महाराष्ट्र दिन विशेष - "घाटवाटा- सह्याद्रीतील दुर्गम वहिवाटा"

Submitted by जिप्सी on 1 May, 2016 - 00:56

सर्वप्रथम समस्त मायबोलीकरांना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!

खास महाराष्ट्रादिनानिमित्त मायबोलीकर भटके (ओंकार (सह्याद्रीमित्र), साईप्रकाश (Discoverसह्याद्री), योगेश (योगेश आहिरराव), रोहित (रोहित एक मावळा), मनोज (स्वच्छंदी), नचिकेत (आनंदयात्री), योगेश (यो रॉक्स), पवन (पवन), दत्तराज (इंद्रधनुष्य), आणि योगेश (जिप्सी) घेऊन येत आहोत महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीतील काही निवडक घाटवाटावर चित्रमालिका "घाटवाटा- सह्याद्रीतील दुर्गम वहिवाटा".

"घाट" हा शब्द आठवला की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी कोणतं चित्र उभं राहात असेल ?? डोंगराच्या कुशीतून सळसळत आणि सर्पाकृती वळणं घेत गेलेला काळा कुळकुळीत डांबरी रस्ता,त्यावर निवांतपणे प्रवास करणारी वाहनं,आजूबाजूला असलेले सुंदर धबधबे आणि या सगळ्या वातावरणाला पोषक आणि पूरक ठरणा-या कांदाभजीच्या गाड्या !!! हो ना ?? पण सह्याद्रीत मनमुराद आणि पायाची लाकडं होईपर्यंत भटकंती करणा-या ट्रेकर्सच्या लेखी मात्र घाटाची परिभाषा काही वेगळीच आहे !! घाटमाथ्यावरून कोकणात कोसळणा-या कड्यात खोदून काढलेली एक अरुंद पायवाट,कधी नैसर्गिकरित्या तयार झालेली तर कधी मानवी हातांनी घडवलेली.....त्यावर गवसणारे गतवैभवाचे पुरावे...आसमंतात नजर फिरताच सह्याद्रीच्या दुर्गम गडकिल्ल्यांनी आणि रौद्रभीषण कडेकप-यांनी धरलेला फेर आणि या सगळ्याच्या आकंठ प्रेमात बुडालेली काही वेडी मनं !! घाटवाटांचं खरं महत्व म्हणजे पूर्वीच्या काळी दळणवळणासाठी वापरली जाणारी पायवाट. यातल्या अनेक घाटवाटा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी संरक्षक किल्ल्यांची बांधणी केली गेली.त्यामुळे या डोंगरवाटांचं महत्व अगदी इतिहासकाळापासून अधोरेखित झालं आहे. अगदी आजच्या काळातही कदाचित गाड्याही जाऊ शकणार नाहीत इतक्या वेगात आणि कमीत कमी वेळात घाटावरची माणसं कोकणात आणि कोकणातली माणसं घाटावर प्रवास करतात. आजही या वाटांचा उपयोग व्यापारासाठी केला जातो आणि म्हणूनच ट्रेकर्सच्या लेखी घाटवाटांचा मान हा अबाधित आहे !! महाराष्ट्रदिना निमित्त सादर होत असलेल्या या फोटोफिचरमधे आपण अशाच काही अपरिचित, दुर्गम पण वेडावून टाकणा-या काही निवडक घाटवाटांचा धांडोळा घेतोय आणि या वाटांवर मार्गदर्शकाची भूमिका पार पडणार आहेत मायबोलीवरचे आपलेच काही अस्सल भटके...तेव्हा पोतडी भरा आणि तयार व्हा एका भन्नाट सफरीला.....
========================================================================
========================================================================

१. नाणदांड घाट
घाटमाथ्यावरचे गाव : एकोले (जि. पुणे)
पायथ्याचे गाव : ठाकुरवाडी, सुधागड (जि. रायगड)

