'स्मरणे गोनीदांची' - 'जाणता कलावंत' - डॉ. श्रीराम लागू

Submitted by संयोजक on 26 February, 2016 - 23:24

गोनीदांचं हे जन्मशताब्दी-वर्ष. यंदाचा मायबोलीवर साजरा होणारा मराठी भाषा दिन गोनींदांना समर्पित केला आहे.

गोनींदांनी सर्व साहित्यप्रकारांमध्ये अतिशय सहजतेनं मुशाफिरी केली. 'गाडगेबाबांमुळे मी सहज लिहायला आणि बोलायला शिकलो' असं सांगणार्‍या गोनीदांच्या कादंबर्‍या, प्रवासवर्णनात्मक आणि आत्मचरित्रात्मक लेखन जितकं सकस, तितकीच ताकदीची आहेत त्यांनी लिहिलेली नाटकं. 'जगन्नाथाचा रथ', 'काका माणसात येतो', 'वनराज सावध होतात', 'कुऱ्हाडीचा दांडा', 'संगीत राधामाई' ही गोनीदांनी लिहिलेली नाटकं मराठी साहित्याचा अमोल ठेवा आहे.

'जगन्नाथाचा रथ' हे गोनीदांचं पहिलं नाटक. पुण्याच्या 'प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन', अर्थात पी.डी.ए.नं ते रंगमंचावर सादर केलं होतं. नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागू यांचा या नाटकाशी आणि नाटककाराशी निकटचा संबंध होता.

गोनीदांची भाषेवर असलेली पकड, ग्रामीण जीवनाबद्दलचं त्यांचं ज्ञान, पहिल्या नाटकाच्या वेळी पदरी पडलेली उपेक्षा यांचा मागोवा घेत या नाटकाच्या निर्मितीमागची आणि सादरीकरणाची कथा सांगितली आहे डॉ. श्रीराम लागू यांनी.

GoNiDa1.JPG

१९५५मध्ये मुंबई सरकारनं हौशी नाटयसंस्थांसाठी नाटयस्पर्धा जाहीर केल्या. अवघ्या महाराष्ट्रातल्या हौशी नाटयसंस्थांसाठी त्या स्पर्धा खुल्या होत्या. पी.डी.ए.चा हातखंडा खेळ 'उद्याचा संसार' स्पर्धेकरिता करायचं ठरलं!

अंतिम फेरीचा निकाल लागून पी.डी.ए.च्या 'उद्याचा संसार'ला पहिलं बक्षीस (न विभागता!) मिळालं होतं.

आम्ही प्रेक्षागृहात न बसता स्टेजवर विंगेतच उभे होतो. मी आपला उगीचच. भालबांच्याबरोबर... त्यांना आधार म्हणून. टाळ्यांच्या गजरात भालबा बक्षीस घेऊन आले आणि आम्ही जायला निघणार, तेवढ्यात ध्वनिवर्धकावरून जाहीर करण्यात आलं की, सांघिक पारितोषिकांबरोबरच, वैयक्तिक अभिनयासाठी दहा पारितोषिकं देण्याचं सरकारनं ठरवलं आहे आणि पहिलंच नाव माझं पुकारलं गेलं! एकशे एक रूपये रोख आणि रौप्यपदक!

मी चांगलाच गोंधळलो - पण स्टेजवर जाऊन बक्षीस घेतलं. टाळ्यांचा कडकडाट वगैरे काही झाला नाही. किंवा झाला असला, तर मला ऐकू आला नाही. पण बक्षीस मिळाल्याचं मला आश्चर्य वगैरे मात्र वाटलं नाही. असं वाटलं की, परीक्षकांना अभिनयातली जाणकारी चांगलीच दिसतीय! पण मला ती वाईट सवयच लागली - अभिनयाकरता पारितोषिकं मिळवण्याची. अगदी म्हातारपणीदेखील ती सवय काही सुटलेली नाही!

