माझ्या वाईट सवयी ५ - मारामारी

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 January, 2016 - 12:17

चोरी, जुगार, शिवीगाळ .. या वाईट सवयींच्या गटात बसणारा शब्द म्हटले की पटकन आठवावा असा शब्द, मारामारी!

हक्कासाठी जी करावीच लागते ती मारामारी! रोजच्या जगण्यासाठी जी करावी लागते ती मारामारी!
माझ्या आयुष्यातील पहिली मारामारी, जी मी वयाच्या ५व्या वर्षी केली.
बस्स ही मारामारीच माझी वाईट सवय क्रमांक ५ आहे.

म्हटलं तर ९० टक्के मुलांनी जी आपल्या लहानपणी कधीतरी केलीच असते, ४० टक्के मस्तीखोर मुलांनी बरेचदा केली असते, तर १० टक्के मुले यासाठीच प्रसिद्ध असतात.
मी या दहा टक्क्यांच्याही आत कुठेतरी होतो.
डोके, रक्त, हात. सारे काही चटकन गरम व्हायचे. कोणालातरी ठेवून दिल्याशिवाय आयुष्यातील कुठलाच प्रॉब्लेम सुटू शकत नाही हा विश्वास. मग जिथे प्रॉब्लेम तिथे मारामारी.

तर पहिली मारामारी. पहिले शैक्षणिक वर्ष. ईयत्ता ज्युनिअर केजी. बालवाडी.

त्या वयात शत्रू आपला कोणीच नसतो. असतात ते सारे मित्रच. बालमित्र, वर्गमित्र. अश्याच एका वर्गमित्राने कसल्याश्या कारणाने माझे डोके फिरवले असावे, जे मी त्याचे डोके फिरवत बाकावर आपटले. तपशीलवार आता फारसे आठवून सांगता येणार नाही, पण पहिल्याच मारामारीत समोरच्याच्या डोक्यातून रक्त काढले होते एवढे मात्र आठवते. कायद्याच्या भाषेत सांगायचे झाल्यास, हाल्फ मर्डर.

पुढे रीतसर मला शिक्षा झाली. बाईंनी दुपारी जेवणाचा डबा खाऊ दिला नाही. संध्याकाळपर्यंत मला उपाशी ठेवले गेले. दुसर्‍या दिवशी माझ्या पालकांना बोलावले. त्या पोराचे पालक तर त्याचे डोके फुटल्याफुटल्याच हजेरी लाऊन गेले. मलाही कदाचित त्यांनी खुन्नस दिली असावी. पण मी त्याला जुमानणारा नव्हतो. कारण आपले आईबाप वगळता ईतरांच्या आईबापाला घाबरायचे कारण नाही, कारण आपण त्यांचे खात नाही, या असल्या समजा मला बरेच लहान वयात आलेल्या. पण माझ्या घरी मात्र मार पडायचा. मी एकुलता एक दिवटा असल्याने जरा कमी पडायचा, पण पडायचा. त्यामुळे एक मर्यादीत कोडगेपणा अंगी आला होता. जो पुढच्या मारामारीच्या वेळी कामी यायचा.

पुढे अश्याच काही मारामार्‍या करत आणि पालकसभेला आपल्या पालकांना लाजवायला लावत माझी शैक्षणिक कारकिर्द सुरू झाली. तब्येतीने मी यथातथाच होतो, किंबहुना आज मला पाहिले तर एकेकाळी मी असला डेंजर होतो हे कोणाला शपथेवर सांगूनही विश्वास बसू नये. पण पहिल्यापासूनच तयार झालेली एक इमेज आणि दुसरे म्हणजे ती जपण्यासाठी अंगी असलेली डेअरींग, या दोन गोष्टी कामी यायच्या. मूळ स्वभाव शीघ्रकोपी, ज्यावर सध्या नियंत्रण मिळवायचे यशस्वी प्रयत्न चालू आहेत, मात्र तेव्हा यालाच हत्यार बनवून वापरत असल्याने या स्वभावाला आणखी खतपाणी घालायचो. चारचौघांमध्ये बोलीबच्चन बनत वावरायचो. कराटे वगैरे येतात म्हणत ज्याला कराटेचा ‘क’ देखील माहीत नाही त्याच्या खांद्यावर एखादा र्रपटा कच्चकन मारायचो. पण प्रत्यक्षात पाचवीनंतर जेव्हा माझ्या लक्षात आले की निव्वळ हातापायी करून आपण एखाद्याला लोळवू शकत नाही तेव्हा मी कंपास, करकटक, वॉटरबॅग जे पहिला हाताला लागेल त्याने मारामारी करायला सुरुवात केली. म्हटले तर या वस्तू सर्वांकडेच असतात, पण म्हणतात ना, एखाद्यावर त्या उगारायला जी जिगर लागते ती सर्वांकडे नसते. याऊपर मारामारीत माझा एक स्वत:चाच बनवलेला उसूल होता. जो पहिला हात उचलतो तो सरस. त्यामुळे आजवर कुठली अशी मारामारी झाली नाही ज्यात समोरच्याने सुरुवात केली आहे. सर्वांचा श्रीगणेशा माझ्याच हस्ते झाला आहे. त्यामुळे समोरचा हुज्जत घालतानाही वचकून राहायचा.

