जम्मू ते पुणे सायकल मोहीम (भाग ८): हनुमानगढ - राजस्थानात प्रवेश

Submitted by आशुचँप on 15 May, 2016 - 13:26

http://www.maayboli.com/node/58217 - (भाग ७): मुक्तसरसाहीब - कसोटीचा दिवस
======================================================================

कालच्या तुफान दमणूकीनंतर आज कुठेही उठून जायची इच्छाच उरली नव्हती. आजचा दिवस ब्रेक घ्यावा, सगळा शीण जाऊ द्यावा आणि मग पुढे निघावे अशी तीव्र भावना मनात दाटून आली.
पण आमच्या टाईट स्केड्युलमध्ये असले काही चोचले बसण्यासारखेच नव्हते. त्यामुळे चरफडत उठलो. मी आणि वेदांग रूम पार्टनर होते, त्याचे आवरून झाल्यावर मी माझेही आटपून खाली आलो तर मंडळींचे सामान सायकलवर चढवून पण झाले होते.
आम्ही राहीलो त्या हॉटेलला पार्किंगसदृश काही प्रकाराच नव्हता, त्यामुळे काल रात्री चक्क त्यांच्या डायनिंग रूममध्ये टेबले बाजूला सरकावून सायकली कोंबल्या होत्या.
त्याच अडचणीत मग गरमा गरम चहाचे घो़ट घेत पॅनिअर्स बांधले.

शरीर आणि मन दोन्ही चिंबून गेल्यासारखे झालं होतं आणि बाहेर पडलो तर मळभ. मस्तपैकी दाटून आलेलं आभाळ. म्हणलं, अॅक्युवेदरच्या अंदाजाला मानले पाहिजे. मी दोन आठवड्यांपूर्वी सगळ्या दिवसांचे हवामान त्या अॅपवर चेक केलं होतं त्यात त्यांनी मुक्तसरला ढगाळ हवामान, हलक्या पावसाच्या सरी असे अनुमान केले होते.
त्याला अनुसरून मी एक लाईटवेट वींडचिटरपण सामानात कोंबले होते.

कालच्या प्रमाणे आजही रस्ता शोधताना गडबड झालीच. पेव्हर ब्लॉकवरून खडखड करत जात, गल्लीबोळातून रस्ता विचारत विचारत बाहेर पडलो तेव्हा तासभर उलटून गेला होता. भूकही कडाडून लागली होती. आणि एका हॉ़टेलजवळ आलो तोच भुरभुर पाऊस..

पडत्या फळाची आज्ञा घेत आम्ही आत घुसलो. ऐसपैस हॉल आणि त्यात आम्हीच फक्त. नाष्ट्याला नेहमीप्रमाणे प्राठा. सगळ्यांना म्हणलं, आजच्या दिवसात काय खायचाय तो प्राठा खाऊन घ्या, आज आपण राजस्थानात शिरणार आहोत. तेव्हा उद्यापासून पराठे वगैरेचे लाड बंद. सामोसा, फाफडा, कचोरी वगैरे मिळेल नाश्त्याला.

त्यावर हेम म्हणे, उद्याचे उद्या बघू आत्ता तर खाऊ दे...त्याचे एक बरे होते, सकाळी सकाळी तो मस्त एक पटीयाळा पेग दुध हाणायचा. त्यावर त्याचे नाष्टापर्यंत निभावायचे. नंतरही जिथे मिळेल तिथे दुधाचा रतीब सुरुच असायचा. त्याचे बघून मी पण नंतर दुध घ्यायला सुरुवात केली, पण त्याची कारणे वेगळी होती. ते सांगतोच नंतर.

दरम्यानची गंमत. सकाळचे विधी आटपून घ्यावेत म्हणून तिथल्याच एका स्वच्छतागृहात गेलो आणि गडबड लक्षात आली. आम्हाला मिळालेला मेरीडाचा सायकल सूट हा वन-पीस होता. पायातून चढवून मग त्याचे पट्टे खांद्यावरून ओढून घ्यायचे. त्यावर मग जर्सी, वर गरम कपडे, त्यावर जर्कीन. आणि ही सगळी वस्त्रप्रावरणे उतरून ठेवल्याशिवाय सूट उतरवणेही शक्य नव्हते.
अरे देवा, मेजर कसरत करावी लागली आणि तीपण अशा बिकट प्रसंगी. आत्ता ते आठवून हसू येतंय, पण तिथे म्हणजे आता काय करू काय नको असा दुर्धर प्रसंग ओढवलेला.

