Dermatoglyphics Multiple Intelligence Test करावी का?

Submitted by मी अमि on 30 May, 2016 - 00:40

आमच्या एका परिचीतांनी त्यांच्या मुलांची वरील टेस्ट करून घेतली. या टेस्ट मध्ये त्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्याचे विश्लेष्ण केले जाते आणि त्यावरुन त्या व्यक्ती साठी कोणते करीयरचे पर्याय योग्य असतील ते सुचवले जाते. तुमचे वेगवेगळे ईंटलिजन्स विश्लेषण करून रिपोर्ट तयार करतात म्हणजे https://en.wikipedia.org/wiki/Theory_of_multiple_intelligences इथे दिलेल्या ईंटलिजन्स चे विश्लेषण करतात. त्यांच्या मते बोटांच्या ठशावरून या ईंटलिजन्स मॅपिंग करता येते.

  1. ही टेस्ट कोणी केली आहे का?
    साधारण कोणत्या वयात करावी?

मुळात बोटाच्या ठशांचा मेंदूशी संबंध असतो का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फिंगर प्रिंट्स कशा तयार होतात म्हणजे बोटांवरचे रेषांचा जो युनिक पॅटर्न कसा तयार होतो? तो तयार होण्याशी मेंदूचा संबंध असतो का?

मुलांच्या करीयर संबंधी जर काही सल्ले हवे असतील तर करीयर कौन्सेलर्स कडे जावे, अ‍ॅप्टिट्युड टेस्टस असतात त्या कराव्यात. त्या वैज्ञानिक ज्ञानावर आधारीत असून तुम्हाला बर्‍यापैकी योग्य दिशा दाखवू शकतात.

<<फिंगर प्रिंट्स कशा तयार होतात म्हणजे बोटांवरचे रेषांचा जो युनिक पॅटर्न कसा तयार होतो? तो तयार होण्याशी मेंदूचा संबंध असतो का?>>

------ रेषा आणि मेन्दूचा सम्बन्ध नाही आहे. सम्बन्ध आहे तो तुमच्याकडे असलेला पैसा आणि रेषा यान्चा. तुम्ही आणि तुमच्याकडे असलेल्या पैशान्च्यामधे या हातावरच्या रेषा मधे येत आहेत. तुमच्या कडे पैसा नसेल तर ह्या रेषा काहीच सान्गत नाहीत... Happy

मामी, अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट हा सर्वमान्य मार्ग आहे. माझा उद्देश या नव्या टेस्ट बद्दल जाणुन घेणे हा आहे.

उदय, तुमचे म्हणणे खरेही असेल. मी एक साधासुधा वैज्ञानिक प्रश्न विचारलाय की या रेषा कशा तयार होतात? या संबंधी तुमच्या कडची माहिती तुम्ही शेअर कराल का?

<<मी एक साधासुधा वैज्ञानिक प्रश्न विचारलाय की या रेषा कशा तयार होतात?>>
----- गर्भात असताना हाताच्या मुठी वळलेल्या असतानाच या रेषा तयार होतात. पुर्ण उघडलेला तळहाताची त्वचा ताणली जाते, आणि बन्द असताना त्वचा सैल पडते - हे सहजतेने होण्यासाठी त्वचेला कुठेतरी निसर्गत: दुमडावे (fold) लागते, यालाच हस्त रेषा म्हणायचे. अशा हस्तरेषान्चा आणि त्या व्यक्तीचे भविष्याचे भाकित यान्चा काहीच सम्बन्ध नाही.

कुठल्याही दोन व्यक्तीच्या हस्तरेषा तन्तोतन्त सारख्या नसतात.

ओके धन्स.
पण बोटांच्या टोकावरील त्वचा कुठे फोल्ड होते? हस्तरेषा मुठी वळल्याने होतात हे ठीक आहे. पण बोटांच्या टोकांवर तयार होणारा पॅटर्न कसा तयार होतो?

प्रथमतः डी. एम. आय.टी. ( डर्मेटोग्राफिक्स मल्टीपल इन्टेलिजेन्ट टेस्ट) बद्दल थोडेसे शास्त्रीय पार्श्वभुमी
१. आपल्या बोटां वरील रेषा ज्याला आपण फिंगर प्रिंटस म्हणतो, त्या साधारण वयाच्या ६ ते ८ व्या महिन्यात निश्चित होतात. बहुतेकांच्या बोटा च्या रेषांचे पॅटर्न ५-६ प्रकारचे असतात. पण त्या रेषां मधील अंतर माणसागणीक बदलते. जसे आपले रुप माणसा गणीक बदलते तसेच.