मावळात तथाकथित विकासाच्या रेट्यामुळे निसर्गाला ओरबाडणं चालू असलं, तरी या मुलुखातल्या पायथ्याची कोकणपट्टी अन् सह्याद्रीच्याघाटमाथ्याला जोडणा-या काही जुन्या ‘घाटवाटा’ (दुर्गम पाऊलवाटा. डांबरी रस्ते नव्हेत) ट्रेकचा रसदार अनुभव देतात. प्राचीन बंदर चौलपासून माथ्याकडून उतरलेल्या दांडावरचा मोठ्ठा कातळटप्पा हे ‘नाणदांड’ चढण्यासाठी अचूक दांड ओळखायची खूण. प्रत्येक पावलागणिक तेलबैल्याच्या जोडभिंती, सुधागडाचे तट-कडे अन दूरवर डोकावणारा पालीजवळचा सरसगड असं मोठ्ठं लोभस दृश्य दिसतं. आणि, सोबतीला असतात काही अशक्य landscapes: सह्याद्री - घनगडाचा कातळमाथा - ढग - ऊनसावली - गवत - गुराखी यांच्या कॅलिडोस्कोपचा अनोखा आकृतीबंध!सह्याद्री घाटमाथ्यावर चढणा-या जुन्या घाटवाटांपैकी तीन व्यापारी घाटवाटा - नाणदांड घाट, नाळेची वाट अन् घोणदांड घाट या खो-यात आहेत, तर त्यांचे संरक्षक दुर्ग कोकणात सुधागड तर माथ्यावर तेलबैला अन् घनगड असे दिग्गज. सुधागडपासून खोलवर आत गेलेल्या सह्याद्रीच्या भिंतीचं अन् तेलबैल्याच्या कातळभिंतींचं अनोखं दर्शन घेण्यासाठी लांबची ‘नाणदांड घाटा’ची वाट.
(लिंकः http://www.discoversahyadri.in/2014/04/KhadsambaleNandandAndharbanKondja...)

========================================================================
========================================================================
२. अंधारबन घाट :
घाटमाथ्यावरचे गाव : पिंपरी (जि. पुणे)
पायथ्याचे गाव : भिरा (जि. रायगड)

अंधारबन....बस नाम ही सबकुछ है !! पुणे आणि रायगड जिल्ह्याची नाळ जोडणारा हा एक सर्वांगसुंदर घाटमार्ग. अंधारबनाच्या ट्रेकचं सार सामावलंय ते त्याच्या वाटेवरच्या किर्र आणि निबिड अरण्यात. पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर,ताम्हिणी इत्यादी संरक्षित अभयारण्य सोडल्यास नैसर्गिकरित्या जतन झालेलं हे एक नितांतसुंदर जंगल. अंधारबनात प्रवेश करताच आजही डोळ्यासमोर शब्दश: अंधारी यावी इतकं घनदाट हे जंगल आहे. जिथे सूर्याचा किरणही जमिनीला क्वचितच स्पर्श करू शकतो अशा प्रदेशातून आपली होणारी चार पाच तासांची कसदार पण अविस्मरणीय भटकंती हाच अंधारबन ट्रेकचा आत्मा !! कधी आभाळउंचीच्या गर्द सावलीने मनोमन सुखावून जावं तर कधी पानातून होणा-या अनामिक सळसळीने अंगावर सर्रकन काटाच यावा अशी अनुभवांची विविधता देणारी ही सुरम्य भटकंती. वाटेवरचं हिर्डी गाव म्हणजे “दुर्गम” या शब्दाला यापेक्षा समर्पक असं उदाहरणच सापडणार नाही इतकं “रिमोट” !!! घनगड,तैलबैलाच्या कराल कातळभिंती बघताना वाटेवरची माळरानं तुडवावीत,उन्हाने करपलेल्या शरीराला अंधारबनाच्या गर्द सावलीत सुखाचे चार क्षण द्यावेत आणि सुमारे सहा सात तासांची ही निखालस सुंदर भटकंती उन्नई धरणाच्या थंडगार पाण्याने शमवावी !! बस....और क्या चाहिये !!
(लिंकः http://www.onkaroak.com/2013/02/blog-post.html)

========================================================================
========================================================================
३. वाघजाई-सवाष्ण घाट
घाटमाथ्यावरचे गाव : तेलबैला (जि. पुणे)
पायथ्याचे गाव : ठाणाळे/बेहरामपाडा, सुधागड (जि. रायगड)

प्राचीन काळात मालवाहतुकीसाठी वापरात असलेले व सध्याच्या काळातही वापरात असलेले हे दोन सुंदर घाट. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील तैलबैला डोंगरामागील पठारावर साधारण दोन टोकांना ह्या दोन्ही घाटांची सुरूवात होते. वाघजाई घाट घाटाखाली ठाणाळे गावात उतरतो, तर सवाष्ण घाट बहिरमपाडा या गावात उतरतो. बहिरमपाड्यापासून सुधागडाच्या पायथ्याचे धोंडसे गाव जवळच आहे. ठाणाळेहून वाघजाई घाटावाटेवर एके ठिकाणी ठाणाळे लेण्यांकडे पायवाट जाते. गावातून स्थानिक वाटाड्या घ्यावा आणि त्याच्या तोंडून या प्रदेशातल्या जुन्या कथा, कहाण्या ऐकत सह्याद्रीतली ही मनोरम भटकंती करावी. सवाष्ण घाटाची कहाणी, सुधागडाचे किस्से, रानमेवा, आणि वाघजाई मंदिराशेजारच्या धबधब्यातलं थंड आणि स्वच्छ-शुद्ध पाणी... अजून काय हवं?
(लिंकः http://www.maayboli.com/node/36522 आणि http://www.maayboli.com/node/36604)

