'बेहद्द नाममात्र घोडा' अर्थात 'कुबेरा ss स्पीकिंग ss'

Submitted by झंप्या दामले on 19 March, 2016 - 10:28

'बेहद्द नाममात्र घोडा' अर्थात 'कुबेरा ss स्पीकिंग ss !! :
-------------------------------------------------------------------------
Dilgiri_1.jpg

'बेहद्द नाममात्र घोडा' अश्या भीषण नावाची अरुण कोलटकरांची एक कविता आहे. शीर्षकाचा अर्थ समजणे दूरची गोष्ट पण, हे तीन शब्द कधी एकत्र येऊ शकतात अशी कल्पनाही मी पामर करू शकत नाही. त्यामुळे हा शब्दसमुच्चय पुन्हा कधी आयुष्यात येईल असे खरच वाटले नव्हते ... पण आज लोकसत्ता मध्ये कुबेरांचा माफी अल्पाक्षरी माफीनामा वाचला आणि याला काय म्हणावे याचा विचार करत असताना अचानक हा 'बेहद्द'च अचानक डोळ्यासमोर आला...
खरेतर माफीनामा वाचून डोक्यात बराच कल्लोळ चालू आहे. उण्यापुऱ्या २५ शब्दांच्या मागे अनेक ठळक घडामोडी आणि सूक्ष्म अर्थच्छटा आहेत. आणि ते सगळे एकत्र डोक्यात पिंगा घालत असल्यामुळे सारे काही योग्य त्या क्रमाने शांतपणे इ-कागदावर उतरवणे थोडे आव्हानात्मक वाटते आहे.... प्रयत्न करतो.

राजू परुळेकरला अनेक वर्षे माझ्या ध्यानात येणारही नाही एवढ्या बारकाईने टिपत गेलो आणि शेवटी त्याचा (दुरून दिसणारा का होईना) आलेख मी लेखातून मांडला. गिरीश कुबेरांना मी राजू इतके दीर्घकाळ आणि तपशीलवार टिपले नसले तरी या माफीच्या निमित्ताने विचार करता त्यांच्या लोकसत्ताचे संपादक झाल्यापासून इतक्या गोष्टी आठवत आहेत की माझे मलाच आश्चर्य वाटते आहे.

जशी देशाला 'गांधीपरिवार-मुक्त' कॉंग्रेसची गरज आहे तशी 'गांधीभक्ती-मुक्त' संपादकाची 'लोकसत्ता'ला गरज होती, कुमार केतकरच्या तावडीतून सुटका होऊन लोकसत्ता कुबेरांच्या हाती पडला तो एक सुदिनच होता. कुबेरांबद्द्ल पत्रकार म्हणून फारशी माहिती नव्हती. पण अर्थकारण कळणारा आणि आखाती देशातले तेलकारण उमजून असणारा लेखक म्हणून त्यांची 'एका तेलियाने' वगैरे पुस्तकामुळे ओळख झाली होती. समाजाला डोस देणाऱ्या आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक गोष्टीचा व्यासंग असल्याचा समाज असणाऱ्या अनेक संपादकांची अर्थसाक्षरता ही तोळामासाच असते. त्या तुलनेत अर्थज्ञानी संपादक म्हणून कुबेर वाचायला मिळणे ही एक चांगली गोष्ट होती.

सुरुवातीच्या काळातच (२०११च्या सुमारास) बंगाल निवडणुकीत कम्युनिस्टांवरच्या ममता बानर्जीच्या ऐतिहासिक विजयानंतरच्या 'दांभिक गेले, कर्कश आले' सारख्या अग्रलेखातून केलेले अचूक विश्लेषण फारच प्रभावी वाटले होते. डाव्यांच्या ढोंगीपणावर बोट ठेवताना ममताच्या आक्रस्ताळ्या नेतृत्वशैलीतल्या उणीवासुद्धा बरोबर दाखवून दिल्या होत्या. अर्थकारणातल्या खाचाखोचांचे सखोल ज्ञान असल्यामुळे भावनिक/धार्मिक मुद्द्याला अर्थशास्त्रीय आणि भू-राजकीय angle कसा असतो याचा परिपाठच त्यांचे काही अग्रलेख देतात. त्यांच्यातली मुख्य आवडणारी गोष्ट म्हणजे सगळ्यांना सारखेच ठोकणे. डावे, उजवे, अधले-मधले यांच्यावर यांच्यावर ते सारखेच तुटून पडतात. कॉग्रेस, नेहरू-गांधी यांच्या प्रेमात शिगोशिग बुडालेल्या कुमार केतकर यांच्या अग्रलेखामुळे पिवळ्या पडलेल्या लोकसत्तेच्या संपादकीयांना तुकतुकी आल्यासारखी वाटली. मुख्य म्हणजे मला भावनिकदृष्ट्या न पटणाऱ्या कुबेरांच्या मुद्द्यांनादेखील व्यावहारिकतेची किनार जाणवायची/जाणवते. त्यामुळेच त्यांचे काही अग्रलेख पटले नाहीत तरी अग्रलेख वाचणे मी थांबवले नाही.

