डॉ. अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार २०१६

Submitted by अतुल ठाकुर on 26 February, 2016 - 00:10

12694606_1183162901713786_5856450398389291371_o.jpg

फेब्रुवारी महिन्याच्या सात तारखेला संपन्न झालेला "डॉ. अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार" सोहळा मला अनेक अर्थाने वेगळा वाटला. ठाणे फॉलोअपला नियमित हजेरी लावणार्‍या, पंचविसहून जास्त वर्ष व्यसनमुक्त राहुन निव्वळ आपल्या अस्तित्वानेच अनेकांना प्रेरणा देणार्‍या आमच्या प्रमोद उदार सरांना हा पुरस्कार मिळाला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार्‍या डॉ. शैला दाभोळकर यांची अनिता अवचटांशी घनिष्ट मैत्री होती ही माहिती मला नवीन होती. चंद्रपूर जिल्ह्यात व्यसनमुक्तीचे काम करणार्‍या, सरकारला यशस्वीपणे दारुबंदी लागु करायला भाग पाडणार्‍या पारोमिता गोस्वामी यांनाही या वर्षीचा पुरस्कार मिळाला होता. एका अर्थाने व्यसनमुक्तीचे काम दोन्ही मार्गाने चालवले पाहिजे हेच मुक्तांगणने यातुन सुचवले होते. उदारसरांसारखी माणसे आहेत. ती स्वतः व्यसनमुक्त राहतात. आणि वैयक्तिक पातळीवर काम करुन शेकडो माणसांना व्यसनमुक्त राहण्यासाठी सर्व प्रकारे मदत करतात. त्याहीपेक्षा कितीतरीपटीने जास्त माणसांना प्रेरणा देतात. ही व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाची वैयक्तिक पातळीवरची बाजु झाली. पारोमिता गोस्वामींसारख्या व्यक्ती सामाजिक स्तरावर या समस्येशी लढा देतात. सरकारला दारुबंदी आणायला भाग पाडतात. या दोन्ही आघाड्यावर चालवलेल्या कामानेच व्यसनमुक्तीचा सूर्य उगवण्याची शक्यता आहे असे मला वाटते. वैयक्तिक सुधारणा करताना सामाजिक जबाबदारी नाकारता येणार नाही आणि सामाजिक चळवळ करताना वैयक्तिक पातळीवर देखिल बदल घडवावे लागतील.

संघर्ष सन्मान पुरस्कार हा खर्‍या अर्थाने डॉ. आनंद नाडकर्णी यांचा कार्यक्रम असतो. ते सूत्र संचालक असतात. मार्मिकपणे प्रश्न विचारुन एरवी फारसे न बोलणार्‍या उदार सरांना देखिल त्यांनी बोलायला लावले. पारोमिताताई तर चळवळीतल्याच. त्या बोलक्याच होत्या. डॉक्टरसाहेबांनी सुरेख उपमा वापरत, उदाहरणे देत कार्यक्रम नेहेमीप्रमाणेच खुलवत नेऊन अतिशय रंगतदार केला. सुरुवातीला यशोदा वाकणकर यांनी डॉ. अनिता अवचट यांचे, त्यांच्या आईचे अत्यंत आवडते "वैष्णव जन तो तेने कहिये" हे भजन सुरेल स्वरात गायिले. प्रथेप्रमाणे मुक्तांगणच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनी हा पुरस्कार पूर्वी मिळवलेल्या मानकर्‍यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. आणि कार्यक्रम सुरु झाला. सुरुवातीला पारोमिता गोस्वामी यांची मुलाखत डॉ. नाडकर्णींनी घेतली. पारोमिताताईंचे व्यक्तीमत्व अगदी थेट पु.लं.च्या "वंगचित्रे" मध्ये वर्णन केलेल्या बंगाली श्यामल वर्णाचे देखणे असे होते. ही परप्रांतिय मंडळी मराठी मुलखात येऊन काम करायला लागली कि त्यांच्या मराठी भाषेत त्या गावरान मातीचा गंध मिसळतो. त्यातुन पारोमिता ताईंच्या आवाजाला एक सुंदर नाद होता. त्यामुळे त्यांचे बोलणे सतत ऐकत राहावेसे वाटत होते. यावेळच्या दोन्ही विजेत्यांच्या बोलण्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा प्रांजळपणा आणि डोंगराएवढी कामे करुन देखिल आपण काहीच फारसे केले नाही अशा तर्‍हेने बोलण्याची वृत्ती.