२. ह्या बद्दल अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले. अनेक थीअरी आज प्रचलीत आहेत. जशी हॉलंड थीअरी, मॅकेंझी थीअरी इ.इ.... पण ह्याबद्दल खरे संशोधन करुन त्याचा वापर बुद्धी वा मेंदुशी जोडुन मल्टीपल इंटेलिजन्स ची थीअरी आणली डॉ. हावर्ड गार्ड्नर ह्यांनी (https://en.wikipedia.org/wiki/Howard_Gardner). पुर्वी माणसाचा बुध्यांक फक्त आय.क्यु ने तपासला जायचा. पण त्यांनी पहिल्यांदाच "इ.क्यु" "सी.क्यु"आणि अ‍ॅक्यु" म्हनजेच "इमोशनल कोशंट"
" क्रीयेटिव्हीटी कोशंट" आणि "अ‍ॅद्व्हर्सीटी कोशंट"

३. आय क्यु = भाषीक ज्ञान्+ लॉजीकल ज्ञान
इमोशनल कोशंट = एखाद्या घटनेकडे बघायचा इमोशनल द्रुष्टीकोन
क्रीयेटिव्हीटी कोशंट = कल्पकता
अ‍ॅदव्हर्द्सीटी कोशंट= एखाद्या इमर्जन्सी मधे आपण कसे वागतो किंवा प्रेशर घ्यायची कुवत

४. आपल्या मेंदुचे दोन भाग असतात. डावा व उजवा. ज्याचा डावा भाग जास्त अ‍ॅक्टीव्ह आहे तो माणुस मेमरी, भाषा, गणित ह्याविषयात एकदम उस्ताद असेल. ज्याचा उजवा भाग अ‍ॅक्टेव्ह असतो तो कला, चित्रकला, अंतरीक उर्मी, सौंदर्य ह्याकडे जास्त लक्ष देणारा असेल. आपल्या मेंदुच्या दोन्ही भागांना पच पाच लोब्ज असतात. (कंपार्ट्मेंटस) ते आपल्या हाताच्या बोटांशी जोडलेले असतात. ज्यांचा मेंदु जन्मतः वीक असतो वा मंद असतो त्यांच्या बोटांवर रेषा नसतात किंवा अती पुसट असतात.

५. ह्यावरुन आपण साधारण १० प्रकारच्या इंटेलिजन्स चा शोध घेवु शकतो
१. स्वतःला काय हवे आहे हे ओळखण्याची क्षमता
२. दुसर्‍यां बरोबर कम्युनिकेट करण्याची क्षमता
३. लॉजिकल अ‍ॅबीलीटी
४. इमॅजीनेशन अ‍ॅबीलीटी किंवा व्हीजुवलायझेशन
५ फाइन मोटर स्कील.... बारीक बारीक कामे करणे
६. ग्रॉस मोटर स्कील .... खेळ
७. भाषा ज्ञान
८. संगीत ज्ञान
९. भवतालचे ज्ञान....
१०. अंतराचे ज्ञान

६. त्याच बरोबर आपले सेन्सेस जसे " सी, लीसन, टच, स्मेल, टेस्ट" ह्या पैकी कोणते स्त्राँग आहेत, तसेच पर्सनॅलीटी कोणत्या प्रकारची आहे. तसेच ती व्यक्ती एक्झीक्युटर आहे की थींकर? ती व्यक्ती कॉन्सेप्ट ड्रीव्हन आहे की ऑब्जेक्ट ड्रीव्हन ? कोणत्या प्रकारची लर्नीग स्टाइल उपयोगी पडेल?

ह्या सगळ्याचा उपयोग काय?????

१. आपल्याला कोणत्या प्रकारचा जॉब सुटेबल आहे.

२. कोणत्या खेळात वा अ‍ॅक्टीव्हीटी मधे आपण स्ट्रेस बस्टर शोधु शकतो. कधी कधी आईवडिल मुलां ना सगळ्या अ‍ॅक्टीव्हीटीज लावतात. खुप क्लास लावतात. ड्रॉइंग, मैदानी खेळ, पोहोणे, चेस, कराटे इ.इ.इ. ते मुल बीचारं दमुन जात. कशातच प्रगती करु शकत नाही.

३. तीच गत ट्युशन ची. त्याला जर ऑडिओ इंटेलिजन्स कमी असेल तर कितीही लेक्चर ऐकवा तो मुलगा कोरडाच राहील. त्यापेक्षा त्याची स्टाईल ओळखली तर तेंव्हाच त्याला ग्रुम केले जाउ शकते.

४. कोणत्या स्ट्रीम ला जाणे योग्य. म्हणजे सायन्स, कॉमर्स, की आर्ट्स. तिकडे गेल्यावर प्रत्येक साईड्ची जी जी शिक्षणं असतात त्या त्या ठीकाणचे कोणत्या बाजुचे शिक्षण घ्यावे, उदा. मेडिकल म्हंटले तरी जर अ‍ॅदव्हर्सीटी कोषंट वीक असेल तर इमर्जन्सी चे स्पेशलायझेशन घेवु नये. मग त्याने ऑप्थोल्म्प्लोजी, फीजीयोथेरपी, इ. निवडावे. तसेच कॉमर्स आहे आणि अ‍ॅव्हर्सीटी कोशंट चांगला आहे तर मग सी.ए. वा सी.एस. व्हावे.
लॉजीकल व भाषिक बुध्यांक चांगला असेल तर अय.ए. एस, करावे.