त्यांचे धाडसी लिखाण अनेक ठिकाणी कौतुक करावे असे असते. पं.नेहरू यांच्याकाळापासून काहीशा डाव्या असणाऱ्या अर्थनीती ऐवजी उजवी अर्थनीती असणे यात गैर काहीच नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. भांडवलशाहीचे न लाजता त्यांनी समर्थन केलेच शिवाय पूर्वापार असणाऱ्या 'गरिबी म्हणजे सज्जनता आणि श्रीमंती म्हणजे पाप' अशा भाबड्या समजुतीने नुकसानच कसे केले आणि पैसे कमावण्यात गैर काहीच नाही हा त्यांचा अनेकदा सूर असतो. उगीच ढोंगीपणाने समाजवादी, पुरोगामी वगैरे विचार अग्रलेखातून बिम्बवणाऱ्या आणि प्रत्यक्षात वृत्तपत्राच्या मालकशेठच्या ताटाखालचे मांजर असणाऱ्या इतर काही संपादकांपेक्षा अशी वेगळी भूमिका ही नजरेत भरण्याजोगी होती.... त्यांच्या लिखाणाचे समर्थन करत मी फेसबुकवरच्या दोस्त लोकांशी वादसुद्धा घातले आहेत ...
पण अनेकदा अशा संपादकांना कुठे थांबावे हे कळत नाही. संपादकाचा 'संपादकराव' होतो. जनमताच्या विरुद्ध विचार व्यक्त करण्याची झिंग, स्वतःच्या लेखणीच्या प्रेमात बुडून जाणे आणि तथाकथित निर्भिडतेची पट्टी सतत कपाळावर बांधून फिरायचा सोस यामुळे अनेकांचे होते तेच यांचे व्हायला लागले. परखडतेत तुसडेपणा येऊ लागला. एखाद्याला शेलक्या शब्दात किरकोळीत काढणे, किंवा उठसूट सगळ्यांना फाट्यावर मारणे असला वास त्या अग्रलेखांना येऊ लागला. एकंदरीत सगळा समाज कायम उत्सवी मानसिकतेत किंवा उन्मादात असताना अनेकदा त्याला त्यामागचे संभाव्य धोके सांगून वेळीच कान टोचणे आणि जमिनीवर आणणे हे जबाबदार संपादकाचे कर्तव्य नक्कीच असते. पण कुबेरांच्या लिखाणाचे कान टोचण्यापेक्षा टोचून टोचून लिहिणे हेच व्यवच्छेदक लक्षण बनत चालले आहे. त्यांच्या लिखाणात दोन कौतुकाचे शब्दही दिसेनासे झालेत. छिद्रान्वेषी वृत्ती वाढली आहे. काहीतरी निमित्त काढून सतत राजकारणी, समाजकारणी, साहित्यिक यांना हिणवत राहायचे, कसलीही तर्कटे लढवून आपल्या मुद्द्यांना समर्थन देत राहायचे. अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून हा तुच्छतापूर्ण स्वर प्रकर्षाने जाणवायला लागला. आंदोलन घडत असताना एक भारावलेपण होते. तो एक बुडबुडा होता आणि तो यथावकाश फुटलाही... त्या दृष्टीने त्यांचे त्यावेळचे लेख पुढच्या धोक्याचा इशारा देणारे होतेही त्याचवेळी अग्रलेखात कधीही एवढे लोक आंदोलनाला पाठिंबा का देत आहेत, त्यामागची मानसिकता काय असेल याचे विश्लेषण दिसले नाही. ते दोन चार महिने फक्त आणि फक्त नेत्यांपासून, आंदोलकापर्यंत आणि VIP पासून ते सामान्य माणसाला हिणवण्यात गेले.

पुढेपुढेही यातल्या बऱ्याच गोष्टी लिखाणात डोकावत राहिल्या. वारू चौखूर उधळले. अश्वमेधाचा बेहद्द अश्वच जणू.... याकुब मेमनच्या फाशीच्या अग्रलेखाने लोकसत्तेच्या नाही तर बहुतेक पत्रकारीतेच्याच इतिहासातली सर्वात खालची पातळी गाठली असावी. जी न्यायव्यवस्था न्यायाधीशाच्या समोर पलायन करून पुन्हा पकडल्या गेलेल्या गुन्हेगारालासुद्धा सुनावणीत 'तो आपल्या डाव्या हाताच्या बेडीत होता की उजव्या हाताच्या हे पोलीस नक्की सिद्ध करू न शकल्या'ने 'बेनिफिट ऑफ डाउट'वर सोडून देण्याइतकी दयाळू आहे, त्या न्यायववस्थेने (दहा-दहा वेळा अपिलाची संधी मिळाल्यानंतर) सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला किरकोळीत काढण्यापर्यंत कुबेरांची मजल गेली. याकुबच्या शिक्षेने झालेल्या जी एक समाधानाची लाट दिसली तीत कुबेरांना 'एक शोकांत उन्माद' दिसला... तो माफीचा साक्षीदार होता अशा आशयाची धादांत खोटी माहिती द्यायचीही लाज वाटली नाही याकुबच्या बापाने व्यथित होऊन पाकिस्तानात सर्वांदेखत याकुबला कानाखाली मारल्याचे तपशीलवार माहित असणाऱ्या कुबेरांना वीस वर्षे खटला चालू असताना त्याच्या मदतीला जायची बुद्धी का झाली नाही ? त्या क्षणी कुबेर मला देशद्रोही वगैरे वाटले नाहीत पण 'जनभावनेच्या आहारी जाणे धोक्याचे असून त्यामुळे बुद्धीवरतीची काजळी धरते' या लाडक्या सिद्धांताच्या पूर्णपणे आहारी जाऊन, मुद्दामुनच जनभावानेच्या विरुद्ध लिहिण्याची कंड शमवू पाहणारा cynic माणूस वाटला...