मग काय, एक सिंपल फंडा असतो. ज्याला चार चौघे वचकून असतात त्याची दहाबारा जणांची गॅंग बनते आणि मग आणखी चाळीस पोरे दचकून राहतात. तशी माझी काही गॅंग वगैरे नव्हती, पण ज्यांची होती ते देखील मला इज्जत द्यायचे. कारण काही अफवा माझ्या नावावर उठल्या होत्या. माझे एक दूरचे काका होते. ज्या कंपनीत ते कामाला होते तेथील ते युनियन लीडर होते. पक्के राडेबाज होते. सोबत हत्यार बाळगायचे. प्रत्यक्षात माझी भेट त्यांच्याशी कधीतरीच व्हायची. ते देखील माझी नाही तर माझ्या वडीलांचीच व्हायची. पण माझ्याशी पंगा म्हणजे रुनम्याचे काका नंगी गुप्ती नाचवत आपल्या घरी येतील आणि आपले साधेसरळ पांढरपेशे बाबा देखील आपल्याला वाचवू शकणार नाही असे काही पोरांचे समज झाले होते. तसेच माझ्या आधीच्या भागांमध्ये उल्लेखलेल्या वाईट सवयी - चोरी, जुगार, शिवीगाळ पाहता मी एक पुरेसा वाह्यात इमेज असलेला मुलगा होतो हे वेगळे सांगायला नको. तर या सर्वांचा एकत्रित परीणाम म्हणून माझी ‘चालायची’..

तर आता काही आठवणीतले किस्से बघूया, सर्वच छोट्यामोठ्या मारामार्‍या आणि धटिंगगिरी सांगत नाही पण मजेशीर तेवढे ऐकूया.

शाळेतील घटना - ज्या घटनेने ‘हा रुनम्या लय डेंजर आहे’ अशी माझी इमेज बनवली तिथून सुरुवात करूया.
पहिली ते चौथी जेमतेम हुशारी दाखवत हुशार मुलांच्या ‘अ’ तुकडीत जागा मिळवून होतो. चौथीला अभ्यास कमी आणि मस्ती जास्त झाली तसे पाचवीला ‘ब’ तुकडीत घसरण झाली. वर्ग बदलला तसे बरेचसे वर्गमित्र बदलले. आम्हीही टवाळ होतो, ते देखील टवाळ होते. पण अजून त्यांच्यात मी तितकासा मिसळलो नव्हतो. काही जुने मित्र जे माझ्यासारखे ‘चौथी अ’ मधून ‘पाचवी ब’ मध्ये घसरून आलेले त्यांनाच पकडून राहायचो. अश्यातच एक फारशी ओळखपाळख नसलेला कार्टा माझ्या नादाला लागला.

