खर्डेघाशी

Submitted by Chakrapani on 9 March, 2008 - 22:09

दिवसांवर दिवसांच्या राशी
जीवन म्हणजे खर्डेघाशी

फोडासम ज़पलेले शैशव
खपली धरते तळहाताशी

तुझ्या बटांशी खेळुन जावे,
वार्‍याची इतकी बदमाशी?

बांधू जेथे घरटे आपण
तिथेच मथुरा,तिथेच काशी

भुकेल्यांस भाकरी नसे, अन्
खाणारे खाऊन उपाशी

तुझ्याविना जगण्याची शिक्षा
हीच का मरेस्तोवर फाशी?

जरी वादळे येती ज़ाती
लाटांना भिडतात खलाशी

गुलमोहर: 

मस्त गझल आहे चक्रपाणी.. छोटी आणि छान. हे शेर आवडले, वार्‍याचा सर्वात जास्त! Happy

तुझ्या बटांशी खेळुन जावे,
वार्‍याची इतकी बदमाशी?

बांधू जेथे घरटे आपण
तिथेच मथुरा,तिथेच काशी

तुझ्याविना जगण्याची शिक्षा
हीच का मरेस्तोवर फाशी?

तुझ्याविना जगण्याची शिक्षा
हीच का मरेस्तोवर फाशी?>>>>

सही लिहिलंय!!!! Happy

भुकेल्यांस भाकरी नसे, अन्
खाणारे खाऊन उपाशी

तुझ्याविना जगण्याची शिक्षा
हीच का मरेस्तोवर फाशी?

हे शेर आवडले. छान आहे गझल.

मस्तच आहे गझल.
>> भुकेल्यांस भाकरी नसे, अन्
खाणारे, खाऊन उपाशी

दिवसांवर दिवसांच्या राशी
जीवन म्हणजे खर्डेघाशी

मतला अप्रतीम!

भुकेल्यांस भाकरी नसे, अन्
खाणारे खाऊन उपाशी

तुझ्याविना जगण्याची शिक्षा
हीच का मरेस्तोवर फाशी?

दोन्ही शेर ताकदीचे आहेत!

पण काही शेर उगीच भरती असल्यासारखे वाटले, किंवा ते तितके ताकदीने आले नसावेत म्हणून तसे वाटते आहे.

पण एकूण तुम्ही सशक्त गझलकार आहात! गझल वाचून मजा आली...!

अधिकाधिक चांगल्या चांगल्या गझला लिहा हीच शुभेच्छा!

सारंग

वा! मतल्याचा शेर एकदम जबरदस्त आहे.
शैशव, वारा आणि मक्त्याचा शेरही आवडले.
फक्त
>> हीच का मरेस्तोवर फाशी?
या शेराचा अर्थही छान पण मात्रांची गडबड फ्लो मधे बाधा आणतेय.

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.
सारंग,
तुमच्या प्रतिसादानंतर गझल परत वाचली. कुठला शेर भरतीचा आलाय, असे मला तरी वाटले नाही; पण इतर शेरांच्या तुलनेत काही शेर फारच साधे आलेत, आणि त्यामुळे खास वाटत नाहीत, हे तुमचे निरी़क्षण पटले. विशेषकरून शेवटच्या शेरात मला स्वतःला तसे जाणवले.
संघमित्रा,
हीच का मरेस्तोवर फाशी मधल्या 'च'चा पूर्ण उच्चार केल्यास (हीच् असा न करता हीच असा) लय बिघडायची नाही, असे वाटते.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे पुनश्च आभार. अशाच सूचना, मतमतांतरांची अपेक्षा आहे. यातूनच शिक्षणाची संधी उपलब्ध होते, असा अनुभव आहे.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

पुन्हा एकदा दाद चक्रपाणी!
मतला, शैशव आणि उपाशी हे शेर विशेष!!

आवडली गझल.

तिसरा आणि चवथा सारंग म्हणतो तसे वाटले!

मतला खूपच आवडला!वेगळा वाटला!
फाशीचा तर अप्रतिम!