५. मुलाच्या लर्नींग स्टाइल प्रमाणे त्याचा कल आपल्याला कळु शकतो. थोडेसे बदल त्याच्या अभ्यास पद्धतीत केले की सुरेख रीझल्स येतात.

ह्या बाबतीत माझा स्वतःचा अनुभव. माझी मुलगी सहावीत असताना अचानक भयानक आळशी झाली. उलटी उत्तारे देणे. आपल्याच मस्तीत रहाणे. अभ्यासाकडे दुर्लक्ष.इ.इ. तिला आनंद नाडकर्णींच्या आय.पी.एच. ला ही काउंसेलिंग ला नेवुन आणले. तरीही फारसा बदल झाला नाही. माझ्या एका डॉक्टर मैत्रीणीने ही टेस्ट करावयास सांगितले. ती करुन घेतली. त्या वेळेस काउंसीलर ने खुप डोळे उघडले. मुख्य म्हणजे माझी मुलगी अतिषय शार्प आहे, पण ती गर्दीत शिकु शकत नाही. तिला वन टु वन शिकवले पाहिजे. अभ्यास करताना तिला एकटे ठेवायचे नाही. तिला टर्गेट्स द्यायची आणि ती पुर्ण झाल्याने काय होवु शकत.., ते समजवायचे. इमोशन कोशंट सगळ्यात जास्त असल्याने, तिच्या बारीक बारीक शंका उडवुन लावायच्या नाहीत. इ.इ.

हे सगळे कळल्यावर मी नाहीतरी नोकरी सोडायचा विचार करतच होते. तो आमलात आणला. आणि तिचं आठवीचं वर्ष फक्त तिच्या चुकलेल्या तारुला वळण आणणयात घालवलं. त्यांच्या सुचना शक्य तितक्या आमलात आणल्या. संस्क्रुत, इतर भाषा आणि सायन्स माझ्याशी तिचं उत्तम पटायच. पण गणितात मात्र मारामारी व्हायची. ह्याचा कारण माझ्यातला पेशंन्स जायचा. म्हणुन मग एक अतिषय हुशार आय.आय.टीची मैत्रीण कामी आली. ती आठवड्यातुन फक्त एकदा येवुन ब्रश अप करुन जायची. ह्याचा एकत्रीत परिणाम म्हनुन आठवीत तिची विषयाची समज प्रचंड वाढली. आणि त्याचा परिणाम म्हणुन मार्कांची गाडी ८१% पर्यंत गेली. जी सातवीत ६५-७०% घोटाळत होती. मग नववी मधे ती तिचा अभ्यस करायला लागली आणि गाडी ८८% पर्यंत पोहोचली, ते ही अनेक उद्योग करुन.

तिच्या रीपोर्ट मधे फॉरेन भाषा शिकवावी असे होते. गेली ३ वर्ष ती फ्रेंच शिकत आहे. शाळे मधे नाही तर बाहेरुन. आता ती अलायंन्स फ्रान्सेसे च्या ए२ (अ‍ॅडल्ट) लेव्हल ला १४व्या वर्षी पास झाली. ( ही संस्था फ्रेंच कॉन्सुलेट शी संबंधीत आहे)

ही तिची प्रगती पाहुन मी स्वतः ह्या विषयाकडे ओढली गेले. त्याच्या काउंसिलींग चे रीतसर शिक्षण घेवुन आता मुलांना सल्ला देते. मी स्वतः नापास होणारी खुप मुलं आजुबाजुला बघते. ( मी सी.ए व सी.एस फायनल चे क्लासेस घेते) त्यांची गल्ली चुकली तर नाही ना. म्हणुन एक दोन रीपिटर्स चे रीपोर्ट विनामुल्य केले. आणि गल्ली चुकल्याचेच रीपोर्ट आले. त्यांना त्या प्रमाणे सजेशन देवुन त्या मुलांनी आपली लाईन बदलली. आणि सुखी झाले.

हा रीपोर्ट करण्या मधे सगळ्यात पुढे असलेला देश म्हणजे सिंगापुर. मुख्य म्हणजे ह्या थीअरी चे पेटंट घेवुन त्याचा सोफ्टवेअर बनवुन घेतले ते त्यांनी. त्यांनी त्याचा वापर वर्कर्स वापरताना ही केला. मग ह्याचा प्रसार चीन मधे वेगाने झाला. ज्यांची खेळात प्रगती आहे त्यांना लहान पणीच वेगळे प्रशिक्षण द्यायला सुरुवात करतात. त्याचाच परिणाम मग देशाला प्रगत बनवण्या साठी होतो. आर्थात त्यांचे सगळेच निर्णय योग्य नाहीत. राजकिय चर्चा नको. तरीही आहे ते मनुश्यबळ योग्य रीतीने वापरले तर नक्कीच त्याचा फायदा होतो.

