दुकानात नशिबाच्या

Submitted by जयदीप. on 24 May, 2016 - 13:50

'आता' असले तर मग 'नंतर' नाही आहे
दुकानात नशिबाच्या 'लवकर' नाही आहे

आठवेल कोणाला चेहरा तुझा नंतर
कुरूप नाही आहे, सुंदर नाही आहे

वाद्य कोणते आहे काही समजत नाही
रेडिओमधे इतकी खरखर नाही आहे

पायाखाली जमीन लागत आहे का बघ
येथे काहीसुद्धा स्थावर नाही आहे

रिकामेच तर होते घर, मग शिरल्या चिमण्या
कसे म्हणू कोणाचा वावर नाही आहे

लांबलचक आहे अन् मुद्देसूदच आहे
पण, माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही आहे

एक चेतना आहे साठवते क्षण सगळे
मेंदू कोणाचाही सर्व्हर नाही आहे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users