तेव्हापासून हा माणूस मनातून प्रचंड उतरला. पुढे पुढे लिखाणात काही संतापजनक विधाने आढळली की आधीचे काही प्रमाद आठवू लागले. 'बळीराजाची बोगस बोंब' हा जवळपास सर्व शेतकऱ्यांनी धिक्कारलेला आणि कित्येक ठिकाणी जाहीरपणे जाळला गेलेला अग्रलेख. 'हस्तिदंती मनोऱ्यातली पत्रकारिता' म्हणून त्यावर जळजळीत टीका झाली होती. (दुर्दैवाने तो वाचायचा राहून गेला, त्यामुळे भाष्य करू शकत नाही पण या ठिकाणी त्या अग्रलेखाची आठवण येतेच). मग अचानक आठवला एक अगदी वेगळा संदर्भ. तीनचार वर्षापूर्वी ब्लॉगविश्वावर नजर टाकणारे एक सदर लोकसत्तातून यायचे. ते कोणीतरी लेखक 'अभिनवगुप्त' या टोपणनावाने लिहायचा. त्यातही बऱ्याचदा वेगवेगळ्या ब्लॉगवर टीका असायची. हेरंब ओक नावाच्या ब्लॉगरच्या ब्लॉगचे ('काय वाटेल ते' या नावाचा तो ब्लॉग होता बहुधा) अभिनवगुप्तने वाभाडे काढले होते... त्यातही हेरंब ओकचा ब्लॉग अतिशय लोकप्रिय का आहे याचे कुठलेही विश्लेषण करण्याची इच्छा नव्हती - जणूकाही खूपजण वाचतात म्हणजे मग ती लोकभावना तुसडेपणाने झटकून टाकण्यातच आपली 'निर्भीडता' सिद्ध होते अशी अभिनवगुप्ताला खात्री असावी. लोक जर त्यावरून हेरंब आणि अभिनवगुप्त यांच्यात बरेच इमेल युद्ध रंगले होते. हेरंब हे छातीठोकपणे म्हणत होता की अभिनवगुप्त म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून गिरीश कुबेरच होते. पण हेरंबच्या इ-पत्रांना कधीही समाधानकारक उत्तर दिले नव्हते/देता आले नव्हते (ही माहिती मला हेरंबचा ब्लॉग चाळतानाच मिळाली...मी इथे फक्त मधले काही बिंदू जोडायचा प्रयत्न केलाय). माझा फेबुमित्र अमेय म्हणतो त्याप्रमाणे २ + २ चे उत्तर हे 'पाच ' असे देणार... का ? कारण 'लोक' त्याचे उत्तर 'चार' असे देतात !!

एवढे असूनही त्यांचे अग्रलेख मी अजूनही का वाचतो वाचतो याचे निश्चित उत्तर मलाच देता येणार नाही. कदाचित त्यातल्या cynicism मधून अधून मधून डोकावणारे जागलेपण मला महत्वाचे वाटत असावे. अशातच मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यात मराठी भाषा दिन आणि एकूणच दिनाच्या निमित्ताने एक अग्रलेख आला आणि माझे डोकेच गेले. 'कुणीतरी रिकामटेकडा संगीतकार कलात्मक झटापट आणि माल विक्री कौशल्याची खटपट करत अभिमान गीत गात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो ...' असे निर्भिडतेचे खजिनदार असलेल्या कुबेराने कौशल इनामदारचे नाव न घेता लिहिले...!!! त्यांना ते गीत आवडले नाही असे म्हणायचा पूर्ण अधिकार आहे पण त्यांनी कौशलच्या मेहनतीला असे किरकोळीत काढणे हा घृणास्पद प्रकार आहे. इतका तुसडेपणा येतो कुठून ? आपण स्वयंभू असल्याची भावना पत्रकारात/संपादकात घटत रुजणे अटळ असते का ? याच्या प्रकाशित साहित्याला रिकामटेकड्या तेलवाल्याची पुस्तक विकायची खटपट म्हणायचे का ? अक्षरशः जाहीरपणे मुतण्याच्या लायकीचे आहे हे अग्रलेखातले वाक्य ... घोडा बेलगाम उधळल्याचेच लक्षण हे !! या प्रकाराने पुन्हा माझ्या दुष्टबुद्धीला विस्मृतीत गेलेला संदर्भ आठवला : एका अग्रलेखात महोदयांनी कुठल्याश्या संदर्भात लिहिताना काहीही कारण नसताना प्रवीण दवणेंच्या काव्यप्रतिभेविषयी अतिशय हिणकस भाष्य केले होते (आणि स्वतः मात्र वर दिलेली हे खटपट-झटपट असली यमके किंवा 'सडक्यातले किडके', 'हटाववादी हुच्चपणा', 'हकनाक हनमंताप्पा' असले पोरकट अनुप्रास वापरून अग्रेलखांची शीर्षके आणि मजकूर चटपटीत करणार !!!)....