पारोमिता ताईंनी तर आपल्याला उपजत समाजकार्य करण्याची आवड वगैरे आहे असे काहीही सांगीतले नाही. इंग्रजी साहित्यात पदवी घेतलेली ही युवती काहीतरी वेगळे करावे म्हणुन मुंबईच्या प्रसिद्धा टाटा सोशल सायन्सेसमध्ये गेली आणि तिथुन अभ्यासक्रम पूर्ण करुन बाहेर पडल्यावर इमानेइतबारे काम करु लागली. पुन्हा योगायोगानेच त्या चंद्रपूरला आल्या आणि तेथे त्यांच्यात कशा तर्‍हेची ताकद आहे त्याचा त्यांना स्वतःलाच साक्षात्कार घडला. मग ती त्यांची कर्मभूमीच बनुन गेली. पारोमिता ताईंचे नाव व्यसमुक्तीच्या बाबतीत माहित असले तरी संघटना बांधुन त्यांनी आदिवासी लोकांना त्यांच्या हजारो एकर जमिनी मिळवुन दिल्या आहेत हे फारसे कुणाला माहित नाही. याबद्दल बोलताना त्यांच्या तोंडुन संघटना बांधुनच अशातर्‍हेची कामे करता येतात हे सारखे येत होते. मला स्वतःला संघटना बांधणे आणि त्याद्वारे जनजागृती करणे, लोकोपयोगी कामे करणे हेच येते, त्यावेगळे काही येत नाही असे त्या प्रांजळपणे म्हणाल्या. मात्र त्यांनी केलेली कामे अफाट आणि अचाट होती. नागपूरला सरकारला साकडे घालायला जायचे तर सरळ गेलो तर सरकार वाटाण्याच्या अक्षता लावणार हे त्यांनी ताडले होते. कारण अशी अनेक माणसे येतात. पारोमिता ताईंना सरकारला धक्का देऊन खडबडुन जागे करायचे होते. त्यांनी कित्येक किलोमीटर अलिकडे आदिवासी महिलांचा मोर्चा काढला. मंत्र्यांसमोर एका वृद्ध आदिवासी महिलेने आपली वळांनी भरलेली पाठ दाखवुन "लहानपणी व्यसनामुळे बापाने मारलं, मोठेपणी त्याच व्यसनामुळे नवर्‍याने मारलं आणि आता म्हातारपणी मुलगाही तेच करतो आहे. तेव्हा या भयंकर व्यसनावर काहीतरी उपाय करा" असं गलबलुन टाकणारं साकडं त्यांनी सरकारला घातलं. पारोमिता ताईं यश मिळालं. चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागु झाली. पण वाट इतकी सोपी नव्हती.

दारु बनवणारी मंडळी आता कोर्टात गेली आहेत आणि त्या आघाडीवर पारोमिताताईंना लढावे लागत आहे. मात्र या संघर्षात सुखावणार्‍यादेखिल अनेक गोष्टी आहेत. कोर्टाकडुन मिळणारी साथ, डॉ. अभय बंग यांच्यासारख्या लोकांनी केलेली पाठराखण, काही सरकारी उच्च्पदस्थांची त्यांच्या कार्याला असलेली सहानुभुती अशा अनेक गोष्टी सांगता येतील. मात्र दारु बनवणारी जी लॉबी आहे त्यांच्या निर्लज्जपणाचे त्यांनी सांगीतलेले एक उदाहरण येथे द्यावेच लागेल. ही दारुबंदी उठवावी कारण आम्ही बनवलेली जास्तीतजास्त दारु चंद्रपूर जिल्ह्यात विकली जाते आणि जर चंद्रपूर मध्ये दारुबंदी झाली तर आमचा कारखाना बंद पडेल असे कारण घेऊन एक कंपनी कोर्टात गेली होती. दारुबंदी झाली तरी चोरुन दारु विकण्याचे प्रमाण आहेच. अशा घटनांमुळे निराश वाटते का असे विचारल्यावर "छट्" म्हणुन त्यांनी तेथेच निराशेचा विचार झटकुन टाकला. "विरोध करणारे त्यांचे काम करत असतात. आम्ही आमचे काम करत राहु" असे पारोमिताताई म्हणाल्या. मला पारोमिताताईंच्या बोलण्यातले हे सूत्रवचन असल्यासारखे वाटले. अशातर्‍हेचे विचार घेऊन जगणार्‍यांना निराशा कुठुन येणार? यानंतर डॉ. नाडकर्णी उदारसरांकडे वळले. उदारसर तसे बोलत नाहीत. पण आज भरभरुन बोलले. गोदरेज कंपनीत कामावर असताना व्यसनात गुरफटलेल्या उदारसरांच्या व्यसनमुक्तीचा संपूर्ण प्रवास डॉ. नाडकर्णींच्या साक्षीने झाला. कारण ते सुद्धा त्यावेळी गोदरेजमध्ये कामगाराच्या मानसिकस्वास्थ्यासंबंधी कामात कार्यरत होते. उदारसर मोठ्यामॅडमच्यावेळी मुक्तांगणमध्ये दाखल झाले. त्यावेळी नवी वास्तू नव्हती. मेंटल हॉस्पिटलचा एक भाग म्हणुन मुक्तांगणचे काम चालत असे. व्यसनमुक्त झाल्यावर तेथे त्यांना अनेक मित्र मिळाले. मॅडमच्या शेवटच्या आजारपणात ही मित्रमंडळी नेहेमी त्यांना भेटायला जात असत. स्वतः व्यसनातुन बाहेर पडल्यावर इतरांना व्यसनमुक्त करण्याचा विडा उदारसरांनी कुठलाही गाजावाजा न करता उचलला आणि ते झपाट्याने कामाला लागले.

