जम्मू ते पुणे सायकल मोहीम (भाग ७): मुक्तसरसाहीब - कसोटीचा दिवस

Submitted by आशुचँप on 2 April, 2016 - 15:32

http://www.maayboli.com/node/58175 - (भाग ६): अमृतसर - लखलखते सुवर्णमंदीर

======================================================================


इक ओंकार सितनाम करता पुरखुि नरभउ निरवैर।

अकाल मूरित अजूनी सैभंगु साद।।

आद सचु जुगाद सचु। है भी सचु नानक होसी भी सचु।।

सोचे सोिच न होवई जेसोची लख बार।

चुपैचुप न होवई जेलाइ रहा लिवतार। भुखया भुख न उतर जेबंना पुर आंभार।

सहस सियाणपा लख हो ह, त इक न चलेनािल।

कव सिचयारा होइए, कव कूड़ै तुटै पाल।

हकिम रजाई चलणा, नानक लिखआ नाल।

नानकवाणीतून उच्चारलेले हे पवित्र शब्द कानावर पडून दिवसाची सुरुवात व्हावी अशी इच्छा होती. रंग दे बसंती मध्ये अतिशय सुंदररित्या चित्रबद्ध केलेले हे. पण कानावर गुरुमुखी पडली तरी हे मनात घर करून बसलेले शब्द नाही पडले. त्यामुळे उठल्या उठल्या हेडफोन्स लाऊन पहिल्यांदा हे ऐकले आणि मगच दिवसाची सुरुवात केली.

आणि आज खरेच गरज होती, या शब्दांची. आज मोहीमेतला सगळ्यात मोठ्ठा पल्ला होता. १६५ किमी. अमृतसर ते मुक्तसर साहीब. हा दिवश यशस्वीरित्या पार पडला असता तर पहिली चाचणी परिक्षा पास झाल्यासारखेच होते.

यापूर्वी १६५ किमी अंतर पार केले नव्हते असे नाही. कन्याकुमारीला जाताना, त्याही आधी सराव करताना, त्यानंतर गोव्याला जाताना असे तीन वेळा एवढे अंतर पार केले होते. २०० किमी अंतरही केलेले होते. त्यामुळे भय अंतराचे नव्हते तर इतके सामान घेऊन, अनोळखी मुलखात, रस्ता विचारत, त्यात पुन्हा धुके, अंधार, बेफाम ट्रक्स यांच्याशी सामना करत. त्यामुळे नाही म्हणले तरी थोडी मनात धाकधुक होती.

धुक्यामुळे लवकर निघता येणे शक्य नव्हते, त्यामुळे नेहमीच्याच वेळी निघायचे ठरले. दोन दिवस माझी आधीचीच सायकलींग शॉर्ट घातली होती. पण आज अंतर लक्षात घेता मेरीडाकडून मिळालेली आंतरराष्ट्रीय दर्जाची शॉर्ट चढवली. गेल्या कन्याकुमारी मोहीमेला अशी काही मिळाली असती तर किती बहार आली असती. कारण आम्ही ज्या वापरायचो, त्या तासभर अंतरासाठी वापरण्यासाठीच आहेत असे त्यावर छापलेले होते. आणि आम्ही वापरल्या दिवसाला ८-१० तास. त्यामुळे सॅडलसोअर होणे स्वाभाविकच होते. पण या मेरीडा शॉर्टमुळे अतिशय सुख होते. किरकोळ हुळहुळणे सोडले तर सॅडल सोअर कुणालाच सतावले नाहीत.

सकाळी अमृतसरातल्या बोळींमधून सगळयांच्या कुतूहलनजरा झेलत बाहेर पडलो. पण कुठेतरी असा एक विचार मनाला चाटून जात होता, की आज आपली कसोटी लागणार आहे. योगायोग म्हणा किंवा कसेही काय, पण कन्याकुमारीला जातानाही निप्पाणी ते धारवाड या तिसऱ्या दिवसाने खेकटे काढले होते आणि जवळपास तोच प्रकार आज तिसऱ्या दिवशी झाला.

पहिलाच अपशकुन झाला तो म्हणजे माझी बॅटरी पडल्याचा. कालच्या अमृतसरला येतानाच्या खाबडखुबड रस्त्यावर माझी टॉर्चची बॅटरी पडली असावी. बर साधासुधा नाही, आम्ही खास सायकलींगसाठी मागवलेला १८०० रुपयांचा. आता फक्त त्याचा दिवा होता बॅटरी नाही. आणि आज अंधारात जावे लागण्याची दाट शक्यता होती आणि आजच बरोबर माझ्याकडे बॅटरी नव्हती.