अशात १६ मार्च आला... 'असंतांचे संत' हा प्रामुख्याने मदर तेरेसावर आणि सोबतच इतरही धार्मिक गुरूंवर घणाघात करणारा अग्रलेख ! वास्तविक मदर तेरेसाच्या ढोंगी समाजसेवेमागच्या धर्मांतराच्या प्रेरणा नि:संदिग्धपणे मांडणारा अग्रलेख... ज्या धाडसीपणा बद्दल कौतुक वाटायचे ती हिम्मत या लिखाणामागे नक्कीच आहे.... पण अरेच्या !!! काल १८ मार्चला मी हे काय बघितले !! महाराष्ट्राने काय बघितले ! जगाने काय बघितले !!! वाघाने 'म्याव' केले ? हिमालय मेवाड्मिक्स आईसक्रीम बनला ? वडवानल विडी पेटवायला वापरला ?? निडरतेचे दुसरे नाव असणारा संपादक आज दुसऱ्याला नावे ठेवण्याऐवजी 'लोकभावने'ने हळहळला ?

लक्षात घ्या, एरवी कोणताही पुचाटपंपू संपादक अग्रलेखात 'आम्ही सरकारचा निषेध करतो'वगैरे भाषा वापरतो आणि कधीतरी बातमीत नावे व फोटो छापण्यात चुका झाल्या तर संपादक 'आम्ही दिलगीर आहोत -संपादक' असे संपूर्ण वृत्तपत्राच्या वतीने माफीपत्र छापतो. पण कुबेरांच्या माफीनाम्यात्ला मजकूर ''मी' दिलगीर आहे' असा आहे. आवेशाच्या शिडाला भगदाड पडले आहे. हा 'बेहद्द घोडा' आज मालकानेच घोडा लावल्यामुळे 'नाममात्र' ठरला आहे आता यावर 'निर्भीडतेची नाहीशी नांगी' असा एक आवेशपूर्ण अग्रलेख लिहायला कुबेर आपले शब्दांचे धन वापरतील का ?

आता कुबेरांच्या धगधगत्या अंगाराचे कासवछाप अगरबत्तीत रुपांतर झाल्याची हळहळ-कम-आनंद बाजूला ठेवायचा तर जास्त गंभीर चित्र दिसते. इतके दिवस त्यांनी बहुसंख्यांकांच्या श्रद्धास्थानांच्या कासोट्याला यथेच्छ - काहीवेळा तो गरजेचाही होता - हात घातला. न्यायव्यवस्थेपासून ते संगीतकारांपर्यंत सगळ्यांची वस्त्रे फेडली, त्याबद्दल अर्थातच त्यांना निषेधाचे खलिते, शिव्याशाप वगैरे पोचले असणार .... पण ती 'जनभावना' असल्याने त्यांची कदर करायची महाशयांना गरज वाटली नसणार... असे असताना, जगद्वंद्य मदरच्या भक्तांच्या बापुड्या भावनांबद्दल अचानक एका दिवसात कुबेरांना गहिवर कसा आला ? त्या भक्तांची ताकद आणि ओळख कुठपर्यंत जात असेल ? पाशात्य चर्चेस आपल्या इथल्या अनेक मिडिया houses ना भरपूर फंडिंग करतात असे ऐकले होते तीच का ही 'प्रभू'भक्तीची ताकद ? गेल्या काही काळात इंडिअन एक्स्प्रेसची भूमिका अतिशय उद्विग्न करणारी झाली आहे (याकुबच्या फाशीच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यात मोठ्या font मध्ये 'And they hanged Yakub' अशी संतापाचा स्फोट करवणारी हेडलाईन होती - जणूकाही जंगलराज असणाऱ्या रानटी व्यवस्थेने कट करून त्याला भर चौकात टांगले असा आभास निर्माण करणारी ...) 'लोकसत्ता' हे जवळपास स्वायत्त म्हणावे असे प्रकाशन वाटत असले तरी ते एक्स्प्रेस ग्रुपचाच भाग आहे. त्यामुळे कशावरून कुबेरांवर आलेला दबाव या एक्स्प्रेसच्या सगळ्या पार्श्वभूमीतून आलेला नसेल ? आता हा अग्रलेखच मागे घेतला आहे (वेबसाईटवरून हटवण्यात आला आहे.) आता यापुढे त्यांची credibility काय राहील ? कुबेर कोणाचीही अक्कल काढायला गेले किंवा कुणालाही अग्रलेखातून धारधारपणे सुनावले तरी ते किती फुसके असेल ! "ओ ss ... पावर नाही पंचनामा करायची तर फालतू चौकशा कशाला करता" असे कोणीही मलुष्टे त्यांना जाता येता सुनावू शकतो ..

