गावो गावीच्या यात्रा/जत्रा

Submitted by कृष्णा on 6 March, 2016 - 23:56

आज महाशिवरात्र!!
आमच्या गावी अगस्ती ऋषींचा आश्रम आहे प्रवरतीरी. इथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. अकोले, संगमनेर, सिन्नर आदी भागातून मोठया संख्येने लोक यात्रेला येतात अनेक वर्षांचा इतिहास असलेल्या ह्या भागात कित्येक वर्षांपासून हि यात्रा भरते. ह्या निमित्त विविध खेळ, किर्तन, लोकनाट्ये, कुस्त्यांचे फड, खाद्य पदार्थाचे स्टॉल, आदींची रेलचेल महाशिवरात्र म्हणजे संपूर्ण दिवस भर पहाटे पासून संध्याकाळ होईल पर्यंत धमाल असायची.. अत्यंत निसर्गरम्य दाट वनराईत दडलेल्या त्या शांत निवांत परिसरात ह्या यात्रेच्या दिवशी धमाल असायची.
तशी यात्रा रात्री उशिरा पर्यन्त सुरु असते..
ह्या अगस्तींच्या आश्रमापाठी पण एक अख्याईका आहे. उत्तरेकडुन दक्षिणेत येताना ह्या आद्य कृषकाने इथेही जमीन नांगरुन शेती केली! त्यामुळे आमचा भाग सुपीक अतिशय!
तसेच प्रभुरामचंद्र पंचवटीत वास्तव्यास असता अगस्तींच्या दर्शनार्थ इथे आले होते म्हणे!
सीतामाई कर्पूर गंधा तिने प्रवरेत स्नान केल्याने तिचय देहाचा गंध पाण्यात उतरला आणि प्रवराही कर्पूर गंधा झाली!

अगस्तीची यात्रा ही आमच्या बालपणीची एक खुप मोठी ठेव... Happy

अश्याच आपल्या आठवणीतच्या यात्रा शेअर करण्यासाठी हा धागा...

अगस्ति मंदिरातील अगस्तिंची प्रतिमा व मुळ मुर्ती...

2016-03-07.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती.

मुंबईहून श्रीरामपूरला टेम्पोने समान घेऊन जाताना आम्ही इगतपुरी अकोलेमार्गे गेलो तेव्हा साधारण अगस्ती ऋषीचं वास्तव्य त्या भागात होतं हे समजत होतं, सगळीकडे त्याचं नाव दिसत होतं.

मुंबईजवळ शहरात राहिल्याने टिपिकल जत्रा फारशी माहिती नाही. इथे जवळच्या गावातून भरतात पण जाणे नाही होत. तसं डिसेंबरमध्ये वगैरे असतात उत्सव, आगरी महोत्सवसारख्या जत्रा डोंबिवलीत.

श्रीरापूरला मात्र रामनवमीची जत्रा खूप एन्जॉय केली. एकतर ते शांत टाऊन आणि मला खूप माणसे रस्त्यावर बघायची सवय. सोसायटीत शांतता पण कायम रस्ते माणसांनी फुललेले. तिथे मात्र तुरळक गर्दी. पण रामनवमीला तुफान गर्दी असायची त्यावेळी मला खूप छान वाटायचं. आजूबाजूच्या गावातून जत्रेसाठी यायचे बरेच जण, त्यामुळे रस्ते फुललेले. सर्व टिपिकल राईडपण एन्जॉय करायचो आम्ही. जायंट व्हील etc.

छान धागा. माझ्या अशा काही आठवणी नाहीत फार, पण इतरांच्या गोष्टी वाचायला मी उत्सुक आहे. Happy तुमची अगस्ती ऋषींची यात्रा आवडली. त्यांच्या आश्रमात आता कोणी असते का?

