श्वानांचे प्रेम

Submitted by अनाहुत on 7 May, 2016 - 10:16

तस पाहिलं तर कुत्रा या प्राण्याबद्दल मला फारस कधी प्रेम नव्हत . पण या प्राण्याला माझ्याबद्दल नेहमी प्रेम वाटत आलेले आहे . पूर्वी अगदी फार भुंकणारे कुत्रेहि मला भुंकत नसत . याच कारण काही माहित नाही . पण बहुधा माझा अंधविश्वास याला कारणीभूत असावा असे वाटते . मला असे वाटायचे कि आपण जीन्स घातली
असल्यामुळे त्याचे दात काही या जीन्सला पार करून आपल्यापर्यंत पाहोचणार नाहीत व फक्त आपण हात वर केला तरी तो आपल्या हाताला चावू शकणार नाही . त्यावेळी मित्र परिचित नातेवाईक यांच्याकडच्या कुत्र्यांनाही फार प्रेम व्यक्त करूस वाटायचं . एखाद्या कुत्र्याने आपल्या छातीवर त्याचे पुढचे दोन पाय ठेवले तर नक्की कसे वाटते याचा अनुभव मला दोन वेळा दोन वेगवेगळ्या कुत्र्यांकडून आला . बर हे दोघे वेगवेगळे असले तरी दोघेही अजास्र अशाच वर्णनाचे होते . तो कुत्रा जेव्हा तसा उभा राहिला तेव्हा मी ते मित्राला दाखवले , त्यावर तो कुत्रा आपुलकी व्यक्त करतो आहे अस त्याच म्हणन झालं . आता त्या कुत्र्याला आणखी प्रेम जर वाटल असत आणि त्याने मला एखादा छोटासा लव्ह बाईट दिला तर मी खरच कुणाला तोंड दाखवू शकणार नव्हतो कारण त्याच्या जबड्यात माझा बराचसा चेहरा सामावला असता व त्या खूणा आयुष्यभर राहिल्या असत्या . मी मला वाटणारी भीती व्यक्त केली त्यावर कुत्र्याला लस का इंजेक्शन काहीतरी दिल्याच कळल . म्हणजे त्याला नक्की कोणाची काळजी होती माझी का कुत्र्याची तेच कळेना .

एकदा असच बोलता-बोलता माझा एक श्वानप्रेमी मित्र गप्प झाला . त्याला लहानपणापासून ओळखत असल्यामुळे तो दुखावला गेला आहे हे लक्षात आल . मग थोड्या विचाराअंती अस लक्षात आल कि मी त्याच्या
कुत्र्याचा कुत्रा असा केलेला उल्लेख त्याला आवडला नव्हता म्हणून मी चुकीची दुरुस्ती करण्याचा विचार केला पण कुत्र्यांमधे अजिबात इंटरेस्ट नसल्यामुळे मला काही त्याचे नाव लक्षात राहिले नव्हते आणि त्यामुळे रिकॉलही होत नव्हते . भर समरप्रसंगात ब्रम्हास्त्र न आठवणा-या कर्णासारखी माझी अवस्था झाली होती . मला असा शाप बहुधा एखाद्या कुत्र्यानेच दिला असावा अशी दाट शक्यता वाटली . शेवटी मित्रानेच ते नाव सांगितले आणि मी ते रिपीट केल्यावरच त्याच समाधान झालं . एकदा असच आमच्या नातेवाईकांकडे गेलो होतो तेव्हा त्यांचा कुत्रा
असाच लाडात आला होता व माझ्या आसपास उड्या मारत-मारत त्याने माझ्या हाताला चाटण्याच्या उद्देशाने तोंड वर केले असावे ( असा मी समज करून घेतला ) आणि माझ्या हाताचा पंजा संपूर्णपणे त्याच्या जबड्यात गेला . मी पहात होतो काही क्षणच पण माझा हाताचा पंजा पूर्णपणे त्याच्या जबड्यात होता व तो आता बाहेर येत होता . माझा हात जराजरी हलला असता किंवा त्याचे तोंड थोडेजरी वेगळ्या दिशेने गेले असते तरी त्याचे सुळे माझ्या हातात घुसले असते .

मग एकदा एका कुत्रा चावलेल्या मित्राची कहाणी ऐकली . त्याला पायाला कुत्रा चावला होता
आणि तेव्हा त्याने जीन्स घातली होती जी जून्या प्रकारची जाड जीन्स होती आणि त्यातून त्या कुत्र्याचे दात आत पोहोचले होते आणि दुसऱ्या एकाला कुत्र्याने पाय त्याच्या अंगावर ठेऊन त्याच्या खांद्याचा चावा घेतला होता . या दोन अनुभवानंतर मात्र मला कुत्र्याची भीती वाटू लागली होती . आणि हे बहुदा तमाम कुत्र्यांना माहित झाल होत आणि मग मात्र मला बहुतेक कुत्र्यांनी भुंकून भीती घालायला सुरुवात केली होती . अगदी एखादा कुत्रा जॉगिंग करत निघाला असेल तरीही जाता-जाता एकदातरी माझ्यावर भुंकल्याशिवाय त्याला बरेच वाटत नसे . यावर
उपाय विचारल्यावर काही जणांनी कुत्रा कोणत्या जातीचा आहे हे विचारले . पण मी जाती-पाती मानत नसल्यामुळे याच काही उत्तर नव्हत माझ्याकडे . आणि कुत्र्यांकडूनही कोणताच भेदभाव केला जात नव्हता . सर्वच कुत्रे आपापल्या पद्धतीने भुंकून घेत होते .

अशाच भीतीच्या वातावरणामध्ये एकदा मला आमच्या परिचितांनी त्यांचा female कुत्रा आजारी असल्याबद्दल सांगितले . आणि त्यालाही आपल्यासारख्याच गोळ्या द्याव्या लागतात हे समजले . पुढे भूतकाळातील त्याला फार बरे नसतानाच्या गोष्टीही ऐकायला मिळाल्या . अगदी त्याला एकदा admit केल्याच व त्याला सलाईन लावल्याचही समजलं . यावरून मला तोही आपल्यासारखाच ( काहीअंशी का असेना ) वाटला . त्यांनी त्याला बाहेर बोलावल तेव्हा तो येऊन माझ्या पाया पडला (अस त्याचं म्हणन होत , खरतर तो फक्त माझ्यापर्यंत आला ज्याने मी घाबरलो पण त्याने जवळ येउन फक्त मान थोडी खाली केली ) . ते पाहून मलाही अगदी भरून आल व आपल्यालाही न भुंकणारे कुत्रे या भूतलावर आहेत यावर माझा विश्वास बसला . मग मीही कुत्र्यांना न घाबरता सामोर जायचं ठरवलं . हा विचार करत मी परत येत होतो तेव्हढ्यात एक कुत्रा येताना दिसला . मी त्याला स्वतःहून स्माईल दिली आणि काय आश्चर्य त्यानेही मला रिप्लायमधे एक क्युट स्माईल दिली . खर आहे कुत्रा असो कि माणूस कोणालाही स्माईलने जिंकता येते . आता मी कुठेही कुत्र्यांना न घाबरता फिरू शकतो .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

ते वास्तविकतः श्वानांनी माझ्यावर दाखविलेले प्रेम आणि परत त्यापासून दूर गेलेले श्वान आणि परत दुरावा दूर होणे अस श्वानांचे मनुष्य प्राण्यावरील प्रेम या स्वरूपाचे आहे .