कंपनीत त्यांनी मिटिंग सुरु केली. आणि एए चा त्यांनी ध्यास घेतला. आज एए संस्था आणि तिचे काम हा त्यांचा श्वास बनला आहे. उदारसर गेली कित्येक वर्षे नियमितपणे ठाणे आणि माहिमचा मुक्तांगणचा फॉलोअप अटेंड करतात. त्यानंतर त्यांचा बाकी वेळ दादर पोर्तुगिज चर्च येथील एए च्या कार्यालयात जातो. या मंडळींचे भारतात निरनिराळ्या ठि़काणी व्यसनमुक्तीचे वर्कशॉप्स आणि मिटिंग्ज असतात. तेथे ही मंडळी स्वखर्चाने जात असतात. उदारसरांनी अनेकांना व्यसनमुक्तीसाठी आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे त्याचा मित्रपरिवारदेखिल अफाट आहे. शिवाय निरनिराळ्या कार्यक्रमांना त्यांची मुक्तांगणमध्ये हजेरी असतेच. तल्लख स्मरणशक्ती हे उदारसरांचे आणखि एक वैशिष्ट्य सांगावे लागेल. जुन्या जुन्या माणसांची नावे, त्यांच्या व्यसनमुक्तीची वर्षे, त्यांच्या व्यसनमुक्तीचा प्रवास उदारसरांना मुखोद्गत असतो. हे सारे करताना तोच नम्र स्वभाव, तेच मिस्किल हसु आणि तोच शांतपणा. इतके दिवस त्यांना ठाण्याला पाहुन सुद्धा त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू या सोहळ्यात मला नव्याने उमगले. उदारसर आपल्यासेवेत मग्न असताना अनेक वैयक्तिक दु:ख त्यांना सहन करावी लागली. जवळची माणसे काळाच्या पडद्याआड झाली. पण त्यांचे काम थांबले नाही. अनेक कार्यांमध्ये काही माणसे अशी असतात कि त्यांच्या नुसत्या असण्याने ते कार्य पार पाडणार्‍या मंडळींमध्ये उत्साह येत असतो. मुक्तांगणमध्ये उदारसरांचे स्थान आता असे झाले आहे. त्यांचे नुसते तेथे असणेच उर्जा देणारे असते. दोघा विजेत्यांचे मनोगत जाणुन घेतल्यावर कार्यक्रम समारोपाकडे आला असताना कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. शैला दाभोळकरांना बोलण्याची विनंती करण्यात आली. शैलाताईंनी कायक्रमावर सोनेरी कळस चढवला असे म्हटले तर वावगे होणार नाही. आपल्या जिवलग मैत्रिणिच्या, डॉ. अनिता अवचटांचा आठवणी सांगत, त्यांनी आपले मनोगत खुलवुन श्रोत्यांना गुंग करुन सोडले. बोलताना त्यांच्याकडुन सहजपणे वाचिक अभिनय होत होता. प्रसंग सांगण्याची सुरेख हातोटी, त्याला प्रसन्न विनोदाची जोड आणि त्यात मैत्रिणिच्या आठवणींचा मिसळलेला सुगंध त्यामुळे शैलाताईंचे अध्यक्षिय भाषण अतिशय परिणामकारक झाले.