मी स्वतः अनेक मुलांचे रीपोर्ट केले आहेत. ह्याची फी जास्त असायचे कारण की मुळात सॉफ्टवेअर ची बेसिक फीच जास्त आहे. जेव्हा कोणी त्याचा पेटंट इंडियात घेइल तेंव्हा ते स्वस्त होइल.

सगळेच नाकारु नका. हे थोतांड नाही हे नक्की. त्याचा वापर कसा करायचा हे प्रत्येक माणसावर अवलंबुन आहे,
मला तरी फायदा झाला.

मी उगाचच कोणाला हे सांगत फिरत नाही. जे स्वतः हुन येतात त्यांनाच रेकमेंड करते. जी मुलं फोकस असतात त्यांच अजिबात करत नाही. ही माझी हौस आहे. आज माझ्या फ्रेंचायझी मधे मी सगळ्यात कमी रीपोर्ट कर?णारी तरीही एक उत्तम काउंसेलर म्हणुन मला आमच्या पॅरेंट ऑफिस मधुन नेहेमी लेक्चर साठी बोलावतात. गेल्या दोन वर्षात मी फक्त ४२ रीपोर्ट केले. मी काही सेल्स् मन नाही. मी काउंसेलर आहे.

इकडे लिहावसं वाटल कारण बरेच गैर्समज दिसले. ही माझी रिक्षा नाही

ही एक प्रकारची अ‍ॅप्टीट्युड टेस्ट आहे. कदाचित त्याही पेक्षा जास्त परीपुर्ण. जी आयुष्याला वेगळे वळण लावु शकते. फक्त अभ्यास नाही तर बीहेव्हीयर बदलुन टाकु शकते.

मोकीमी - अनेक धन्यवाद .
मुद्देसुद व उत्तम माहिती.

काही खाजगी शंका आहेत...तुम्हाला विपु केली तर चालेल का?

अनेक लोकांनी टेस्ट भंपक आहे, हे न करता ठरवलेले आहे . हीच तर गंम्मत आहे. आपण कोणत्यातरी फालतु गोष्टी बद्दल नाही तर एका अतिषय सायंटीफिक विषयावर चर्चा करत आहोत.

पुर्वी हार्ट सर्जरी मधे बायपास हा शेवटचा शब्द होता. ब्लॉकेजेस असतिल तर त्या विना उपाय नसायचा. आज सरळ १० मिनीटात स्टेंट घालुन अँजिओप्लास्टी करुन टाकतात. बायपास वाल्या डॉक्टर चं महत्व कमी झालं

आता लेप्रोस्कोपिक सर्जरी करतात. पुर्वी फाडायला लागायचे.

माझ्य डिलिव्हरीच्या वेळेला "ईपिड्युराल अनेस्थेशिया" इकडे कोणी ऐकलाही नव्हता. माझी मोठी बहिण जी अमेरिकेत असते तिने घेतला होता म्हणुन मला सजेस्ट केला, तर ते इकडे नव्हतेच. आता सर्रास झालय.

जेनेटिक्स, बायो टेक्नॉलो जी... ह्यावर नवे नवे संशोधन होतच रहाणार. ही टेस्ट हा ह्यातला नवा प्रकार म्हणायला पाहिजे. सिंगापुर, चीन, जपान मधे हे सगळे गेली अनेक वर्ष वापरत आहेत.

नवी नवी संशोधनं येतच रहाणार. आरोग्याच्या बाबतीत आपण ह्या नव्या बदलांना सहज स्वीकारतो. इकडेही बदल होइल. एकदम सगळं पटावं असे नाही. पण नीदान उडवुन तर लावु नका.

त्याचा संबंध सरळ बुवाबाजीशी लावुन लोक मोकळे होतात. आपल्याला माहित नाही... निदान ते तरी मान्य करा...

हे काही भविष्य नाही. साधे सायंस आहे. त्याच्या मागे अनेक संशोधकां च्या आयुष्यभराची मेहेनत आहे. हॉर्वर्ड युनिव्हर्सीटी मधे ह्या विषयाचा स्वतंत्र विभाग आहे...... जरी हे शास्त्र प्रचलीत नसले तरी बरेच परीपुर्णतेच्या जवळ आहे.

मोकीमी खरंच खुप छान समजावलंत तुम्ही.