त्यात कहर म्हणजे, सुह्दने त्याचा दिवा हरवला. त्यामुळे त्याच्याकडे बॅटरी, माझ्याकडे दिवा असा जुगाड करून जायचे ठरले. ते एक झाले पण एकंदरीत निघायच्या गडबडीत काहीच खाल्ले नाही. आणि व्हायचे तेच झाले.

पंधराएक किलोमीटर गेल्यावर माझी गाडी रिझर्वला आली पण पेट्रोलपंप दिसेना त्यामुळे शेवटी गचके देत देत बंद पडली. मॉर्निंग सिकनेसनी इथेही माझा पिच्छा सोडा नव्हता तर. शेवटी कितीही प्रॅक्टिस करा किंवा काय पण करा, शेवटी शरीराला इंधन नाही दिले तर ते यंत्र शेवटी किती तग धरणार. काहींची धरतात, आमच्यासारखे पामर त्याला बळी पडतात.

मी वाटेत थांबून सायकलच्या हँडलवर डोके टेकवून तसाच राहीलो. मागून काका आणि ओबी येतच होते. त्यांना आता माझ्या सिकनेसचा चांगलाच अनुभव होता. त्यामुळे एकही प्रश्न न विचारता, त्यांनी थांबून चिक्की काढली, ओबीने ग्लुकोज पावडर टाकून सरबत तयार केले. तिथल्याच एक कटट्यावर बसून चिक्की रिचवली, सरबत प्यालो. पाच दहा मिनिटे बसून राहीलो. टाकी रिफील झाल्यावर पुन्हा एकदा रिचार्ज झालो आणि पुढे निघालो. याला म्हणतात टीम स्पीरीट.

पण सकाळी निघताना एनर्जी बार्स खाणे आवश्यक आहे हे मनावर बिंबवले. एनर्जीबार वरून आठवले. ट्रीपची खरेदी करायला ज्युनिअर चँपला (वय वर्षे ८) घेऊन गेलो होतो. तिथे तेलाची छोटी बाटली, टूथब्रश, पेस्ट इ.इ. देैनंदिन वस्तु घेतल्यावर एनर्जी बार्स उचचले. तब्बल १०-१२ आणि ते ट्रॉलीमध्ये टाकले. ट्रॉली अर्थातच ज्युनिअर फिरवत होता, तेवढीच त्याची गाडी गाडी. पण इतके बार्स बघून तो थोडा अस्वस्थ झाला. म्हणले काय झाले रे...

"एवढे तु एकटेच खाणार आहेस?"

"अरे एकदम नाही काही. मी आता १७ दिवसांसाठी चाललोय ना. अधून मधून खात राहणार"

"पण तु एकदम का घेतोयस?"

"मग पुढे नाही मिळाले तर...काय नक्की प्रॉब्लेम काय आहे..."

"लोकांना थोडेच माहीती"

"काय आता?"

"त्यांना वाटेल बघा हा मुलगा किती कॅडबरी घेऊन चाललाय ते. त्यांना काय माहीती सगळे त्याचा बाबाच खाणार आहे."

मला एकदम इतके हसू आले की आजूबाजूचे लोक बघायला लागले चमकून. अॉन अ सिरीयस नोट, त्याच्या जवळ बसलो आणि त्याला म्हणलं, एकतर लोक काय म्हणतील याचा विचार करायला तु अजून खूप लहान आहेस.

आणि मोठा झाल्यावरही जर लोक काय म्हणतील याचा विचार करत राहीलास तर कधीच तु हॅपी होणार नाहीस. तुला जे आवडतयं तेच करायचं एकदम बिनधास्त.

त्याने मान डोलावली खरी पण त्यातले किती त्याला समजले माहीती नाही. पण मलाच एक बाबाचे कर्तव्य केल्याचा फिल आला आणि त्याच्या गोंडस निरागसपणासाठी एक कॅडबरी जेम्सचा बॉल घेऊन दिला.

मी ज्युनिअर चँपच्याच आठवणीत असताना एका टपरीवजा ठिकाणी प्राठे खायला थांबलो. तिथे एक पोरगा स्कुलबसची वाट बघत थांबला होता. मी अजून इमोशनल मोडमध्ये असल्याने मला त्याला बघुन ज्युनिअर चँपची खूपच आठवण झाली आणि ज्युनिअरला जर अशी पगडी वगैरे घातली तर तसाच दिसेल इतके साम्य.

