शब्दपुष्पांजली-मला आवडलेले गोनीदांचे पुस्तक- कुणा एकाची भ्रमणगाथा

Submitted by अमेय२८०८०७ on 28 February, 2016 - 05:25

"ब्याऐंशी - एकशेबेचाळीस गुणोत्तराची उत्कट भ्रमणगाथा"

देहरचना आणि शरीरतत्त्वाची मूळ मूस एक असली तरी प्रत्येक आयुष्य म्हणजे मर्ढेकर म्हणतात तसे 'हर गार्डाच्या न्याऱ्या शिट्टीसारखे' वेगवेगळे. प्रत्येकाची चित्तरकथा आणि भ्रमणगाथा निराळी. यामुळेच कदाचित प्रवासवर्णने आणि आत्मचरित्रे रस घेऊन वाचली जातात.

गोनीदांचे 'कुणा एकाची भ्रमणगाथा' मात्र आत्मचरित्र अथवा प्रवासवर्णन खचितच नव्हे. या पुस्तकाच्या बाजाला सर्वसामान्य नामाभिधान लावणे योग्य होणार नाही.

विपुल लेखन करणाऱ्या प्रथितयश लेखकांच्या काही-काही शब्दकृती निराळ्या हातांनी लिहिल्यासारख्या उतरलेल्या असतात. शेकडो कथा कवितांतील निवडक मोजक्या, जणू काही अंगची वीज लेऊन जन्मतात. ती वीज, तो आवेग वाचकाच्याही उरापोटात उतरतो आणि सर्व लख्ख उजळून टाकतो. अशावेळी लेखकाला निराळा सूर सापडला असतो. 'स्वामी', 'तुती' किंवा 'कैरी' कथेत जी एंना, 'सावित्री' मध्ये रेग्यांना, 'सारे प्रवासी घडीचे' मध्ये जयवंत दळवींना, 'फलाटदादा' कवितेत मर्ढेकरांना आणि 'भय इथले संपत नाही'मध्ये ग्रेसांना असाच सूर सापडलाय, आणखीही अनेक उदाहरणे असतील. भ्रमणगाथा माझ्यासाठी अशाच प्रतीचे निराळे पुस्तक आहे.

आईमुळे 'गोनीदा' आणि बाबांमुळे 'पुल' ही आमच्या वाचनफळीवरची आद्य दैवते. विशेषतः गोनीदांच्या लेखनाबद्दल बोलताना आईचा स्वर तिच्या स्पर्शासारखाच एकदम मऊसूत होऊन जात असे. त्या दिवसांत विकतची पुस्तके ही अपूर्वाई असल्याने मोजकीच पुस्तके घरी होती. ग्रंथालयातून गोनीदा घरी येत तेव्हा दोन दोन पारायणे झाल्यावरही मोठ्या मुश्किलीने पुस्तक परत करावेसे वाटे. वाचकाच्या डोक्यावर मायेने हात फिरवून गोष्ट सांगितल्यासारखी ती भाषा म्हणजे मला आपल्याच कोण्या वडीलधाऱ्याच्या मायेच्या बोलण्यासारखी वाटायची.

भ्रमणगाथा मात्र तेव्हा वाचले गेले नव्हते. आईच्याही बोलण्यात कधीच उल्लेख आला नाही. एका अर्थी बरेच झाले कारण हे पुस्तक उमजून वाचायला थोडी समज यायलाच हवी होती.

भ्रमणगाथेत लेखकाच्या हाती लेखणीऐवजी आरशाचा तुकडा आहे, असा भास मला नेहमी होतो. गोनीदांनी पानपानभर चमकते कवडसे उजळवून ठेवले आहेत आणि एकावर नजर ठरते तोच प्रकाश दुसऱ्या जागी स्थिरावतो.