========================================================================
========================================================================
४. गोप्या घाट
घाटमाथ्यावरचे गाव : कुंबळे (जि. पुणे)
पायथ्याचे गाव : कुंभे शिवथर (जि. रायगड)

रायगड किल्याच्या पुर्वेला पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगां मधे अनेक घाटवाटांचा उगम झालेला आहे. त्यातील रायगडच्या अग्नेय टोकाला पसरलेल्या सह्य धारेवर मढे, उपांड्या या घाट वाटांचा साथीदार म्हणजेच 'गोप्या घाट'. कोकणातील कुंभे शिवथर गावाला वेल्हा तालुक्यातील कुंबळे गावाशी जोड्णारी ही घाटवाट दाट रानातून वर चढते. दिड-दोन तासाच्या खड्या चढणीने पायात गोळे येत असले.. तरी या वाटेवरील पावसाळ्यातला नजारा म्हणजे केवळ स्वर्ग!!!

========================================================================
========================================================================
५. मढे – उपांडया घाट :
घाटमाथ्यावरचे गाव : केळद (जि. पुणे)
पायथ्याचे गाव : रानवडी (जि. रायगड)

नरवीर तानाजी मालुसरेंच्या अखरेच्या प्रवासाच्या पवित्र स्मृती जपणारा,आपल्या वाटेवरच्या घडीव पाय-यांनी पुरातनपणाची जाणीव करून देणारा आणि लक्ष्मी व वाघेरा यांसारख्या रौद्रभीषण पण शब्दातीत करणा-या जलप्रपातांनी स्वत:चं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणारा घाट म्हणजे मढे घाट !! वर्षाकाली तर याचं रूप काय वर्णावं !! हिरवागार शालू नेसलेला नितांतसुंदर परिसर,दरीतून वर येणारे शुभ्र धुक्याचे लोट,पावसाच्या कधी सुखावणा-या तर कधी धडकी भरावणा-या सरी आणि या सगळ्यात एका अनामिक आनंदाच्या शोधात निघालेली काही भटकी पावलं...हाच तर खरा मढे घाटाचा “युएसपी”. सुरुवातीच्या निबिड झाडीतून एका मोकळ्या पठारावर येऊन तासाभराची चाल केली की कर्णवडी हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. उपांडया घाटाचा खरा पायथा म्हणजे कर्णवडी. गावातून पाण्याची घाटमाथ्याकडे चढत गेलेल्या पाईपलाईनचं मागोवा घेत एक खडी चढण चढून गेलो की आपण पुन्हा केळदलाच येऊन पोहोचतो. अगदी एका दिवसात होईल अशी ही निवांत भटकंती !! पण हा भारून टाकणारा परिसर,नजरबंदी करणारे सह्याद्रीचे रौद्रभीषण कडे आणि सोबतीला असलेली भटकी मनं यातच या तंगडतोडीचं वैशिष्ट्य सामावलं आहे.
(लिंकः http://epaper.loksatta.com/c/1650321)

========================================================================
========================================================================
६. शेवते घाट
घाटमाथ्याचे गाव : कुसूर किंवा केळद (जि. पुणे)
पायथ्याचे गाव - शेवते (जि. रायगड)

आपणास किल्ले रायगडावर जाणारी गांधारी नदी खोर्यायतील वाट माहीती असते पण रायगडाच्या पूर्वेकडे वाहणार्या् काळ नदीच्या खोर्यानत पण निसर्गाची अनेक वैभव दडलेली आहेत. वाळणकोंडीचे रांजणखळगे, लिंगाणा किल्ला हे तर आहेतच पण त्याच बरोबर अनेक घाटवाटाही ह्या डोंगररांगेत अनेक आहेत हे आणि त्या असणारच कारण राजगड ते रायगड जाण्यासाठी हीच डोंगररांग ओलांडायला लागते. फडताड, आग्या, बोराट्या, निसणी, जखीण अश्या एकाहुन एक भक्कम नावाबरोबरच एक नाव आहे, शेवते. पायथ्याच्या शेवते गावात उभे राहीले की समोरच्या भिती दाखवणार्याय दर्याकतुन एक डोंगर सोंड वरपासून थेट गावात उतरलेली दिसते. ह्याच सोंडेचे नाव आहे शेवतेघाट. आजूबाजूच्या डोळे फिरविणार्यास दर्या तुन जाणार्याव बाकीच्या घाटवाटा पाहिल्या कि शेवते घाटाचे महत्व आपल्याला कळते कारण ह्या घाटाला ना कुठला कातळ चढायला लागतो की कुठली दरी उतरायला लागते. लागते ते फक उत्तम दिशाज्ञान कारण शेवते गावातंतर एक गुगुळशीचा झाप सोडला तर कुठलीच वस्ती मध्ये नाही.
उन्हाळा वगळला तर हिवाळ्यात हा उत्तम घाटवाट आहेच पण पावसाळ्यात तर स्वर्ग आहे ही घाटवाट. वाटेच्या दोन्ही दिशेला धबधब्यांची जत्रा असते आणि तु मोठा की मी मोठा अशी स्पर्धा करत हे धबधबे सह्याद्रीच्या कुशीत मनसोक्त खेळत असतात आणि यामधुनच एखाद्या सुस्त पडलेल्या अजगरासारखी शेवत्याची ही वाट आपल्याला घाटमाथ्यावर आणुन सोडते आणि आपण घाटमाध्यावरच्या केळद किंवा कुसुर गावच्या वाटेला लागतो.

