बाका प्रसंग

Submitted by संतोष वाटपाडे on 8 March, 2016 - 01:15

(एका फ़ेसबुकावर भेटलेल्या काव्यरसिकाच्या घरी गेलो होतो. त्याला माझ्या कविता ऐकायच्यात...असे कोणेकाळी म्हणाला होता तो....)
मी दाराची बेल अगदी आदरपुर्वक वाजवली...आदरपुर्वक म्हणजे जास्त जोरात न दाबता....जेणेकरुन आतला माणूस वैतागून शिव्या घालत दार उघडनार नाही...अर्थात बटन कितीही हळू दाबले तरी आत केकलणारी बेल त्याचा विचार न करता जोरात बोंबा ठोकणारच होती ....दार उघडले...कपाळावर सस्मित आठ्या....खांद्यावरचा पदर डोक्यावर गेला... स्त्रीपात्र होते दारात याचा अंदाज आलाच असेल सर्वाना......चेहर्‍याच्या हावभावांवरुन मी त्यांच्या घशातून वेगाने उसळून येणारा प्रश्न मी बाहेर येऊच दिला नाही....तोंडाचा बोळका उघडायच्या आत...."नमस्ते मॅम....मी संतोष वाटपाडे....सर आहेत?" त्या अजुनही दारातच आणि मी दाराबाहेर.....पिवळट मळके बनियान जुना रंगीबेरंगी टॉवेल कमरेला गुंडाळलेले एक अवजड धूड मला पाहून आतूनच ओरडले...आमचे आदरणीय हुसके सर...." ओहोहो....या या या संतोषजी...अहोभाग्यम....अरे अरे आत तर घे सरांना....आज काय भाग्य आमचे !! बसा सर....आलोच दोन मिनिटात कपडे घालून....हॅहॅहॅ...आज सुट्टी न त्यामुळे उशिर झाला जरा...."मी पायातले शूज काढून...फ़ाटलेला सॉक्स दिसणार नाही अशा पद्धतीने जाऊन भामट्यासारखा सोफ़्यावर बसलो...समोर टिपॉयवर मागच्या महिन्यातला टाईम्स ओफ़ इंडिया पडलेला होता त्यामुळे पेपर उचलून हातात घ्यायचा मोह मी टाळला...

किचनच्या चौकोनी भगदाडातून दोनतीन पोरंपोरी डोकावून गेले....रस्त्यात पडलेल्या दारुड्याला लोक जसे कुतुहलाने बघून जातात अगदी तसेच मख्ख चेहर्‍याने!....मी भांबावून केस नीट केले...शर्ट इन आहे की नाही पाहून घेतले... तेवढ्यात हुसकेसर स्वतःला लुंगीत गुंडाळून येताना दिसले...आल्या आल्या "हॅहॅहॅ...संतोषजी बाकी तुम्ही अगदी फ़ेसबुकातल्या प्रोफ़ाईल पिकात दिसता तसेच आहात बुवा.....हॅहॅहॅ.." मी मंदपणे हसलो....दुसर्‍या अनेक प्रकारचे हसू मलाही येते किंबहुना येत होते पण आज हुसकेसरांना कविता ऐकवायच्या होत्या त्यामुळे अगदी सुमडीत बसलो होतो..." एएए.....हे संतोषसर बरंका...मी नै का तुला बोल्लो होतो....खुप भारी कविता लिहितात.. ते हेच..!!....किचनच्या भगदाडातून मघाची मुंडी सस्मित बाहेर आली....बहुधा मला नमस्कार केला असावा त्यांनी...मीही लाजत नमस्ते केला....हातातल्या बिग बझारच्या प्लास्टिक थैलीतून शंभरपानी वही काढून हातात घेतली...तोवर हुसकेसरांनी डोक्यावरचे अंशतः उरलेले केस हाताच्या कंगव्याने विंचरुन सेट केले....