पूर्वार्धात तो कुणी एक नर्मदापरिक्रमा करतो आहे हे उमजते आणि तो रेवामैयाच्या काठाकाठाने आपल्याला सोबत फिरवत जातो. परिक्रमा हेच मुळी कष्टाचे काम आणि नर्मदेकाठचा तो परिसरही काही फिरण्यास अनुकूल नव्हे, पण त्याने खूप वेदना भोगलेली आहे. मग ही परिक्रमा तरी तो का करतोय? यातून चित्तशुद्धी नक्की मिळणार आहे का? मुळात शरीरातून फुटून जगभर व्यापून राहिलेल्या या वेदनेचे आणि ती सोसत-नव्हे तिला आपलीशी करत- मुक्तिगामी यात्रेवर चाललेल्या त्याच्यासकट अनेकांच्या प्रवासाचे प्रयोजन काय? असे अनेक प्रश्न त्याला पडताहेत. शरीर क्लांत आहे, मनही कुठेतरी थकले आहे पण विचारशक्ती आणि निरीक्षण लख्ख आहे. सभोवताली पाहिलेले टीपकागदाप्रमाणे शोषून घेत त्यातून विचार प्रसवण्याची अनोखी संवेदना त्याच्याजवळ आहे. जगरहाटीचा उष्मा सोसूनही विनोदबुध्दी ताजी आहे. ग्रहण केलेल्या ज्ञानातून विवेकाचे सार काढण्याची प्रज्ञा त्याच्याअंगी आहे याचे मनोहारी दर्शन आपल्याला पूर्वार्धातून घडते. यातूनच त्याला पृथ्वीच्या सृजनशीलतेची भव्यता कळते, फत्तर फोडीत पुढे चाललेल्या माईच्या दुथडीचे अपार कौतुक वाटते आणि सृष्टीतील पंचतत्त्वांची नित्य नवे रूप धारण करणारी किमया बघून लीन व्हायला होते.

असे असले तरी अनेक वर्षांच्या धगीने त्याला दमवले आहे, प्रवासाची ओढ कमी झाली नसली तरी वाटेत विसाव्यासाठी कुठेतरी थांबावे याची सूक्ष्म जाणीव त्याचे अंतर्मन त्याला करून देते आहे. अनवाणी पायात बोचणाऱ्या काट्यांसोबत मनातलेही काटे त्याला हळूवार काढून टाकायचे असावेत. या भ्रमणातील पहिला महत्त्वाचा थांबा निश्चलपुरीच्या मठात त्याला गवसतो.

पुरीजींचा मठ संपन्न आहे, एका छोट्या संस्थानासारखा स्वयंसिद्ध आहे. खायप्यायची सुबत्ता, मूठभर ज्ञानाच्या अपेक्षेने हातीपायी सेवा करण्यास तत्पर असलेले सेवक आणि एकूण सुखासीन वातावरणात त्याला बरेही वाटते. जगाचा विपुल अनुभव घेतल्याने त्याच्या पुस्तकी ज्ञानाला व्यवहाराचे पाणी लाभले आहे ज्याने निश्चलपुरी आणि इतर सर्व दिपूनही जातात पण गावातल्या एका मुलीच्या सासरी पाठवणी करण्यावरून निर्माण झालेल्या वादंगामुळे चित्र बदलून जाते. निश्चलपुरींनी केलेला निवाडा, घेतलेली ठाम भूमिका आणि मुलीकडून (लक्ष्मी) सत्य काढून घेण्यासाठी त्याच्यावर टाकलेला विश्वास यामुळे त्याला त्यांच्याबद्दल जवळीक वाटू लागते आणि एका अल्पकालिक पण गहिऱ्या मैत्रिभावाचे दर्शन घडते. लक्ष्मी आणि निश्चलपुरींचा भूतकाळ, मठाचे महंतपद मिळाल्याने वैयक्तिक भावनांना द्यावी लागलेली तिलांजली या बाबीही वैश्विक वेदनेच्या अस्तराच्या एका वैयक्तिक धाग्यासारख्याच. म्हणजे त्याची गत पुन्हा, 'वेदना संपावयासी वेदनेला साकडे', अशीच. त्याच्या प्रभावाने निश्चलपुरी देखील ज्ञानयागासाठी परित्यागाच्या मार्गावर निघतात आणि कादंबरीचा पूर्वार्ध संपतो.