हॉटेलातून निघालो तोवर हेमला नासिकच्या महेंद्र महाजनांचा मेसेज आला की मुक्तसरला आहात तर गुरुद्वारा नक्की पहा. पण आता उशीर झाला होता. आता मात्र आपण खरंच काहीतरी मिस केल्यासारखं वाटू लागलं. परत आल्यावर नंतर त्यांना जेव्हा गुरुद्वारा न केल्याचं समजलं तेव्हा त्यांनी उत्तरपूजा बांधली, असे कळले हेमकडून. खरेच हा खूप मोठा मिस झाला होता. अमृतसरला परत येणे शक्य होते, पण फक्त मुक्तसरसाठी येणे जवळपास नाहीतच जमा. थोडक्यासाठी हुकला. कायमची हळहळ.

दरम्यान, एक वैताग सुरु झाला. माझ्या टाचेच्या जरा वरच्या बाजूला दुखायला लागले. अगदी ठणका म्हणता येणार नाही पण जाणवण्याईतपत. म्हणलं, कालच्या अतिश्रमाचा परिणाम असणार. मग थोडे स्ट्रेचिंग करून पाहिले. पण शीर आखडल्यासारखेच झाले होते आणि पाय मोकळा होत नव्हता. त्यावेळी तरी ते फार मेजर वाटले नाही आणि तसाच सायकल दामटवत निघालो. दुपारच्या सुमारास कधीतरी थोडे बरे वाटले पण तब्बल २०-३० किमी असेच चालवले. हे दुखणे मला पुढे किती महागात पडणार होते याची त्यावेळी मुळीदेखील कल्पना आली नाही.

वाटले होते आज दिवसभर पाउस पाठ सोडणार नाही. पण नाहीच, त्याची हजेरी फक्त रस्ता ओला करण्यापुरतीच होती. त्यामुळे माझी विंडचिटर कधी बाहेर आलेच नाही. असेही आता थंडीचा बहर ओसरला होता आणि थर्मल्सपण कायमस्वरूपी पॅनिअर्समध्ये स्थानापन्न झाले होते. आता ते ओझं पुण्यापर्यंत वागवत न्यायचे होते. काही पर्यायच नव्हता. पण वातावरण भारी झालं होते. जूनमधे शाळा सुरु होतात तेव्हा जसं कुंद पावसाळी वातावरण असतं तसं.

रस्ताही मस्तच.. अगदी पुकारता चला हूं मै .. गाण्यातल्यासारखा! डावीकडे मोहरीची पिवळी हिरवी लांबचलांब शेतं..

मधेच बाबुभाईची सायकल पंक्चर झाल्याने सगळे थांबलो.

एसएलआर असताना सेल्फी घेऊ नये असे थोडीच आहे... Happy

जवळची संत्री अधाशासारखी सगळ्यांनी संपवली. सगळे आपापल्या वेगाने निघाले. मी आपला पाय साथ देईना त्यामुळे हळूहळू पॅडल मारत होतो. माझ्यासोबतीला हेम आणि सुह्द. डावीकडे आता संत्र्याच्या बागा लागलेल्या व तिथलीच संत्री विकायला बाहेर. कल्पनातीत स्वस्त. त्यामुळे हावरटासारखी किलोकिलोच्या हिशेबात घेतली. इतकी की ठेवताना कसरत करावी लागली. एके ठिकाणी संत्री व पेरु घेऊन वाटावाटी केली.

आम्ही अजूनही सरहद्दीला खेटूनच चाललो होतो. मालौट हे गाव कापस उत्पादनासाठी प्रसिद्ध. तिथून राजस्थानची सरहद्द होती ६५ किमी आणि पाकिस्तान होतं ५५ किमी. त्यामुळे इथेही एक तणावपूर्ण शांतता अनुभवायला मिळाली.

पण जम्मू, अमृतसरसारखा मिलीटरी प्रेझेन्स फारसा नव्हता. टिपिकल पंजाबी गाव, रस्त्याच्या कडेला बाजली, धाबे, ट्रॅक्टर्स, ट्रक्सची वाहतूक जोरात. आणि त्यात नवीन भर पडली होती ती आमची. छान वातावरणाचा आनंद घेत डुलत डुलत नादात जात असताना एक लाकडाचे ओंडके घेऊन चाललेला ट्रॅक्टर मागून गेला पुढे. स्पीड बेताचाच होता आणि त्यामुळे त्याचा ड्राफ्ट घ्यायचा मोह आवरला नाही.

