२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - पुर्वार्ध

Submitted by वेदांग on 17 May, 2016 - 13:30

||नर्मदे हर ||

"ठरलं...२६ जानेवारी २०१४ ला आपण परिक्रमेला सुरुवात करायची..." नंदू काका (आनंद घाटपांडे), बाबा आणि मी नवीन सायकल घ्यायला आलो असतानाचा बाबांनी बॉम्ब टाकला. मनात विचार आला, अजून १ वर्षापेक्षा जास्त वेळ आहे, आरामात सराव होईल पण त्या वेळी म्हणजेच डिसेंबर २०१२ ला लक्षात नव्हतं आलं कि वर्षभराची प्रक्टिस सुद्धा पुरेशी होणार नाहीये. जे भोग भोगायचे आहेत ते भोगावे लागणार आहेतच.
२ नव्या कोऱ्या Montra जाझ्झा घेऊन ऐटीत दुकानाच्या बाहेर पडलो. सध्या बाबा आणि माझ्यात मिळून १ च सायकल घेतली होती आणि दुसरी सायकल चंद्रशेखर काकांसाठी होती. दोघात १ सायकल घेण्याचं कारण म्हणजे बाबांना आलेला माझा पूर्वीचा अनुभव. मी किती आरंभशूर आहे याचा बाबांना चांगलाच अंदाज होता. पण मला काय हे मनापासून पटला नव्हतं. तसं बोलून सुद्धा दाखवलं. पण “महिनाभर नियमितपणे सराव केलास तर दुसरी सायकल घेऊ” असं उत्तर मिळाल्यामुळे तात्पुरता तरी गप्प बसावं लागलं. लगेचच २ दिवसात नंदू काकांनी पण तशीच सायकल घेतली. चंद्रशेखर काका बेळगाव ला असल्यामुळे त्यांना लगेच सायकल देणं शक्य नव्हतं. तो पर्यंत आमच्या तिघांसाठी ३ सायकल झाल्या होत्या.
सराव सुरु केला. पहिले २ दिवस ताशी १३-१४ च्या वेगाने ५-६ किलोमीटर अंतर जाऊन आलो तरी घाम फुटला. दम लागला. म्हणलं अवघड आहे. वय झालं आपलं. पण सराव सुरु ठेवायचा असा ठरवलं होतंच. १५ दिवसातच बराच फरक जाणवला. गूगल वर एक सायकल ग्रुप जॉईन केला. त्यांच्या सोबत लोणावळा ला जायचं ठरवलं. बाबा म्हणले 'कशाला उगाच उड्या मारतोयस, १५ दिवसांच्या प्रक्टिस वर ८० किलोमीटर जाणं म्हणजे काय खाउची गोष्ट नाहीये.' खरच होतं ते. आत्तापर्यंत एका दिवसातलं सायकलवर कापलेलं जास्तीत जास्त अंतर होतं ३० किलोमीटर. आणि आपण चाललो आहोत डायरेक्ट ८० किलोमीटर. जाऊ का नको असा चालू होता. ठरवलं. आपण जायचं. जे होईल ते भोगायचं. शाळा सोडल्यानंतर सायकल ला हात न लावलेला माझा मित्र रोहित पण यायला तयार होता. मग तो येतोय तर मी का नाही. आपण तर त्याला “सिनियर” आहोत. १५ दिवसांची जास्त प्रक्टीस आहे आपली. आपण त्याच्या पेक्षा नक्कीच ५-१० किलोमीटर जास्त सायकल चालवू. ठरल्या दिवशी निघालो. आम्ही जवळपास ७-८ लोक होतो. पहिले २५ किलोमीटर त्यांच्या स्पीड नि चालवल्यावर लक्षात आल कि आपण काय लोणावळ्या पर्यंत पोचू शकणार नाही. देहू रोड फाट्याला चहा प्यायला थांबलो. तेव्हा त्यांना सांगितलं कि बाबांनो तुम्ही तुमच्या स्पीड नी जा. आम्हाला जेवढं आणि जसं जमेल तसं हळू हळू येतो. तुम्ही थांबू नका.’ हळू हळू पुढे जात होतो. शेवटी कामशेत च्या अलीकडे रोहित म्हणाला कि आता परत फिरू. पडत्या फळाची आज्ञा समजून लगेच उलटं फिरलो. पुढचे ४ दिवस मांड्या, पोटऱ्या आणि पृष्ठभाग दुखत होता.
काही दिवसातच बाबांच्या आणि माझ्या पण लक्षात आलं कि मी नियमितपणे सराव करतोय. मग बाबांनी नवीन सायकल घेतली. श्वीन स्पोर्टेरा. आत्ताच्या सायकल पेक्षा खूपच स्मूथ होती. पण मला Montra च आवडली होती. बाबांची सायकल आली आणि चंद्रशेखर काका त्यांची सायकल बेळगाव ला घेऊन गेले.
आता सरावाला वेग यायला लागला होता. कात्रज घाट सुद्धा सर झाला. गूगल ग्रुप वर माझी आणि अद्वैत जोशी ची भेट झाली. त्याच्याकडे पण Montra च होती. मग बाबा आणि नंदू काकांना खो देऊन मी अद्वैत बरोबर सराव करायला लागलो. सराव करण्या बरोबर एकीकडे सायकलिंग ला लागणारी सगळी आयुधं घेणं सुद्धा चालू होतं.