मी आपला प्रेमभराने त्याच्याशी बोलायला गेला पण तो चांगलाच अस्वस्थ झाला. बरोबर आहे, माझा पोरगा त्याच्या वयाचा असला आणि मला काही वाटत असले ती असा अनोळखी माणूस सायकलवर येऊन अचानक सलगी दाखवतोय म्हणल्यावर तो चक्रावणारच.

मीच माझ्या मनाला समजाऊन माघार घेतली पण त्याचे दोन फोटो काढलेच.

पुढे हेमचाही किस्सा झाला. चहा प्यायला एके ठिकाणी थांबलो होतो तेव्हा एक चिरंजीव आले आणि डायरेक्ट हेमच्या गळ्यात पडून, गालाला हात वगैरे लाऊन चौकशी. आम्हीही भंजाळलो, इतके प्रेम. खूप दिवसांनी आपले माणूस दिसल्यावर कशी करतील लहान मुले तसाच पवित्रा. काय बोलत होता हे काय कळत नव्हते, पण थोड्यावेळात जाऊन आजोबांना घेऊन आला. तेही लांबून बघून परत निघून गेले.

म्हणलं, हेम काय रे बाबा, ये क्या सीन है. तोही फुल गोंधळलेला.

असो, दरम्यान, ओबीचा एक किस्सा. त्याने शिरीषची सायकल घेतलेली आणि एकदाही न चालवता डायरेक्ट राईडला. त्यामुळे बेक्कार गेम झाली. ती सायकल कशी कोण जाणे भयानक जड झालेली. काहीतरी सेटींगमध्ये गडबड. आणि ती सायकल अक्षरश ओढत न्यावी लागत होती.

केवळ बाबुभाईचा अफाट स्टॅमिना आणि फिटनेस याच्या जोरावर त्याने संपूर्ण राईड त्यावरच केली. मध्ये हेम, लान्स सगळ्यांनी एकेकदा चालवून थोड्याच वेळात त्याला परत केली. मी तर डेरींगपण नाही केले.

त्याची कीव येऊन हेमने त्याच्या स्कॉट सब४० ची अदलाबदली केली. पण त्याला वाटले त्यापेक्षा ओबीची सायकल जाम आखडू निघाली. कितीही जीव खाऊन पॅडल मारले तरी २१-२२ च्या वर वेग जाईचना. १०-१२ किमी नंतर तरणतारणच्या चौकात थांबलो तिथे लान्सने मी बघतो थोडावेळ घेऊन म्हणत श्विन घेतली व हेमने लान्सची मेरिडा घेतली.
पुढे निघालो तर लान्सकडे असलेली श्विन पंक्चर. सुह्रुद, काका व लान्स थांबलेले. मी व हेम पुढे निघालो. वेदांग व बाबुभाईला गाठत एकत्र निघालो. बहुतेक जीरा गांवाच्या अलिकडे एका पंक्चर दुकानासमोरच हेमची मेरिडा पंक्चर. पंक्चर आम्हीच काढलं व पुन्हा आपापल्या सायकली घेतल्यामुळे इतका वेळ वेगामुळे अदृश्य झालेला बाबुभाई पुन्हा आमच्यात दिसू लागला.

असो, तर हरिकेला मोठे पक्षी अभयारण्य आहे असे वाचले होते. अर्थात ते बघायला जाणे शक्यच नव्हते पण जाता जाता काही दिसले तर बघावे म्हणून सतलज आणि बियास संगमाजवळच्या पुलावर थांबलो. पक्षी काय दिसले नाहीत पण व्ह्यू झकास होता. पुलावर पंजाबी भटके लमाणांच्या तांड्यासारखे घोडागाड्यांवर सगळे सामान लादून काफिला करून चालले होते. त्यांचेही काही पोट्रेट घेतोय तोच

...

तोच गुरगुर करत एका धुडावरून दोन भक्कम पोलीस मामा आले आणि एकदम आक्रमकपणे

क्यो भाई, किसकी फोटो खीच रहे हो, बोर्ड नही देखया क्या, यहा पे फोटो निकालना मना है...किधर से हो, कहा ज रहे हो अशी सरबत्तीच. ती पण दरडावून...नाही म्हणले तरी सरबरलोच जरा.

मग थोडक्यात सांगीतले की कसे कुठे चाललोय,आणि बोर्ड नाही पाहीला खरंच. आम्ही पक्ष्यांचे फोटो काढायला थांबलेलो.