असा वाऱ्याचा फोर्स फारसा नव्हता पण तरीही ड्राफ्टमध्ये तेवढेही कष्ट वाचतात. त्या झोनमध्ये तुम्ही असलात की निर्वात पोकळीसारखे फक्त पॅडल मारत रहावे लागते. अर्थात, सतत एक लक्ष समोरच्या गाडीवर आणि हात ब्रेकवर अत्यंत दक्ष. मध्येच मागे पाहिले तर हेमही पाठोपाठ माझ्या मागच्या चाकावर सावध नजर ठेवत येताना दिसला. तब्बल १०-१२ किमी अंतर आम्ही जवळपास ३०च्या अॅव्हरेज स्पीडने पार केले. मस्त धम्माल येत होती. नेमका तो डावीकडे वळला आणि मला चरफडत थांबावे लागले. अजून एक १०-१२ किमी मिळाला असता तर....
(धोक्याची सूचना - ड्राफ्ट घेण्याबद्दल पूर्ण खात्री नसेल तर मुळीच हे करायला जाऊ नये, जर पुढच्या गाडीच्या वेगाचा अंदाज आला नाही, किंवा त्याने कचदिशी ब्रेक मारला तर तुम्ही त्याला जाऊन आदळणार हे निश्चित. त्यामुळे डू नॉट फॉलो)

असो, पण जिथे थांबलो, तिथूनच एक फाटा फुटत होता आणि थांबणे आवश्यकच होते. त्या तिठ्यावरच एक बऱ्यापैकी हॉटेल दिसले. ५० एक किमी झाले असावेत आणि अजून बराच पल्ला बाकी होता. पण भूकही कडाडून लागलेली.

मग थांबलो. जेवण नेहमीचेच रोट्या,पनीरची भाजी. पण त्या धाबामालकाला प्लेट प्रकार फारसा मान्य नव्हता. त्याने भाजी आणि एका ताटलीत रोट्यांची चवड आणून ठेवली. वाट पाहून पण काही मिळेना आणि वाफा निवायला लागल्या तसा धीर निघेना आणि आजूबाजूला बघत एका हातात रोटी घेऊन, तशीच डायरेक्ट भाजीत बुडवून खायला सुरवात केली. भूक इतकी लागली होती की हायजीन वगैरे विचार करण्याची सवडही नव्हती. असेही ट्रेकर मंडळींना त्याचे वावडेच असते. त्यामुळे मी, हेम दोघे एकाच ताटलीवर तुटून पडलो. बाकी मंडळींनी अनुकरण करत ताव मारला. त्यानंतर आलेले ताकही ए वन होते.

दरम्यानच्या काळात सुह्दने किस्सा केला. धाब्याशेजारीच मोबाईल अॅक्सेसरीजचे दुकान होते. तिथे जाऊन तो हेडफोन्स घेऊन आला. आणि एकदम एक्साईट झालेला सांगताना कि त्याला किती स्वस्तात पडले. आणि नीट काय सांगितले ते कळले नाही पण आम्ही ऐकले ते असे की हेडफोन्स ८० रुपयाला होते आणि त्याने जोरदार बार्गेनिंग करून ते १०० ला घेतले.

हाहाहा, आम्ही म्हणजे हसून कोसळलोच. असाही सुह्द कायमच बकरा व्हायचा सगळ्यांचा, त्यामुळे सगळेच एन्जॉय करत होतो. अर्थात त्याला असे हिणवायचा उद्देश नसायचा पण तो जो काही गडबडगुंडा करायचा त्यामुळे आम्हाला फुल्ल चान्स मिळायचा. याचेही परिणाम पुढे घातक होणार होते.

एकंदरीत आजचा दिवस म्हणजे पुढे घडणाऱ्या नाट्यमय घटनांची बीजे रोवणारा होता एवढे मात्र निश्चित. जेवल्यावर तिथेच बाजल्यावर पडून जरा विश्रांती घेतली आणि निघालो आणि पुढचा बळी ठरला बाबुभाई.

भाई उत्साहात निघाले आणि मागचे येतात का नाही न बघता पुढे आलेल्या एका उंच थोरल्या फ्लायओव्हरवर सायकल घातली. रुटप्रमाणे आम्हाला डावीकडे वळायचे होते. पण म्हणले याची जरा गंमत करूया. म्हणून त्याला पुर्ण फ्लायओव्हर चढू दिला आणि मग पलिकडे गेल्यावर फोन करून सांगतले की ये आता खाली, आपल्याला डावीकडे जायचे आहे....आला मग ठणाणा करत.

