आज आरती याचं “राधे… . सृजन…” वाचनात आलं. आणि मग स्वत:ला थांबवताच आलं नाही. एकतर राधा-कृष्ण आवडतात मला. त्यात इतक सुंदर लिहिलेलं.खरच त्या सगळ्या भागांमध्ये रंगून गेले अगदी. लेख तर निव्वळ अप्रतिम. सगळच्या सगळ तस्स डोळ्यासमोर आलं. वाचून झाल्यावर नेहमीप्रमाणे तुला पाठवली लिंक. मला आवडलेलं साहित्य तुला आवडतच कायम. काही गोष्टींबाबत मतभेद असले [सगळ्यात आधी धुक्यातल चांदण] तरीही राधे आवडेल तुला याची खात्रीच होती. ५ मिनिटात तुझा मेसेज अपेक्षित होता. आणि तू केलासही. पण लेखाबद्दल काहीच न बोलता तू मला अचानकच विचारलस, ‘तुला कोमल रिषभ कळतो?’ आणि मला एक क्षण खरच काही कळल नाही.
[कोमल रिषभ कळतो मला. अगदी कंठात होता. रिषभच काय. सगळेच स्वर. एक छान नात आहे माझं सुरांशी. खूप आधीपासून. अगदी त्याच्याही आधीपासून. पण मग ते राहून गेलं नंतर. आता तर आठवतय तेही तोडक मोडक. संगीताशी संबंधच संपल्यासारखा. हृदयाच्या कुठल्या तरी एका कप्प्यात बंद झालं संगीत. कारण नाही शोधलं मी. अत्यंत बेदरकारपणे हातचं सगळ जाऊ दिलं, कायम. स्वच्छंद जगायचं होत मला. गेलेल्या गोष्टी का गेल्या याचा ना कधी विचार केला ना असणाऱ्या गोष्टी सांभाळायचा प्रयत्न. अगदी तू भेटेपर्यंत हे असच होत अरे.
आणि तू तरी का आलास? माझ कोसळणार नात सावरायला. त्याच्यातले आणि माझ्यातले गैरसमज संपवायला. आणि खरच तस केलंस. त्याआधी तर ओळखतही नव्हतो एकमेकांना. तोच आपल्याला जोडणारा दुवा. तू त्याचा मित्र. एकदा शेवटच ऐकून घेऊ तुझ्याकरवी त्याला काय म्हणायचय आणि संपवू हे नात, म्हणून बोलले तुझ्याशी. आणि आयुष्यभरासाठी अजून एक नात जोडून बसले.तुझ्यात मला काय नाही मिळालं? तू कधी मला माझ्याशी मनसोक्त भांडणारा भाऊ वाटतोस, तर कधी तत्त्वज्ञान शिकवणारा आजोबा, कधी तुला हे जमेलच म्हणून ठणकावून सांगून मला वाटणाऱ्या अशक्यप्राय गोष्टी करवून घेणारा शिक्षक तर कधी यातलं काहीच न करता फक्त माझा त्रागा आणि घुसमट ऐकून आणि समजून घेणारा जिवलग सखा. आणि तरीही मी तुझा प्रचंड द्वेष करते. कारण तुला चांगलच माहितेय. त्याला तू जवळचा वाटतोस. तू आधी त्याचा मित्र आहेस म्हणून. कसलं उंदरा-मांजराच नात आहे हे. वर आणि आम्हालाच म्हण tom and jerry. (बर jerry कोण ते ही स्पष्ट सांगत नाहीस आणि अजून भांडण वाढवंतोस आमची. तुला माहितेय आम्हाला दोघांना jerry व्हायचं असत) तू त्याचा मित्र आहेस यावर माझा आक्षेप आहेच आणि कायम असणार आहे. तू कायम त्याची बाजू घेतोस आणि माझ्याशी भांडतोस. असो. मूळ मुद्दा काय? कोमल रिषभ.]