सकाळी नेहमीच्या वेळेस शाळा भरली. पण वर्गशिक्षिका बाई अजून आल्या नव्हत्या. लाऊडस्पीकरवर प्रार्थनेला सुरुवात झाली आणि सारे जण उभे राहिले. तो माझ्या मागच्या बाकावर होता. प्रार्थना संपल्यावर बसायच्या आधी त्याने कंपासपेटी उभी करत माझ्या बाकावर ठेवली. मी खाली बसलो तसे गचकन नाजूक जागी घुसली आणि थोडासा कळवळतच मी जमिनीवर आडवा झालो. आजूबाजुचे चारचौघे हसायला लागले. हा मानसिक आघात शारीरीक जखमेपेक्षा जास्तीचा वाटला. कारण ते हसणारे दात माझ्या मित्रांचे नव्हते. सगळ्यांचे थोबाड एकाच फटक्यात फोडून टाकावेसे वाटले पण ते शक्य नव्हते. मग काय, सारा राग त्या कंपासपेटी ठेवणार्‍यावर निघाला. अंगापिंडाने तो माझ्यापेक्षा मजबूत होता, पण हा विचार करायच्या मनस्थितीत मी नव्हतो. त्याची कंपासपेटी तोडून टाकायच्या उद्देशाने मी धाडकन बाकावर आदळली, तसे त्यातील सारे अवजार खळकन बाहेर आले. पुढे तो चिडून माझ्या अंगावर आला तसे त्यातील करकटक उचलून ते सप्पकन त्याच्या दिशेने फिरवले. त्यात त्याचा बचावासाठी पुढे आलेला हात शहीद झाला. त्याच्या तळहातापासून मनगटाच्या कोपरापर्यंत उमटलेली लाल लकेर ‘ऋन्मेषरेषा’ बनत माझ्या नावाची कायमस्वरुपी दहशत पसरवण्यास पुरेशी ठरली. मला ती रेषा त्यापुढे कधी ओलांडण्याची गरज पडली नाही. करकटक हातात घेणे किंवा हवेत फिरवणे पुरेसे ठरू लागले.

"एवरी अ‍ॅकशन इज इक्वल अ‍ॅन्ड ओपोजिट रिअ‍ॅक्शन" या न्यूटनच्या नियमाला मी तिथपासून (त्यातील ‘इक्वल’ या शब्दाला फाट्यावर मारत) पाळू लागलो. ‘तुम एक मारोगे, तो हम चार मारेंगे’ वगैरे फिल्मी डायलॉग ऐकायच्या आधीपासून मी असे करायला लागलो हे विशेष.

आता असाच एक बिल्डींगमधील किस्सा ऐकूया. तिथल्या पोरांमध्ये ‘रुनम्या म्हणजे राडा झाला की मागे पुढे न बघणारा’ हा समज केव्हा रूढ झाला हे बघूया.

बिल्डींगमधील सारीच पोरे तशी अतरंग होती. आपापसात आमच्या खूप मारामार्‍या चालायच्या, पण कोणी कोणाच्या घरी तक्रार घेऊन जायचे नाही हे तत्व कसोशीने पाळले जायचे. ज्याच्यात ताकद जास्त तो समोरच्याला मारायचा, ज्याच्यात धटींगपणा जास्त तो हूल द्यायचा. पण डेअरींग प्रत्येकाची तेव्हा पाण्याबाहेर आली जेव्हा बिल्डींग बाहेरच्या पोरांशी लफडा झाला.

खुल्या मैदानावर क्रिकेटचा सामना चालू होता. हा योग तेव्हा क्वचितच यायचा अन्यथा बरेचसे क्रिकेट गल्लीतच खेळले जायचे. तर आम्हा सर्वांची वयवर्षे १० ते १४ च्या दरम्यान असावीत, समोरच्या टीममधील मुलांचाही तोच वयोगट असावा, आणि माझे वय असावे साधारण बारा. फरक ईतकाच की समोरची मुले फुल्ल टू झोपडपट्टीछाप होती. मॅच घेण्याअगोदर आम्हाला याची कल्पना नव्हती, अन्यथा घेतलीच नसती. आधी त्यांची आपापसात शिवीगाळ, मग खेळताना आमच्याशी नियमांवरून चिडाचीड, अर्वाच्य भाषेचा वापर, एकंदरीत आम्ही वैतागलो होतो. कुठून या मुलांशी सामना घेतला असे झाले होते. तरी जिंकत होतो म्हणून सामना सोडून जात नव्हतो. पण ते जसे हरत होते तसे त्यांचा त्रागा आणखी वाढत होता. अखेर आमच्या कर्णधाराचा संयम सुटला. जेव्हा तो फलंदाजी करत होता तेव्हा त्याची आणि त्यांच्या विकेटकीपरची बाचाबाची झाली. लगोलग त्यांच्या सर्व क्षेत्ररक्षकांनी त्याला घेरला. मी जवळच्याच टाकीवर स्कोअर लिहित बसलो होतो. तडक उडी मारून निघालो पण तिथे पोहोचेपर्यंत आमच्या कर्णधाराचे शर्ट पकडून त्याला धक्काबुक्की चालू होती. बॅट होती त्याच्या हातात, पण त्याच्यामते अजून ती वापरायची वेळ आली नव्हती. पण मी काही समझौता एक्स्प्रेस घेऊन आलो नव्हतो. उचलला स्टंप आणि फिरवला. सामना तसाही केव्हाच संपला होता.