त्यांनी कॅमेरे पहिले आत ठेवायला लावले आणि मग सगळी चौकशी करून सोडले. म्हणलं फोटोला का बंदी आहे. तर म्हणजे,
ये दुआब से आगे नो मॅन्स लँड और आगे दुश्मनोंका एरीया मतलब पाकिस्तानकी बॉर्डर शुरु होती है. यहा कही पे भी फोटो नही निकलना...

आयला, हे म्हणजे भारीच होतं की. पण कॅमेरा जप्त न करता नुसत्या ताकिदीतवर भागलं म्हणून हुश्श करत पुढे निघालो.

तिथून मग दोघेही निमुटपणे एकमेकांचा आळीपाळीने ड्राफ्ट घेत जात असतांना मधेच काकांची उजव्या बाजूने शिट्टी ऐकू आली. ती गँग जेवायला थांबली होती. मला काही मेंदूत रजिस्टरच झाले नाही. माझ्या मागे असलेला हेम थांबला पण मी काकांकडे पाहत पाहत पुढे चालवत निघालो. शेवटी त्यांनी दोन-तीन हाका मारल्यावर कुठे मला जाणवले की हे आपलेच लोक आहेत आणि आपल्याला थांबायला सांगतात.

माझ्या त्या ट्रान्स फेज बद्दल सगळ्यांनी भरपूर हसून घेतले. जेवतांना बाजूलाच बसलेल्या दोन जोडप्यांनी आमच्या सायकलींजवळ जाऊन अडकवलेली हेल्मेट्स घालून स्टाईल मारत फोटो सेशन सुरु केलं. आम्हीही सायकलला फक्त काही इजा करीत नाहीयेत नां याकडे एक डोळा ठेवत जेवण हाणत होतो. दुपारचा दीड वाजलाय. आत्ता कुठे फक्त ७२ किमी आलोय. अजून नव्वदेक किमी जायचंय याचं टेन्शन घेत सगळ्यांनी सायकल्स वेगाने मारायला सुरुवात केलेय खरी पण त्यामुळे बाजूच्या हिरव्यागार शेतीकडे क्वचितच लक्ष जातंय अशी स्थिती.

...

मुडकीपर्यंत रटाळपणे सायकल हाणत होतो. फरीदकोट आवाक्यांत येतंय असं दिसताच सगळ्यांत पुढे असलेल्या लान्स व वेदांग या अही-मही जोडीला गाठायचा हेमला मूड आला व तो अचानकच गियर बदलून सुसाट निघाला. त्या पाठोपाठ मी आणि सु्ह्दही सुटलो आणि हेमला माहीतीच नाही की आम्ही त्याचा ड्राफ्ट घेत चाललोय. असेही मी सायलेंट ड्राफ्टर म्हणून नाव मिळवले होते. मी पुढच्याला मुळीच कळू न देता अगदी सावकाश त्याच्या पाठोपाठ जाऊन चोरून ड्राफ्ट घेण्यात प्राविण्य मिळवले होते. त्यामुळे कधी पुढच्याने मागे वळून पाहीले तर अचानक मागच्या चाकाला खेटून मी दिसायचो.

तर त्या झपकन गेलेल्या ७-८ किमीमधे ३५ च्या आसपासचा वेग कायम होता. फरीदकोट बायपास करुन डावीकडे वळालो तेव्हा मी हेमला म्हणलोही की. कसली अंगात आल्यासारखी चालवलीस आत्ता.. वाट लागली ना आमची! तर म्हणे मला कांय माहीत तुम्ही ड्राफ्ट घेतांय!

आता रस्ता सतलज नदीच्या कालव्याच्या बाजूने जात होता. पुढे एका चौफुलीवर चहाच्या व मुक्तसररस्त्याच्या शोधात असतांना एक हौशी सरदार भेटला. त्याने चौकशी करुन थोडं पुढे एका चहाच्या टपरीवर थांबवलं. मुक्तसर अजूनही ४५ किमी. आणि इथे अनपेक्षितपणे पाऊस सुरु झाला. म्हटलं आज परीक्षेचाच दिवस दिसतोय. त्या सरदारनेही काहीतरी फालतू थिम सांगून दोनेक कविता ऐकवल्या, फोटोसेशन केलं. तो I specialist वाटणारा सरदार आजही गांवात आमच्यासवे काढलेले ते फोटो दाखवत चमकोगिरी करत असेल ही माझी खात्री आहे.

