न सांगितलेली प्रेमकहाणी....

Submitted by अजय चव्हाण on 28 February, 2016 - 03:54

न सांगितलेली प्रेमकहाणी....

तिला पहिल्यांदा कधी पाहीलं हे आता आठवतं नाही...पण ती दिसायची नेहमीचं...कदाचित तिची नि माझी वेळ एक असावी...मला अजुनही आठवतंयं जेव्हा पहिंल्यादा मला तिच्याबद्दल काहीतरी जाणवलं...

मी नेहमीसारखाच ठराविक रांगेत मेट्रोची वाट पाहत घाटकोपर स्टेशनला उभा होतो... सकाळची मस्त प्रसन्न वेळ, हवेतला गारवा थोडासा अंगाला झोंबतोय ...आजुबाजुला थोडी हालचाल आहेच पण त्यात इतरवेळी असते तशी चढाओढ नाहीये...एकदम शांतही नाहीये की, एकदम गडबडही नाहीये..कानातल्या हेडफोनमध्ये माझ्या आवडत्या गाण्याचे "आओगे जब तुम साजना, अंगना फुल खिलेंगें" सुर मनात फिल करतोय..सहज बाजुच्या रांगेत लक्ष जातं..समोरचं असलेल्या दोन इमारतीच्या फटीतुन वाट काढून कोवळी किरणे फलाटाच्या कडेला येऊन धडकू पाहतायेत...त्यातलीच काही किरणे तिच्या आंबुस- पिवळ्या पंजाबी सुटवर सांडलेली...मुळात पिवळा असलेला तिचा पंजाबी सुट सांडलेल्या किरणांमुळे सोनेरी भासतोय आणि हातभर असलेल्या गर्दीत ती जरा जास्तच उठून दिसतेय...हेच कारण असावं माझं लक्ष तिकडे जायला..ओढणी केसांवरून ओढून गळ्याभोवती व्यवस्थित सरकवलेली, एका हातात मॅचिंग पर्स, दुसर्या हातात मोबाईल, मी तिचं निरीक्षण करू लागलो...
मेय बी तिला कळलं असावं... तिन झटकन वळून माझ्याकडे पाहीलं...बस् हीच ती वेळ तिची नजर माझ्या नजरेत कैद होण्याची..त्या नजरेत नक्कीच काहीतरी होतं.. काय होतं ते माहीत नाही पण मी वाहवत जात होतो...त्या सुरांचे परिणाम की, आणखी कसले ते नाही कळलं तेव्हा पण मनाच्या अंगणात नक्कीच तेव्हा फुले फुलली होती...

एव्हाना मेट्रो आली..आणि नेमकं मला तिच्या समोरच्या सीटवर जागा मिळाली...मी अजुनही तिच्याकडे पाहतोय..हे तिला कळतं होतं.. ती जाणुनबुजुन दुर्लक्ष करत होती....केसांवरची ओढणी तिने काढून केस मोकळे केले..अहाहा!...काय केस आहेत तिचे अगदी " इन जुल्फे के घने सायें में मै जिंदगी बिता लू "इतपत म्हणण्यापर्यंत...मी उगाचच घने सायें में हरवल्यासारख्या तिच्याकडे पाहतोय...गोरा उभट चेहरा,काळेशार पाणीदार डोळे, हनुवटीच्याखाली असलेला लोभस तिळ,खरंच ही म्हणजे माझ्या स्वप्नातलीच....इतकी सुंदर बरं नुसती सुंदरच नाही तर कसालाही कृत्रिम डामडौल नाही, राहणीमान एकदम साधं, कुठेच कसलाच "मी आहे" हा दिखावा नाही..खरंतरं मगाशी मेय बी मी तिच्या रूपाकडे आकर्षित झालो असेल पण खरंतरं तिच्या साधेपण्याच्या प्रेमात मी पडलो होतो...
मी एकटक तिच्याकडे पाहत कसलातरी विचार करतोय हे ती मोबाईल समोर धरून चॅटिग करत असल्याचा आव आणत पाहत होती....इतक्यात "मरोळ नाका स्टेशन "अशी अनाऊसमेंट झाली तसा मी भानावर आलो आणि घाईघाईतच उतरलो...सरकत्या जिन्यावरून उतरत असताना वेळ आणि तो मेट्रोचा तिसरा डबा ह्याची नोंद माझ्या मनाने केली...मग त्याच वेळेला त्याच रांगेत बरेच दिवस "ती " दिसण्याची वाट पाहीली...पण नाहीच दिसली ती कधी....कदाचित कुठेतरी वरच्याला हे मंजुर नसावं असं समजुन मी ही तिचा विषय सोडून दिला तसंही म्हणतातच ना " मनासारखं झालं तर चांगलच आहे आणि नाहीच झालं तर अजुन चांगल आहे कारण ती ईश्वराची ईच्छा असते"