नशीबाने कोणाचे डोके मध्ये आले नाही. पण जिथे त्यांची अक्कल होती तिथे मार बसलाच. गुडघा फुटला एकाचा. पांगापांग झाली. आम्हीही लागलीच पळ काढला. त्यांच्या हातात लागण्यात कुठलाही शहाणपणा नव्हता. काही बिल्डींगच्या दिशेने पळाले. तर काही वाट फुटेल तिथे. पळतापळता मला आयडीया सुचली. माझ्याबरोबर एकजण पळत होता, त्याला घेऊन सरळ चौकी गाठली. तेथील मामांना क्रिकेट खेळताना राडा झालाय आणि झोपडपट्टीतील काही पोरे आम्हाला मारायला आमच्या मागे लागलीत असे सांगितले. त्यांनी आम्हा दोघांना सुरक्षितपणे घरी आणून सोडले. पुढे ती पोरे बदला घ्यायला कधी आली नाहीत आणि काही दिवस आम्हीदेखील आमच्या गल्लीतच क्रिकेट खेळणे पसंद केले.

असो, किस्से बाय किस्से म्हटले तर बरेच आहेत. लेखाच्या शब्दमर्यादेत सारेच नाही सांगता येणार,

तरी शाळेत असताना जवळच्या एका कॉलेजच्या ग्रूपशी पंगा घ्यायची हिम्मत दाखवली होती. अर्थात, आम्हीच बराच मार खाल्ला होता. पण तरीही, एकहीच मारा पर सॉलिड मारा स्टाईल त्यातही माझे नाव झाले होते.

ज्युनिअर कॉलेज पहिलेच वर्ष. दोन सिनिअर स्टुडंटना त्यांच्या दुर्दैवाने नेमके माझीच रॅगिंग घ्यायची हुक्की आली. तोपर्यंत कॉलेजमध्ये माझाही ग्रूप बनला होता. संध्याकाळी कट्ट्यावर गाठले त्यांना. आधी सहज विचारपूस केली. पण त्यांच्यात सिनिअर असल्याचा माज जाणवला. मग काय, गालावर राम-लक्ष्मण-सीता उमटवले. आणि चेहर्‍याचा हनुमान केला. तसेही आपण अन्यायाविरुद्ध लढतोय असे जेव्हा माझ्या मनाला वाटायचे तेव्हा माझा आवेश भलताच असायचा.

ईंजिनीअरींग कॉलेजात असताना वॅलेंटाईन डे ला आमच्या ग्रूपमधील एक मुलगा एका जुन्या मैत्रीणीला प्रपोज करायला म्हणून दुसर्‍या कॉलेजला गेलेला. तिथे त्याची काही चुकी नसताना तिथल्या पोरांचा मार खाऊन आलेला. त्याचा बदला घ्यायला म्हणून दुसर्‍या दिवशी त्या कॉलेजच्या बाहेर आम्ही फिल्डींग लावली आणि त्या ग्रूपच्या चारचौघांना पकडून चोप दिला होता. त्यावेळी ईंजिनीअरींगच्या वर्कशॉपच्या टूल्समधील एक अवजार मी माझ्याबरोबर बाळगले होते. "जर ते संख्येने खूप जमले आणि त्यांनी आपल्याला घेरले तर मी टाकतो एकाच्या डोक्यात, ते सगळे त्याला सांभाळत बसतील आणि आपण पळ काढूया", असा प्लान मी बनवला होता. पण सुदैवाने ती वेळ आली नाही. आता विचार करता असे वाटते की आलीच असती तशी वेळ, तर नक्कीच माझ्या हातून काहीतरी अनर्थ घडला असता. कदाचित ते हत्यार आणि त्याने मारलेला फटका जीवघेणाही ठरला असता.