या ठिकाणी प्रकर्षाने आठवण होतीये ती अघळपघळ या पुस्तकातल्या 'प्रा. विश्व. अश्व. शब्दे' या अतीव धमाल लेखाची. दुर्बोध पांडित्य आणि पोकळ विद्वत्तेला अफलातून टपल्या मारणारा हा लेक. गाढ व्यासंगाचा आव आणणारे समीक्षक-कम-प्राध्यापक 'विश्वनाथ अश्वत्थामा शब्दे' या स्युडो-सूर्याची आणि त्यांच्या आजूबाजूला लाळ घोटणाऱ्या विद्वानांची अर्थात स्युडो-ग्रहमंडळाची ही गोष्ट. सार्त्र, काफ्का, कामू वगैरे नावे तोंडी लावत
जडजंबाल चर्चा करणारे आणि या अभिजनांसमोर पांडित्य ताणणारे प्रा. शब्दे सर्वात शेवटी लीन दीन याचक होऊन टेबलावर तंगड्या ठेवून बसलेल्या प्रकाशकापुढे जाऊन त्याच्या तळपायावरची कुरुपे निरखत उभे राहतात !!!! शेवटी माणूस गुलाम पैशाचा ....

Vayumandal.JPGSampadak_1.jpg

जाऊ दे... माझ्या मना बन दगड ! ज्यांच्या ज्यांच्या पायाची धूळ मस्तकाला लावायची आस होती त्यांचे त्यांचे मातीचे पाय दिसून यायचा काळ आलाय.... कुबेरांसारख्या अर्ध्यामुर्ध्याच्या नि:स्पृह्तेची काय कथा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म्म.... चांगले लिहिलेय, फक्त परत एकदा हात फिरवून काही चुका असतील त्या पहाव्यात हि विनंती.

शेवटच्या परिच्छेदाशी सहमत, दुर्दैव आपले, अजून काय!!!

चागंला लेख..फक्त अभिनवगुप्त म्हणजे अभीजीत ताम्हणे होता बहुदा..हे हेरंब ओक ह्यांना कुणीतरी त्यांच्या ब्लॉग मधे कमेंट मधे सांगीतल्याचे आठवतय...

माझ्या मना बन दगड ! ज्यांच्या ज्यांच्या पायाची धूळ मस्तकाला लावायची आस होती त्यांचे त्यांचे मातीचे पाय दिसून यायचा काळ आलाय.... कुबेरांसारख्या अर्ध्यामुर्ध्याच्या नि:स्पृह्तेची काय कथा !
>>

हे मात्र प्रचंड आवडल्या गेलेय.

वा वा २ २ धागे एकदम अगदी ठरवून
असो अग्रलेख वाचला नाही पण मागे नाही घ्यायला पाहीजे

पण तिकडे बिचार्या शक्तिमान नामक घोड्याचा भाजपाच्या आंदोलनात पाय तोडला त्यावर चकार शब्द कुठे दिसला नाही.

बाकी बाशिंग चालू द्या

Dp

हिमालय मेवाड्मिक्स आईसक्रीम बनला ? वडवानल विडी पेटवायला वापरला ?? निडरतेचे दुसरे नाव असणारा संपादक आज दुसऱ्याला नावे ठेवण्याऐवजी 'लोकभावने'ने हळहळला ? >>

ग्रेट. Lol

दामले, तुमचा हा लेख बेहद आवडला. कौशल इनामदार प्रकरण गरज नसतानाचे होते. खरे तर कुबेरांना आल्टर इगोचा प्रॉब्लेम झाला आहे.

खरे कारण अगदीच वेगळे असावे. अग्रलेख बारकाईने वाचल्यास लक्ष्यात येईल. >> सिरियसली, मग ते बापू काय ह्यांना ठार मारणार काय? आणि म्हणून त्यांनी अग्रलेख मागे घेतला? की तांब्यांना पवारांची देखील साथ आहे म्हणून कुबेर घाबरले. ? मग संपादक होण्यापेक्षा उगा आपले मायबोलीवर शब्द का नाही बडवायचे?

त्या बापूंचा विरोध मी ही केला. म्हणजे मी ही पोस्ट मागे घ्यावी काय?

केदार,
विरोध आणि (चुकून झालेला आणि हिडन का असेना,)आरोप यात फरक आहे ना? शिवाय मायबोलीवरचे प्रतिसाद आणि लोकसत्ताचे संपादकीय यांच्या जबाबदारीत आणि वाचकसंख्येत फरक आहे ना?
त्या वाक्यातून चुकून का होईना, जो अर्थ ध्वनित झाला आहे, तो कायदेशीर कारवाईस पात्र आहे.

संपादकाच्या प्रवासाबद्दल एकदम thought provoking लिहीले आहे. मी कुबेरांचे अग्रलेख जमेल तेव्हा वाचतोच. वरती उल्लेख केल्याप्रमाणे सुरूवातीला त्यांचे लेखन अनेक पक्ष, अनेक विचार यांच्यावर टीका करणारे असे. सुरूवातीला एक भाबडा अमेरिकाविरोध जाणवत असे, पण नंतर तो दिस्ला नाही फारसा. अर्थात अगदी रोजचे लेख वाचलेले नसल्याने कल्पना नाही. पण मी जे लेख वाचले आहेत त्यावरून हा वरचा आलेख समजावून घेता येउ शकतो.