पट्टीच्या पोहणाऱ्याने काठाकाठाने सूर मारता मारता अचानक खोल पाण्यात जावे तसा पहिल्या ब्याऐंशी पानांचा पूर्वरंग संपल्यावर भ्रमणगाथेचा सूर अचानक पालटतो. इथून पुढची एकशेबेचाळीस पाने म्हणजे जीव ओवाळून टाकावा असा नात्याचा, सूक्ष्म तणावाचा आणि विफल अपरिहार्यतेचा चढता आलेख आहे.

परिक्रमा कुण्या एकाला नर्मदाकाठच्या लहान्या गावात आणून सोडते. तिथे त्याला, आपल्याला यशोदा भेटते आणि पुढे पुस्तकभर, मनभर यशोदाच व्यापून उरते. तिचे पहिले दर्शनच पोळल्यावर घातलेल्या फुंकरेप्रमाणे शीतल, सुखावणारे. ती करत असलेल्या आरतीच्या तबकातील निरांजनासारखे स्थिरज्योत, मंद आणि प्रकाशाचा विश्वास देणारे. काहीतरी देखणे तिथे वावरत आहे याची अनुभूती त्याला येते. यशोदेचा सहज वावर, साधाच पण कुशल स्वयंपाक आणि तिच्या वडिलांच्या पाठशाळेतील विद्यार्थ्यांविषयी तिचे ममत्व यामुळे त्याला रखरखाटातून जणू काही मरुद्यानात आल्याचा भास होतो.

खरेतर ही भेट अल्पजीवी ठरायची कारण एका दिवसाच्या विश्रांतीनंतर त्याला यशोदेच्या वडिलांसोबत बाहेर पडून परिक्रमा सुरू करायची असते पण इतक्या दिवसांच्या अवहेलनेचा बदला म्हणून शरीर ज्वराच्या रुपात बंड उभारते आणि यशोदा व पाठशाळेतील विद्यार्थी यांच्या ताब्यात त्याला सुश्रुषेसाठी देऊन यशोदेचे वडील प्रवासास निघून जातात.

सहवासाने त्याला यशोदेची निरनिराळी रूपे दिसू लागतात. माया हा तिचा सहजभाव असला तरी ती केवळ गृहकृत्यदक्ष एवढीच नाही. अकाली वैध्यव्याने तिच्या अस्तित्वाला करूणेची गहिरी डूब आहे आणि त्यातूनच कदाचित माया फुलली आहे. ती विदुषी आहे, शास्त्रपारंगत आहे, हजरजबाबी, संवादिनी आहे आणि जगाचा अनुभव फारसा नसला तरी उपजत चांगुलपणा वागवणारी आहे.

अशा स्थितीत त्याच्यासारख्या युवकाला जवळीक न वाटती तरच नवल. त्याला वाटणारे यशोदेचे आकर्षण, असे वाटत असल्याबद्दल त्याच्या मनाशी चाललेले प्रत्यही द्वंद्व आणि या सर्वाला यशोदेचा प्रतिसाद हे तरल संयतपणे लिहायला गोनीदांची नितळ शैलीच हवी.

त्याच्या आणि यशोदेच्या अस्फुट नात्याची काच एकदाही कुठे चरा न पाडता लखलखीत अभंग ठेवल्यामुळे कहाणीला खोल, लुभावणारी छटा प्राप्त होते. यशोदाने केलेली सेवा, संवादातून उमटणारे तिचे बहुश्रुत व्यक्तित्व, उरक आणि या सगळ्यांशी बिलगून आत आत वाहणारा दुःखाचा पाझर यामुळे यशोदा कधी आपलीशी वाटू लागते आणि भ्रमणगाथा केवळ मीची कहाणी न उरता यशोदेचीही कथा होते हे कळतच नाही.