पुढच्या वर्षीच्या स्पर्धेसाठी आम्ही खूप उत्साहानं शिरवाडकरांचं 'दूरचे दिवे' नाटक दिलं. आम्हीही नेहमीप्रमाणे खूप मेहनत करून प्रयोग केला. अंतिम फेरी तर सहज गाठली - पण अंतिम फेरीत मात्र यशानं आम्हांला हुलकावणी दिली.

पुढच्या वर्षी स्पर्धेला काय करावं, याचा विचार चालू असताना एक दिवस अचानक माझ्या घरच्या पत्त्यावर एक पोस्टकार्ड आलं -

'कालच 'आंधळ्यांची शाळा' पाहिलं. देखणं नाटक. काय देखणा मनोहर, अण्णासाहेब. बिंबाची वेदना फार गहिरी. रडूं अगदी आवरेना. असं वाटलं, मी तुमच्याकरता काही लिहावं - तुम्ही ते करावं, जमेल का? पाहूं या!

तुमचा,
गो. नी. दांडेकर'

वर तळेगावचा पत्ता होता. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मराठीतला एवढा मोठा कादंबरीकार आपल्याकरता नाटक लिहू इच्छितो - आपण ते करू शकू, असा विश्वास प्रकट करतो!

दांडेकरांचं खूप साहित्य वाचलं होतं - खूप आवडलं होतं. पण त्यांचा प्रत्यक्ष परिचय असण्याचं काही कारणच नव्हतं. मी ताबडतोब पत्र घेऊन भालबांकडे धावलो. भालबाही खूश झाले. लगेच आम्ही दांडेकरांना पत्र टाकलं -

'तुम्ही जरूर आमच्याकरता लिहा. आम्ही आनंदानं आणि अभिमानानं ते करू!'
अशा अर्थाचं.
उलट टपाली दांडेकरांचं पत्र आलं.
'माझ्याकडे एक नाटक लिहून तयार आहे. अमुक तारखेला तळेगावला आलात, तर वाचून दाखवीन. कोण कोण येता, कळवा.'
ठरलेल्या तारखेला भालबा, पाळंदे, जया आणि मी सकाळची गाडी पकडून तळेगावला, दांडेकरांचा पत्ता शोधीत त्यांच्या घरी हजर.

खेडेगावातलं स्वच्छ, नीटनेटकं, टुमदार घर होतं. शेणानं स्वच्छ सारवलेल्या जमिनीवर एक सतरंजी टाकून, तीवर एका बैठया डेस्काशी बसून दांडेकर काही लिहीत होते. धोतर आणि अंगात फक्त बंडी.

आम्हांला पाहून एकदम उडी मारून उठले आणि, "यावं.. स्वागतम्" असं म्हणून अगदी खूप परिचय असल्यासारखे मोकळे, खळखळून हसले.

आमच्या डोक्यावरचं ओझं एकदम उतरलं! एवढया मोठया लेखकाशी काय बोलावं, कसं बोलावं, या विचारानं आम्ही खरे दबलेलेच होतो. पण दांडेकरांनी क्षणार्धात आमचा प्रश्न सोडवून टाकला. ते स्वतःच खूप बोलत राहिले - आम्ही ऐकत राहिलो. आम्ही तिथं घरीच बसून नाटयवाचन करू शकलो असतो, पण दांडेकर म्हणाले,
'पुण्यात तुम्ही घरी बसून वाचता - तळेगावात, रानात जाऊन वाचायचं असतं!'
आम्हांला कल्पना फारच आवडली.

चहा-पाणी करून आम्ही सगळे थोडया वेळात बाहेर पडलो. दांडेकर तसेच धोतर आणि बंडीत! रान घरापासून फार दूर नव्हतंच. एका मोठ्या झाडाची सावली बघून आम्ही सगळे वर्तुळ करून खाली बसलो मांडी घालून आणि दांडेकर वाचन करू लागले.
नाटकाचं नाव : 'जगन्नाथाचा रथ!'