मिरजेत अंबाबाईची जत्रा नवरात्रात आणि मीरासाबच्या दर्ग्याचा उरुस या दोन मोठ्या जत्रा. उरुस मुसलमानी कॅलेंडराप्रमाणे असल्यामुळे तो इंग्रजी कॅलेंडराप्रमाणे दरवर्षी नवीन वेळेला येतो.
अंबाबाईच्या जत्रेत पाळणेवाले आर्‍यांवर चढून पाळण्याला गती देत. त्याला ट्युबलाइट लावलेल्या असत. लहानपणी ते सगळेच भारी वाटे. नवरात्रात जत्रा असल्याने थोडे मावळे खरेदी पण होत असे.
उरुसाची स्केल अंबाबाईच्या जत्रेपेक्षा बरीच मोठी. तिथले पाळणे पण मोटरीवर चालणारे. त्यात चित्रविचित्र आरसेवाला असे, जादुगार असे. हुषार गाढववाला पण असे. हुषार गाढव त्याच्या मालकाने सांगितलेल्या गोष्टी करतो. म्हणजे मालक म्हणाला पांढरा सदरा असेल्याजवळ जाउन उभे रहा की हुशार गाढव तिथे जाते Happy माझ्या वडलांचा एक चुलत भाऊ जर्मनीत स्थायिक झालेला. त्याचा तिथेच जन्मलेला/वाढलेला ८ वर्षाचा मुलगा एकदा भारतात आला असताना उरुस लागला होता. त्यात त्याने हुषार गाढव बघितले. संपूर्ण वास्तव्यात त्याला हुषार गाढवाचे अप्रुप काय कमी झाले नाही.

अंबाबाईच्या देवळात तसेच उरुसात संध्याकाळ व रात्री उशीरापर्यंत संगीत क्षेत्रातील दिग्गज - नावाजलेले तसेच नवखे - येऊन गातात. ही परंपरा आजही आहे. अंबाबाईच्या देवळात कार्यक्रम आखीव असतो. अंबाबाईच्या देवळाची जबाबदारी गुरवांकडे आहे. हे सर्व गुरव संगीतात उस्ताद - विशेषतः गाण्यात आणि तबल्यात. नवरात्र महोत्सवाच्या समितीत हे सर्व लोक असतात. यांचे गेली ५०-१०० वर्ष उत्सव केल्यामुळे कलाक्षेत्रातील दिग्गजांच्या ओळखी आहेत. तसेच गांधर्व महाविद्यालयाचे अखिल भारतीत हेड हापिस याच गल्लीच्या दुसर्‍या टोकाला आहे. अजून एक विशेष म्हणजे नृत्याचा एक तरी कार्यक्रम असतो - यात कथ्थक/भरतनाट्यम वगैरेंतील दिग्गज नर्तक सादर करतात.
उरुसात दर्ग्यात संध्याकाळी ८-९ला कार्यक्रम सुरु झाला की सकाळपर्यंतही चालत असे. एखादा गायक/वादक ३-४ तासदेखील सादर करे जर लोकांची दाद मिळू लागली तर. उरुसात कुनाला बोलवायचे, कधी, किती वेळ सादर करणार याचे गणित कसे जमवतात (मुळात जमवतात का) हे आजवर मला कळले नाहीये. इकडून चाललो होतो, जाताजाता सादर करून जातो असे म्हणुन रशिद खान पण गाऊन जातात. झाडून सगळे सतारमेकर तिथे कार्यक्रमाला असल्याने बहुतेक कलाकारांवर जोरदार दडपण येत असावे. कारण या सतारमेकरांचा कान अजबच तयारीचा.

कट्यार काळजात घुसली मध्ये मिरजेतला खाँसाहेब आणि सदाशिव गुरव दारव्हेकरांनी उगा घेतलेला नाही!

या बरोबरीने गावोगाव जत्रा असतात (म्हणजे मिरज हे 'शहर' असल्याने आजुबाजुची खेडेगावे Happy ). त्यांचे कॅलेंडर या जत्रात पालं लावणार्‍यांकडे असते. तसेच काही जत्रा लावणीच्या फडासाठी फेमस असतात.

जत्रांसारखे गावोगावी उत्सव असतात. जसा देवीचा उत्सव, खंडोबाचा उत्सव. आमच्या शेतावर दोन खेड्यांच्या शीवेवर खंडोबाचा दगड आहे. त्याचा उत्सव असतो. त्याला फक्त पुरुष लोक जेवण बनवतात. जेवण म्हणजे मजबूत तिखट घातलेल्या पाण्यात खळाखळा उकळलेलं मटण. ते खायचे म्हणजे माझी वाट लागत असे. मोठ्या थाळ्यात ते मटण घ्यायचे आणि भाकरी हातात घेऊन त्याबरोबर ते खायचे. त्या मटणात जेव्हडे पाणी असे तेव्हडे माझ्या डोळ्यातून येई. आणि वर कौतुकाने 'बघा बामणाचा पोर कसा खातोय' म्हणुन आग्रहाने अजून वाढायचे. दुसर्‍या दिवशी सायकल वरून घरी येताना सीटवर बसायलासुद्धा यायचे नाही!

श्रीरामपुरची रामनवमी यात्रा मी पण अनुभवलिये! Happy

तुमची अगस्ती ऋषींची यात्रा आवडली. त्यांच्या आश्रमात आता कोणी असते का?>>>

तिथे आता एक मांदिर बांधलयं मोठे. बाजुला राम मंदिर आहे.. पण परिसरातील वनराई आता कामी झालिये माणसे वाढली तशी! Sad
पुर्वी एक लाकडाचे भव्य मंदिर होते अगस्तींचे ते जाऊन कॉन्क्रीट्चे झाले.. पुर्वी शांत असलेल्या त्या परिसरात आंबा चिंचेचे खुप वृक्ष होते पाण्याचा बारामाही ओढा वहायचा जो पुढे प्रवरेला मिळायचा त्या ओढ्याचे पाणी देखिल थेट पिता यायचे इतके स्वच्छ होते!
पण यात्रा अजुनी तितकीच उत्साहाने होते. काल परत्वे त्यात बर्‍याच नविन गोष्टी समविष्ट झाल्यात पण गुडीशेव, गुडदाणी शेव चिवडा हे पारंपपारीक खाऊ तसेच! Happy

माझ्या गावच्या (केळशी) महालक्ष्मी यात्रेचं एवढं वर्णन http://www.maayboli.com/node/34251 इथे केलंय कि मला लिहायला काही उरलंच नाही.
यंदा यात्रा २१, २२ एप्रिल २०१६ ला आहे..

आमच्या गावी मुरुडला ग्रामदैवत कोटेश्वरीची जत्रा असते. रामनवमीला एकदर गावातल्या रामाच्या देवळापासून मुरुड पर्यंत शोभायात्रा असते. दत्त जयंतीला डोंगरावरच्या दत्ताच्या देवळात यात्रा असते.

माझ्या आजोळी , खानापूर ला ( बेळगाव) , दर सतरा-वीस वर्षानी असते लक्ष्मीची यात्रा.
आधीच जवळपास वर्षभर तयार्‍या सुरू होतात. अचानक एक अनोळखी मुर्तीकार येतो ( माझ्या पहाण्यातल्या दोन्ही वेळा असच झालय ) अन मुर्ती घडवून जातो. तिची प्रतिष्ठापना करून , गावातल्या मुख्य रस्त्यांवरून मिरवणूक होते. ३-४ दिवस यात्रा ! तारखा शोधून पाहते पण ह्या पुर्वीची यात्रा फेब्रुवारी २००७ मधे झाली होती. काही मान्करी घरांनी, तो रथ ओढायची , घरासमोर लक्ष्मीला ओवाळून स्वागत करायची वगैरे प्रथा आहे. ही माहेर्वाशिण असते , त्यानिमित्तनी गावभर सगळ्या घरात माहेरवाशिणी येतात. आजूबाजूच्या गावातली मंडळी देखिल! बच्चे कंपनीला आकर्षण जत्रा , खाउचे स्टॉल , खेळणी , भरपूर असतात मैदानावर. सकाळी घरातले मोठे , मुलाना लाय्नीत उभं करून काही चिल्लर हातावर टेकवतात. पोरं मग उंडारायला मोकळी. आमची टोळी असायची , पहिली फेरी सर्व्हे, मग बसून हिशोब, मग कोणकोणत्या स्टॉल वर बक्षिस आहेत ते पाहणे , ती मिळवणे, वाटून घेणे , घरी खायला रेलचेल असल तरी तिथे जाउन सुकी भेळ , बुढीके बाल, खाजे खाण म्हणजे अपार मज्जा अस वाटायच तेव्हा.
आजी, मामी ,आई ,मावश्या , इतर मोठी मंडळींच्या अजेंड्यावर , ओटी भरायला जाणे , नैवेद्य बनवून पाठवणे, घरातल्या अलोट गर्दी ला जेवायला खायला घालणे वगैरे,
अमाप उत्साह , अन एनर्गीनी भरलेले , भारलेले दिवस!

मला वाटत, यात्रा म्हणजे धार्मिक कार्यक्रम अन जत्रा त्या च्या आजूबाजूला येणारे करमणून , फुटकळ खरेदी विक्री वगैरे कार्यक्रम. यात्रा पण सामिष नैवेद्याची असते की .

टण्या, मीही मिरजेचा उरुस आणि अंबाबाई जत्रेबद्दल लिहायला आलो होतो. Happy
रम्य आठवणी.

कृष्णा, तुमची अगस्ती ऋषींची यात्रा आवडली. Happy

हल्ली abp माझावर दर शनिवारी रात्री ८ ला अशा गावोगावीच्या जत्रा दाखवतायेत. मध्ये चिपळूणजवळच्या दहिवलीची बघितली, परवा एका ठिकाणचा उरूस दाखवला ते मी संपता संपता बघितलं. लक्षात राहिले आणि घरी असले तर मी बघते हा प्रोग्रॅम. छान आहे. कोणाला जमलं तर नक्की बघा.

मस्त आहे हा धागा, वेगवेगळ्या ठिकाणची मस्त माहिती मिळतेय, इंटरेस्टिंग. टण्या, आशुडी, इन्ना मस्त.

मॅगी केळशीची महालक्ष्मी माझ्या आजोळच्या लागु घराण्याची कुलदेवता Happy . मला जायचंय तिकडे, अजुन योग आला नाही.

इन्ना, खुपच छान आहे तुमच्या आजोळची लक्ष्मी मातेची यात्रा! Happy

मॅगी, केळशी चे डिटेल वर्णन मागेच पाहिलेले छानच खूप! Happy

ज्यांनी अश्या यात्रा किंव अजत्रा पाहिल्य अनुभवल्या असतील त्यांचे अनुभव नक्की शेअर करा! Happy

मला वाटत, यात्रा म्हणजे धार्मिक कार्यक्रम अन जत्रा त्या च्या आजूबाजूला येणारे करमणून , फुटकळ खरेदी विक्री वगैरे कार्यक्रम. यात्रा पण सामिष नैवेद्याची असते की .>>>>

काही अंशी हे बरोबर वाटते पण सामिष नैवेद्य बहुदा मंदिरात होत नाहीत बर्‍याच ठिकाणी.
नगर बुरा नगरच्या देवीची यात्रा असायची. केडगांवच्या देवीची असायची तिथे सामिष नैवेद्य बाहेर होत मंदिरात केवळ गोडाचे आणि निरामिष नैवेद्य असत!

जत्रा ही एक पेक्षा अनेक दिवस चालते करमणुकीचे कार्यक्रम वैगेरे...

कृष्णा, माझ्या आजीचे माहेर म्हणजे अकोले, आजी कडुन हे सर्व वर्णन ऐकले आहे. आजीची आठवन झाली>>>

अरे वा! आमचे गांव म्हणजे तुमचे पणजोळ की!!! Happy

होय. पण आजीच्या घरच्यानी अकोले १९४५-५० साली सोडले आणि नाशिकला कायम करिता राहायला आले. तिथे एक द्त्त मन्दिर आहे , ते आजीच्या कुटुम्ब्चा मालकिचे होते.

तिथे एक द्त्त मन्दिर आहे , ते आजीच्या कुटुम्ब्चा मालकिचे होते.>>>

अकोल्यात ३-४ दत्त मंदिरे आहेत सध्या. शनि-मारुती मंदिरा जवळचे दत्त मंदिर का?

आमच्या अकोल्याचे ग्रामदैवत म्हणजे भोलेनाथ शिवशंकर राजराजेश्वर महाराज हे आहे. मंदिराच्या स्थापना अन उत्पत्ती बद्दल नंतर कधीतरी इथे फ़क्त यात्रेची माहीती देतो.

श्रावणी सोमवार म्हणजे आमच्या गावात एक मोठे प्रस्थ असते जुन्या शहरात किल्ल्याजवळ असलेल्या राजेश्वर मंदिरात त्या वेळी तूफ़ान गर्दी असते , ह्या यात्रेच्या समापनाला म्हणजे शेवटच्या सोमवाराला विशेष महत्व असते, ह्या शेवटच्या सोमवारी लोकं अकोल्यापासुन २२ किमी दूर असलेला गांधीग्राम इथून कावड़ भरून पाणी आणतात अन राजेश्वर महाराजांच्या पिंडीवर वाहतात .

ही कावड़ म्हणजे साधी दोन घट एक बांबु अशी नसते तर दीड दीडशे फुट लांब अन तीस तीस फुट आडवे बांबु एकमेकांस काथ्याने बांधून तयार केलेली जाळी असते एक . उभ्या अन आडव्या बांबुचे जिथे छेद असतात त्या प्रत्येक ठिकाणी एक दोन कळश्या बांधलेल्या असतात. अशी ही कावड़ एक्कावन, एकशे एक, चारशे एक्कावन वगैरे कळश्यांची असते , डाबकी रोड अकोला च्या कावडी विशेष फेमस आहेत, कावडी उचलून पोरांचे खांदे सोलवटून निघतात पण तरीही पोरे भोलेबाबा साठी भक्तिपाई करतात कावडीचे सायास सगळे, अन सोबत असतात "हर्र बोला महादेव" च्या गर्जना.