त्यानंतर एका थर्टीफर्स्ट नाईटला फार मोठा राडा झालेला. त्यात माझी फार महत्वाची भुमिका होती. पण ते प्रकरण दूरगावी झाले, तिथेच मिटले आणि त्याचा कुठलाही पोलिस रेकॉर्ड बनला नाही हे माझे नशीब.

पण मग शेवटची उल्लेखनीय मारामारी म्हणावी अशी तीच होती. त्यानंतर त्या मारामारीचे होऊ शकणारे परीणाम लक्षात घेता तौबा केली म्हणा, किंवा ते कॉलेजचे शेवटचे वर्ष असल्याने मस्तीचे दिवस संपले म्हणा, पण माझ्या जीवनगाथेतील युद्धाचा अध्याय तिथेच संपला!

लेखही ईथेच संपायला हवा.
पण जाता जाता अहिंसेचा धडा द्यायचा मोह आवरत नाही, जो मी स्वानुभवातून शिकलोय.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपले गरम रक्त जरी समोरच्याला जाळायला कामी येत असले, तरी त्याचे चटके आपल्यालाही सोसावे लागतात. ते देखील आयुष्यभरासाठी..
- ऋन्मेष

माझ्या आधीच्या वाईटसाईट सवयी वाचण्यासाठी खालील लिंकांवर टिचक्या मारू शकता.

माझ्या वाईट सवयी १ - चोरी http://www.maayboli.com/node/56756
माझ्या वाईट सवयी २ - जुगार http://www.maayboli.com/node/56890
माझ्या वाईट सवयी ३ - शिवीगाळ http://www.maayboli.com/node/56984
माझ्या वाईट सवयी ४ - निष्पाप जीवांची हत्या http://www.maayboli.com/node/57095

अवांतर - यावेळची शब्दखूण - लेखन मारामारी - मारतोय माझे लेखन तुमच्या माथी, झेला Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी टग्या.. जर मी सेव्हंटीजचा असतो तर या लेखातील किस्सेच वेगळे असते.. आजोबांच्या तोंडून त्यांच्या काळातले खतरनाक ऐकलेतच, पण वडिलांच्या तोंडून सुद्धा बरेपैकी भारी ऐकलेत.. उदाहरणार्थ आमची बिल्डींग आणि शेजारची एक वाडी यांची भारत-पाक सारखी दुश्मनी होती. साधारण दर सहा-आठ महिन्यांनी एकमेकांवर ट्यूबलाईट फेका, सायकलच्या साखळीने वार करा, या लेव्हलच्या मारामार्‍या व्हायच्या.. तर आता बोला.. या मारामारी संस्कृतीत वाढलेली आमची मागची पिढी `तुम्ही बच्चे आहात नि काही करतच नाही' म्हणून आम्हाला हिणवायचे..

मी ट्युबा, सायकलची चेन, चॉपर च्या मारामार्‍य स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्यात.

ऋ, तुझ्या काकाकडे गुप्ती होती तसं माझ्या काकाकडे एक मोठा सुरा आणि एक छोटी तलवार होती.
एका मारामारीची पुर्व तयारी म्हणुन त्या सुर्‍याला मोरीच्या कठड्यावर पाजवताना मी पाहिलयं काकाला. मी ५-६ वर्षांची होते तेव्हा. ह्याने सुरा पाजवला नी निघाला खिशात घालुन. गणपतीचे दिवस होते. माझ्या पप्पांना कोणीतरी मित्रांनी सांगितले की, तुझ्या भावाचं अड्ड्यावर भांडण झालंय आणि तो परत येणार आहे. यु नो बदला घ्यायला. पप्पांनी ह्याला रस्त्यात गाठले. जाउच दिले नाही. नाहीतर काकाचा पुर्वैतिहास बघता त्याने कुणाचा तरी कोथळाच काढला असता.