दांडेकरांचं वाचन म्हणजे एक उत्तम एकपात्री नाट्यप्रयोगच तो! अतिशय रंगून जाऊन दांडेकरांनी नाटक वाचलं.
नाटक मावळातल्या एका खेडयात घडणारं... नाटकात बख्खळ वीस-बावीस पात्रं. प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी. कुणी भोळसर ग्रामीण, कुणी इरसाल ग्रामीण, कुणी मुसलमानी ग्रामीण, कुणी बेरड ग्रामीण, कुणी अगदी लाचार, करूणास्पद ग्रामीण, कुणी स्वच्छ, सात्विक, ब्राह्मणी ग्रामीण, कुणी इरसाल, धूर्त, शहरी - अशी नाना पात्रं दांडेकरांनी आपल्या वाचनानं इतकी जिवंत केली की, ते सबंध नाटक त्याच्या सगळ्या बारकाव्यांसकट मूर्तिमंत डोळ्यांपुढं उभं राहिलं. आपल्या मनाच्या रंगभूमीवर प्रयोग घडणं म्हणजे काय, ते कळलं! खेडयातलं सगळं वातावरण, तिथली धूसर पहाट, रणरणती दुपार, काळीकुट्ट अंधारी रात्र, खेडयातली चंद्रमौळी घरं, बाकडी टाकलेलं खेडयातलं चहा-चिवडयाचं हॉटेल, त्यात वावरणारी ती सारी माणसं, त्यांच्या रंगभूषेसकट, वेशभूषेसकट, त्यांच्या उठण्या-बसण्या-चालण्यासकट, त्यांच्या प्रत्येकाच्या विशिष्ट लकबींसकट - पार जिवंत होऊन मनाच्या रंगमंचावर खेळली! दांडेकर उत्तम साहित्यिकच नव्हेत, तर अप्रतिम अभिनेता आहेत, याची ग्वाही मिळाली.

पुढं ते आमच्या प्रयोगात गावातल्या फकिराचं कामही करायचे. मग आता प्रयोग बसवायचा, म्हणजे काय? जे नाटक एवढया बारकाव्यांसह आपल्याला इतकं लख्ख दिसलेलं आहे, ते नुसतं हाडामांसाची माणसं घेऊन, नेपथ्य घेऊन, दिवे लाऊन स्टेजवर उभं करायचं. बस्स!

नाटक मला आणि पाळंदेला फार आवडलं. भालबा तेवढे उत्साही नव्हते - पण त्यांना पटवून देणं फार अवघड नव्हतं. आम्ही प्रथमच नवंकोरं, पूर्वी कोणीही न केलेलं नाटक करणार होतो, हा महत्त्वाचा मुद्दा होताच.

पुण्याला येऊन आम्ही लगेच नाटकाच्या तयारीला लागलो.स्पर्धेला तसा अवकाश होता; पण इतक्या पात्रांचं नाटक बसवायचं म्हणजे तालमी खूप लागणार होत्या; आणि प्रयोगाला सफाई येण्याच्या दृष्टीनं स्पर्धेआधी काही प्रयोग झाले, तर हवे होते.

जवळ-जवळ तीन चार महिने तालमी झाल्या.

भालबांनी तालमी अगदी कसून घेतल्या. या नाटकाच्या निमित्तानं खूप नवीन मंडळी येऊन पी.डी.ए.ला मिळाली. त्या वर्षी माझ्या काही व्यावसायिक अडचणींमुळं मी फार मोठं काम नाटकात घेऊ शकलो नव्हतो. अगदीच छोटी भूमिका - 'भुजबळ' माझ्याकडे होती. नाटकाच्या शेवटच्या अंकात शेवटच्या प्रवेशात फक्त पाच-सात मिनिटं 'भुजबळ'चं काम आहे. त्यामुळं मला स्वतःला तालीम फार करायला लागायची नाही. पण जेवढा वेळ मिळेल, तेवढा वेळ मी तालमीला जाऊन बसायचो. भालबांच्याबरोबर मावळात तिथल्या माणसांचं, घरांचं, रस्त्यांचं, वडाच्या पाराचं निरीक्षण करायला जायचो. दांडेकर आम्हांला घेऊन जायचे.