========================================================================
========================================================================
७. वाजंत्री घाट
घाटमाथ्यावरचे गाव : भिमाशंकर (जि. पुणे)
पायथ्याचे गाव : जांबरूख/कामतपाडा, कर्जत (जि. रायगड)

वार्‍याने धरलाय ताल, अन ढगांचा वाजतोय ढोल..
धबधब्यांची जणु भरलेय जत्रा, पावसाच्या संगीत सरीवर...
मन खरच भिजतय मित्रा..

पावसाळ्यातील ढगांच घर म्हणजे भिमाशंकर अस म्हंटल तर वावग ठरणार नाही.भिमाशंकरला जायला कोकणातुन अनेक वाटा आहेत.शिडी घाट,गणेश घाट या नेहमीच्या वापरातल्या घाटवाटा.अशीच एक घाटवाट म्हणजे...वाजंत्री घाट.याला वाजंत्री घाट का म्हणतात हे इथला पाऊस पिऊन अनुभवल्या शिवाय समजायच नाही.
मुंबईहुन कर्जत रेल्वे मार्गावरील नेरळ अथवा कर्जत स्टेशन ला उतरायच. पुढे शेअर रिक्षा ने जांबरुख गाव गाठायच. जांबरुख कर्जत पासून ३० किमी अंतरावर आहे. जांबरुख गावातून चालत अर्ध्या तासात कामत पाडा.
समोर रोंरावत पडणारा रणतोंडीचा धबधबा दिसेल.सोबत गावातील एखादा वाटाड्या असल्यास उत्तम. इथून पुढे आपल्याला खिंडीतून चढायचय .कामत पाड्यातून नदी काठाने वाट डावीकडे वळून चढू लागते. साधारण एक तासात आपण पहिला टप्पा चढून पठारावर येतो. थोडे दाट जंगल लागते. जंगलातुन चालल्यानंतर उजवीकडे वर घळीतून चढून जाणारी वाट दिसते. त्या वाटेने चढून आपण घाट माथ्यावर पोहोचतो. घाट चढुन गेल्यावर खेतोबाच मंदिर लागत. खेतोबाच्या मंदिराकडून ईशान्येला अर्धा तास चढून गेलो कि आपण मोठ्या पठारावर येतो आणि लोणावळा भीमाशंकर वाटेला येऊन मिळतो. या वाटेने डावीकडे म्हणजे उत्तरेकडे चालत राहायचा. या वाटेने भीमाशंकरला पोहोचायला अजून अडीच तास लागतील. वाटेमध्ये कमळजा देवीच मंदिर आहे. अन पुढे भीमा नदीच आडवी येते. भिमेच्या काठाकाठाने गेल्या वर आपण गुप्तभिमाशंकरापाशी पोहोचतो.
चढून दमला असाल तर कमळजा मंदिराच्या उजव्या हाताला येरवळ किंवा भोरगिरी गावात मुक्काम करता येतो. भोरगिरीचा किल्ला पाहुन पुढे भिमाशंकर गाठता येते.
(लिंकः http://www.maayboli.com/node/39530 आणि http://www.maayboli.com/node/45596)

========================================================================
========================================================================
८. ठिपठिप्या घाट
घाटमाथ्यावरचे गाव : दापसरे, वेल्हा (जि. पुणे)
पायथ्याचे गाव : जिते, माणगाव (जि. रायगड)

सह्याद्रीच्या मुख्य रांगेतली देशावरच्या दापसरे ता.वेल्हा जि.पुणे आणि कोकणातल्या जिते ता.माणगाव जि. रायगड या गावांना जोडणारी सुंदर आणि रम्य अशी घाटवाट. उत्तरेकडे वसलेला किल्ले कुर्डगड या वाटेचा पहारेकरी. वाटेत एका छोट्या कुंडावर कातळातून ठिपठिपणारी पाण्याची धार त्यामुळेच बहुधा ठिपठिप्या नामांतर झाले असावे. सरळसोट चढाई असलेली आणि वाटेतल्या ओढ्यापलीकडची कड्याला चिकटून जाणारी ट्रेव्हर्सी इथे येण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा खुणावते.
(लिंकः http://www.maayboli.com/node/57077)