माझ्याबाबतीत नेहमी असं का होतं हा प्रश्न मला नेहमीच पडतो...म्हणजे बघा ना एखादी गोष्ट जेव्हा मला हवीहवीशी वाटते आणि ती मी मिळवण्याचा अटोकाट प्रयत्न करतो तेव्हा ती मला कधीच मिळत नाही पण तिच गोष्ट माझ्या ध्यानीमनी नसताना किंवा अपेक्षाच नसताना अलगद अगदी सहजतेने भेटते उदाहरण द्यायचं झालं तरं त्यादिवशीचीच गोष्ट तिच्या प्रेमात पडल्यानंतर तिला परत पाहण्यासाठी खुप प्रयत्न केला मी जवळपास साडेतीन आठवडे मी त्याच वेळेला त्याच रांगेत तीची वाट पाहीली तेव्हा नाही दिसली मला कधी ती..पण त्यादिवशी जेव्हा तिची वाट पाहणं मी सोडून दिलं होतं तेव्हा नेमकी मला "ती" दिसली...खरंतरं माझ्या मनातलं प्रेमाचं गुलाब कोमेजून गळूनच पडणार होतं तेवढ्यातच गारगार पाण्याच्या शिडकाव्याने ते पुन्हा टवटवीत झालं....मनात पुन्हा एक आशा निर्माण झाली...कदाचित त्या वरच्या रबला पण हेच हवं असेल...

सुट्टीचे दिवस वगळता हल्ली "ती" रोजच दिसते..मी नेहमीच पाहतो तिला एकटकं..तिच्याकडे पाहील्यानंतर हरखुनच जातो मी..आजुबाजुचा गोंगाट कानात घुसतचं नाही...कानात गुंजतात तेव्हा फक्त " आओगे जब तुम साजना अंगणा, फुल खिलेंगे" ह्या गाण्याचे सुर...मनातलं गाणं सालं हे संपतचं नाही...कधी कधी असं पिसासारखं हलकं हलकं वाटत...आकाशात उडतोय असा भास होतो...

" नैना तेरे कजरारे है, नैनो पे हम दिल हारे है..
अंनजाने है तेरे नैनो ने वादें किए कही सारे है"

जेव्हा जेव्हा माझे डोळे तिच्याकडे बघतात...तेव्हा तेव्हा माझे डोळे तिच्या डोळ्यांना हेच सांगत असतात..
तिला डे वनपासून माहीतेय मी तिच्याकडे पाहतो ते...
तीही माझ्याकडे पाहते...बोलत काहीच नाही, हसतही नाही, ओळख असल्याच्या खाणाखुणाही नाही, पण तिचे डोळे माझ्या डोळ्यांना चांगले ओळखात....हे तिलाही माहीतेय ...शी कान्ट डिक्लाईन दॅट..

एक वर्ष झालं डोळ्यांनीच पाहतोय तिला...कधी कधी वाटतं समोर जाऊन सांगावं तिला मनातलं सारं...पण भीतीही वाटतेय..कसं सांगाव आणि कुठे सांगावं हा ही प्रश्न आहेच..पण प्रयत्न करायला काय हरकत आहे...अखेर थोडीशी हिंमत करून मी विचारायचं ठरवतो पण त्याअगोदर एक करायला हवं..तिचंसुद्धा मन बघायला हवं त्या अनुषंगाने दुसर्या दिवशी मी तिच्यासमोर जातचं नाही...ती त्याच रांगेत उभी आहे..तिलाही मला पाहण्याची सवय आहे का नाही हे पाहायचं...जसं तिला उशीर झाला की, मी थांबतो ती थांबते का हे बघायला हवं...हा विचार करून मी लांब उभं राहून ऑब्जर्व करतोय..बघु आता मला शोधते का..ती खरोखर मला शोधतेय..मला उशीर झाला असेल असं समजुन तिने चक्क दोन मेट्रो सोडल्या..

मला माझ्या प्रश्नाचं उत्तर न विचारताचं मिळालं..खुप आनंदी होतो मी त्या दिवशी..ह्रद्याच्या खिशात ढग भरले होते तेव्हा...एक उंच उडी मारून "याहु" करावसं वाटलं पण सावरलं स्वतःला...उद्या विचारूच असं ठरवून मी माझा प्रपोज एक दिवस पुढे ढकलला...

दुसर्या दिवशी मस्त एक गुलाब घेऊन त्याच रांगेत उभा राहीलो तिची वाट पाहतं....

ती नाही आली....

1 वर्ष 3 आठवडे 4 दिवस झाले...ती परत कधी दिसलीच नाही...एका पाऊलावर जग होतं माझं..एक पाऊलही मला पुढे टाकता आलं नाही...तेव्हा विचारलं असतं तर??
ह्या गोष्टी आता फक्त जर तरच्या झाल्या...आता काहीच अर्थ नाही ह्या गोष्टीला...तिला घेतलेलं ते गुलाब अजुन तसंच आहे माझ्या त्या कवितेच्या पानांवर....कोमजलं जरी असलं तरी त्यातल्या भावना अजुन तशाच आहेत न कळवलेल्या आणि त्या कवितेचे शब्देही आहेत तसेच तुझ्या आठवणीतले....

"एक मंद झुळुक कुठनशी येते..मन वाहवत जाते...नकळत एक नवे स्वप्नांकुर फुलते..मन उंच उंच भरारी घ्यायला लागते.. रोज एक नवी आस लागून राहते..कुठेतरी ती वाट संपते आणि आठवणीच्या पाऊलखुणा ठेऊन मन पुन्हा परतते..."

समाप्त....

(कथा इतरस्त पुर्वप्रकाशित)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह...

लिखाणाबद्दल कॉमेंट करायच्या मनस्थितीत नाही..
माझ्या केसमध्ये त्या अनामिकेचे लग्न ठरले आणि झालेही..
ज्या दिवशी ते ठरले असावे त्याच्या दुसर्याच दिवसापासून ती माझ्या नजरेला पलटून नजर द्यायची बंद झाली होती.. तेव्हाच मला कल्पना आलेली, मी बोलायला उशीर केला.
मलाही लिहावेसे वाटतेय.. पण आज नाही ...

या लिखाणाबद्दल आणि जुन्या आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद मित्रा.. तुमच्या भावना छान उतरल्या आहेत Happy

भेटेल हो परत, तिने दोन गाड्या नक्की तुमची वाट पाहत सोडल्या की गर्दी म्हणून? Happy
लिंक इन वर गेट ईन्ट्रोड्यूसड प्रकार असतो तसं काही तुम्हाला नॅ चरली करता आलं तर नुसतं बघत बसावं लागणार नाही असं मनात वाटून गेलं.

"एक मंद झुळुक कुठनशी येते..मन वाहवत जाते...नकळत एक नवे स्वप्नांकुर फुलते..मन उंच उंच भरारी घ्यायला लागते.. रोज एक नवी आस लागून राहते..कुठेतरी ती वाट संपते आणि आठवणीच्या पाऊलखुणा ठेऊन मन पुन्हा परतते..."

मस्त...लई.....आवडले.

"एक मंद झुळुक कुठनशी येते..मन वाहवत जाते...नकळत एक नवे स्वप्नांकुर फुलते..मन उंच उंच भरारी घ्यायला लागते.. रोज एक नवी आस लागून राहते..कुठेतरी ती वाट संपते आणि आठवणीच्या पाऊलखुणा ठेऊन मन पुन्हा परतते..."

अप्रतिम..!!
खूपच सुंदर..

छान आहे कथा!

युरेक्का युरेक्का