या सगळ्यामुळं सबंध नाटक मला जवळजवळ पाठ झालं - सगळ्या पात्रांच्या भूमिका मनातल्या मनात मी बसवून टाकल्या! याचा मला पुढं खूपच उपयोग झाला. कारण नाटकाचे खूप प्रयोग झाले; आणि या ना त्या कारणानं कुणी एखादा नट काम करू शकत नसला, की मी त्याचं काम करायचो. एकूण सात भूमिका मी या नाटकात वेळोवेळी केल्या! भुजबळ, सरपंच, लका, सका, हिंमतलाल, भिवाप्पा आणि शेवटी अण्णा! नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा अभ्यासक्रम पुरा केल्याचं पुण्य मिळालं एकाच नाटकात!

मनात योजल्याप्रमाणे स्पर्धेच्या आधी चारएक प्रयोग झाले आणि ते खूप सफाईदार झाले. भालबांनी हा प्रयोग फारच सुरेख बसवला होता.

भालबांच्या वास्तवदर्शी दिग्दर्शन-शैलीचा हा कळस होता, असं म्हणायला काहीच हरकत नाही. विशेषतः खेडूत मंडळींचे प्रवेश तर फारच खरेखुरे वाटत. एका वेळी पंधरा-वीस पात्रं रंगमंचावर असत - पण त्यांचं बोलणं, चालणं, बसणं, त्यांची भांडणं-मार्‍यामार्‍या, त्यांनी दंगा करून हॉटेलची केलेली मोडतोड - सारंच फार जिवंत वाटे.

या नाटकाचा आशय अगदी साधा, सोपा, सहज चिमटीत सापडण्यासारखा होता, हे जरी खरं असलं तरी त्याने माझ्या या विधानाला उणेपणा येण्याचं कारण नाही.

स्पर्धेत आम्ही नेहमीप्रमाणे अंतिम फेरी सहज गाठली. (जणू पुणे केंद्रावर आम्हांला कुणी स्पर्धकच नव्हता.) या नाटकाचं नेपथ्याचं सामान खूपच होतं आणि ते संस्थेनं स्वतःच्या खर्चानं तयार करून घेतलं होतं. ते सामान मुंबईला नेण्यासाठी ट्रकच करावा लागणार होता. त्याचा खर्चही मुंबईहून मंजूर झालेला होता. पण नाटकात पात्रं खूप होती. स्पर्धेच्या नियमाप्रमाणे जितक्या माणसांचा प्रवासखर्च मंजूर झाला होता, त्यापेक्षा नाटकाबरोबर तीन माणसं अधिक होती. मग ट्रकच्या भाडेखर्चाच्या नियमांतल्या एका नियमाचा आम्ही फायदा घ्यायचं ठरवलं. ट्रकमधल्या सामानासोबत तीन 'अधिकृत हमाल' न्यायला परवानगी होती. त्या तीन हमालांना रजा देऊन मी, सदा नाडकर्णी आणि राम खरे या तिघांनी हमाल व्हायचं ठरवलं! ट्रक भल्या पहाटे अंधारातच सामान घेऊन पुण्याहून मुंबईला, अंतिम फेरीच्या प्रयोगासाठी निघाला. सामानाचं वजन फार नसलं तरी आकारमान बरंच होतं. ट्रक भरून वर चांगलाच उंच ढिगारा झाला. आम्हांला तिघांना बसता यावं, म्हणून ढिगारा वर निमुळता केला होता. आम्ही तिघं वर चढून, घोडयावर बसतात, तसे दोन बाजूला पाय टाकून, एकामागे एक असे बसलो. ट्रक पुण्याच्या बाहेर पडेपर्यंत रस्त्यावरच्या दिव्यामुळं थोडंफार दिसत होतं, पण पुण्याच्या बाहेर पडल्यावर अंधार गुडूप झाला. आम्ही जीव मुठीत धरून बसलो होतो.

