इसवी सन ४०१६ - बुलेटिन

Submitted by घायल on 8 April, 2016 - 21:00

इसवी सन ४०१६
चालू कालगणनेनुसार टीआर १०१६
३००० साली टाईम रीसेट करण्यात आला होता. त्यामुळे इतिहासकार एकूण कालखंड काढताना टीआरपूर्व काल आणि टीआर नंतरचा काल याची बेरीज करतात. टीआरपूर्व काळात देखील इसवीसन पूर्व आणि एडी अशी कालगणना असल्याचे आढळून येते.

दोन हजार वर्षांपूर्वी मानव कसा होता याची उत्सुकता आता संपली आहे. दोन हजार सालापूर्वी ऑर्कुटयुग, फेसबुकयुग आणि ट्विटरयुग होऊन गेले अशी जी थिअरी होती तिचे पुरावे सापडले आहेत. वैज्ञानिकांनी या युगात जाण्यासाठी इंटरनेट नावाच्या गुहेत शिरण्याचे मार्ग शोधून काढले आहेत. त्या काळी ज्याला सर्व्हर म्हटले जात असे , असे काही संगणक चालू करून त्याला इतर संगणक जोडले असता तत्कालीन माहीतीचे साठे उपलब्ध होत आहेत. एव्हढी अजस्त्र माहिती त्या काळचा मानव वाचत होता असे आता आपल्याला म्हणता येते.

सदर काळ मोठाच धामधुमीचा असावा असे नोंदीवरून दिसून येते. न्यायासाठी न्यायालये होती. यावरून लोक न्यायप्रिय होते असे एका गटाचे म्हणणे आहे. तर न्यायालयातच विरुद्ध पक्षाचे वकील लोक अशिलास मारहाण करत असे एका गटाचे म्हणणे आहे. यावर पहिल्या गटाने ते अशील राष्ट्रद्रोही असल्याने राष्ट्रवादी वकिलांनी त्यास मारहाण केली असा युक्तीवाद केला आहे. तर राष्ट्र ही बुरसट कल्पना २०२५ सालीच निकालात निघाल्याने २०१६ साली त्यावरून भांडणे होत होती हे आश्चर्याचे असल्याचे म्हटले आहे. यावरून आता वाद पेटला आहे.

या काळात मानवी जीवनाने उत्क्रांती केल्याचे संशोधन सांगते. मंदीरप्रवेश, अस्पृश्यता अशा गोष्टी कायद्याने संपल्याचे नोंदीवरून कळते. त्याच वेळी शनी शिंगणापूर नामक देवळात मंदीरप्रवेशाचा लढा चालू होता आणि रुपकुंवर सती गेल्यावरून ऑर्कुटवर दंगा झाल्याच्या नोंदी बुचकळ्यात टाकणा-या आहेत. आसामात देवळात प्रवेश केल्यावरून अस्पृश्य़ांचे डोळे काढण्याच्या नोंदी देखील चक्रावून टाकणा-या आहेत.

आंतरजालावरच्या या लोकांच्या काळाच्या नोंदी अगदी तपशीलवार असल्य़ाने त्या पुढेमागे होण्याची शक्यता नाही. सुधारणा झाल्याच्या घटना या शंभर दोनशे वर्षांपूर्वीच्या असल्याचे स्पष्टपणे कळून येते. शंभर वर्षापूर्वीच्या काळातले राहणीमान आणि या काळातले राहणीमान यातला फरकही स्पष्टपणे जाणवतो. मानव एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला होता हे जाणवते. देव, धर्म, भुतं खेतं या गोष्टी काल्पनिक आहेत असं मानले जात होते. वैचारीक दृष्ट्या माणूस प्रगत होत होता हे कळते. त्याच काळात टीव्हीवरच्या पौराणिक मालिकांवरून भांडणे चालू असल्याचे भारत या भूभागात असलेल्या युझर्स वरून लक्षात येते. याच देवांच्या मंदिरावरून मोठ मोठ्या रथयात्रा आणि नरसंहार झाल्याचे आढळते.

त्या काळी रजनीकांत नामक सर्वशक्तीमान मनुष्य असल्याचे कळते. पुढील काळात त्याची मंदीरे देखील स्थापन झाल्याचे दिसते. काहिंच्या मते रजनीकांत अजरामर असून तो संकटकाळी मदतीला धावून येतो अशी श्रद्धा असल्याचे दिसते. २२१५ पर्यंत अशा नोंदी आढळतात. त्यानंतर आंतरजालावर दंगल होऊन ते बंद पडले असे म्हटले जाते.

याच काळात छापील ग्रंथ ही प्रथा बंद पडली असल्याने पुढचे पुरावे अथवा संदर्भ आढळत नाहीत. २००० च्या पुढचा काळ हा गोंधळात टाकणारा आहे यावर सर्व विद्वानांचे एकमत झालेले आहे. तसेच या गोंधळाच्या काळात रॅशनल मत मांडणारे लोक जिवंत राहत नसत असे दाखलेही आढळून आलेले आहेत. या घटना मोगल काळाशी आणि त्यामागील मनुस्मृतीतील काळाशी साम्य दाखवणा-या आहेत. यावरून मोगल काळ, मनुस्मृती काळ आणि अलकायदा , तालिबान या सर्व घटना समकालीन असाव्यात आणि सद्य काळातील इतिहासकारांचे कालमापनावरून वाभाडे काढत आणखी एका गटाने वादात उडी घेतली आहे.
एकंदरीतच या गटाचा इतिहास हाती लागल्याने सद्यकाळातले वातावरण कलुषित आणि असहीष्णू होत आहे.

पुढील बुलेटिन अचानक केव्हांही..

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान