दिशाभूल वाऱ्याची होते !

Submitted by सुप्रिया जाधव. on 5 March, 2016 - 14:11

शिरजोरी नशिबाची होते
गळचेपी स्वप्नाची होते

दोष खरातर सुगंधा तुझा
दिशाभूल वाऱ्याची होते !

ना माझी ना त्याची होते
विटंबना नात्याची होते !

एकांती अंधार बिलगतो
सर्वार्थाने त्याची होते

परिस्थितीशी लग्न लागते
वाताहत प्रेमाची होते

कटाक्ष त्याचा ज्वालाग्राही
लाही सर्वांगाची होते

एकटीच लढली पांचाली
शूर-वीर तर पाची होते

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users