दार उघड ना बाबा

Submitted by संतोष वाटपाडे on 16 March, 2016 - 01:18

मागणार नाही आज,भाकरी भात उपाशी राहू
लागली जरीही भूक समजुनी चूक दाबुनी ठेवू..
घाबरु नको इतक्यात दुःख पोटात ठेव रे ताबा
पाहिजे तेवढा मार एकदा दार उघड ना बाबा...

मारुन हाक भेसूर बडवते ऊर एकली आई..
दारास मारते लाथ खाऊनी दात बारकी ताई..
ऐकून आर्त विनवणी हात जोडुनी लाडक्या बाबा...
पाहिजे तेवढा मार एकदा दार उघड ना बाबा...

पायात ठोकली नाल सोलली साल पेटले डोळे
एकेक उसासा घेत आपले शेत रापले काळे
जाळले तरी गवतात कोवळी पात घेतसे जागा
एकदाच घे माघार लावले दार उघड ना बाबा...

स्वप्नात बघू भाकरी करु चाकरी धन्याच्या दारी
आपले शेत नांगरु कष्ट पांभरु मार ललकारी
सोड रे हट्ट तू सोड अबोला तोड नको हा त्रागा
एकदाच घे माघार लावले दार उघड ना बाबा...

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users