राधे तुझ्याविना तो ...

Submitted by बाळ पाटील on 14 February, 2016 - 23:22

पाठी असून रखुमा, भक्तात दंग का ब्वा
काळ्या विठूस म्हणति, पांडूर - अंग का ब्वा

खातात ते अघोरी, करतात नाद भारी
आम्हास शिंक आली, की शिस्तभंग का ब्वा

सोळा सहस्त्र राण्या, सजले महाल वाडे
राधे तुझ्याविना तो, ठरला अपंग का ब्वा

छपन्न भोग झाले , ढेकर तरी न आली
माये तुझी चुलीची, भाकर खमंग का ब्वा

किणकिण बिल्वरांची, झंकार पैंजणांचा
येतो तुझा अबोला, छेडीत जंग का ब्वा

शांती हवी तुला तर, ती गाठ सोड आधी
इकडून सैल आम्ही, तिकडून तंग का ब्वा.

- बाळ पाटील , उस्मानाबाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users