इथून मुख्य रस्त्याशिवाय कालव्याकडेनेही एक रस्ता मुक्तसरकडे जात होता पण अंधार झाल्याने आम्ही मुख्य रस्ताच निवडला. कोट कपुरा १० किमी असतांना आम्ही सायकलचे दिवे लावले. कोट कपुरात ऐन गजबजीच्या वेळी आम्ही पोहोचलो होतो. त्यांतून हनुमान सुह्रदच्या मदतीने एकमेकांना योग्य रस्त्याचे इशारे करत, रेल्वे लाईन ओलांडत उजवीकडे मुक्तसर रस्त्याला लागलो. अजून ३५ किमी. अंधारात १५ किमी गेल्यावर उजवीकडे एक यथातथा धाबा दिसल्यावर मी आक्रमकपणे सगळ्यांना थांबवलं. इथे जेवून पुढे निघू. पुढे धाबा नसेल तर कांय! पोहोचेपर्यंत हॉटेल्स बंद झाली तर कांय वगैरे माझ्या प्रश्नांना उत्तरं द्यायची कुणाची ताकद नव्हती व भूकेची वेळही झाली होती. पण.... या धाबेवाल्याने आजवरच्या सगळ्या एवन पंजाबी खादाडीला काळीमा फासला. भाजीला वास येत होता तरी मालक त्याची बाजू मांडत होता. जबरीने उदरभरण करुन एकमेकांमागून सावकाश निघालो. आता फक्त अंतरच कापायचंय. संपता संपत नव्हतं. परिसर खरंच छान असणार हे हवेवरुन जाणवत होतं.

मधेच एका नेता छाप फॉर्च्युनरवाल्याने थांबवून आमच्यासोबत फोटोसेशन केलं. अजूनही ८ किमी.. आजच्या राईडने सगळ्यांचेच दिवे लावले होते. मोहीमेचा खरा सिरीयसनेस आज समजत होता.

फावल्या वेळातले स्ट्रेचिंग Happy

१७ दिवसांतला सगळ्यात जास्त किमी चा दिवस पार पडला होता. शेवटही दिवसाप्रमाणेच कसोटीचा गेला. मुक्तसरमधे बोळीच बोळी. त्याही पेवर ब्लॉक्सच्या.. त्यांत जीपीएसवरुन हॉटेल शोधतोय. हनुमानामागे आम्हीही गोल गोल बोळी फिरतोय, रिंगा रिंगा राणी खेळतोय तरी सापडेना. शेवटी काकांना एका शटर अर्धवट उघडल्याठिकाणी संशय आला व चौकशी करता तेच हॉटेल आमचे निघाले. रात्रीचे साडेदहा वाजलेत. आंघोळी आवरुन झोपेपर्यंत १२ वाजले. खरी मोहीमेची सुरुवात आज. २०० ची बीआरएमच केली म्हणा नां...

अर्थात, यात एकच झाले ते म्हणजे मुक्तसरसाहीबचे दर्शन नाही होऊ शकले. अमृतसरला पुन्हा येणे कदाचित शक्य होणार होते पण इतकी वाकडी वाट करून मुक्तसरला येणे फारच अवघड. आणि खूप लोकांनी वाटेत सांगितले होते की खूप सुंदर आहे. पण नाहीच.

वाटेत काकांना आणि सुह्दला खूप वेळेला विनवण्या केल्या की उरलेले २०-२५ किमी सरळ टेंपो करून जाऊ. पण दोघेही बधले नाहीतच. पण झाले ते एका अर्थी बरेच झाले.

मी धाब्यावर जेवायला थांबलो त्यानंतर निघताना स्ट्राव्हा सुरु करायचेच विसरलो, त्यामुळे बाबुभाईचा डाटा देत आहे.

---


===================================================
http://www.maayboli.com/node/58684 - (भाग ८): हनुमानगढ - राजस्थानात प्रवेश

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी चालू आहे. पुलेशु.
त्यांना काय माहीती सगळे त्याचा बाबाच खाणार आहे>>> मुलं चारचौघात दांडी उडवतात, पण त्यांचे प्रश्न लॉजीकली सॉलीड करेक्ट असतात Happy
फावल्या वेळातले स्ट्रेचिंग Biggrin

वाह!! तुमच्या ह्या गृप चे एकदा सग्रसंगीत टंगड्या पूजन करून ५ मुंज्या मुलांस साइकिलिंग शॉर्ट्स चं वाण द्यावं म्हणतो !!!