"हॅहॅहॅ...सर खरंच काय लिहिता राव तुम्ही...कमाल आहे तुमची!! कसे सुचत असेल राव तुम्हा लोकांना....हॅहॅहॅ ...आम्हाला तर एक ओळ नै सुचत राव"...
"ऐकवा न सर एखादी कविता तुमच्या आवाजात"...हुसके सर
मी उत्साहात हातातली उघडली....ज्या ज्या कविता ऐकवायच्या होत्या किंवा ऐकवण्यासारख्या होत्या ती पाने मुडपलेली होती आधीच....हुसकेसर सरसावून पुढे सरकले
मी‘ सुरवात केली " किन गु......" .........."ओ चहा घेऊन जा हा....." खेकसण्यासदृश आवाज भगदाडातून...सर तुरुतुरु धावून चहाचा ट्रे घेऊन आले...
एक कप मला देऊन त्यांनीही एक घेतला....
हां सर ऐकवा आता....एक मिनिट हं मी बिस्किट आणतो...कालंच बनवून आणलेत गव्हाचे.......हॅहॅहॅ
एका मोठ्या पसरट ताटात मोजून सहा बिस्किट...मी लाजत लाजत एक उचलले...माझ्या कपातला चहा संपला होता....पुन्हा खाली ठेवले गपचिप.....!
सरांनी सहाही बिस्किट तेवढ्या वेळात कशी गायब केली देव जाणो...तोंड पुसत म्हणाले...इकरार्र !!

"अहो सर इर्शाद म्हणायचंय का तुम्हाला..!!? "
"होय ओ संतोषजी...आपल्याला कुठं उर्दुबिर्दु येतं...असंच आपलं कैतरी....हॅहॅहॅ ! "
मी बोटाच्या त्रिशुळात वही घट्ट पकडून..मुशायर्‍यात देतो तशी पोज देऊन..कपाळावर आठ्याबिठ्या आणल्या....
"काओ सर तुम्ही मागच्या महिन्यात ती प्रेमावर कविता लिहिली ती भारी होती पण...काहीही म्हणा तुम्ही..!! जाम आवडली होती ब्वॉ आपल्याला...!! " इति हुसके महोदय
मी आवंढा गिळून...मुशायर्‍यातून धक्के मारुन बाहेर काढलेल्या गजलकारासारखा खोटं खोटं हसत म्हणालो.." कोणती सर...हॅ.. हॅ...हॅ ...!!!!"
"अओ ती नै का तू तू तू होतं प्रत्येक ओळीत...चुलीतून भाकर की काय...गुलाबी निखारा ..!! ऐकवा ना ती...चालबिल लावलीच असेल न तिलाही...??...!!"

मी वहीची पानं चाळून शोधली ती....अर्थातंच पान मुडपलेलं नव्हतं...."हां सापडली हुसके सर..ऐका !"
डोळे मिटून मी अलाप घेतला "दिवेलागणीला......" ढिंगाक ढिंगाक ढिंगाक ढांग ढिंगाक ढिंगाक मोबैल कोकलला... हुसके सरांचाच मोबैल तो!!..
अतिउल्हासात...माझ्याकडे "दोन मिनिट हं" असा हाताने इशारा करुन फ़ोनवर.." हालो... अरे हेम्या!.. तुझीच आठवण काढत होतो मनातल्या मनात...ऑं..ओळख बरं आपल्याकडे कोण आले असेल आज?......अरे तरी अंदाज लाव ना!....कवीराज आहेत एक उंचपुरे !...अरे ते नै का फ़ेसबुकावर भगवा शर्ट घातलेला फ़ोटो आहे बघ...कविता करतात ना !!!! ओळखले का आता !!!! हां तेच संतोष वाटपाडे आलेत...बसलेत माझ्यासमोर...बर्‍याच दिवसापासून त्यांची इच्छा होती मला कविता ऐकवण्याची...मग आज म्हटलं या...अशीही सुट्टी आहेच...बरं बरं हो हो चालेल...आठवणीने कर पण पुन्हा फ़ोन..." कट केला की झाला कै कळले नाही....मी कपाळावरचा वगैरे घाम पुसुन हुसकेसरांनी फ़ोनवर माझी काढलेली इज्जत विसरुन मनातल्या मनात ....हॅहॅहॅ केले.....व्हाटस एप आणि मेसेंजरवर आलेले सर्व मेसेज तेवढ्या वेळात पटकन पाहून, रिप्लाय करुन हुसकेसरांनी पुन्हा ’इकरार’ केला...

घामेजलेल्या त्रिशुळातून एव्हाना वही सुटु लागली होती तरी मी तिची नरडी पकडून सुरु झालो..." दिवेलागणीला चु..."
....पप्पाआआआआआआssssss अशी जोरदार आरोळी "काका काका मला वाचवा" या आविर्भावात ठोकत आतल्या खोलीतून बंड्या धावत आला..अशा ऐनवेळी पचका करणार्‍या सर्व मुलांची नावं बंड्या असावीत असा अंदाज करुन मी त्याला बंड्याच म्हटले ..त्यांच्यावर थोरल्या बंधुरायांनी बंधुसदृश युद्धात हल्ला केला असावा बहुतेक...(गोंडस) बंड्याला मांडीवर घेऊन हुसकेसर मोठ्याने केकाटले " हण्ण्या...फ़टके खायचे का लेका तुला........????"
हण्ण्या म्हणजे नक्कीच त्याचे नाव हणुमंत असेल एवढी कल्पना माझ्यासारख्या ’कवीला’ ताबडतोब येणारच ना!....लाडका (शेंबडा) हण्ण्या मागच्या दाराने पळतानाचा आवाज ऐकून बंड्याचे डोळे पुसत हुसकेसर लाडाने.. " अले अले हे बघ हे शल आपल्याला गाणं म्हणून दाकवतायेत..ऐक आता नको ललु"...पोलिसस्टेशनमधे पकडून आणलेल्या आरोप्यासारखा बंड्या माझ्याकडे बघत होता....सर मला म्हणाले "संतोषजी हौन जौ द्या एक गांण चिन्मयानंदसाठी...!!" मी इकडे तिकडे पाहू लागलो..चिन्मयानंद कुठे दिसतो का..."हॅहॅहॅ हा काय माझ्या मांडीवर बसलाय...याचं नाव आम्ही चिन्मयानंद ठेवलंय..."
देवा रे!! (मनातल्या मनात) वासुदेव कविता ऐकवू या उद्देशाने मी वहीचे शेवटून तिसरे पान काढले..घसा खाकरुन ग्लासातले उरलेले पाणी पिऊन मी माझ्यातला कधीही अस्तित्वात नसलेला किशोर कुमार जागा केला...ऐका हं.." पायात घुंगरु....."( बंड्या भनाट्ट्ट्ट्ट्ट किचनमधे...........) टाळ कपाळी (हुसके सर पंखा लावायला उठले) मोरपिसाचा तुरा...(सोबतच दारात पडलेला गृहशोभाचा अंक उचलून....पहिल्या पानावरची हिरवी नौवार नेसलेली एक्सवाय्झेड हिरोईन पाहण्यात गर्क)

मी वही कडाकडा आवाज करणार्‍या प्लास्टिकच्या पिशवीत सुखरुप कोंबली...."सर येऊ का मी...बराच उशिर झालाय"
"ओह ओह...सॉरी सॉरी माझे लक्षच नव्हते.....बसला असतात नं अजून....मज्जा आली बाकी आज.... तुमच्या आवाजात कविता ऐकायला मिळाल्या !!!!!" इति हुसकेसर
किचनच्या भगदाडातून हुसकेबै,हण्ण्या,बंड्या डोकावून निरोप देत असावेत बहुतेक.....मी शूज घालून लेस न बांधताच बाहेर पडलो....मुशायरा संपला होता....

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol Lol Lol

भन्नाट

'स्वतःची मुलगी आणि स्वतःचा हुनर आपण होऊन दुसर्‍याच्या दारात दाखवायला नेऊ नये' असं माझी आजी सांगायची.
Happy

हाहाहा.....अनुताई... गजल ऐकणार कि मुक्तछंद कि कविता????? घरुन येताना जेवूनच येईल मी ...उगाच हाल नको ऐनवेळी..