तुझ्या प्रश्नातच काहीतरी वेगळ जाणवलं. कळून न कळल्यासारख. तुला काहीही उत्तर देण्याआधी सृजन पुन्हा वाचल. त्यात दिसला कोमल रिषभ. पण अनोळखी. अस वाटल, मला या पूर्ण लेखनात काही कळतच नाही आहे. शब्द ओळखीचे. पण अर्थ अनोळखी. वाचता येतंय पण तरीही उमगत नाहीये. म्हणून मग तुलाच विचारलं, काय कळण अभिप्रेत आहे तुला? आणि लेखिकेलाही? मग नुसताच काही नाही म्हणालास.
[विचित्र आहेस तू. एकदम विक्षिप्त. तुझ्या प्रत्येक प्रश्नात काहीतरी लपलेलं असत. मोठ. न समजणार. अस कायम वाटत मला. कसला रिषभ? कसला गंधार? सूर आहेत ते. एवढ कळत मला. फार तर लेखाच्या अनुषंगाने कृष्णाच्या पाव्यातुन आलेत. मग पुढे काय? मला कळतो का? याचा काय अर्थ? आता नाही म्हटलं तर सांग कि पुढे.]
मग स्वतःच पुन्हा मेसेज केलास “कोमल रिषभ हा असा एक स्वर आहे जो काळजात खोलवर हलवून जातो. अगदी आत.”
[मी आजपर्यंत गायलेत हे स्वर. पण हे नवीन होत. कदाचित संगीतातल्या भावना कळायचं वय नव्हत तेव्हा संगीत शिकले आणि भावना कळण्याच्या वयात विसरून गेले म्हणून असेल. पण तेव्हाही गाताना काही सूर विशेष आवडायचे. कोमल स्वर असलेला आलाप अत्यंत आवडून जायचा. अगदी शांत, मंद आणि गोड भासणारा पिलू राग. इतक छान त्याच नाव दोन कोमल स्वरांमुळे इतका गोड असतो हे आता कळतय. पण तीव्र मध्यम कायमच त्रास द्यायचा मला. गाताना, ऐकताना. म्हणून कदाचित कल्याण नाही आवडला मनापासून. पण त्यात विशेष असं काहीच नव्हत. हे भावना वैगरे काही कळायचं नाही मला.]
“इतका नाही विचार केला मी कधी याचा. खरच असत हे?” माझा पुढचा प्रश्न ठरलेलाच होता. आणि तुला ते माहित असणारच होत. तुला सगळ आधीच कळत [I hate you from bottom of my heart]. “प्रत्येक स्वर, आणि त्याचं एकमेकांत मिसळण एक भावना आहे. आणि कोमल रिषभ काय किंवा गंधार, काळजातल्या खूप त्रास देणाऱ्या भावनांना हात घालतात. या लेखात जे आलंय ना ते असच सगळ, राधेच्या मनातल कृष्णाबद्दलचं प्रेम, कृष्णाला वाटणारी राधेची ओढ, अनयवरचा राग हे सगळ कोमल रिषभ व्यक्त करतोय. प्रत्येक स्वर, आणि तो ज्या रागात गुंफलाय तो राग काहीतरी सांगत असतो. त्यामुळे तोच स्वर रागातल्या त्याच्या जागेनुसार वेगळा सामोर येतो.”