मला एकदम इतके हसू आले की आजूबाजूचे लोक बघायला लागले चमकून. अॉन अ सिरीयस नोट, त्याच्या जवळ बसलो आणि त्याला म्हणलं, एकतर लोक काय म्हणतील याचा विचार करायला तु अजून खूप लहान आहेस.

आणि मोठा झाल्यावरही जर लोक काय म्हणतील याचा विचार करत राहीलास तर कधीच तु हॅपी होणार नाहीस. तुला जे आवडतयं तेच करायचं एकदम बिनधास्त.

जिंकलात राजे!! पोरगा नाव काढणार! तारीख अन वेळ सहित स्क्रीनशॉट ठेवा खरा होणारच Happy

धन्यवाद सर्वांना

मुलं चारचौघात दांडी उडवतात, पण त्यांचे प्रश्न लॉजीकली सॉलीड करेक्ट असतात

अगदी अगदी

वाह!! तुमच्या ह्या गृप चे एकदा सग्रसंगीत टंगड्या पूजन करून ५ मुंज्या मुलांस साइकिलिंग शॉर्ट्स चं वाण द्यावं म्हणतो !!!

हाहा हाहा....जबरी..आम्ही सगळेच मुंजेच आहोत. वाण आम्हालाच द्या त्यापेक्षा.....

पोरगा नाव काढणार! तारीख अन वेळ सहित स्क्रीनशॉट ठेवा खरा होणारच

आशिर्वाद असू द्यावेत Happy

१६५ किमी करताना तुमची लागलेली वाट लेखातून कळलीही नाही, इतकं स्विफ्टली लिखाण केलं आहेस.. सवय झाली की कष्टांचं अप्रूप वाटेनासं होतं, तसं सायकलिंग मध्ये होतंय का आता तुझं? माझ्यासाठी १६५ हा आकडाच पुरेसा आहे 'अबब!' म्हणायला... Happy

येऊ दे पुढची सफर...

वाचतांव हां... मस्त लिहिलय Happy भारी किस्से. वाचुन शिकण्यासारखेही खूप....
किती किती भिन्न स्वभावाची वैशिष्ट्यपूर्ण माणसे भेटली असतील ना ? केल्याने देशाटन.... ते हि सायकलवरुन.... (रेल्वे/विमान/बस ने नाही).

धन्यवाद सर्वांना Happy

सवय झाली की कष्टांचं अप्रूप वाटेनासं होतं, तसं सायकलिंग मध्ये होतंय का आता तुझं?

असेलही कदाचित...किंवा पुढे जो त्रास झाला त्यापुढे हा इतका वाटला नाही. त्यावेळी मात्र चांगलाच जीव काढला होता. आणि तो मी हेमच्या लेखनकौशल्यापुढे फार मांडला नाही.....

रात्रीचे सायकलींग करत होतो त्यावेळी अनेक विचार येत होते, खूप राग येत होता, संताप सुद्धा, सुखाचे जीवन सोडून असा आचरटपणा करायचा प्रयत्न केल्याबद्दल स्वताची निर्भत्सना सुद्धा....

पण आता इतक्या दिवसांनी जेव्हा पुन्हा तो क्षण आठवतो त्यावेळी तो राग किती तात्कालीक होता हे जाणवते. पण त्यावेळी त्याक्षणी तो येणे स्वाभाविक होते. किमान माझ्यासाठी तरी.

किती किती भिन्न स्वभावाची वैशिष्ट्यपूर्ण माणसे भेटली असतील ना ?

खूपच...अफाट प्रकारची लोकं भेटली, दिखाऊपणा करणारी, सच्ची, परिस्थितीने गरीब पण मनाने श्रीमंत अशी.....हीच आमची खरी कमाई होती. जेव्हा कुणी विचारतात की कशासाठी तेव्हा आता उत्तर फक्त फिटनेस किंवा सायकलींगची हौस म्हणून नाही येत...आता सांगतो आपल्याच देशातल्या लोकांना भेटण्यासाठी

वा.. खूप खूप छान वाटतं ही मालिका वाचताना.. तुमचे अनुभव अगदी जिवंत होऊन उभे राहतात डोळ्यासमोर..
ऑसम!!!

जूनिअर चँप.. जियो ...मस्तं !!! Happy

ज्युनि. चम्प चा प्रश्न ऐकुन मला पु. ल. चे 'म्हणजे मला कधी कधी चिडुन डुक्कर म्हणता ते हे?' आठवले!! Lol Lol
बाकी लेख मस्त! पु.भा.प्र.