स्पेसिफिकली या लेखाबद्दल - लोकसत्तेने "वाचकांच्या भावना दुखावल्याने" हे कारण लिहून स्वतःलाच एक मोठा अडसर निर्माण करून ठेवला आहे - यापुढे कोणावरही टीका करताना तो अडसर मधे येइल. "काही कायदेशीर अडचणींमुळे" किंवा "तांत्रिक अडचणींमुळे" वगैरे दिले असते तर पुढे कधी स्पष्टीकरण देताना एक 'वे आउट' असला असता. आता वाचकांच्या भावना या कॅटेगरीतून भारतात बहुसंख्य विषय सुटत नाहीत, त्यामुळे टीका जस्टिफाय कशी करणार याबद्दल कुतूहल आहे.

बाय द वे तो बळीराजा चा उल्लेख असलेला लेख वेब वर सहज सापडेल.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/state-government-under-debt-shou...

हीरा,

देअर यु आर. थोडक्यात काय एका ओळीत चूक झाली तर ती लगेच दुसर्‍यादिवशी ती स्पेसिफिक ओळ "अशी नसून अशी आहे" असे वृत्तपत्र देत असतात. कुबेरांनाही तेच करायचे. त्यासाठी अग्रलेख मागे का घेतोय असे का म्हणायचे. म्हणून लिहिले दुसरे काही तरी कारण आहे आणि ती ओळ नाही.

लेख आवडला, अर्थात काढलेले सगळेच नि:ष्कर्ष वा संदर्भ जोडणे पटलेच असे नाही. तरीही काही उपमा/पंच अतीशय मस्त. Happy
माधव गडकरींनंतरच्या संपादकांचे लेख वाचणे जवळपास सोडुन दिले होते, हल्ली तर अग्रलेखाची जागा इग्नोर करुन बाकी पेपर बघत असतो. किंबहुना, कोणत्याच वृत्तपत्राच्या संपादकीयात "आवर्जुन" वाचावे असे हल्ली काही नसते असा आपला माझा ग्रह.
तो अग्रलेख "आख्खाच्या आख्खा " मागे घेण्याचे कारण काय?
आख्खा अग्रलेख मदर तेरेसांच्या संत पदवी बाबत लिहून सुरवातीस व शेवटी तोंडि लावण्यापुरते हिंदु ढोंगी संतांचा उल्लेख करणे हे सद्याच्या "सर्वधर्मसमभावी" इनथीमला तसेच सगळ्यांनाच "सारखा न्याय लावतो" या दिखाव्याला वा अस्सल भुमिकेला धरुनच नव्हते काय?
गेली कित्येक वर्षे मी वर्तमानपत्रे वाचतो, टाईम्स गृप कायमच सत्ताधार्‍यांच्या पाठीशी असतो, व एक्स्प्रेस गृप कायम विरोधात अशी ढोबळ मांडणी पूर्वी होती. टाईम्स गृप आजही आहे तसाच आहे, एक्स्प्रेस गृप मात्र गेल्या विस पेक्षा जास्स्त वर्षात स्वतःची भुमिका कोणती याबाबत गोंधळात आहे असे वाटते. कित्येकदा असेही वाटते की टाईम्स गृप उजवा आहे तर एक्स्प्रेस ग्रुप डावा, अन गेल्या काहीवर्षातील एक्स्प्रेस ग्रुपमधिल "भरती' मुळे तो अधिकाधिक "डावा" बनत चालला आहे. अन त्यामुळेच सध्याचे संपादक उजवे नाहीत हे नक्की पण प्राप्त परिस्थितीपुढे/मुळे किती डावे झालेत इतकाय काय तो प्रश्न माझे मनात होता.
इतकेच काय, तर मी तर असेही मत / उपपत्ती मांडू इच्छितो की वृत्तपत्रीय सृष्टिमधे बोकाळलेल्या/भरमसाठरित्या वाढलेल्या एकांगी "डाव्या" विचारांमुळे, खरे तर "लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ " ही वृत्तपत्रांची भुमिकाच संशयास्पद वाटू लागलेली आहे, कारण "डावे विचार" अन "लोकशाही" यांचे विळाभोपळ्याचे सख्य/नाते सर्वश्रुत आहेच. असो.
अग्रलेख मागे घ्यायला लागणे ही नामुष्कीची वा "कसल्यातरी मजबुरी"चीच गोष्ट आहे.
पण ती घटना "इष्टापत्ती" मानुन, लगेच त्या घटनेचा रोखही "हिंदू साधूंकडे" वळवित बुद्धिभेद करण्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा हल्ली तितकीशी अचंबित करीत नाही. Happy
असे म्हणतात की मेसोपोटॅमिया की कुठल्याश्या राणीचे नाक वाकडे होते म्हणून जगातील पुढील अनेक गोष्टी घडल्या...
उद्या खरोखरच हिमालय देखिल मेवाड आईस्क्रिम/कुल्फी बनला, तर ते बनण्यामागेही "हिंदू साधूसंतच" आहेत असा नि:ष्कर्ष काढायला डाव्यांचे पुजारि मागे पहाणार नाहीत.
कुबेरांचा लेख, व तो मागे घेणे ही एक किरकोळ घटना आहे. पण त्यामागची कारणे मात्र "अतिविशाल" आहेत. असो. Happy
आपला काय संबंध वृत्तपत्रांशी? महिन्याच्या शेवटी कडकी आली की घरातील इतःस्ततः पसरलेली रद्दी गोळा करुन वाण्याच्या दुकानात नेऊन घालणे, अन महिनाअखेरीची तुट, तो खळगा कसा तरी भरु पहायचा, इतकीच आमची लायकी. सबब आमच्यासारख्यांनी या घटनेवर बोलायला जाऊच नये... नै का? Happy

लेख आवडला.