सरावामध्ये कराड, कोल्हापूर, चिपळूण, सातारा अशी १०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असलेली गावे सुद्धा सर झाली. average स्पीड वाढला. लागणाऱ्या सगळ्या सामानाची जमवा जमव सुरु होतीच. आणि अशात आमच्या मोहिमेचा दिवस जवळ कधी येऊन ठेपला ते कळलेच नाही. आनंद घाटपांडे, चंद्रशेखर इती, अनिकेत सुतार, उपेंद्र शेवडे (बाबा) आणि मी हे मोहिमेचे सदस्य पक्के झालो. परिक्रमा ओमकारेश्वर पासून सुरु करण्याचे ठरले. त्यासाठी पुणे ते इंदूर बसने आणि इंदूर ते ओमकारेश्वर खाजगी गाडीने करायचे ठरले. सायकली बॉक्स मध्ये बांधून झाल्या आणि ठरल्याप्रमाणे २६ जानेवारी २०१४ ला नीता वोल्वो मध्ये बसलो. २५ तारखेच्या पहाटे इंदूर ला पोचलो तिकडूनच एक महिंद्रा ची गाडी मिळाली. तिच्या टपावर सायकली बांधल्या आणि ओमकारेश्वर च्या दिशेने कूच केली. साधारण ९.३० वाजता ठिकाणी पोचलो. आता सायकल कुठे उतरवाव्या या विचारात असतानाच एक गुरुजी भेटले. परिक्रमेचा यथासांग संकल्प विधी पार पडायला गुरुजींची गरज लागतेच. त्यांना आमच्या सायकलींची अडचण सांगितल्यावर लागलीच त्यांनी त्यांच्या घरी बॉक्सेस ठेवायची संमती दर्शवली. त्या प्रमाणे आम्ही त्यांच्या घरी बॉक्सेस ठेवून संकल्प विधींसाठी नर्मदा मैय्याच्या किनारी गेलो. प्रथमतः सर्वांनी क्षौर (चमन गोटा) केला आणि मैय्या मध्ये स्नानासाठी गेलो. स्नान झाल्यावर संकल्प विधी झाले आणि त्या नंतर जेवण. हे सर्व विधी होईपर्यंत दुपारचे ३.३० – ४ वाजले. त्यानंतर गुरुजींच्या घरी येऊन सायकली जोडल्या. खूप कष्टाचे काम आहे सायकल जोडणे. मग सर्वानुमते असे ठरले कि परिक्रमेचा श्री गणेशा उद्याच करूया. मुक्कामी गजानन महाराज संस्थानाच्या धर्मशाळेत राहिलो. दिवसभर दगदग झाली असल्यामुळे परिक्रमेच्या विचारात झोप कधी लागली कळलेच नाही.
दुसया दिवशी पहाटे लवकर उठून शौचमुखमार्जन केले आणि खाली येऊन सायकलींवर खोगीरं चढवली. "नर्मदे हर" च्या घोषात आम्ही सायकलला टांग मारली आणि पवित्र नर्मदा परिक्रमेचा शुभारंभ केला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेदांग,

नर्मदे हर !

मस्त लेखन झले आहे. पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत आहे. फोटो खरंच हवेत.

नर्मदा परिक्रमा हा विषय का कोण जाणे पण ह्रुदयाच्या खुप जवळचा वाटतो. एकदा ही परिक्रमा करायच फार ईच्छा आहे.

नर्मदे हर!
वेदांग, परिक्रमेविषयी उत्सुकता खूप आहे. पण ते खडतर व्रत करण्याची माझी शारीरिक आणि मानसिक कुवत नाही! तुमचे लेखन मात्र नक्कीच वाचेन. शक्य असेल तर थोडे मोठे भाग प्रकाशित कराल का? पुलेशु!

आपल्या प्रतिक्रियांबद्दल अनेक धन्यवाद! पुढचा भाग लवकरच टाकतो. आणि तुमच्या suggestion प्रमाणे फोटो सहित आणि डिटेल मध्ये करतो. परत एकदा धन्यवाद माझ्या नवख्या लेखनाला इतका छान प्रतिसाद दिल्या बद्दल.

नर्मदे हर!
व्वा! छान सुरुवात. आता फोटो सहित वृत्तांत येऊ द्या. सध्या त्यावरच समाधान मानणारं! Happy