या उत्तररंगात पुस्तक क्षणभर मिटून विचार करण्यासारखे अनेक क्षण येतात. त्याच्या उशीशेजारी मोगऱ्याची फुले पाहून त्याच्या मनात आलेले विचार, राजपूत स्त्रियांच्या जोहाराविषयी यशोदेने व्यक्त केलेली मते, तिचे रात्री येऊन पांघरूण सारखे करून जाणे, बागेतली सहल, नावेतला प्रवास आणि त्याच्याकरवी घडणारे भाष्य सगळेच समृद्धीचा शब्दोत्सव साजरे करणारे. कुणाचेही डोळे न दिपवता स्थिरतेजाने चमकणाऱ्या निळ्या ज्योतीसारखी गोनीदांची लेखणी आणि त्याची वाणी आपल्या मनाचा आसमंत झगझगीत करून जाते.

अखेरची अपरिहार्य ताटातूटही चटका लावणारी. जिथे प्रेमच अस्फुट अव्यक्त तिथे या ताटातुटीला चिरविरह तरी कसे म्हणायचे? त्यासाठी पुन्हा गोनीदांनी उद्धृत केलेल्या "यथा काष्ठं च काष्ठं च...."चाच आधार घ्यायचा. त्यातही ते म्हणतात तसा श्लोकाचा उत्तरार्ध अधिक बोचणारा. ती कुण्या एकाची बोच आपल्याही उरात टोचून घ्यायची आणि डोळे वाहत असतील तर वाहू द्यायचे, इतकेच वाचकाच्या हाती!

एकटेपणाचा भोग काही केवळ अनाथ निराधारांच्याच वाट्याला येतो असे नाही. रूढ अर्थी सर्व सुरळीत चाललेल्या आयुष्यालाही एकटेपणा निरनिराळ्या कारणांनी भोवत असू शकतो. असाच वैराण एकटेपणा वाट्याला आलेला तो कुणी एक आणि त्याची यशोदेसोबत व्यतीत केलेल्या सोनेरी क्षणांची भ्रमणगाथा सरूनही संपत नाही, मनात रुंजी घालतच राहते.

मर्ढेकर, ग्रेसांच्या संध्याकाळच्या कविता आणि भ्रमणगाथा या तीन पुस्तकांपासून मला फारसे लांब जाववत नाही. प्रत्येकवेळी वाचायची जरी नसली तरी ही तिन्ही पुस्तके अगदी थोडक्या दिवसांच्या फिरतीतही पिशवीत सोबत असतात, एरवी तर उशाजवळ असतात. निर्वेधपणे खेळण्यासाठी आई अगदी जवळ नसली तरी घरात, हाकेवर आजूबाजूला आहे हा विश्वास लहान मुलाला हवा असतो. मोठेपणी आयुष्याच्या लुटुपुटूच्या खेळाला निभावून नेण्यासाठी काहीतरी शुद्ध शुभ्रावर विश्वास ठेवावा लागतो. हाच विश्वास या तिन्ही पुस्तकांतून- विशेषतः भ्रमणगाथेतून- मला नेहेमी मिळत असतो.

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>त्याच्या आणि यशोदेच्या अस्फुट नात्याची काच एकदाही कुठे चरा न पाडता लखलखीत अभंग ठेवल्यामुळे कहाणीला खोल, लुभावणारी छटा प्राप्त होते. >>>>> हे अगदी पटल.खूप छान झाली लेखन.

अप्रतिम! शब्दच नाहीत माझ्याकडे! बहुतेक वाक्यांना अगदी अगदी असं झालं. ती आईची उपमा अगदी समर्पक.. माझ्या ही फार आधाराचं पुस्तक आहे हे!

काय जिवंत लिहिलंयस! पुनःप्रत्यय मिळाला.
मी मघाशी जिज्ञासाच्या लेखावर यशोदेच्या प्रेमात पडायला ती भाग पाडते असं म्हणाले, मला स्वतःलाच नंतर ते खुप बटबटीत वाटलं, कारण ती त्याहीपलिकडे कुठेतरी पोचवते, ते कुठेतरी तुझ्या लेखात सापडतंय Happy
तो कुणी एकही मला यशोदेइतकाच भावतो कारण तोही तितकाच नितळ आणि अस्पर्श आहे. इतकी उदंड भ्रमंती आणि वेदना सोसूनही कोणत्याही पुटापासून अस्पर्श. ते दोघेही परस्परपूरक होतात.
माझ्या वीसाव्या वाढदिवसाला ही भेट मिळाली होती, त्यावेळी वाचताना मी निराळ्याच जगात होते. परिस्थिती आजही निराळी नसते, मात्र अनेक अन्वयार्थ नव्याने उलगडत जातात. योग्य वयात भ्रमणगाथा हातात पडल्याचं समाधान आजही आहे.