पण एक गोष्ट अजुनही क्लीअर नाही की बोटांवरचा पॅटर्न मेंदूशी संबंध का आहे? जसे आपली द्रूष्टी, वाचा, आपल्या हालचाली, शारिरिक अवयव इतकेच काय हार्मोन्स हे सुद्द्दा मेंदूशी संबंधीत आहेत आणि ते कसे काय संबंधित आहेत, याचे पुरावे आहेत. तसे फिंगर प्रिंट्स च्या बाबतीत आहे का?

छान माहिती दिलीस मोकीमी.

कदाचित हातावरच्या रेषा आणि ज्योतिष अशी सांगड घातली गेली आहे सहसा त्यामुळे या शास्त्राबद्दल शंका वाटते.

मोहन की मीरा, तुम्ही हे गंभीरपणे लिहिताय ? Rofl Rofl

हाताच्या दहा बोटांच्या रेषांचा मेंदूच्या दहा भागांशी वेगवेगळ्या बुद्धीमत्तांचे थेट डायग्नॉसिस वा मापन करता येईल असा संबंध !!!! सर्व न्युरोलोजिस्ट्ना ताबडतोब रस्त्यावर आणेल असे महान संशोधन आहे हे !!! तुम्ही म्हणता तसे सायंटिफिक वगैरे असेल तर हे कोरिलेशन सिद्ध करणारे पेपर सायंटिफिक जर्नल्समध्ये नक्कीच प्रसिद्ध झाले असतील. तुम्ही काही संदर्भ देउ शकाल काय ?

>>>>>>
१. आपल्या बोटां वरील रेषा ज्याला आपण फिंगर प्रिंटस म्हणतो, त्या साधारण वयाच्या ६ ते ८ व्या महिन्यात निश्चित होतात. बहुतेकांच्या बोटा च्या रेषांचे पॅटर्न ५-६ प्रकारचे असतात. पण त्या रेषां मधील अंतर माणसागणीक बदलते. जसे आपले रुप माणसा गणीक बदलते तसेच.
२. ह्या बद्दल अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले. अनेक थीअरी आज प्रचलीत आहेत. जशी हॉलंड थीअरी, मॅकेंझी थीअरी इ.इ.... पण ह्याबद्दल खरे संशोधन करुन त्याचा वापर बुद्धी वा मेंदुशी जोडुन मल्टीपल इंटेलिजन्स ची थीअरी आणली डॉ. हावर्ड गार्ड्नर ह्यांनी (https://en.wikipedia.org/wiki/Howard_Gardner).
>>>>>>>

हे साफ खोटे आहे. डॉ. गार्डनर यांनी मल्टीपल इंटेलिजन्सची थिअरी आणली आणि जरी ती सर्वमान्य नसली तरी करीअर कौन्सेलिंगसाठी वापरली जाते हे ठीकच. पण त्याचा फिंगरप्रिंटशी बादरायण संबंध जोडून एक सॉफ्ट्वेअर प्रोग्रॅम व फ्रॅन्चॅईझी मॉडेल याद्वारे मुलांबद्दल काळजीत असलेल्या पालकांना लुबाडायचे हे चीनी/ तैवानी स्कॅम आता भारतातही फोफावते आहे हे बघून धक्काच बसला.

यात नुसती आर्थिक फसवणूक नाही तर मुलांच्या आयुष्याशी खेळ आहे. हा १०० टक्के फ्रॉड आहे. इच्छुकांनी खोलात जाउन गुगलवर तपास करावा. न्युरोलॉजिस्ट, सायकिआट्रिस्ट्स यांच्याशी बोलावे म्हणजे हा केवढा भोंदूपणा आहे ते स्पस्ष्ट होईल.

>>हे काही भविष्य नाही. साधे सायंस आहे. त्याच्या मागे अनेक संशोधकां च्या आयुष्यभराची मेहेनत >>आहे. हॉर्वर्ड युनिव्हर्सीटी मधे ह्या विषयाचा स्वतंत्र विभाग आहे.... Rofl

असा कुठला विभाग आहे त्याची लिंक तुम्ही देऊ शकाल का ?

{आपल्या मेंदुच्या दोन्ही भागांना पच पाच लोब्ज असतात. (कंपार्ट्मेंटस) ते आपल्या हाताच्या बोटांशी जोडलेले असतात. }

या एका ओळीमुळे बाकी सगळ्या शास्त्रीय गोष्टी बोटांच्या ठशांशी निगडीत असतात हे सिद्ध होतंय असं म्हणायचंय का तुम्हाला?

आताच एक असलाच धागा पाहिला. निरा यांचा पहिला प्रतिसाद आवडला.

सर्व्हे किंवा सँपलिंग मेथड वर आधारीत ठोकताळे हे योग्य वाटते. शास्त्र म्हणवून घ्यायला बरेच पापड लाटावे लागतील असे वाटते.