अबोहर अर्थात व्हाईट गोल्ड नावाने ओळखल्या जाणाऱ्या शहरापासून आम्ही डावीकडे वळलो आणि काही अंतर गेल्यानंतर पुन्हा डावीकडे. त्यामुळे हेमला वाटू लागले की आपण पुन्हा बहुदा मुक्तसरच्या रस्त्याला लागलो. पण तसे नव्हते. आम्ही आता पाकिस्तान सरहद्दीपासून दूर चाललो होतो. आधिच्या प्लॅनप्रमाणे श्रीगंगानंगर मार्गे सुरतगडला मुक्काम होता. पण बदललेल्या रु़टनुसार आजचा मुक्काम होता हनुमानगड आणि त्यामुळे आता इंटीरीयर राजस्थानमध्ये घुसायला सज्ज झालो.

साधारण ७० एक किमी अंतर (मुक्तसरपासून) झाल्यावर आम्ही अधिकृतरित्या राजस्थानात प्रवेश केला. असेही एका बोर्डाव्यतिरिक्त तिथे कसलीही खूण नव्हती. राज्यसीमा म्हणून फोटो काढायला जमलो तर लगेच २०-३० माणसं भुरुभुरु जमा झाली.

आजूबाजूचे लोक अगम्य राजस्थानी, पंजाबीमध्ये प्रश्न विचारत होते आणि त्यांचे उच्चार काही केल्या पल्लेच पडत नव्हते. काहीतरी थातुर मातुर उत्तरे देऊन त्यांना वाटेला लावायचा प्रयत्न केला पण त्यांनी निघेपर्यंत काही पिच्छा सोडला नाही. ईतकेच काय तर आमचा आम्हा एक धड ग्रुप फोटोही घेऊ दिला नाही.

मुक्कामाचं हनुमानगड अजूनही ४५ किमी.. हद्दीतून पुढे येऊन वळण घेतलं तर लगेच खड्ड्यांचा रस्ता सुरु झाला. राजस्थानात प्रवेश केल्या केल्या मला लगेच असा ट्रान्सफर सीन होईल असे वाटले होते. लगेच वाळूचे डोंगर वगैरे. पण प्रत्यक्षात मोहरीची शेतीच लागली. ती देखील मैलोन मैल. ही पद्धतशीर लागवड होती ती एखाद्या तेल उत्पादक कंपनीची असावी कारण सगळीकडे व्यवस्थीत कुंपण घालून जोपासलेली होती. इतकी एकत्रित शेती आख्ख्या पंजाबातपण नव्हती दिसली.

ही शेती एका वकीलाची असल्याचा बोर्ड दिसला. साईड बिझनेस कुठला असावा याचा तर्कच लागेना..

काही किमी अंतर गेल्यावर मात्र बदल दिसू लागला. हिरवीगार शेती, त्यातून वाहणारे निळ्याशार पाण्याचे कालवे, त्यावर विहरणारे पांढरेशुभ्र बगळ्यांचे थवे, रस्त्याच्या बाजूने मस्त झाडी, त्यातून सुरेख खड्डेविरहीत डांबरी रस्ता, बाजूला धाबे, त्यातून दरवळत येणारा पराठ्यांचा आणि पनीरचा भूक प्रज्वलीत करणारा वास....सगळं मागं पडलं आणि आता परिसरात लगेच बदल दिसू लागला होता. रखरख दिसायला लागली होती. पांढऱ्या मातीची निस्तेज घरं..एक चहाची टपरी सोडली तेव्हा अंधार पडायला सुरुवात झाली होती. सगळ्यांनी लाईटस सेट केले. अंतर संपता संपत नव्हतं त्यांत राज्यसीमेवरचा भाग असल्याने रस्ते खड्डाळू होते.

सदुलशहर, कैरवाला, धोलीपाल अशी किरकोळ गावे पार करत झपाट्याने अंतर कापत चाललो होतो पण आता प्रचंड कंटाळा आला होता. दिवसभर सायकल चालवायला काही वाटत नाही पण रात्री ते लाईट्स लावून सायकल चालवणे हे फारच कटकटीचे वाटत होते.

