ताकीद दे के छोड दिया.

Submitted by मानव पृथ्वीकर on 12 March, 2016 - 02:09

१९९१. त्याकाळी मुंबईच्या CST स्थानकावर लोकल गाड्यांना दोन्ही बाजूने फलाट नव्हते, फलाट एकाच बाजूने यायचा. आणि गाडी थांबल्यावर त्या फलाटावर उतरले तर खूप गर्दी असायची, बाहेर निघायला जरा वेळ लागायचा. कधी कधी आपली गाडी फलाटाला लागली तेव्हा बाजूला आधीच दुसरी गाडी असायची. ती आधीच पोचली असल्याने त्यातील प्रवासी केव्हाच निघून गेलेले असायचे. सकाळी सकाळी CST हून निघणारे प्रवासी खूपच कमी असायचे तेव्हा तो फलाट रिकामाच असायचा.

आपल्या गाडीच्या दारा समोर जर त्या आधी आलेल्या गाडीचे दार आले, तर लोक या गाडीतून त्या गाडीत उडी मारून त्या रिकाम्या फलाटावरून भरकन निघून जायचे, वेळ वाचायचा.

मी पण एक दिवस अशीच उडी मारली, आणि नेमका तो मार्च महिना होता आणि पोलिसांना आपले टारगेट पूर्ण करायचे होते. दारांच्या बाजुला पोलीस टपूनच बसले होते. मला धरले, बहुतेक सगळ्या उड्या मारणार्‍यांनाच धरले. शेवटल्या फलाटावर (बहुतेक १० नंबर) छोटिशी पोलीस चौकी होती, तिथे नेले.

आमचा गुन्हा : रेल क्रॉसिंग. या गाडीतून त्या गाडीत उडी मारली तरी रेल क्रॉसिंग. दीडशे की काहीसा दंड भरायचा होता. ज्यांच्याकडे होते त्यांनी भरला. माझ्या कडे पैसे कमी पडत होते. मी म्हटले ठीक आहे फोन करु द्या, माझे ऑफिस बलार्ड इस्टेटलाच आहे, १० मिनिटात माणूस येईल पैसे घेऊन म्हणून सांगितले.
पण पोलिसांनी काही मला फोन करू दिला नाही. मी विरोध केला तर दमदाटी केली. नाव, पत्ता विचारुन गुन्ह्याची नोंद करुन घेतली.

आम्ही जे दंड भरू शकलो नाही बहुतेक सगळी मुलंच होतो, त्यांना चक्क छोट्याश्या लॉक-अप मध्ये टाकले.

दीड दोन तास लॉक-अप मध्ये होतो. त्या लॉक-अप मध्ये काही गुन्हेगार - चोर, पाकीटमार, गांजा विकणारे पण होते. त्यातले काही कदाचित आमच्या चेहर्‍यावरिल भाव ओळखुन आम्हाला "काय केलेत पाकीट मारले का? गांजा पकडला का?" इ. विचारत खिदळु लागले. मी गप्प बसलो आणि इतर मुलांनाही गप्प रहायला खुणावले.

शेवटी एकदाची लॉक-अप रूम उघडली सगळ्यांना बाहेर काढले, म्हणे कोर्टात जायचंय. CST स्थानकावरच पहिल्या मजल्यावर ते कोर्ट आहे. त्याला अडाणी कोर्ट असे म्हणायचे. इतर गुन्हेगार आणि आम्ही यांना दोन रांगेत उभे राहायला सांगितले. आम्ही उभे राहिलो. आणि पोलिसांनी चक्क हाताला दोरी बांधायला सुरवात केली. विरोध केला आम्ही भरपूर "पळून जाणार आहोत का? काय चोर, दरोडेखोर समजता का?" वगैरे पण काही उपयोग झाला नाही. फलाटावरून आमची हाताला दोरी बांधून वरात निघाली कोर्टाकडे. लोक बघत होते. मी तोंडावर रुमाल धरला. पण इतर मुरलेले गुन्हेगार मात्र बागेत फिरायला गेल्या सारखे इकडे तिकडे टकमक बघत होते. थोड्यावेळाने मी सुद्धा भीड सोडली, आणि नाकासमोर सरळ बघत चालु लागलो.