माझा आणि सुनंदाचा स्वभाव अगदी वेगळा पण आमची गाढ मैत्री होऊ शकली याचे कारण आम्ही दोघी आपापल्या कामाशी "कमिटेड" होतो हे आहे. हे शैलाताईंनी सुरुवातीलाच सांगीतले. त्यामुळे शैलाताई आणि मोठ्या मॅडम कधीही भेटल्या कि तासनतास बोलत असत. दोघी मैत्रिणींना बोलुनच बरे वाटत असे. पुढे मोठ्या मॅडमच्या स्वभावाचा विशेष सांगताना शैलाताई म्हणाल्या कि अशा गप्पा चालल्या असताना त्यांनी शैलाताईंना सातारला व्यसनमुक्ती केंद्र सुरु करण्याचे सुचवले. आणि एका "गाफील क्षणी" शैलाताई याला होकार देऊन बसल्या. त्यानंतर शैलाताईंकडे सातारला दर महिन्यात मोठ्यामॅडम मिटींगसाठी जाऊ लागल्या. दोघी मैत्रिणींचे व्यसनमुक्तीचे काम सातारला सुरु झाले. अशा काही मिटीग्ज झाल्यावर एका मिटिंगमध्ये मोठ्या मॅडमने जाहिर केले कि यापुढे शैलाताई पुढच्या मिटिंग्ज घेतील आणि मी कधीतरी अधुनमधुन येईन. हे ऐकल्यावर शैलाताईंना धक्काच बसला. "अग मला याचा कुठे अनुभव आहे? मला कसं जमणार?" पण "अग सोपं असतं हे. आणि काही अडचण आलीच तर मी आहेच की." असे म्हणुन मोठ्या मॅडमनी आपल्या मैत्रिणीला व्यसनमुक्तीच्या कामाला लावले. पुढे आपल्या धडाकेबाज स्वभावानुसार शैलाताईंनी व्यसनमुक्तीचे काम हाती घेतले. विचाराने फेमिनीस्ट असलेल्या शैलाताईंनी एका व्यसनी माणसाला तडक आपल्या जीपमध्ये घालुन मुक्तांगणला आणले. आणि आणल्याबरोबर त्याला फिट आल्यावर शैलाताईंची बोबडीच वळली. तेव्हा "अग हे विथड्रॉल सिम्पट्म्स असतात. असं होतंच" असे सांगुन मोठ्या मॅडमनी आपल्या मैत्रिणीला धीर दिला. पुढे व्यसनमुक्तीचे काम किती चिकाटीने करावे लागते याचा अनुभव शैलाताईंना येऊ लागला. सारे उपाय करुन, समुपदेशन करुन स्लिप रिलॅप्स होणारी माणसे दिसु लागली. मात्र हे होत असतानाच एक माणुस बरा झाल्याबर अनेक माणसांच्या चेहर्‍यावर फुलणारे हसु सुद्धा त्यांना पाहायला मिळाले. एक व्यसनी बरा झाल्यावर त्याबद्दल अनेकजण कृतज्ञता व्यक्त करीत. त्यामुळे एकाच्या व्यसनामुळे किती जणांचे आयुष्य अंधारलेले असते आणि तोच माणुस बरा झाल्यावर किती जणाच्या आयुष्यात प्रकाश येतो हे ही त्यांच्या लक्षात आले.

शैलाताईंच्याच शब्दात सांगायचे तर मोठ्या मॅडमनी आपल्या मैत्रिणिला एखाद्या लहान मुलाला हाताला धरुन चालायला शिकवावे अशा तर्‍हेने शिकवुन व्यसनमुक्तीच्या कार्यात आणले. आपल्या मनोगताचा समारोप करताना शैलाताईंनी मोठ्यामॅडमनी केलेली व्यसनाची जी कार्यकारणमिमांसा सांगितली ती मात्र अंतर्मुख करुन गेली. त्या म्हणाल्या अनेक जणांना आपल्या घरात बार आहे याचा अभिमान वाटतो. आमच्या घरातील बारमध्ये भरपूर "स्टॉक" आहे. अनेक उंची ब्रँडची दारु आम्ही ठेवतो असे लोक प्रौढीने सांगतात. आमच्याकडे या, आमचा बार पाहा आणि हवे ते घ्या असे आमंत्रण देतात. दारुला प्राप्त असलेली ही प्रतिष्ठा हे व्यसनाचे मूळ कारण आहे असे मोठ्या मॅडम म्हणायच्या. हे ऐकतानाच सोशल ड्रिंकिंगचे वाढत चाललेले प्रमाण आणि त्यातुन लागणारे व्यसन पाहता मोठ्या मॅडमचा विचार किती सार्वकालिक होता हे मला जाणवले. शैलाताईंच्या मनोगताबरोबरच कार्यक्रमाचा समारोप झाला. अनेक जण भेटले. आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळाचे सभासद आले होते. शोभनाताई भेटल्या. प्रथेप्रमाणे कार्यक्रमात यावेळच्या आनंदयात्रीच्या अंकाचे प्रकाशनदेखिल झाले होते. ते अंक तेथे टेबलवर पुस्तकांबरोबरच मांडले होते. यावेळी नेहेमीप्रमाणे मला रेंगाळता येणार नव्हते कारण प्रबंध पूर्ण करायचा होता. मुंबईला निघालो. अनेक दिवस पुरेल अशी शिदोरी या कार्यक्रमाने मला दिली होती.

