गुंता

Submitted by विद्या भुतकर on 10 April, 2016 - 23:07

मी पाचवीत असताना मला स्केचपेन मिळाले होते बक्षीस म्हणून. तेंव्हा सांभाळायची अक्कल नव्हती आणि ते हरवल्यावर नवीन मागायची हिम्मत. बऱ्याच दिवसांपासून मी खूप दुकानांत ही कलरिंग ची पुस्तकं बघत होते, Adult Coloring Books. मोठ्या लोकांना चित्र रंगवण्यासाठी ही पुस्तकं. सान्वीची अशी पुस्तकं पाहिली की मला खूप इच्छा व्हायची आपण पण काहीतरी करावं अशी. एकतर मला काही चित्रकला वगैरे येत नाही. स्वत: चित्रं काढणे, रंगविणे हे सर्व प्रयत्न करून झाले आहेत गेल्या ८-१० वर्षात पण ते जमणार नाही किंवा तेव्हढा संयम नाही रोज सराव करण्या इतपत. त्यामुळे अशी आयती चित्र काढलेली पुस्तकं फक्त रंग भरायला सोप्पी म्हणून मी दोन घेऊन आले, नवीन स्केचपेन चा बॉक्सही. Happy

फोटोत असलेलं हे चित्र गेले दोन आठवडे करत होते, अर्थात रोज थोडं थोडं करून रात्री टी व्ही बघताना.दिसायला सुंदर दिसणारी डिझाईन पण, हातात घेतलं तेव्हा कळेना की कुठून सुरु करावं. कारण नुसते मनाप्रमाणे कसे रंगवणार?बराच वेळ बघत बसले वाटलं उगाच घेऊन येते काहीही. पण कुठून तरी सुरुवात करावीच लागणार होती ना? नाहीतर माझ्यामध्ये आणि माझ्या ७ वर्षाच्या मुलीत फरक तो काय? मग आधी पटकन समोर दिसणारी फुलं घेतली. एकसारख्या दिसणाऱ्या फुलांना एकेक रंग निवडले आणि सुरु केले. मग हळूहळू चित्र उलघडत गेलं. कधी कधी चुका झाल्याच पण एकूण काल शेवटचे रंग देऊन थांबवून टाकलं. मध्ये रिकाम्या जागा पण पाहिजेत ना. शुभ्र पांढरा हा ही एक रंग आहेच की. असो.

पण या चित्रात जो अनुभव आला न तो मला नेहमी येतो. म्हणजे एखाद्या दिवशी सिंकमध्ये खूप भांडी पडलीत आणि बघून सुरु करायचीही इच्छा होत नाही इतकी. पण मग मी ती मोकळी करायला लागते. म्हणजे ताट वेगळे, चमचे-पळ्या वेगळे आणि मोठी भांडी वेगळी, काचेची भांडी वाट्या पेले वेगळे. आधी काचेची भांडी जी फुटण्याची शक्यता असते आणि काचेचे ग्लास वगैरे ला मसाल्याचा वासही लागू शकतो घासणीचा. त्यामुळे ती आधी बाहेर जातात. त्यानंतर मोठी भांडी घ्यायची, म्हणजे ती धुवायची कमी असतात पण आकार मोठा त्यामुळे सिंक त्यांनीच भरलेलं असतं. मोठी भांडी धुवून बाजूला गेली की ढीग निम्मा झालेला असतो. मग ताट येतात. ती गेली की फक्त बारीक बारीक वस्तू राहतात. चमचे सर्वात शेवटी येतात. अर्थात घरातली साफसफाई किंवा धुणं यांतही हे नियम लागू होतातच. पण एकून काय की कुठेतरी सुरु करावं लागतं.

अभ्यास करतानाही हाच प्रयोग मी कधीकधी केला आणि कधी ऑफिसमध्ये खूप काम पडल्यावर सुद्धा मी हट्टाने उठून कामाला लागते सर्व संपवायचेच आज असे म्हणून. बरेच वेळा संपत नाही पण ढीग निम्मा झालेला असतो. मी माझी हाफ मेरेथोन पळताना सुद्धा एकेक अंतर घेते. पहिले ३ किमी सर्वात अवघड मग अर्धे अंतर होण्याची वाट बघते आणि अर्धे झाले की जोर दुप्पट होतो. बरेच लोक वजन कमी करायचं आहे किंवा व्यायाम सुरु करायचा आहे किंवा अमुक अमुक रेस मलाही करून बघायची आहे असं म्हणतात. तर काही मला इथे राहायचं नाहीये, भारतात परत जायचं आहे असंही म्हणणारे असतात पण खरंच जर एखादी गोष्ट करायची असेल न तर सुरुवात करणं महत्वाचं आहे. दिसताना ते अंतर, ते काम किंवा तो निर्णय अवघड वाटतो. पण एकेक छोटी छोटी अडचण बाजूला करत, छोटे छोटे निर्णय घेत पुढे गेलं की बरंच अंतर पार केलेलं असतं.

माझ्या बऱ्याच गळ्यात घालायच्या चेन एका डब्यात ठेवल्या की हमखास अडकून जायच्या. बरेच दिवस मी त्या तशाच पडू द्यायचे. पण मग एकदा घेतले की हळूहळू कुठे नक्की गाठ बसलीय, कुठली चेन कुठल्या बाजूने आत किंवा बाहेर काढली पाहिजे हे बघत एकेक गाठी सोडवत जायचे. दोन वेगवेगळ्या चेन दिसल्या की भारी आनंद व्हायचा. (आता मी त्या वेगवेगळ्या कप्प्यातच ठेवते. Happy ) कधी केसातला गुंता सोडवला आहे? होळी खेळून आल्यावर धुतलेल्या केसातला? ओढून तर चालत नाही. मग एकेक बट सुटी करून घ्यावी लागते आणि हळूहळू तो गुंता सोडवावा लागतो. नात्याचं पण असंच असतं नाही? गुंता हळूवारच सोडवावा लागतो. पण त्यासाठी कुठेतरी सुरुवात तर करावीच लागते.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

IMG_5755.JPGIMG_5831.JPGIMG_5847(1).JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!!

Thank you all so much. It's fun to do this activity. Stress buster.
Vidya.

खुप साधं सोपं आणि मस्त लिहिलय...
>>नात्याचं पण असंच असतं नाही? गुंता हळूवारच सोडवावा लागतो. पण त्यासाठी कुठेतरी सुरुवात तर करावीच लागते. >> हे खासच