========================================================================
========================================================================
९. लिंग्याघाट/उंबर्डी घाट
घाटमाथ्यावरचे गाव : धामणव्हाळ (जि. पुणे)
पायथ्याचे गाव : उंबर्डी,(जि. रायगड)

प्राचीन नागोठण (आत्ताचे नागोठणे) बंदरातून देशावर जाणार्याट प्राचीन व्यापारी मार्गावरचा एक महत्वाचा आणि तितकाच वापरातला घाट म्हणजे उंबर्डीचा घाट. पायथ्याच्या उंबर्डी गावाला आणी देशावरच्या धाम्हणव्हाळ गावाला जोडणार्‍या या घाटाला देव घाट, लिंग्या घाट असेही म्हटले जाते. तुम्ही कुठलेही नाव घ्या तरी या घाटाचे रौद्रपण काही कमी होणार नाही. डोळे भिवविणार्‍या खोल दर्‍यात, सरकारी नियमाच्या संरक्षणाचे गरज नसलेले घनदाट जंगल व यातुन अलगद वळणे घेत जाणारी घाटाची वाट. जास्तीत जास्त जंगलातून जाणारी आणि सरळसोट उतरणार्याु दर्या असल्या तरी कमीत कमी अवघडजागेतून जाणारी घाटाची वाट बघितली की अशा वाटा शोधणार्‍यांचे कसब वाखाणण्यासारखे आहे. या अशा घाटवाटेला इतिहासाचा वारसा नसेल तर नवलच. महाराजांच्या काळातील एक तालेवार बांदल घराण्याचे कारभारी बाजी पासलकरांचा हा प्रदेश. त्यांच्या सारखीच करडी नजर घाटावर ठेऊन असलेला कुर्डुगड ह्या घाटाचे महत्व अधोरेखित करतो.
(लिंक: http://www.maayboli.com/node/31567 आणि http://www.maayboli.com/node/32027)

========================================================================
========================================================================
१०. कुंभे घाट
घाटमाथ्यावरचे गाव : घोळ, (जि. पुणे)
पायथ्याचे गाव: बोरवाडी (जि. रायगड)

निजामपुरहुन पुर्वेकडे निघालो आणी जसे जसे सह्यडोंगररांगांच्या जवळ जायला लागले की डोकावू लागतात खोल खोल जाणार्‍या दर्‍या आणि त्यातूनच मानवाने शोधलेले रस्ते. या अशाच एका घाटवाटाचे नाव आहे कुंभ्या घाट. नावाचा कुंभाराशी काही संबंध नाही तर वाटोवाट आढळणार्यास असंख्य कुंभ्याच्या झाडांमुळे याचे हे नाव पडले असावे. पायथ्याथ्या बोरवडीतून निघून छोटेखानी पण सुंदर अश्या मानगडाचे दर्शन घेऊन वरघाटी जायला निघालो की कुंभ्या घाटाचा आवाका लक्षात येतो. बोरवाडीहून निघुन चाचगांवला बगल मारून माजुर्णे आणी कुंभेवाडीत रामराम घालून पलीकडे घोळगावात पोचेस्तोवर दिवस संपलेला असतो. अश्यातच कुंभेवाडी ते घोळ गाव हा वहीवाट मोडलेला आणि अगदीच निर्मनुष्य रस्ता. जंगलातून जाणारी एकच एक पायवाट आणी तोच भरोसा. हिच वाट आपल्याला कुंभेवाडीतून दोनेक तासात घोळ गावात पोचवते. हिवाळ्यात जरी ही घाटवाट सुखद अनुभव देत असली तरी पावसाळा आणि उन्हाळ्यात वाटा हरवण्याची शक्यता व पाण्याचा अभाव यामुळे ही घाटवाट टाळलेलीच बरी.

========================================================================
========================================================================
११. मुडागडची पाज आणि काजिर्डे घाट
घाटमाथ्यावरचे गाव : पडसाली, (जि. कोल्हापूर)
पायथ्याचे गाव : काजिर्डे, (जि. सिंधुदुर्ग)

कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यांच्या पश्चिमेला सह्याद्री घाटमाथ्याजवळ लपलेले - निबिड अरण्य, वन्यजीव, मुडागड-गगनबावडा-शिवगड हे अरण्यदुर्ग, दुर्गम अरण्यवाटा आणि कोकण-घाटमाथा जोडणा-या घाटवाटा बघण्यासाठी हा ट्रेक. 'मुडागडची पाज' या घाटवाटेचं सर्वात उग्र अस्त्र म्हणजे, मुडागडावर पोहोचण्याआधी उभ्या धारेवरचे एकापाठोपाठ तीन उंचवटे. तीव्र चढ, घसारा, वाळकी झुडुपं, चिंचोळा मार्ग आणि खोलवर कोसळलेल्या दऱ्या असा रौद्र माहोल. वाट अडचणीची आणि वापरात नाही. केवळ आडवाटेच्या ट्रेक्सची खुमखुमी म्हणून अश्या वाटा धुंडाळायच्या. बाजूचा काजिर्डे घाट म्हणजे घाटमाथा आणि कोकण यांच्या दरम्यानचा दुर्गम विराट सह्याद्रीचा पहाड जोडणारी ऐतिहासिक वाट. या वाटेवरून जाताना वाटतं, कधीतरी दुर्मिळ माल या घाटाने कोल्हापूरला गेला असेल, तर कधी कुठल्या सत्ताधीशाच्या आज्ञेवरून सैनिक या घाटाने चढून गेले असतील, कधी कोण्या माहेरवाशिणीचे पाय जड झाले असतील… आणि आताच्या काळात या वाटांनी निकामी होऊन पडणं. काय काय अनुभवलं असेल या घाटवाटांनी. कोल्हापूरचे अरण्यदुर्ग, दुर्गम घाटवाटा आणि अरण्यवाटांवरचा थरार अजूनही मनी रुंजी घालत आहे…
(लिंकः http://www.discoversahyadri.in/2014/07/MudagadShivgadGhats.html)

========================================================================
========================================================================
१२. ढवळे घाट
घाटमाथ्यावरचे गाव : जोर/ महाबळेश्वर, जि. सातारा
पायथ्याचे गाव : ढवळे, जि. रायगड

येता जावली, जाता गोवली, इतकं आक्रमक लिहिलं होतं चंद्रराव मोरेनं शिवरायांना (म्हणजे, जावळीत आलात, तर अडकलात म्हणून समजा), ते केवळ जावळीच्या दुर्गम मुलुखाच्या बळावरंच. अश्या जावळीतल्या घनटाट अंधा-या जंगलातून, ओढ्यानाल्यांतून चढत तब्बल ६-७ तासांच्या चढाईची अप्रतिम घाटवाट म्हणजे ढवळे घाट. भीतीदायक घसरड्या traverse वरून गेल्यावर बहिरीच्या ठाण्यापाशी आपण पोहोचतो. कड्याच्या धारेवरून ऑर्थरसीट टोकापाशी चढताना पर्यटकांच्या आश्चर्याच्या नजरा अन् हातवारे जाणवतात. सर्वांगसुंदर ढवळे घाटाच्या चढाईनं कोळेश्वर आणि महाबळेश्वरच्या पश्चिमकडयांपाशी नतमस्तक होण्याचा हा धम्माल ट्रेकरूट!
(लिंकः http://www.discoversahyadri.in/2015/02/KamatheGhatMahadevMurhaChandragadDhavaleGhatArthurSeat.html)

========================================================================
========================================================================
१३. आहुपे घाट
घाटमाथ्यावरचे गाव : आहुपे, जुन्नर (जि. पुणे)
पायथ्याचे गाव : खोपीवली, (जि. ठाणे)

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका हा गडकिल्ल्यां साठी जसा प्रसिद्ध आहे, तसाच येथिल अनभिज्ञ घाटवाटांबद्दलही तितकाच लोकप्रिय आहे. पायथ्याच्या खोपीवली गावातून निघाले की मश्चिंद्रगडाची धार सुरु होते. या धारेला बिलगून अजून एक डोंगररांग पठारावर जाउन पोहचते. जुन्नर आणि मुरबाड तालुक्यांना जोडणारी ही पुरातन पायवाट म्हणजेच 'आहुपे घाट'... घाटमाथ्या वरिल अहुपे गावापर्यंत आता गाडी रस्ता झालेला असल्यामुळे सध्या ही घाटवाट मोडकळीस आली आहे. ठराविक अंतरावर विशिष्ठ पद्धतीने रचलेले दगड-धोंडे हे या घाटवाटेच्या राबत्या काळाचे मुक साक्षिदार आहेत.
(लिंकः http://www.maayboli.com/node/37340)

========================================================================
========================================================================
१४. त्रिगुणधारी घाट (डोणीचे दार)
घाटमाथ्यावरचे गाव : डोणी, जुन्नर (जि. पुणे)
पायथ्याचे गाव : रामपुर, मुरबाड (जि. ठाणे)