मधे एका गांवात (बहुतेक धौलीपाल) किरकोळ खरेदीसाठी थांबलो तर निम्मा गांव जमा झाला. पुढे व्यवस्थित रांगेत जात हनुमानगड गाठलं तोवर जेवणाची वेळ झाली होती. हॉटेल मस्तच होतं. हॉटेलच्या मागील बाजूस सायकली लावल्या. पटापट सगळ्यांनी आवरलं व जेवणासाठी थोडं चालत जाऊन एका मोकळ्याशा हॉटेलात शिरलो. गरमगरम सूप ढोसल्यावर बरं वाटलं.

जरी राजस्थानात आलो असलो तरी पंजाबी जेवणाचा प्रभाव होताच त्यामुळे एक मसालेदार, जळजळीत पंजाब जेवण घशाखाली घातले.

पण तिथल्या महागड्या पंजाबी जेवणापेक्षा धाब्यावरचे स्वस्त आणि मस्त जेवणच मनात घर करून आहे. आजही इतके दिवस झाले पण पुूण्यात कुठल्याही हॉटेलात जाऊन पंजाबी खाण्याची इच्छाच झालेली नाही. कदाचित तिथल्या हवेची, गव्हाची आणि धिप्पाड माणसांच्या प्रेमळ हाताची चव असेल, आणि केवळ तेवढ्यासाठी पुन्हा एकदा पंजाबवारी करायची आहे.

जसे केरळात झाले तसे काहीसे इथे पंजाबात झाले. अतृप्त मनाने बाहेर पडलो ते पुन्हा येण्यासाठी. बकेट लिस्टमध्ये आता पंजाब आणि केरळ आहे. फक्त सायकलींग आणि खादाडी एवढेच.

आज माझे पार्टनर घाटपांडे काका होते, त्यांना असाही टीव्ही बघण्यात फारस इंट्रेस्ट नसायचा त्यामुळे मी आपले आवडीचे सोनी मिक्स चॅनेल लाऊन बघत बसलो. हे एक माझे आणि हेमचे फेवरीट चॅनेल. दिवसभर काम करून घरी आल्यावर जेवताना इथे मस्त जुनी हिंदी गाणी लागलेली असतात. ते बघताना असे छान रिलॅक्स व्हायला व्हायचे. तोच प्रकार तिथेही. जिथे चान्स मिळेल तेव्हा सोनी मिक्स लावलेच जायचे.

असो, तर आजचा हिशेब म्हणजे ११८ किमी. पण तेवढ्यासाठीही आम्ही अंधार केल्यामुळे काका नाराज होते. रात्री मिटींग झाली त्यात लवकर वेळेत निघायचे ठरले. आणि जो कोण उशीर करेल तो त्या दिवशीच्या खाण्याचे बिल देईल असा फतवाही निघाला.

ते ऐकताच माझ्या पोटात गोळा. कारण लेट लतीफ मी आणि सुह्द. त्यामुळे इथून पुढे आम्हालाच बांबू बसणार हे निश्चित.

...

===================================================
http://www.maayboli.com/node/60334 - (भाग 9): सरदारशहर - वालुकामय वेदना

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमा प्रांतातला फरक आम्हा ही बघितला होता... हिमाचल प्रदेश सोडून पंजाबात शिरताना..

लवकर लिहीत रहा.. सायकलिंगच्या स्पीडने..

इंद्रा - हो तिथेही जोरदार फरक जाणवतो. सगळ्यात तरी भारी होता कर्नाटक मधून केरळात शिरतानाच.

मार्गी, चनस धन्यवाद

आशु - मस्त चालली आहे राईड; आमची न दमता मस्त सफर घडते आहे !!
पुढल्या प्रवासासाठी फार थांबायला लावु नका Happy

मस्त चालू आहे लेखमाला. Happy
बिझी असशील ऑफीसच्या कामात हे माहीती आहेच पण तरीही प्लीज पुढले भाग लवकर टाकायचा प्रयत्न करशील का? लिंक तुटल्यासारखी होते फार अंतर पडलं की Happy पुलेशु

छान ! मलाही सायकलवर फिरायचे वेड होते, पण अजिंठयाचे पुढे गेलो नाही.
रात्रीही प्रवास करत होते काय?

बऱ्याच वेळाने आला हा भाग . मस्त आहे हा हा भाग .

ते मोहरीच शेत बघून यश चोप्रांच्या सिनेमातले प्रसंग आठवले. डिट्टो तसंच दिसतेय

सर्वांना धन्यवाद...हो पुढचे टाकतो आता पटापटा...

