पद्मा आजींच्या गोष्टी १० : झाडाखालचे देऊळ

Submitted by पद्मा आजी on 27 March, 2016 - 14:34

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.
मी तुमचे सर्व प्रतिसाद वाचते. बरे वाटते.

माझे आजोबा तेव्हा अमरावतीहून दर्यापूरला बऱ्याच वेळा जा ये करायचे. एकच बस होती तेव्हा फक्त. तीच पकडून जावे लागे. बस दिवसातून दोन का तीन वेळा चक्कर मारायची. त्यामुळे सकाळची हुकली कि दुपार पर्यंत काही नाही. तेव्हा रस्त्यामध्ये एक मोठा नाला होता. काही पाणी नसायचे त्याला. दोन तीन डबके पसरलेली असायची फक्त. बस जायची त्याच्या पात्रातून.

लांब असल्यामुळे रात्री यायला उशीर व्हायचा. माझे आजोबा धार्मिक होते. दत्ताचे भक्त. सोवळे हि पाळायचे थोडेशे ते. सकाळी पूजा. रात्री आल्यावर आधी आंघोळ, पूजा, आणि मगच जेवण. आम्ही मात्र जेवून घ्यायचो लवकर.

एके दिवशी गेले ते. आणि पाउस सुरु झाला. धो-धो अगदी. संध्याकाळी काम आटोपल्यावर आजोबा निघाले, तर बस आलीच नव्हती दुपारची. मग काय करावे? घरी तर जायला पाहिजे. शिवाय दर्यापूरला राहणार कोठे? हॉटेल वगैरे तर काही नव्हते तेव्हा.

थोड्या वेळ वाट बघून ते निघाले. हातातली पिशवी काखे मध्ये दाबून पायीपायी अमरावतीच्या दिशेने. पाउस पडताच होता. वाटेत त्यांना एक बैलगाडीवाला भेटला. त्याने पोहोचविले थोडे पुढे आणि तो गेला दुसऱ्या वाटेने. चिंब भिजलेले आजोबा निघाले पुढे.

काही अंतरावर त्यांना तो मधला ओढा लागला. पण पाहतात तर काय ओढा भरून वाहत होता. आता काय? काहीच करणे शक्य नव्हते. ना पुढे - ना पाठीमागे. म्हणून आजोबा बसले एका झाडाखाली पाणी उतरण्याची वाट बघत.

दमल्यामुळे त्यांना एक डुलकी लागली आणि अचानक काहीतरी आवाजाने जाग आली. काही समजेपर्यंत एक पाण्याचा झोत आला आणि आजोबा वाहायला लागले. जिथे बसले होते ती जागा तर पाण्याखाली गेली होती. आजोबांना पोहता येत नव्हते. त्यामुळे काही गटांगळ्या नंतर त्यांना काही तरी हाताशी लागले. एक झाड आडकले होते दगडांवर.

प्रचंड पाणी. पूर आला होता. ओढ्या ऐवजी नदी झाली होती. आजोबांनी कशीबशी जमीन गाठली पण पाणी तर वाढतच होते. प्रवाह एवढा कि मोठी झाडे वाहून चालली होती.

झाले. काही खरे नव्हते. आजोबांनी दत्ताचा जप सुरु केला. पण ते जिथे वाहून आले होते तिथे ओढा दाबला गेला होता मोठ्या खडकामुळे. त्यामुळे पळायलाही जागा नव्हती. पाणी तर वाढतच चालले होते. जणू काही धरण फुटल्यासारखे. बघता बघता पाणी छातीशी आले.

जेव्हा आजोबांना वाटले झाली भरली वेळ. तेव्हा त्यांना अचानक एक बाई दिसली काही अंतरावर. तिने हाक मारली त्यांना आणि म्हणाली, "या झाडावर चढ. ठीक होईल. महाराजांची कृपा आहे तुझ्यावर." असे म्हणून ती गायब झाली.

आजोबांनी भरोसा ठेवला आणि ते त्या झाडावर चढून बसले.

इकडे आम्ही चिंतेत. काय करावे काही सुचत नव्हते. आजीने लगेच देव पाण्यात ठेवले व तिच्या अनुषंगाने पूजा चालू केली व रात्रभर ती जप करत राहिली. आम्ही पण जागे रात्रभर.

सकाळी सकाळी बातमी आली कि पाउसाच्या जोराने बरीच छोटी धरणे भरून वाहत होती. दर्यापूरच्या बाजूचे छोटे धरण फुटले होते. झाले. आम्ही सगळे रडायवर. मग आजोबांचे भाऊ, माझे वडील, बाकीचे काही लोक निघाले. बैलगाडी, टांग्यातून.

ओढ्यापाशी पोहोचले तर पाणी उतरले नव्हते. आजोबांचा हि कुठे पत्ता नाही. मग काही लोक ओढ्याच्या खालच्या बाजूला गेले. तेव्हा त्यांना हाक ऐकू आल्या. आजोबा झाडावरच बसून होते अजून. पण पाणीही पूर्ण भरलेले.

मग कुठूनतरी एक दोर आणला आणि काही चांगले पोहोणारे लोक गेले आणि मग आजोबा दोराला धरून कशेबशे कोरड्या जमिनीवर आले.

रात्रीतून त्यांच्या आजूबाजूची अनेक झाडे पडली वा वाहून गेली होती. पण ते ज्या झाडावर होते ते मात्र टिकून राहिले.

त्यानंतर बरेच दिवस आजोबांना भेटायला लोक येत राहिले. त्या बाईचा उल्लेख झाला कि सगळे नमस्कार करायचे. काही दिवसा नंतर आजोबांनी त्या झाडाखाली एक छोटेसे देऊळहि बांधले.

गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

मस्त आवडली गोष्ट...
डोळ्यापुंढे तो प्रसंग जशाच्या तसा उभा राहिला...

मस्तच Happy