लहानपणी एक वैदू आमच्याकडे आला होता. तो रुग्णाला जमिनीवर झोपवून कपाळाला तेल लावायचा. पाच मिनिटांनी तळपायाला टीपकागद लावून त्यावर ते तेल आलं कि नाही हे दाखवायचा. जर तेल आलं तर मनुष्य निरोगी, आणि नाही आलं तर आत काहीतरी प्रॉब्लेम आहे असं निदान तो करायचा.

मला वाटतं याला विरोध नको करायला. कारण काही दिवसांनी ते सायन्स म्हणून पुढे येईल. डॉक्टरांचं महत्व वैदूंमुळे कमी होईल. काही दिवसांनी वैदू स्टेण्टसुद्धा घालतील.

रच्याकने : स्टेण्ट च्या मागे शास्त्रीय संशोधन नाही का ? ज्यांनी ते बनवलं त्यांनी मेडीकल सायन्स विचारात न घेताच बनवलंय का ?

अजुन १-
हायपर/ ओव्हर अक्टिव्ह मुल असतात त्या मुलाच्या पालकांना या टेस्ट चा फ़ायदा झाला.
अभ्यास कसा घ्यावा, मुलाला एका जागी कसे बसवावे, काही खोड्या हा का करत असेल अश्या गोष्टींन साठी मार्गदर्शन मिळाले.
अर्थात आपल्या मुलाचा अभ्यास केला की हि उत्तरे मिळतातच पण त्याला आधार मिळाल्याने मनसिक बळ वाढले असे म्हणु शकतो. >>>

नीरा या दुस-या प्रतिसादाबद्दल मात्र शंका आहेत. अमूक एक सवयी असणा-या मुलांना एकत्र बोलावून त्यांचा अभ्यास केला आणि निष्कर्ष काढले आणि ते ९०% पेक्षा जास्त मुलांमधे सारखेच आले तर आपण या प्रकारच्या मुलांचे असे वागणे नॉर्मली असे असते असे अनुमान काढू शकतो. पण ते शास्त्र होत नाही. तसेच त्यासाठी बोटाच्या ठशांचा आधार घेण्याची आवश्यकता नाही

जर हायपर अ‍ॅक्टीव्ह मुलांचा डेटाबेस तयार असेल त्याच्याशी आपल्या मुलाचे वागणे पडताळून पाहता आले तर कदाचित साधारण रिझल्ट्स सारखे मिळू शकतील. अशा प्रकारच्या सर्व्हेशी न जुळणारे रिझल्ट्स येतात तेव्हां मात्र हे शास्त्र नाही हे सिद्ध होते. डेटाबेसचा आकार वाढवत नेल्यावर काय रिझल्ट्स येतात हे सुद्धा मनोरंजक ठरेल. सर्व्हेवाले त्यांच्या सर्व्हेची अचूकता अमूक एक टक्के आहे असे म्हणतील. त्याच्याशी फारकत घेणा-यांना अ‍ॅबनॉर्मल ठरवत नाहीत हेच नशीब.

समजा सव्हेमधून अचूक अंदाज वर्तवता येऊ लागले तरी अनुमानधपक्यानेच ते सांगितलं जाईल. जोपर्यंत मेंदूचा, बोटांवरील ठशांचा संबंध कशामुळे असतो हे शास्त्रीयरित्या सांगता येत नाही तोपर्यंत .. मेंदूशी संबंधित असणारी रहस्ये उलगडणे हे अजूनही अवघडच आहे.

पूर्वी साधारणता १९९० साली एक aptitute टेस्ट रंकाळा कोल्हापूर येथे होत होती.... त्यावेळी साधारणता स्च्लोर्शीप/ GK चा जसा पेपर होता तसा असायचा. त्यावरून ते करियर, किव्हा काही रुची, आवड,इ. साठी सुचवायचे. तसे हे काही वाटत नाही..
माझ्या अंदाजानुसार खरेच एवड्या लवकर केलेली टेस्ट पुढील मुलाचे/मुलीचे भविष्य किंव्हा पुढे काय करावे हे जर सांगणार असेल तर मी हे मझ्या मुलांसाठी नक्की करेन.
पण जशी मत येत आहेत या नुसार हे काही सत्य वाटत नाही...

मित्र मैत्रीणींनो.....

मी कुठेही गायब नव्हते. किंवा गायब व्हायची इछ्छा ही नाही. मी जास्त माबो वर नसते. रादर मी जास्त नेट वर ही नसते. ह्या प्रकारात अनेक संशोधन झालेली आहेत. अनेक सँपल स्टडी आहेत. काही रेफरन्स पण आहेत. ह्यात काही भारतिय तर काही परदेशी जर्नल्स आहेत. काही सँपल्स ह्या सिद्धांताला पुष्टी देतात, काही नाही. वानगी दाखल काही रेफरन्स खाली दिले आहेत. जाण्कारांनी जरुर वाचावे.