मुक्तेश्वर - नाही, रात्री हॉटेलमध्ये मुक्काम करत होतो. असेही सीमाभाग जवळ असल्याने रात्री बेरात्री फिरणे शक्यच नव्हते आणि मुळात फिजिकलीही कुणालाच जमणार नाही.

ते मोहरीच शेत बघून यश चोप्रांच्या सिनेमातले प्रसंग आठवले. डिट्टो तसंच दिसतेय

हो, अगदी, असे वाटले की आता तुझे देखा तो ये जाना म्हणंत जाडजूड काजोल येईल धावत...

जोक्स अपार्ट, पण खूप सुंदर नजारा होता, आणि दुर्दैवाने तो कॅमेरात धड कॅप्चर करता आलेला नाही.

दादूस लै दिवसांनी भाग इलो!! मजा आली वाचुन! ये तो हमारा घर आंगन है जी! आपला भारत आई आहे असे आपण मानतो तिचा चेहरा पक्षी लद्दाख कश्मीर अतिशय स्वर्गसुंदर आहेत, ह्या भागात आलो की घळघळ डोळे कधी पाझरतात समजत सुद्धा नाही , तेच पंजाब राजस्थान महाराष्ट्र वीर पैदा करणारे खड्गहस्त आहेत तिचे , नॉर्थ ईस्ट म्हणजे हाती कमळ धरलेला सुन्दर पद्मधारी हात आहे बिहार यूपी चे मजबूत खांदे आहे. सगळीकडे आपण फिरलोय खुप फिरलोय मी तिच्या अंगाखांद्यावर खेळलोय पण सालं कन्याकुमारी जायची हिंमत नाही होत, चांस आला तरी गेलो नाही, ते तिचे परमपवित्र पाय आहेत तिथे गेलो तर सगळी बंधने तोडून मी ते पाय धरून रडत बसेल असे वाटते, रिटायर झालो की तिच्या पायाशी जाऊन बसणार मात्र मी एक महिनाभर प्रार्थना करायला की पुढचा जन्म परत तुझ्या पोटी दे मला म्हणूनच...

ह्या भावनिक नमनाला घड़ाभर तेलाची गरज काय ? तर तुम्ही जे काही लिहिताय ते मला ह्या सगळ्या आठवणी एखादा चित्रपट डोळ्यासमोर सरकावा तशी फीलिंग देत आहेत, राजस्थान सोबत आता सोयरीक झाली आहेच पंजाबी जनतेचा ट्रेनिंग ते मैत्री असलेला सुंदर अनुभव आहेच सोबतीला , राजस्थान मधे श्रीगंगानगर हा भाग किंवा हनुमानगढ़ भाग समृद्ध झाला आहे तो मानव निर्मित चमत्कार उर्फ़ इंदिरा गांधी कैनाल प्रोजेक्ट मुळे, मुळात काटक राजपूत जाट बिश्नोई मीणा लोकांना जेव्हा हे पाण्याचे वाण मिळाले तेव्हा ह्या लोकांनी अक्षरशः पाण्यात घाम कालवुन नंदनवन फुलवले आहे भाऊ, गंमत म्हणजे एकेकाळी वाळवंटी जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला श्रीगंगानगर जिल्हा हा आज भारतातल्या पर हेक्टरी सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे मोहरी तुर कापुस अन संत्री ह्या पिकांचा, अतिशय उत्तम भाग

टिप :- कार्यबहुल्य मी समजू शकतो बॉस पण भाग जरा जरा लवकर लवकर येऊ दे की जरा आम्ही आपले चक्क्या सारखे किती टांगून घ्यायचे स्वतःला???

बाप्पू - कडक पोस्ट....काय अप्रतिम लिहीता तुम्ही. अकादमीच्या लेखांवरून कल्पना आलीच होती पण तुमचे एक एक प्रतिसाद असे संग्रही ठेवण्यासारखे असतात.
फारच सुंदर....

आम्ही आपले चक्क्या सारखे किती टांगून घ्यायचे स्वतःला???
>>
हाहाहा, टाकतो टाकतो आता पुढचे पटापटा

साहेब आम्ही तुमच्या पासून प्रेरणा घेऊन सायकलिंग सुरु केल आणि तुम्ही हि लेख मालिका अर्धवट सोडली आहेत.
कन्याकुमारी ट्रीपची लेख मालिका अफलातून होती तशी हि पण वाटत होती. पण तुम्ही पुढचे लेख लिहिले नाहीत अजून. अशा करतो कि लेख मालिका पूर्ण कराल.

Pages