सर्वांत पुढे बसलेला सदा नाडकर्णी एकदम किंचाळला,
'फांदी!' आणि एकदम खाली वाकला.
किंकाळी ऐकून मीही फटकन खाली वाकलो...
पुढं गेल्यावर मागे वळून पाहिलं, तर रस्त्यावरच्या झाडाची एक जाड फांदी चांगलीच खाली आली होती. खाली वाकलो नसतो, तर कपाळमोक्ष व्हायचा! ट्रक चालवणाराला काहीच पत्ता नव्हता.

सकाळी केळेवाडीला साहित्य संघमंदिरात पोचलो. हमाल आम्हीच असल्यानं सगळं सामान ट्रकमधून खाली उतरवलं. तोपर्यंत सकाळच्या गाडीनं बाकीची मंडळी येऊन पोचली. कपडयांची पेटी उघडली, तर लक्षात आलं, की सगळे कपडे कुणीतरी धुऊन स्वच्छ करून ठेवले होते! मावळात एका खेड्यात आयुष्य काढणार्‍या गरीब शेतकर्‍यांचे कपडे एवढे स्वच्छ दिसून चालणार नव्हते. मग एक-दोन बादल्या पैदा केल्या, लाल माती पैदा केली आणि लाल मातीच्या पाण्यात सगळे कपडे बुचकळून काढले - आणि तिथेच प्रेक्षागारात सगळे वाळत टाकले. प्रेक्षागार खुलं होतं म्हणून बरं - नाहीतर मुंबईच्या हवेत कपडे वाळणं कठीण! पण रात्री काही मंडळीना जरा ओले-दमट कपडे घालूनच प्रयोग करावा लागला.

प्रयोग उत्तमच झाला आणि आम्ही सगळे खुशीत पुण्याला परतलो. स्पर्धेचं तिसरं वर्ष असल्यानं आम्ही आता जरा बाकीच्या प्रयोगांची चौकशी करायला लागलो. अंतिम फेरीतले सगळे प्रयोग संपेपर्यंत, 'जगन्नाथाचा रथ' पहिलं येणार, असा सगळीकडे बोलबाला झाला. निकाल प्रसिद्ध झाला, तर 'गोवा हिंदू असोसिएशन' या संस्थेचं 'संशयकल्लोळ' हे नाटक पहिलं आणि 'जगन्नाथाचा रथ' दुसरं! सगळ्यांना धक्काच बसला. एका वृत्तपत्रानं मोठा मथळा दिला : 'परीक्षकांच्या संशयकल्लोळात जगन्नाथाचा रथ मागे पडला!' एकूण बर्‍याच टीकाकारांनी या निकालावर झोड उठवली.

आम्ही 'संशयकल्लोळ'चा प्रयोग पाहिलेला नसल्यामुळं आम्ही काहीच बोलू शकत नव्हतो. आता बोलण्यात अर्थ तरी काय होता? परीक्षकांना 'संशयकल्लोळ'चा प्रयोग अधिक आवडला असेल. प्रयोग चांगला- वाईट मापण्याच्या फूटपट्ट्या थोड्याच आहेत? ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीवर सगळं अवलंबून!

पुढं बर्‍याच दिवसांनी सुप्रसिद्ध सिनेतारका लीला चिटणीस यांची आणि माझी पुणे रेडिओवर एका श्रुतिकेत काम करताना गाठ पडली. त्या अंतिम फेरीतल्या एक परीक्षक होत्या, हे मला माहीत होतं. निकाल असा कसा लागला, हे जाणून घेण्याची मला खरोखरीच उत्सुकता होती. आमच्या प्रयोगात काय कमी पडलं - 'संशयकल्लोळ' कोणत्या निकषांवर उजवं ठरलं, हे मला अगदी विद्यार्थ्याच्या दृष्टीनं जाणून घ्यायचं होतं. पुढच्या खेपेस ते उपयोगी पडेल असं वाटत होतं.

मी लीला चिटणीसांना नम्रपणे विचारलं, तर त्यांनी काय उत्तर द्यावं? त्या म्हणाल्या,
'अहो डॉक्टर, कुठं देवल आणि कुठं तुमचे दांडेकर! दोघांची काही तुलना तरी आहे का?'