अतुल ठाकुर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समाज प्रबोधन आणि सेवेसाठी जितका उपयुक्त तितकाच सहज असा जणू काही कौटुंबिक कार्यक्रमाचा सोहळा आणि त्याचे तितकेच देखणे असे वर्णन अतुल ठाकुर यांच्यातर्फ़े इथे प्रकाशित झाले....ते वाचताना जाणीव होत गेली की खुद्द लेखकांनी केवळ वृत्तपत्रीय थाटाचे लेखन केले नसून ते स्वत: त्या योजनेतील प्रत्यक्ष सहभागी असलेल्या व्यक्ती असून पारितोषिकामागील भूमिका त्याना पुरती माहीत आहे. ज्याना हा पुरस्कार मिळाला त्यांच्याविषयीची सखोल अशी माहिती देतानाही त्या त्या प्रमुखाचे कार्यही अगदी सविस्तरपणे सांगितले गेल्यामुळे त्याही महती किती आहे हे वाचकाला उमगते. सर्वश्री प्रमोद उदारसर, पारोमिता गोस्वामी आणि शैला दाभोळकर यांचे त्या त्या क्षेत्रातील कार्य वाचल्यानंतर त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे असेच वाटते. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी ज्या ज्या घटकांनी आपला वेळ आणि श्रम दिले आहेत ते निश्चित्तच अभिनंदनास पात्र आहे. अतुल ठाकुर यांचे पुन्हा एकदा आभार आणि अभिनंदन.

धन्यवाद अशोकराव. शैलाताई दाभोळकरांमुळे डॉ. अनिता अवचट यांच्या व्यक्तीमत्वाचे नवीन पैलु उलगडले.

छान!
पारोमितांबद्दल यावेळी कुठल्याश्या दिवाळी अंकात छान लेख आला होता. तेव्हापासूनच मनावर त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडला होता.
त्यांना हा पुरस्कार मिळाल्याचं वाचून छान वाटलं.

प्रमोद उदारसरांबद्दल तुरळक उल्लेख बहुतेक आलेत तुमच्या लेखनात.
आता नितीन सर, वस्ताद यांच्यासारखा उदारसरांवरपण एक लेख येऊदे.

धन्यवाद!

सातीजी धन्यवाद, नक्की प्रयत्न करेन. उदार सर स्वतःबद्दल फारसे बोलत नाहीत. तरीही...

बाकि तुम्ही आधीच्या लेखांची नावे लक्षात ठेऊन प्रतिसाद दिल्याने खरोखर सुखद आश्चर्याचा धक्का बसला.
मनःपूर्वक आभार Happy

ठाकूरजी, मी तर तुमच्या पंखामंडळात आहे.
आणि अवचट कुटुंबीयांच्या भक्तमंडळात म्हणता येईल!
Happy

खूप सुरेख ओळख करुन दिली. माहिती मिळाली. दारुचे व्यसन अतिभयंकर. कधी कुणाला लागू नये. माणूस आयुष्यातून उठतो आणि कुटुंबातील प्रत्येकाला प्रचंड त्रास होतो. मी ह्यातून होरपळून गेलो आहे.
धन्यवाद.

अतिशय सुंदर लेख. छान परिचय.

मी पारोमिता ह्यांची मुलाखत मागे टीव्हीवर बघितली होती, एका न्यूज channel वर. छान झाली होती.

अवचट family खरंच ग्रेट. सर्वांबद्दल आदर वाटतो ___/\___.

छान

तुमचे लेख नेहमीच वाचनीय असतात. तुमच्यामुळे आम्हाला अशा उत्तमोत्तम कार्याची माहिती मिळते.

यावेळच्या दोन्ही विजेत्यांच्या बोलण्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा प्रांजळपणा आणि डोंगराएवढी कामे करुन देखिल आपण काहीच फारसे केले नाही अशा तर्‍हेने बोलण्याची वृत्ती. >>>> +१००