने पुन्हा वाटेला लागलो. सह्याद्रीची भव्य रांग इथेही सोबत होतीच. पुन्हा गोप्या, शेवत्या, मढे, उपांड्या, खुट्टे अशी नाव मुखावर आली.
खऱच काय जादू आहे या सह्याद्री भटकंतीत.....

योगेश चंद्रकांत आहिरे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहयाद्री मध्ये भटकणे ह्या हुन दुसरा विरुंगळा नाही, त्यात सह परिवार जाणे हे परम भाग्याचं लक्षण आहे.

हि अनुभूती वारंवार मिळे, हिच अपेक्षा.

छोट्या चार्वी ला पुढील भटकंतीस शुभेच्छा

एकदम मस्त!!!
मागे मकरंदगडावर जाणं झालं होतं... सगळ्या आठवणी पुन्हा जागा झाल्या.
पुन्हा एकदा फिरवून आणल्याबद्दल शतशः धन्यवाद. Happy

संदिप, शशांक, किरू, कंसराज, मंजूताई, यो आणि जिप्सी खुप खुप धन्यवाद !

@ तोफखाना, तुमचा प्रतिसाद आवडला. सहयाद्री मध्ये भटकणे ह्या हुन दुसरा विरुंगळा नाही १०० % सह्मत.

जीवाभावाची माणसे आणि आपला सह्याद्री !

क्क्या बात है....कुटुंब कबिल्यासह... ते ही अवघड वाटेवर जंगलात... मानल पाहिजे तुम्हाला...

>>> बाबा हे फुल, बाबा हा दगड' असेच चालु होते. <<<< अन हे सगळ्यात महत्वाचे.. पुढल्या पिढीवर या वयापासुनच संस्कार.. Happy

फोटो इथे दिसतील असे दिल्याबद्दल धन्यवाद.

वाह, मस्त अनुभव, ते देखील चिमुरड्या पिल्लासह .. सुर्यास्तानंतर चंदप्रकाशात, मजा आली असेल
फोटो मस्त आहेत सगळे..

लिंबूटिंबू, ऋन्मेष, इंद्रा, रोहित आणि वत्सला धन्यवाद.

बंकापुरे साहेब, खुप दिवसानंतर........बरे वाटले प्रतिसाद वाचून.

वॉव!