अमेय फार सुंदर, डोळ्यातून पाणी काढलंस.

विशेषतः गोनीदांच्या लेखनाबद्दल बोलताना आईचा स्वर तिच्या स्पर्शासारखाच एकदम मऊसूत होऊन जात असे, वाह क्या बात है.

मन अगदी प्रसन्न होऊन गेले....समाधान एवढ्यासाठी की ज्यावेळी अमेयने गो.नी.दांडेकर हा विषय शब्दपुष्पांजलीसाठी घेतला त्याचवेळी तो किती खोलात जाऊन लेखाला देखणेपणाने कोरेल याची मला पक्की कल्पना होती. आता ते लिखाण वाचताना (तसेच त्यावर आलेले सुंदर प्रतिसादही...) जाणवते की दांडेकर हे लेखक अमेयच्या साहियप्रेमी जीवनात किती आणि कोणते महत्त्वाचे स्थान मिळवून राहिलेले आहे. त्याच्यासमवेत समोरासमोर बोलताना मर्ढेकर, ग्रेस, बोरकर कवींची ही त्रयी आणि लेखकात जी.ए. अटळपणे येत असतात हे मी जाणले आहे....आता जेव्हा पुन्हा भेटेन त्यावेळी निश्चित्तच गो.नी.दांडेकर संवादाचा विषय असेलच.

"...कुणा एकाची भ्रमणगाथा. हा कुणी एक स्वत:च्या आणि दुसऱ्यांच्या सुखदु:खांचा साक्षी होता.....' असे खुद्द गो.नी.दांडेकरांनी म्हटलेले आहे...मानवी जीवनाची हीच योग्य अशी व्याख्या होय....त्याना जे काही दिसले ते भ्रमणगाथेतून या व्याखेला शोभेल अशाच वर्तनाचे लिहिले आहे...अमेय पंडित याना त्या मांडणीतून तसेच जाणवल्याचे त्यांच्या लिखाणावरून स्पष्ट होतेच.

अगदी जपून ठेवावा असा लेख झाला आहे, अमेय.

अगदी जपून ठेवावा असा लेख झाला आहे, अमेय.>>>अगदी मला वाटत होत तेच नेमकं अशोकजी बोलून गेलेयत . अमेय, तुमच्या या अत्यंत आत्मियतेने लिहलेल्या लिखाणातुनच जाणवतंय की गोनीदांच्या या पुस्तकाच्या वाचनाचेच हे संस्कार आहेत जे या लेखाच्या शब्दा शब्दातून नर्मदेच्या प्रवाहासारखे ओसंडतायात अगदी तुमचाही नितळ आत्मस्पर्श झाल्यासारखे. धन्यवाद ह्या नेमक्या शब्दांत लिहिलेल्या लेखाबद्दल.

क्या बात है अमेयराव .... एखादी भावविभोर करणारी सुंदर, तरल कविताच वाचतोय असा नितांतसुंदर अनुभव देणारा रेशीमतलम लेख ...

कौतुक करायला शब्द अपुरे पडताहेत ... Happy

अप्रतिम लिहीलय.
यशोदा भेटते आणि पुढे पुस्तकभर, मनभर यशोदाच व्यापून उरते. >> +१

कॉलेजला असतांना अगणित पारायणं केली भ्रमणगाथेची. 'त्या'च पुढे काय झालं? परिक्रमा पूर्ण केली का? त्याला परत यशोदा भेटली असेल का असे बरेच प्रश्न पडले होते. मग पुढचं पर्व आहे का याचा खूप शोध घेतला पण त्यावेळी कुठेच नाही माहिती मिळाली .