एका बाजूला दाऱ्या घाटचा दरारा व खुटेदाराची धारदार धार तर एका बाजूला आहुपे घाटाची शानदार धार.. आणि याच दरम्यान लक्षवेधक म्हणावी अशी एक तिनपाती धार म्हणजे त्रिगुणधारी घाट ! तिनपाती म्हणायचे तर या घाटमाथ्याला असणाऱ्या तीन घळींमुळे घाटमाथ्याची तीक्ष्ण भासणारी तीन पातींची टोक.. तिन्ही घळ तश्या अरुंदच पण त्यातल्या त्यात बऱ्यापैंकी म्हणावी अशी मोठी घळ म्हणजेच डोणीचे दार.. हाच त्रिगुणधारी घाट.. हाच तिरंगी घाट..! पोशीची नाळ व माडाची नाळ अशी नावं धारण केलेल्या दोन नाळींच्यामधली ही मधली नाळ.. नाणेघाटापासून प्रवास करत आलेल्या डोंगररांगेचा पदर इथे कोकणात उतराताना अगदी दुमडलेला नि बरोबर तीन घड्या पडलेला.. तुम्ही म्हणाल तसं.. घाटमाथ्यावर डोणी नावाच छोट गाव म्हणून डोणीच दार.. पिटुकल्या गावाला इतक विशाल रौद्र दार ! अजून काय हवं ! पाहताक्षणी धडकी भरावी इतका रौद्रभीषण घाट.. तरीही चार पैसे वाचतील म्हणून ह्या घाटाला अगदी छातीवर घेऊन चढणारे वाटेकरू खरच धडाडीचे ! पायथ्याला रामपुर वा रामपुरचीच एक छोटी वाडी.. हा घाट चढायचा वा उतरायचा म्हटला तर असंख्य आकाराच्या प्रकाराच्या दगडराशींचा चुराडा पार करण्याचे दिव्यकाम ! संपता संपत नाही! घशाला कोरड पडली तर संपूर्ण वाटेत एकाच ठिकाणी दगड कपारीत त्रुटक असलेला पाण्याचा झरा ! घाटमाथा आला कि मग फुटेल त्या वाटेन जुन्नरच्या त्या त्या गावी त्या त्या वाडीत... भरपावसात दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे आवर्जून टाळावा असा हा त्रिगुणधारी घाट.. डोणीचे दार !

========================================================================
========================================================================
१५. दाऱ्या घाट
घाटमाथ्यावरचे गाव : आंबिवली, जुन्नर (जि. पुणे)
पायथ्याचे गाव : पळु, मुरबाड (जि. ठाणे)

पळू हे नकाशावरचे छोटे गाव.. थोडं अजून पुढे सरकलो कि सिंगापुर गाव.. आणि मग पुढे जायचं तर अगदी नाणेघाटपासून पसरत आलेली भव्यदिव्य डोंगररांग.. अगदी भिमाशंकरपर्यंत पसरलेली.. ! त्या डोंगररांगेचे पदर कोकण प्रांतात येणाऱ्या लगतच्या गावामध्ये उतरलेले... अश्याच एका भल्यामोठ्या पदराची घडी पळू गावच्या दिशेने उघडलेली.. आणि मग या पदराचाच हात धरून तो डोंगर चढला व पल्याड उतरले की जुन्नर तालुक्यातले आंबिवली गाव.. आणि म्हणूनच येथील स्थानिकलोकांच्या वापरातला हा दाऱ्या घाट ! दोन पहाडांमधील घळ हे लक्ष्य ठेवून डाव्या बाजूने वर सरकायचे.. प्रारंभी घनदाट जंगल मग ओढ्याचे कोरडे पात्र तर पुढे ओसाड कातळधोंड्याची वाट.. अस सार सार तुडवत गेलो की घाटमाथ्यावर.. संपूर्ण वाटेत फक्त एकाच ठिकाणी थोडं आडवाटेला पाण्याचा झरा ! दिसायला शॉर्टकट पण पुरती दमछाक करणारी वाट..! पावसात थोडाफार मार्ग बदलतो आणि कितीही कठीण वाटली पण तरीदेखील वाटेत थोडे आढेवेढे घेऊन गावकरी घाट चढतातच.. !

========================================================================
========================================================================
१६ नाणेघाट
घाटमाथ्यावरचे गाव : घाटघर, जुन्नर (जि. पुणे)
पायथ्याचे गाव : वैशाखरे, मुरबाड (जि. ठाणे)

प्राचीन काळापासून वापरात असणारा कोकणात कल्याण आणि देशावर जुन्नर या जुन्या बाजारपेठांना जोडणाऱ्या अनेक वाटापैकी एक वाट म्हणजे नितांत सुंदर नाणेघाट. कोकणातील वैशाखरे आणि घाटमाथ्यावर घाटघर या गावांना जोडणाऱ्या उत्तुंग आणि बेलाग अश्या कड्याचं कवच लाभलेला हा घाट, घाटाचा रखवालदार म्हणून जवळच जीवधन सारखा बेलाग किल्ला आहे. घाट वाटेवर २ गुहा आहेत त्यात शिलालेख हि आहे , तो पाहता हा घाट अगदी सातवाहन काळापासून वापरात असल्याची खात्री होते. गुहेच्या बाजूलाच बारमाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत. घाटावर आल्यानंतर एक दगडी रांजण आढळतो, कल्याण बंदर ते देशावर जुन्नर इथे होणाऱ्या मालवाहतुकीवर जकात भरण्यासाठी या रांजणाचा वापर व्हायचा. बाजूलाच एका छोट्याश्या गुहेत गणपतीची सुबक मूर्ती आहे. अखंड कातळात कोरलेल्या दगडी पायऱ्या, दगडी रांजण, पाण्याची टाकी, सातवाहन कालीन शिलालेख असलेल्या आणि अजूनही सुस्थितीत असलेल्या गुहा, या इतिहासाच्या पाऊलखुणा, खिंडीतून रोरावत येणारा सुसाट वारा आणि घाटमाथ्यावरून होणारं सह्याद्रीच अफाट दर्शन आपल्याला परत परत इथे येण्यास भाग पाडतं.