बाकी मी आधीच सांगीतले आहे ही माझी रिक्षा नाही. मला माबो वर कोणतीही जाहिरात करायची गरजच नाही. मी माबो वरच्या फक्त २-३ माणसांना पर्सनली ओळखते. ती ही ओळख तशी पुसटच आहे. माझ्या कडे माबो वरच्या फक्त काही माणसांचे नंबर आहेत. ( त्यातले काही मी माबो च्या आधीपासु न ओळखीचे आहेत)

कोणा काय समज करुन घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ह्या मागे कोणतेही भविष्य, भाकित वगैरे नाही. मी आधी माझा व नवर्‍याचा रीपोर्ट केला जवळ जवळ ८५% जुळला. म्हणुनच मग काही सँपल केले. मग पुढे गेले. ह्या मागे काहीतरी विज्ञान आहे हे मात्र नक्की. नीदान खालचे संदर्भ वाचले तरी लक्षात येइल.

बाकी मग ज्याचा त्याचा प्रश्न.

शब्द हे तलवारी सारखे असतात हे मात्र पटले. आपण एखाद्यावर केवळ समोर नाही म्हणुन जीभ सुटल्या सारखे वाट्टेल ते लिहावे म्हणजे खरच खुप दु:ख दायक आहे. हे वर्च्युअल जग खरच फार जालिम आहे हे नक्की. इतके दिवस माबो वर भांडणे होतात, वाट्टेल ते लिहितात हे ऐकुन होते. आपण्हुन कोणत्याच वादात पडले नव्हते. आताही पडणार नाही. पडायची इच्छा नाही.

तरीही प्रतिक्रियां बद्दल धन्यवाद.!!!!!

http://www.ajol.info/index.php/jmbs/article/viewFile/108303/98122

http://genetic-test.ru/pub/litres/4_Lakshmi.pdf

http://csjournals.com/IJCSC/PDF6-2/24.%20Oindri.pdf

[1]. Penrose L.S (1969). Effects of additive genes at many loci compared with those of a set of alleles at one locus in parent-children
and sib correlation. Annals of human genetics.33: 15-21
[2]. Penrose L.S and Ohara P.T (1973). The development of the epidermal ridges .Journal of Medical Genetics 10: 201-208
[3]. Nora J.J and Fraser F.C (1989). Medical genetics: Principles and Practice.3rd edition. Philadelphia : Lea Febiger
[4]. Cannon T.D (1997).The nature and mechanism of obstetric influence in schizophrenia: A review and synthesis of epidemiologic
studies
[5]. Schaumann, B.A and Alter , M (1976). Dermatoglyphics in medical disorders. New York: NY Springer-Verlag.
[6]. Rajangam, S, Thomas L.M and Janakiram S.(1995). Dermatoglyphics in Down’s syndrome. Journal of Indian Medical Association
93: 10-30.
[7]. Babler W.J (1991). Embryonic development of epidermal ridges and their configurations. Birth Defects Original Article Series.
27:95-112.
[8]. Brown A.S, Schaefer C.A, Wyatt R.J, Goetz R.B, Gorman J.M. and Susser E.S(2000). Maternal exposure to respiratory infections
and adult schizophrenia spectrum disorder: A prospective birth cohort study. Schizophrenia Bulletin. 26: 287-295.
[9]. Rossa A, Gutierrez B, Arias B and Fananas L. (2001) Dermatoglyphics and abnormal palmar flexion creases as markers af early
prenatal stress in children with idiopathic intellectual disability. Journal of Intellectual Disability Research. 45: 416-423.
[10]. Cummins H, and Midlo C. (1943). Finger prints, palms and soles. New York:Blakinson.
[11]. Gardner H. (1999). Intelligence Reframes: Multiple intelligences for the 21st
century. New York: Basic Books.
[12]. Armstrong T. (1994). Multiple intelligence in the class room. Virginir: ASCD.
[13]. Okajima M. (1975). Development of dermal ridge in the fetus. Journal of Medical genetics. 12: 243-250.
[14]. Mostaf Najafi, MD.(2009)Association between finger patterns of Digit II and intelligence quotient level in adolescents. Iran J
Pediatr sep 2009;vol 19 (No 3).277-284.
[15]. Reed T, Young RS. Genetic analysis of multivariate fingertip dermatoglyphic factors and comparison with corresponding individual
variables. Ann Hum Biol. 1979 Hul-Aug;6(4):357-362.

एक शंका: हि टेस्ट करण्यासाठी व्यक्ती स्वतः असावा लागतो का की त्याच्या fingerprints चालतात?

माझ्या (तुटपुंज्या) माहितीनुसारः
१. Fingerprints चा genes शी संबंध अजुनतरी सिद्ध झालेला नाहीये. Biological twins (म्हणजे ज्यान्चे DNA सारखे असतात) च्या fingerprints या दोन unrelated random लोकांच्या fingerprints ईतक्याच सारख्या असतात.

२. Fingerprint formation मधे एक random factor असतो जो की खूप महत्त्वाचा असतो. या factor मुळे fingerprints या unique होतात.