अवनी,
पसारा आवरायला जाल तर चीडचीड होईल, त्यात आठवणी शोधाल तर मन रमेल Happy

सस्मित
एका मारामारीची पुर्व तयारी म्हणुन त्या सुर्‍याला मोरीच्या कठड्यावर पाजवताना मी पाहिलयं काकाला. >>> +१ हे सुर्‍याला धार काढतानाचे द्रुश्य बघणे माझ्याही नशीबी होते. काका नाही, बिल्डींगमधील दुसरी एक व्यक्ती.. बाकी गणपतीचे आणि ईलेक्शनचे दिवस म्हटले की काही राडे ठरलेलेच. या दोघांसारखे सण नव्हते मुंबईत. पण मी नाही पाहिले मोठे राडे. त्या आधीच अंडरवर्ल्डसोबतच ही राडा संस्कृतीही लोप पावली होती.

बाकी गणपतीचे आणि ईलेक्शनचे दिवस म्हटले की काही राडे ठरलेलेच. या दोघांसारखे सण नव्हते मुंबईत.>>>+१

आमच्या इथल्या नगरसेवक कम भाईचा कोथळा काढुन खुन, माझ्या भावाच्या लग्नाच्या दोन दिवस आधीच झाला होता. लग्न अगदी शांततेत करावं लागलं. नो गाना बजाना.

एकदा प्रेमनगर आणि ताडवाडीत दगडफेक चालू होती. तेवढ्यात आमची स्कुलबस तिथे आली. दोन्ही बाजूंनी दगडफेक दोन मिनिटे थांबली. आम्ही मुले पळून गेल्यावर पुन्हा सोडावॉटर च्या बाटल्या ठुप्पकन फुटायला लागल्या.
माझा एक चुलत चुलत भाऊ जवळ जवळ ४ वर्ष तडीपार होता गुंडगिरी मुळे. अगदी किरकोळ बांध्याचा, सिंगल फसली माणूस. पण सुरा, कोयता किंवा चॉपर चालवण्यात एकदम माहीर. संघटित गँगवॉर मध्ये घोडे (म्हंजे पिस्तूल) वापरायला लागल्यापासून माझ्या भावासारखी एकांडी कलाकार माणसे अगदीच बाजूला फेकली गेली. शिवाय पोलिसांच्या अमानुष मारण्यामुळे तो कायमचा अधू झाला.
९३ च्या दंगलींमध्ये पुन्हा एकदा तो एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लुटलेला माल भरून ठेवायला गोण घेऊन फिरायचा.

तर सांगायचा मुद्दा असा की हे सगळं आजूबाजूला असताना ऋन्मेषच्या लेखाच्या खरेपणाविषयी अजिबातच शंका नाहीये

टग्या येस्स,
दोन शेजारच्या वा जवळपासच्या बिल्डींग, वाड्या, वसाहतींमध्ये पारंपारीक शत्रुत्व असणे आणि काही पिढ्यात ते जोपासणे ही तेव्हा नॉर्मल गोष्ट होती.
आमच्या तर बिल्डींमध्येही आमच्या आधीच्या पिढीपर्यंत दोन ग्रूप होते. मुलगा वयात आला की त्याला दोन्हीपैकी एक ग्रूप जॉईन करणार का अशी विचारणा व्हायची.

दूरच्या काकांना मायबोलीचा पत्ता सांगू नको. मायबोलीवर भविष्यात चॅट विंडोतून आयडीला खाली उतरवून घ्यायची सोय झाली तर हे फार्फार महागात पडेल. माबोकरांना आता मारामारीत रोमँटीसिझम दिसायला लागल्याने चिंता वाटू लागलीय Wink

आशु२९
सीरीजमधील पहिल्या धाग्यावर टीका झाल्याने ते सर्व खोटं वाटेल अशा रितीने पुढे लिहीलं की Wink
डोकं आहे हं

रुन्मेष तुझ्या प्रतिक्रिया वाचणे ही चांगली करमणूक आहे. अपशब्द न वापरता व कटू न बोलता शाब्दिक हल्ले परतवावेत तर असे. असो...तर ही रुन-नीती सायबाला टॅकल करण्यासाठी भारी आहे असे वाटते आहे. Happy

हा हा कापोचे, ईंटरेस्टींग लॉजिक आहे आपले. पण यात दोन गोष्टी आहेत.