========================================================================
========================================================================
तर अशी ही सह्याद्रीच्या कडेकपा-यातली उनाड आणि अनवट भटकंती. कधी छातीचा भाता फुलवत सरळसोट उभ्या चढावर कस लागावा तर कधी समोरच्या खोल दरीने डोळे फिरवणा-या आणि पायाखालच्या भन्नाट घसरगुंडीने ठोका चुकवणा-या पायवाटेवरून कसरती कराव्यात....कधी वर्षाऋतूमध्ये समोरच्या हिरव्याकंच आसमंताला आणि भान हरपून स्वत:ला खोल दरीत झोकून देणा-या फेसाळत्या प्रपातांना पाहून आपल्याच नकळत त्यांच्या प्रेमात पडावं तर कधी हाडं गोठवणा-या थंडीत एखाद्या घाटमाथ्यावर तंबू ठोकून लाखो ता-यांच्या साक्षीने थकल्या शरीराला आधार द्यावा !!! ही किमया...ही मोहमाया आणि हे व्यसन कधीच न संपणारं....किंबहुना दिवसेंदिवस जास्तच आकर्षण वाढवणारं !!! रांगड्या घाटवाटांची आणि अविस्मरणीय नजा-यांची ही अद्वितीय भेट अगदी सढळ हाताने आणि खुल्या दिल्याने बहाल केल्याबद्दल त्या सख्या सह्याद्रीचे जितके आभार मानू तितके कमीच !! आम्हाला खात्री आहे...आमच्याप्रमाणे तुम्हीही आज सह्याद्रीच्या प्रेमात नव्याने पडला असाल...!!

========================================================================
========================================================================
ऋणनिर्देशः
१. कव्हर फोटो प्रचि Discover सह्याद्री आणि योगेश अहिरे यांच्या कॅमेर्‍यातुन.
२. कव्हर फोटो सुलेखन मायबोलीकर नीलु Happy
३. प्रस्तावना लेखन ओंकार (सह्याद्रीमित्र)
४. मायबोलीकर भटके, यांच्याशिवाय हि चित्रमालिका होणे शक्य नव्हते.
Discoverसह्याद्री (नाणदांड घाट, मुदागडाची पाज व काजिर्डे घाट, ढवळे घाट)
सह्याद्रीमित्र (अंधारबन, मढे-उपांड्या)
स्वच्छंदी (कुंभे घाट, शेवते घाट, लिंग्या घाट)
यो रॉक्स (दार्‍या घाट, त्रिगुणधारी घाट)
योगेश आहिरराव (ठिपठिप्या घाट)
रोहित एक मावळा (वाजंत्री घाट)
आनंदयात्री
(सवाष्णी/वाघजाई घाट)
इंद्रधनुष्य (गोप्या घाट, अहुपे घाट)
पवन/जिप्सी (नाणेघाट)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच रे जिप्सी, एक नंबर जमलय.
बसल्याजागी बहुतांश घाटावाटांची सफर घडवुन आणलीस.

दिनेशदा प्रतिसाद आवडला, भारीच अवांतर माहिती मिळाली.

अप्रतिम लिहील आहे सगळेच वर्णन. फोटो पण बेष्ट. हे फोटो फिचर आमच्यापर्यंत पोचवणार्‍या सर्व सह्यभटक्यांने सहस्त्र आभार व नतमस्तक. _/\_ जबरदस्त शानदार!!

खूपच सुर्रेख आणि संग्राह्य लेख.... फोटोही अप्रतिम ....

या खूप विस्तृत लेखाचे वाचन हळुहळु करणारे - पूर्ण आस्वाद घेत घेत - तुम्हा लोकांबरोबर वाटचाल करीत करीत...

सर्व भटक्यांचे मनापासून आभार, मुजरा, दंडवत वगैरे सर्व ....

________________________/\_______________________

जय सह्याद्री....

ग्रेट,

१० दिवस १० दुर्ग ह्या प्रमाणे ह्या घाट वाटांचे उन्हाळी पावसाळी असे वर्गीकरण करून भटकंती महिन्यावारी केली तरी १६ महिने लागतील.

सुरेख माहिती

--------------/\-----/\--------------
thanks for such great information
like pics

Pages