असेही एक विसर्जन

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

संध्याकाळचे सहा वाजलेले. लॉस एंजलिसजवळच्या मॅनहॅटन बीचवर कडकडीत उन पडलं होत. आमच्या कॅलिफोर्नियात उन्हाळ्यात संध्याकाळी सहा वाजता कडकडीत उन असतं. समोर समुद्राला भरती आली होती. रविवार असल्याने सगळा किनारा वाळूत खेळणाऱ्या बाळगोपाळांनी आणि सूर्यस्नान करणाऱ्या ललनांनी भरुन गेला होता. समुद्रापासून थोडं दूर वाळूवर चार पाच व्हॉलीबॉलच्या जाळ्या लागल्या होत्या. एकंदरीत वातावरण उत्साही होतं.

चौपाटीला लागूनच एक लहानसा रस्ता होता. अचानक कुठुनतरी एक मोठी बस या रस्त्यावर येऊन थांबली. या रस्त्यावर बसेस फारशा येत नसल्याने आजूबाजूची लोकं या बसकडे पहायाला लागली. बसचं पुढचं दार उघडलं अाणि भराभर भराभर भारतीय वंशाची दिसणारी माणसं उतरायला लागली. बायकांनी नवीन साड्या नेसल्या होत्या. पुरुषांनी सदरे घातले होते. मुलांनीही चांगले कपडे घातले होते. एवढ्यात मागून एक दुसरी मोठी बस येऊन थांबली. त्यातूनही अशीच भारतीय माणसे उतरु लागली. मागून तिसरी आणि पुढच्याच मिनीटाला चौथीही बस आली. आता मात्र आजूबाजूच्या लोकांना कळेना की ही एवढी भारतीय माणसे - तीही अशी नटून थटून इथे या वेळेला काय करता आहेत?

एका बसमधून उतरलेल्या मुलाच्या हातात एक गणपतीचा मूर्ती केशरी पाटावर विराजमान होती. मूर्ती लहानशीच होती - फारफारतर एक फुटाची असेल. मूर्तीला जास्वंदाचा हार घातलेला होता. दूर्वा आणि इतर फुलं पाटावर साचलेली होती.
"इको फ्रेंडली मूर्ती आहे हो, जराही प्लॅस्टर नाही वापरलं मामांनी".
एक साडीतली बाई दुसऱ्या बाईला सांगत होती. तो लहानसा रस्ता एव्हाना साड्यांनी आणि सदऱ्यांनी भरुन गेला होता. एव्हढ्यात कुणीतरी भगवे झेंडे वाटू लागला. लवकरच पंचवीस एक भगव्या झेंड्यांनी त्या गर्दीतून डोकी वर काढली. कुठुनतरी एक खणखणीत आवाज आला - गणपती बाप्पा...
क्षणार्धात जवळजवळ अडीचशे मुखातून एक उद्घोष बाहेर पडला - मोरया! आतामात्र रस्त्यालगतच्या घरातून लोकं डोकावू लागली. हे काय प्रकरण आहे हे तिथल्या गोऱ्या लोकांना कळेना. काही उत्सुक लोकं त्या गर्दित घुसून काय चाललंय याचा शोध घेऊ लागली.


la-visarjan-3.jpg

पुन्हा एकदा कुणीतरी ओरडलं - मंगलमूर्ती... पुन्हा एकदा गर्दिचा उद्घोष - मोरया! आता गर्दिचा गलका चांगलाच वाढला होता. कुठूनतरी खुळ् खुळ् असा आवाज यायला लागला. कुणीतरी चक्क लेझीम वाटत होतं. आता जमाव हलू लागला. रस्त्यावरुन वाळूवर जायला काटकोनात एक अरुंद असा दुसरा रस्ता होता. हळूहळू गणपती धरलेला कार्यकर्ता जमावाच्या पुढे त्या अरुंद रस्त्यावर गेला होता. लेझीमवाली मंडळी गणपतीच्या पुढे जाऊन उभी राहीली. कुणीतरी पुन्हा एकदा ललकारी दिली - गणपती बाप्पा... मोरया. एक दोन तीन चार... तालबद्ध लेझीम सुरु झालं. अरुंद रस्त्यावरुन जमाव लेझीम आणि गणपतीच्या पुढे जाऊ लागला. अचानक कुणीतरी एक ढोलही आणला होता, तो वाजवायला सुरुवात केली. एव्हाना वाळूकडे येणारा हा मोठा गलबला बघून सूर्यस्नान करणाऱ्या ललना उठल्या होत्या. व्हॉलीबॉलही थांबला होता. आजूबाजूच्या लोकांनी कॅमेरे सरसावले. गणपती बाप्पाचा अखंड उद्घोष चालू झाला होता. कुणी तरी 'पायी हळूहळू चाला, मुखाने गजानना बोला' म्हणायला सुरुवात केलं.