अतिशय सुरेख चित्रण केलस अमेय.
'कुणा एकाची... मी वाचले होते ते दुसर्‍याच कारणासाठी. हाती लागतील तितकी नर्मदा परिक्रमेवरची पुस्तके झपाटुन वाचत होते त्या काळात. तेव्हा अचानक हे पुस्तक हाती आले. काहीतरी वेगळ्या अपेक्षेने हे पुस्तक वाचायला घेतले.
एकदम अध्यात्मिक पातळीवरुन एका तरल भावविश्वात प्रवेश करणे अवघड गेले खर तर... पण खरोखर तु म्हणतोस तस ती 'यशोदा' पानभर, पुस्तकभर व्यापुन उरते.
तोपर्यन्त गोनिदांबद्दल शालेय पाठ्यपुस्तकात वाचलेले आणि गड किल्ले भ्रमन्ती करणारा एक थोर साहित्यिक एवढीच तोन्डओळख. . नाही म्हणायाला 'माचिवरला बुधा' एका बैठकीत वाचुन काढले होते.
'मभादि'चे विषय मिळाल्याबरोबर लायब्ररीतुन धुंडाळून गोनीदांचे 'दुर्गभ्रमन्ति' वाचायला घेतले आणि जणु त्यांची रोजनिशीच हाती लागली अस झाले. प्रांजळपणे सांगायचं तर आता कुठे या महान, ऋषीतुल्य व्यक्तीमत्वाची खरी ओळख होतेय. त्यांच्या भ्रमंतीचा, गड-किल्ल्यांविषयी तळमळीचा, साहित्याचा आवाका आणि इतिहासाची जाण सगळच लक्षात येतय.
दुर्गभ्रमंती नंतर ' कुणा एकाची… ' पुन्हा एकदा वाचायला घेईन आणि तुझ्या अ‍ॅन्गलने वाचून काढेन.

सुरेख लिहिले आहे. खरे तर गोनीदांच्या इतर पुस्तकांच्या तुलनेने मला भ्रमणगाथा इतके आवडलेले नाही, तरीही हे लिखाण आवडले. यशोदेची व्यक्तीरेखा हेच ह्या पुस्तकाचे बलस्थान.

रुखातळी/ वाघरुवर कोणी लिहिलेय का? शोधते.

माझं अत्यंत आवडतं पुस्तक!! लेख फार सुंदर जमला आहे.
मई पहिल्यांदा कॉलेजमध्ये असताना वाचले होतं पण खरंतर फारसं झेपलं नव्हतं. बर्याच वर्षानंतर नवर्याला वाचायला मिळालं आणि सहज म्हणून मीही परत प्रेग्नंसीमध्ये वाचलं..अक्षरशः झपाटून गेले. नंतर लेकीचे नाव ठरवायची वेळ आल्यानंतर आम्हा दोघांना " रेवा" सोडुन दुसरे कुठलेही नाव पसंत पडलेच नाही! Happy

अप्रतिम लेख झाला आहे ! तुमची शब्दयोजना, उपमा अतिशयच सुंदर आणि चपखल आहेत ! परत परत सावकाश वाचणार. मी गोनीदांचे हे पुस्तक वाचले नाही आहे पण तुमच्या लेखामुळे पुस्तकाचा आशय पोहचला. इतकं सुंदर विवेचन फार दिवसांनी वाचलं.
<एखादी भावविभोर करणारी सुंदर, तरल कविताच वाचतोय असा नितांतसुंदर अनुभव देणारा रेशीमतलम लेख ...कौतुक करायला शब्द अपुरे पडताहेत > +१

फार सुंदर लेख, अमेय. म्हणजे, हे पुस्तक तर मी अनेकदा वाचले आहेच, पण तुमचे रसग्रहण ही त्याच दर्जाचे झाले आहे...अगदी संयत, सतत पडणार्‍या तेलाच्या धारे सारखे...... आवाजी नसलेले आणि प्रवाही.....
किंबहुना हे पुस्तक अधिक चांगल्या तर्‍हेने समजायला तुमचा हा लेख मदत करेल. वीणाताईंना का नाही फॉर्वर्ड केली लिंक?
लिहीत रहा....समीक्षा ही लिखाणाचा आरसा आहे, म्हणून अधिकच तोलाची, साजूक व मर्यादाशील अपेक्षित असते.......