इथे तर पानगळ बहरात आहे

Submitted by जयन्ता५२ on 18 July, 2009 - 14:00

ऋतू न्याराच ह्या नगरात आहे
इथे तर पानगळ बहरात आहे

म्हणे ते सूर साती वर्ज्य ह्याला
कसा हा राग ह्या प्रहरात आहे?

अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे

उगा ना मागती ते घास अर्धा
युगांची भूक 'त्या' उदरात आहे

निभावा आजचा हा दिन कसाही
विनवणी हीच ह्या अधरात आहे

विनासंचारबंदी सुन्न रस्ते
कुणाचे राज्य ह्या शहरात आहे?

----------------------------------------------------------
जयन्ता५२

गुलमोहर: 

सर्वांना धन्यवाद!
आपला,
जयन्ता५२

अभिनंदन ...........!
अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे

वाह सहीच एकदम.............!

मस्त गझल! अभिनंदन जयंतराव!!
मला मतला आणि रस्ते हे शेर विशेष आवडले...

उगा ना मागती ते घास अर्धा
युगांची भूक 'त्या' उदरात आहे

फारच सुंदर गझल आहे.अभिनंदन

Pages