मॅनहॅटन बीच चांगलाच मोठा आहे. वाळू सुरु झाल्यापासून पाणी लागेपर्यंत चांगलं अर्धा किलोमीटर तरी अंतर असेलच. अखेर ही मिरवणूक पाण्याजवळ एका लाईफगार्ड स्टेशनच्या जवळ येऊन थांवली. गणपती खाली ठेवला गेला. मंडळींनी एव्हाना गणपतीभोवती कडं केलं होतं. कड्याच्या बाहेरच्या अंगाला बरीचशी गोरी मंडळीही दिसत होती. ताम्हन, दिवा, कापूर फटाफट काढलं गेलं. सुखकर्ता दुखहर्ता सुरु झालं. ते संपल्यावर जाहले भजनही (निरोपगीत) म्हणण्यात आलं. स्टेशनमधून लाईफगार्डही पाण्याकडे बघायचं सोडून हा सोहळा बघण्यात गुंतले होते. आरती संपली आणि कुणीतरी वाटली डाळ लोकांमध्ये वाटू लागलं. मंडळी जरा सैलावली. काही मंडळी तिथल्या गोऱ्या लोकांना एव्हांना लॉर्ड गनेशा विषयी सांगू लागली. कुणीतरी लाईफगार्ड स्टेशनच्या लोखंडी खांबावर जाऊन नारळ फोडला. तोही प्रसाद म्हणून लाईफगार्डनाही वाटण्यात आला. एव्हाना दोन खंद्या कार्यकत्यांनी बाह्या सरसावल्या. हे कार्यकर्ते कुठूनतरी कपडे बदलून अर्धी चड्डी घालून आले होते.
"कार्तिक, पावले, जरा सांभाळून, भरती आहे बरं का". कुणीतरी वयस्कर गृहस्थ म्हणाले.
कॅमेर पुन्हा एकदा सरसावले. गणपती दिसायला लागल्याने कड्याबाहेरच्या गोऱ्यांनीही आपआपले कॅमेरे सुरु केले. लाईफगार्डना एव्हाना कळलं की ही मंडळी पाण्यात जाणार बहुधा. काही गोऱ्या मुलांनी एव्हाना या कार्यकर्त्यांच्या मागे मागे जायलाही सुरुवात केली होती. काही लोकं लाईफगार्ड स्टेशनवर चढून फोटो काढण्याच्या तयारीत राहीले.


la-visarjan-2.jpg

प्रशांत महासागराला उधाण आलं होतं. मोठमोठ्या लाटा एकसारखा येऊन कोसळत होत्या. विसर्जन करणारे कार्यकर्ते सोडून बाकीच्या साड्या आणि सदरे जेमतेम पाय ओले होतील अशा अंतरावर उभे राहीले. एखादी मोठी लाट आली की या मंडळीमध्ये पळापळ होई. पाय कमीतकमी भिजावेत म्हणून मंडळी पाठी होत. विसर्जन करणारे कार्यकर्ते एव्हाना गुढघ्याभर पाण्यात शिरले होते. लाटा त्यांना धडका देऊ लागल्या होत्या पण त्यांनी गणपतीचा पाट घट्ट धरुन ठेवला होता. लाईफगार्डनी त्यांच्या नजरा या दोघांवर रोखल्या होत्या. गणपती बाप्पाचा जयघोष थंडावला होता. एक लाट कार्यकर्त्यंाच्या डोक्यावरुन गेली. अशीच एक मोठी लाट ओसरल्यावर कार्यकर्त्यंानी हातातली मूर्ती अलगद प्रशांत महासागरात सोडली. अडीचशे मुखातून पुन्हा एकदा जयघोष झाला - गणपती बाप्पा... मोरया!

la-visarjan-1.jpg

असं झालं आमचं गणपती विसर्जन - लॉस एंजलिसच्या महाराष्ट्र मंडळाचं गणेश विसर्जन. ८०० लोकं उपस्थित असलेल्या या वीकएंडला केलेल्या एकदिवसीय सोहळ्याच्या सांगतेला २५० लोकं उपस्थित होती. जे मुंबई पुण्यात घडतं तेच थोड्या फार फरकाने दहा हजार मैलांवरही घडत होतं. एका बाजूला गणपतीचं विसर्जन चाललं होतं तर दुसऱ्या बाजूला आपल्या संस्कृतीची परदेशातील प्राणप्रतिष्ठापना!

छायाचित्रे - अतुल रिसवाडकर

प्रकार: 

खूप छान वाटले असेल ना गणेशोत्सवाचा असा सगळा साग्रसंगीत सोहळा बघतांना आणि त्या सोहळ्यात सहभागी होतांना.

लई खास! गणपती बाप्पा मोरया.......... Happy
अरे हा लेख इकडल्या मराठी वृत्तपत्रात फोटोसहीत द्या की रे! छानच लिहीलाय... छान वर्णन.

धन्य, धन्य लोक तुम्ही!!

दुसऱ्या बाजूला आपल्या संस्कृतीची परदेशातील प्राणप्रतिष्ठापना!
अगदी खरे!! Happy

आजकाल मला वाटते 'आपल्या' संस्कृतीत, भारतात तरी, लोक दारू पिऊन, हिंदी गाणी लावून नि घाणेरडे अंगविक्षेप करत नाचत जातात! Light 1

छानच विसर्जन मिरवणूक आहे. विसर्जनाच वातावरणपण अगदी खास निर्माण केललं आहे. त्या खांद्यावरच्या मुलीचेपण हात जोडले गेले आहेत.

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आम्ही आमच्या परीनं संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्याला आता लोकंही चांगला प्रतिसाद द्यायला लागले आहेत.

Pages