[अगदी बरोबर. हे मी असच पाठ केल होत प्रारंभिक देताना. पण अस कळल नव्हत. आज काहीतरी नवीन कळत होत. आताच्या आता मला ताबडतोब सगळे राग गाऊन बघायचे होते. तुला याचाही राग येतो न? सगळ आताच्या आता? पण नंतर मला नाही जमत कधी. राहून जात. एव्हाना सगळ्याच रागांनी मेंदूत थैमान घालायला सुरवात केली होती. बालपणीच्या एक एक आठवणी डोकं वर काढत होत्या. अमुक एक राग अमुक एका वेळीच गायचा तर जास्त प्रभावशाली असतो. अमुक रागात या स्वरानंतर तो स्वर आला तर ते काळजाला भिडतं. म्हणून आरोहात हा स्वर शुद्ध असतो तर अवरोहात मात्र तोच स्वर कोमल होतो. अस काहीसं मला मावशींनी फार पूर्वी शिकवलेलं आणि मी घोकून घोकून पाठ केलेलं आठवू लागल. पण कशाचा कशाला संदर्भ नाही. आज वाचेनच घरी जाऊन. आणि हो इतके दिवस मागे छडी घेऊन धावत होतास ना, हार्मोनिअम वरची धूळ झटक म्हणून, आज करेन म्हणते ते काम. आणि मनापासून. स्वरांमध्ये भिजावस वाटतय आज. इतकी वर्ष जमलं नाही ते आज जमेल कदाचित. ]
“दमलो बुवा” म्हणत विषय बदललास खरं. पण तुला माहितेय साधायचा तो effect अगदी साधलायस तू. तू नेहमी अस करतोस. मला कामाला लावतोस. मी जे कराव अस वाटत असत ते करायला लावतोसच. आता काही शांतता नाही जीवाला, जोपर्यंत हा कोमल रिषभ मला कळत नाही तोवर तरी नाहीच नाही. तू म्हणालास आसावरी मध्ये आहे. तो सापडत नहिये. भैरव मध्ये आहे. पण मी याआधी प्रयत्न नाही केलाय. तोपर्यंत हा तोडका मोडका आठवणारा पिलू आठवतेय. कोमल धैवत. आरोहात शुद्ध आणि अवरोहात कोमल गंधार. थोडा आर्त करण्यासाठी कोमल रिषभ चा उपयोग.
तुझी पांडू
काय लिहू?...हल्ली मी नसते
काय लिहू?...हल्ली मी नसते इथे, पण आत्मधूनने आवर्जून कळवलं म्हणुन आले.
खुप छान लिहिलत.
राधे वाचून, कोणाला तरी काही सुचतं, लिहावसं वाटतं,हे वाचून खरच खुप छान वाटलं. मनापासून धन्यवाद.
आणि हो, हा कोमल ऋषभ तुम्हाला लवकर सापडो हीच सदिच्छा
धन्यवाद आरतीजी. तुम्ही फारच
धन्यवाद आरतीजी. तुम्ही फारच छान लिहिता पण. तुमच्या प्रतिसादाने खूप छान वाटलं
सुंदर !
सुंदर !
लाडू, अवलच्या सुंदर लेखाला तू
लाडू, अवलच्या सुंदर लेखाला तू गोड तीट लावली आहेस..
छान लिखाण
किती छान!
किती छान!
वा, छान लिहिलेय. कालच
वा, छान लिहिलेय.
कालच वाचलेले, मोबाईलवर असल्याने प्रतिसाद दिला नव्हता..
लाडू किती अप्रतिम लिहितेस
लाडू किती अप्रतिम लिहितेस ग..... कमी शब्दात बराच काही अर्थ सांगून जातेस. आणि ते देखील असे की वाचणारा घायाळ झाला पाहिजे.
छान!!
छान!!
धन्यवाद
धन्यवाद
छानच
छानच
आहाहा.. किती सुरेख लिहिलय. ते
आहाहा.. किती सुरेख लिहिलय. ते कंसातलं स्वगतातलं स्वगत.. खासम खास.
माझ्या मनात कधीपासून पिंगा घालणारी एक कल्पना तू अंशतः मांडून गेलियेस...
कोमल रिषभ.. हा रिषभापेक्षा षड्जाला अधिक जवळचा. ... तो राधेचाच.
मला नेहमी वाटत आलय की... शुद्धं गंधार हा नक्की अनयाचा...
आणि मारवा त्या दोघांचा.... कृष्णं गोकूळ सोडून गेल्यानंतरचा.
खूप सूंदर कल्पना. तरल अगदी.
खूप सूंदर कल्पना. तरल अगदी. मनाला भिडली