अडाणी कोर्टात आलो, खाली फरशीवरच आम्हाला बसवले आणि मग दोरी सोडली. एकेकाची सुनावणी सुरु झाली. माझे नाव पुकारले.

विचारले रेल क्रॉसिंग गुन्हा मान्य आहे का?
म्हटले हो मान्य आहे.
तिकीट आहे का? म्हटलं पास आहे, पास दाखवला.

आणि पंचांनी ऑर्डर दिली. "जाओ ताकीद दे के छोड दिया! फिरसे ऐसा नही करना!"

आणिे सुटका झाली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !.. मी पण बर्‍याच वेळेला तशी उडी मारली आहे. पुर्वी गाडी स्टेशनात शिरायच्या आधीच फलाटाच्या बाजूने एवढे लोक घुसायचे कि उतरताच यायचे नाही, त्यावेळी तसे करावे लागायचे.

आणि ते खरे आहे, त्या कोर्टात वाद घातला तर दंड वाढवतात. तूम्ही लकि म्हणायचे !!

मस्त अडाणी कोर्टाचा अनुभव मलाही आहे. सीएसटी स्टेशनलाच पकडलेले आम्हाला. मी खूप लहान होतो. (नेमके वय आठवत नाही पण स्टर्लिंगला ईंग्लिश पिक्चर बघायला गेलेलो पण मला आत घेतले नव्हते, असो) पण आमच्यात काही अनुभवी होते त्यांनी सांभाळून घेतले. आणि आगाऊपणा न करत गप्प मुकाट राहायचे सांगितले. जर तुम्ही प्रतिवाद केला तर दंड होतो आणि प्रत्येक वादासोबत वाढतच जातो. बहुधा म्हणूनच अडाणी कोर्ट म्हणत असावेत. कोणाला ईतर कारण माहीत असेल तर सांगा.

बाकी ते दोर्या बांधून जमिनीवरच बसवणे अगदी अगदी..

विठ्ठल आणि दिनेशदा,
हो, वाद घातला तर, दंड / शिक्षा वाढत जाते हे नंतर कळले, हा किस्सा रात्री मित्रांना सांगितल्यावर.

काहीही बोला काही चालत नाही या अनुभवाने, आणि वेळपण खुप निघुन गेल्याने म्हणा मी 'मला फोन करु दिला नाही / हाताला दोरी बांधली' वगैरे कसली कुरकुर केली नाही आणि सुदैवाने ताकीदवर लगेच सुटलो.

सस्मित, आताही असल्या अपराधांना हाताला दोरी बांधतात की माहित नाही, पण अशी वरात अधुन मधुन पाहीली आहे इतक्यात, त्यांचे काय अपराध असतील कुणास ठाऊक.

जेव्हा मोठ्या संख्येने फुकटे / रेल लाईन ओलांडणारे पकडले जातात तेव्हा त्यांची वरात काढताना दोर्‍या बांधायचा प्रघात आहे. दादर् स्थनकावर हे दृश्य पाहिले आहे.

असं कधीतरी एकदा वि रार स्टेशनला 'एकदा करुन बघायचंय' म्हणून केलंहोतं.असं पकडतात वगैरे आता कळलं.
मला लेडीज डब्यातल्या एक दोन बायांनी बरंच झापलं होतं.
हात बांधून वगैरे म्हणजे खूपच कसंतरी वाटलं असेल.

अशा काही अनुभवातून आपण गेलेलो असतो कि कधीकाळी असे(ही) आयुष्य आपण जगलो होतो यावर विश्वास बसत नाही Happy छान लिहिले आहे. प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर येतो.