खरे कारण अगदीच वेगळे असावे. अग्रलेख बारकाईने वाचल्यास लक्ष्यात येईल.>>>>
हीरा, कायदेशीर कारवाईची भिती साठी तर वृत्तपत्रे वकिलांची फौज बाळगून असतात. त्यातही समोरच्या पार्टीने कायदेशीर कारवाईची कसलीही नोटिस अद्याप पाठवल्याचे जाहीर केलेले नाही. अशावेळी दिलगीरीच्या दोन तीन ओळी छापता आल्या असत्या तरी काम झाले अस्ते. अख्खा अग्रलेख मागे घेण्यामागे नक्की काय कारण आहे?

अख्खा अग्रलेख मागे घेण्यात आलेला आहे. केवळ त्या दोन तीन ओळी नव्हेत.

रच्याकने एक्स्प्रेस ग्रुपची टॅगलाईन जर्नालिझम ऑफ करेज आहे. या घटनेनंतर काय असेल बर

जर्नॅलिझम ऑफ शिळोप्याच्या गप्पा!!!

हा आताचा सोडला, तर त्यांचे बाकीचे अग्रलेख मी वाचले होते. शेतकर्‍यांवरचा लेख अत्यंत अक्कलहुशारीने लिहिला होता तरीही तो निंदनीय होताच.. नेमका कसला गर्व झाला होता कुबेरांना ?

आणि असा अग्रलेख मागे घेण्याचे पुर्वी कधी ऐकले नव्हते. एकदा प्रसिद्ध झालेले लिखाण ( वृत्तपत्रीय ) मागे घेता येते का ? हा माफीनामा केवळ त्यांचा कि वृत्तपत्र समुहाचा ?

कुबेर कोणाचीही अक्कल काढायला गेले किंवा कुणालाही अग्रलेखातून धारधारपणे सुनावले तरी ते किती फुसके असेल ! "ओ ss ... पावर नाही पंचनामा करायची तर फालतू चौकशा कशाला करता" असे कोणीही मलुष्टे त्यांना जाता येता सुनावू शकतो ..

सही! तुमचा आयडी सार्थ केलात. Happy

लेखातली बरीचशी मतं पटली. अग्रलेख वाचला नसताना सुद्धा ही बातमी ऐकल्यावर हे कधीतरी होणारच होतं (This was coming / long due) अशी पहिली प्रतिक्रिया होती.
पत्रकारितेत असणाऱ्या लेखन स्वातंत्र्याचा अर्थ विना पुरावा एखाद्याची बदनामी करणे असा होत नाही. काही दिवसांपूर्वी असेच कौशल इनामदार यांच्यावर न घेता ताशेरे ओढले होते. पाश्चात्य वृत्तपत्रात असे मजकूर लिहिले असते तर एव्हाना हजारो बदनामीचे खटले भरले गेले असते कुबेरांवर! (हेमावैम)

याकुबच्या शिक्षेने झालेल्या जी एक समाधानाची लाट दिसली तीत कुबेरांना 'एक शोकांत उन्माद' दिसला... तो माफीचा साक्षीदार होता अशा आशयाची धादांत खोटी माहिती द्यायचीही लाज वाटली नाही >>> कुबेर पहिले होते का ? रेडीफचा लेख कुबेरांनी लिहीला होता का ? टीव्ही पॅनेलिस्ट्समधे तर माजी न्यायमूर्ती पण हेच म्हणत होते. त्या वाहिन्यांबद्दल काय म्हणाल ?

जनमत नेहमी बरोबर असतं आणि त्याबद्दल लिहीणारे सिनिक असतात हा विचार धक्कादायक आहे.

अशा आणखी काही मतांबद्दल असहमती आहे. पण तुमची मतं मांडण्य़ाचा अधिकार मान्य आहे. एकाच लेखाकडे वेगवेगळ्या दृष्टीकोणातून बघून निष्कर्ष एकच निघतो हे गंमतीशीर वाटतं

बापरे! मदर तेरेसा हे प्रकरण असले होते. मला हे जराही माहीत नव्हते. किंवा आजवर तशी टिका कधीही वाचली नव्हती. जर हे खरे असेल तर, आणि तरच, लोकसत्ता कुबेरांचे व मायबोली धागाकर्त्याचे धन्यवाद जे माझ्या अज्ञानात भर टाकली.

विजय मल्ल्याने लोकशाहीच्या चौथ्या खांबाला उद्देशून धमकी दिली कि माझ्याविरुद्ध काही लिहाल तर तुमची लफडी बाहेर काढीन, माझ्याकडे पुरावे आहेत. यावर लोकशाहीवरचा हल्ला, माध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी असं कुणीच का म्हटलं नाही ?