'संशयकल्लोळ'चे लेखक म्हणजे गोविंद बल्लाळ देवल, मराठी रंगभूमीच्या सुवर्णयुगातले एक श्रेष्ठ नाटककार आणि दांडेकर म्हणजे आजचे एक कादंबरीकार, तेही प्रादेशिक. त्यांच्या खात्यावरचं हे कदाचित पहिलंच नाटक - तेव्हा या दोघांची, नाटककार म्हणून तुलना करण्याचा प्रश्नच कुठे येतो? स्पर्धा प्रयोगांची आहे- नाटककारांची नाही!
नाटककार म्हणून कोण श्रेष्ठ, हे ठरवायचं असेल, तर प्रयोग करण्याची स्पर्धा न घेताही देवल हे श्रेष्ठ नाटककार आहेत, असं सांगता आलं असतंच की. पण परीक्षकांच्याच मनांतला हा गोंधळ पाहून असं फार वाटलं, की नाटयप्रयोगाची गुणवत्ता ठरवण्याचे काही वस्तुनिष्ठ निकष परीक्षकांना दिले पाहिजेत.

पण निकाल काहीही लागो, 'जगन्नाथाचा रथ' चांगलंच गाजलं. 'मराठी नाटयसृष्टीतली एक महत्त्वाची घटना' असा त्या नाटयप्रयोगाचा उल्लेख केला गेला.

हां हां म्हणता पंचवीसच्यावर प्रयोग पी.डी.ए.नं केले! त्या काळात १९५७च्या आसपास एका हौशी नाटयसंस्थेनं एकाच नाटकाचे पंचवीस प्रयोग करणं म्हणजे क्वचित घडणारी घटना होती.

पुणे-मुंबई सोडून महाराष्ट्रात इतरत्रही त्याचे प्रयोग झाले. दिल्लीच्या नाटयमहोत्सवात हिंदी आणि मराठी असे दोन्ही प्रयोग पी.डी.ए.नं केले.

जवळजवळ दोन-तीन वर्ष आम्ही त्या नाटकाचे प्रयोग करत होतो. केवळ पुण्यातली नव्हे, तर महाराष्ट्रातील एक अग्रेसर हौशी नाटयसंस्था अशी पी.डी.ए.ची ख्याती या नाटकानं झाली.

मी काही इतिहासतज्ञ नव्हे, पण 'जगन्नाथाच्या रथा'च्या रूपानं वास्तवदर्शी नाटयप्रयोगाचा मानदंड गोनींनी आणि भालबांनी मराठीला दिला, असं विधान करायला मला भीती वाटत नाही.

***

हा लेख 'स्मरणे गोनीदांची' या लेखसंग्रहातून मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित केला आहे. पुनर्मुद्रणासाठी परवानगी दिल्याबद्दल डॉ. श्रीराम लागू, श्रीमती दीपा लागू, श्रीमती वीणा देव व मृण्मयी प्रकाशन यांचे मनःपूर्वक आभार.

***

श्री. गो. नी. दांडेकर यांचं छायाचित्र श्रीमती वीणा देव यांच्या खाजगी संग्रहातून.

हे छायाचित्र वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीमती वीणा देव यांचे आभार.

***

हा लेख लेखक व प्रकाशक यांच्या परवानगीशिवाय इतरत्र प्रकाशित करण्यास अनुमती नाही.

***

टंकलेखन - मॅगी

***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहेत आठवणी. डॉ लागूंच्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या असल्याने अगदी वेगळ्याच वाटल्या.

शीर्षकात गोनीदांचा उल्लेख हवा ना?

छान आहेत आठवणी.. अशी अनेक नाटके त्याकाळात गाजली होती पण त्यांच्या प्रयोगाबद्दल, कथानकाबद्दल फार कमी वाचायला मिळते. नाटकाचा प्रयोग आता होणे तर अशक्यच !

खूप छान आहे लेख!! आठवणी वाचताना मजा आली!!
माबो वर उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार!!!