---
कानडा (Ph. D. (research work in Biometrics))

अवांतरः च्यायला खर्‍या, सिद्ध करता येणार्‍या science पासुन जितके कमावतोय त्यापेक्षा जास्त "या शास्त्राच्या" अभ्यासाने कमावले असते. (I was born intelligent. Education ruined me.)

मोहन की मीरा,

तुमच्या मूळ पोस्टला मी प्रतिसाद दिला होता आणि तुम्ही साफ खोटी माहिती देत आहात असे तीन प्रमुख मुद्दे मांडले होते. तुम्ही त्याला बगल देऊन प्रतिसाद दिला आहे ज्यात मला अनुभव आला म्हणून मी फ्रॅन्चाईझी घेतली वगैरे अ‍ॅमवे, जापान लाइफ गादीछाप युक्तीवाद केले आहेत जे वैज्ञानिक दृष्टीने विषयाकडे पहाण्यासाठी फारसे उपयुक्त नाहीत.

तीन अनुत्तरीत मुद्दे

१) हाताच्या दहा बोटांच्या रेषांचा मेंदूच्या दहा भागांशी वेगवेगळ्या बुद्धीमत्तांचे थेट डायग्नॉसिस वा मापन करता येईल असा संबंध सिद्ध करणारे ठोस संशोधन. तुम्ही दिलेल्या संदर्भांमध्ये हे नाही.

२) डॉ. गार्डनर यांच्या नावाचा दुरुपयोग - <<< आपल्या बोटां वरील रेषा ज्याला आपण फिंगर प्रिंटस म्हणतो ..... पण ह्याबद्दल खरे संशोधन करुन त्याचा वापर बुद्धी वा मेंदुशी जोडुन मल्टीपल इंटेलिजन्स ची थीअरी आणली डॉ. हावर्ड गार्ड्नर ह्यांनी. >>> असे तुम्ही आणि या व्यवसायातील अनेक जण म्हणतात. डॉ. गार्डनर यांचे मल्टिपल इंटेलिजन्सचे काम प्रसिद्ध आहे. ते अ‍ॅप्टिट्यूड टेस्टच्या मार्गाने जाणारे आहे. त्यांनी वरील क्र. १ प्रमाणे संशोधन केले आहे हे साफ खोटे आहे. तसे नसल्यास कृपया ते दाखवा.

३) <<<हॉर्वर्ड युनिव्हर्सीटी मधे ह्या विषयाचा स्वतंत्र विभाग आहे...>>> विद्यापीठाच्या स्वतंत्र विभागाची वेबसाईट तर असणारच. कृपया लिंक द्या.

------------------------------------------------------------------------------

मला काही तुमच्याशी भांडण्याची इच्छा नाही. पण तीन गोष्टींनी मी लिहायला प्रवृत्त झालो.

१) सुरुवातीला हा विषय मी लाईटली घेउन धागाकर्त्याला केवळ एका ओळीचा हलका फुलका प्रतिसाद दिला होता. पण मायबोलीसारख्या साईटवर तसा उच्चशिक्षितांचा वावर असतो, आणि त्यातले कितीतरी याला बळी पडत आहेत हा माझ्यासाठी एक धक्काच होता म्हणून मी तुम्हाला सविस्तर प्रतिसाद दिला आणि तुमच्या प्रामाणिक प्रतिसादाची अपेक्षा होती/आहे.

२) तुम्ही हार्ट सर्जरी, लेप्रोस्कोपिक सर्जरी, एपिड्यूरल अशी उदाहरणे देउन वारंवार हे सगळे सायंटिफिकआहे, लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे असे म्हटले आहे. त्यामुळे तत्वज्ञान, राजकारण साहित्य, धार्मिक वगैरे विषयांसारखे ज्यांना,पटतेय त्याम्नी करा, नाही पटत त्यांनी नका करू अशी पळवाट काढता येणार नाही. तंत्रज्ञान हे कलाशाखेसारखे सब्जेक्टिव्ह नाही. ते असेल तर आहे असे दाखवून द्या नाही तर नाही असे मान्य करा.

३) तुम्ही मुद्दाम केली असे मला म्हणायचे नाही, पण तुमच्याकडून ४२ जणाची फसवणूक झाली आहे. किमान तशी शक्यता आहे हे लक्षात घेउन तुम्ही या विषयाकडे गंभीरपणे बघून उत्तरे शोधयला हवीत आणि द्यायलाही हवीत. तुम्ही फ्रॅण्चाइझी आहात, तुम्ही स्वतःच या कंपनीची रिपोर्ट करण्याची प्रोसेस आणि मार्केटिंग मटेरिअल याकडे ऑडिट करण्याच्या नजरेने पाहिले तर रेड फ्लॅग्ज तुम्हाला स्वतःलाच दिसतील.

Pages