निखील वागळेंच्या भाषणाचा हा व्हिडीओ अत्यंत बोलका आहे.
https://www.facebook.com/dinesh.chavan.98837/videos/1247565941939622/

एक गोष्ट राहून गेली.
गिरीश कुबेर असोत किंवा कुणीही त्यांची माझी मतं भिन्न असतील. त्यांनी त्यांची मतं मांडू नयेत ही अपेक्षा आपण करू नये. पण जी मतं कुणीही मांडतो ती सत्याचा अपलाप करणारी नसावीत ही अपेक्षा माध्यमांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावरचा घाला होईल का ?
झी न्यूजने जे केलं त्याबद्दल आक्षेप घेणं किंवा शिरीष कणेकरांनी माहीत असताना गप्प राहणं या प्रकाराचं समर्थन कसं करावं ? आज कणेकर म्हणतात कि महाराष्ट्रातील ख्यातनाम विनोदी मराठी साहीत्यिक इंडीयन एक्सप्रेसच्या कार्यालयात आले होते तेव्हां त्य़ांनी सांगितलेल्या किश्श्याचा आधारे मला न्यूज बनवायला संपादकांनी सांगितली. पुढे असं काहीही झालेलं नाही हे सर्वांच्याच ध्यानात आलं. पोलिसांनी आवाहनं करूनही कुणीही तक्रार द्यायला आलं नाही. त्या विवक्षित स्थानाच्या आजूबाजूला चौकशी केल्यावर अशी घटना घडली नाही या निष्कर्षाला पोलीस आल्यानंतर अफवा पसरवण्याचा गुन्हा का नोंदवू नये असं पोलिसांनी विचारलं होतं.

इंडीयन एक्सप्रेसने विश्वास ठेवून ही बातमी छापणे कसं काय मान्य करायचं ? असे कुणी लेखक (नाव घेतलेलं नाही कणेकरांनी) आले होते हा किस्सा तरी खरा मानायचा का ? जवखेडा हत्याकांडाच्या वेळी सत्यशोधन समितीमधे नक्षलवादी आहेत असं कुबेरांनी ठोकून दिलं. त्यामुळे शिष्टमंडळाने त्य़ांच्याकडे पुराव्याची मागणी केली. अशी मागणी करणे लोकशाहीत मान्य असावे. तर कुबेर म्हणाले की आम्हाला एका पोलीस अधिका-याने सांगितलेले आहे. त्या अधिका-याचे नाव विचारले तर आम्ही ते जाहीर करू शकत नाही असं उत्तर मिळालं. त्या अधिका-याकडे पुरावे आहेत का हे तुम्ही तपासले आहे का असं विचारल्यावर कुबेर म्हणाले की त्याची आवश्यकता वाटत नाही. कोर्टात गेलं तरच पुरावे देणार का या प्रश्नावर कुबेर म्हणाले कि जा मग कोर्टात ! एकाने विचारलं की पोलीस अधिका-याने चुकीचं सांगितलं असेल तर.. तुम्हाला खातरजमा कराविशी वाटत नाही का ? ते म्हणाले तुमचं बरोबर आहे, पण माही नाही केली खातरजमा. मग शिष्टमंडळाने आवाहन केलं की पोलीस अधिका-याचं नाव देऊ नका, पण उद्याच्या अंकात ज्या पुराव्याच्या आधारे पोलीस अधिका-याने तुम्हाला माहीती दिलेली आहे ती माहिती त्याने सरकारला दिलेली आहे का याची आणि शक्य असल्यास ते पुरावे जनतेसमोर आणून आमच्यातल्या नक्षलवाद्यांना पुराव्यासहीत एक्स्पोज करण्य़ाचं तेव्हढं बघा. त्यावर कुबेर गप्प बसले आणि दोन तीन दिवसांनी कुठेतरी आतल्या पानावर माफी मागितली.

या प्रकरणात लोकसत्ताकडे पुरावे नसते तरीही त्यांच्या म्हणण्यात जरा जरी तथ्य असतं तरी त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या बाजूने माझ्यासारखे अनेक जण जवखेडा आंदोलकांच्या रोषाला न जुमानता त्यांच्या बाजूने उभे राहीले असते. तेव्हां कोणत्याही दबावाविना शिष्टमंडळाला उत्तरे देणारे कुबेर आता का नमले याचं कुतूहल प्रचंड आहे. आताही दबाव कुणाचा आलेला होता हे न सांगण्याच कारण कळत नाही.

लोकांनी अंदाज बांधत याला त्याला दोष देण्यापेक्षा लोकसत्ताने अमूक तमूक यांच्या भावना दुखावल्याने हे जाहीर करावं. वाचकांच्या भावनांना काय वाटाण्याच्य़ा अक्षता लावल्या जातात हे शेतक-यांच्या विरोधात लिहीलेल्या अग्रलेखाने समोर आलेलं आहे.

>>>>> व मायबोली धागाकर्त्याचे धन्यवाद जे माझ्या अज्ञानात भर टाकली. >>>>> Uhoh
अवघड आहेरे ऋन्मेषा... अरे ज्ञानात भर पडते ना? अज्ञानात भर कशी पडेल?

ब्बापरे हे असल वाचण्या पेक्षा मी सकाळ वाचतो ते बर आहे. किमान व्यावसायीक वृत्तीने लिहतात आणि कधी कधी ते बारामतीवरुन छापलेल आहे हे समजत.

निर्भीड पत्रकारितेचा जमाना गेला. नोकरी करणार्‍या संपादकाचे ते काम नाही. त्यासाठी मालक/ चालक आणि संपादक सुध्दा एकच व्यक्ती असावी लागते.

Pages