1) या मालिकेतील जुगार, शिवीगाळ, किड्यामुंग्यांच्या हत्या, या चिरकूट मारामार्या, या सर्वांपेक्षा ते चोरीचे किस्सेच कडक होते जे अविश्वसनीय वाटायची शक्यता जास्त होती.
पण गंमत म्हणजे ते कोणालाही अविश्वसनीय वाटले नाही. असे का याचा उलगडा कराल Happy

2) @ टिका - तर मला माझ्यावर टिका झालेली आवडते, नव्हे ती हवीच असते, आणि मी त्यातूनही मिळणार्या प्रसिद्धीत खुश असतो.... असे देखील काही जण इथे म्हणतात. पण आपल्या लॉजिकनुसार मी टिकेने व्यथित झालो आहे.
तर खरे काय मानू मी आता. कसा आहे मी याचाही उलगडा करा Happy

मेधावि, धन्यवाद ! Happy

या सर्वांपेक्षा ते चोरीचे किस्सेच कडक होते जे अविश्वसनीय वाटायची शक्यता जास्त होती.
पण गंमत म्हणजे ते कोणालाही अविश्वसनीय वाटले नाही. असे का याचा उलगडा कराल >>>>> Uhoh

निकाल स्वत:च दिल्यानंतर इतरांनी उलगडा कसा काय करायचा ? कोर्टाच्या निकालावर मतप्रदर्शन करायचं नसतं. Happy

अहो निकाल कसला त्यात. अविश्वसनीय वाटणे आणि असत्य असणे यात फरक नाही का. चुकत असल्यास मराठी कर्रेक्ट करा.

मी माझ्या आयुष्यातील जी सत्ये सांगितली त्यातील विस्मयकारक गोष्टींवर लोकं सहज विश्वास ठेवत चर्चा करतात आणि जे दर चौथ्या व्यक्तीच्या आयुष्यात कमीअधिक प्रमाणात घडतेच त्याला फेकाफेकी म्हणतात हे कसे याचा उलगडा करा.

तसेच तुम्ही माझ्यावर हा असत्य लेखनाचा घिणौना आरोप करून नेमके काय सिद्ध करणार आहात त्याबाबत मी अजून गोंधळात आहे.
म्हणजे माझा पहिला चोरीचा लेख तुम्हाला खरा वाटतो की खोटा किमान हे तरी सांगा.

>>अजिबात काल्पनिक वाटलं नाहीये ऋन्मेष. हे सगळ अगदी जवळुन पाहिलंय आणि अनुभवलय >> मी पण.

ऋ ने केल्यात तसल्या मारामार्‍या तर सर्रास चालायच्या आमच्याइथे, मी नसयाची पण त्यात, माझं फक्त तोंडच बस होत Wink

मारामारीची एक खास आठवण -
२००५ साली माझ्या मैत्रिणीचे लग्न होते. मी, ती आणि आणखी दोघीजणी असा आमचा चौघींचा ग्रुप होता शेजारी शेजारी राहणार्‍या मैत्रिणी. हळदीच्या दिवशी नाचुन वैगरे झाल्यावर चौंघींचा बॅचलर म्हणुन शेवटचा दिवस म्हणुन आम्ही रात्री एकत्र रहायचे ठरविले व झोपयला एकीच्या घरी गेलो (झोपायला म्हंजे गप्पा मारायला)

रात्री ३ च्या आसपासच्या सुमारास रस्त्यावरुन भांडणाचा आवाज आला म्हणुन आम्ही खिडकी खोलुन बघु लागलो. आमच्याच वाडीत राहणारा एक गुंड प्रवृत्तीचा मुलगा कोणासोबत तरी भांडत होता. दोघेही एकमेकांना अर्वाच्य शिव्या देत होते ते ऐकुनच नवरी मैत्रीण घाबरली व खिडकी बंद करायला सांगु लागली पण तिला न जुमानता आम्ही भांडण बघत राहिलो.

काहीवेळाने त्या अनोळखी माणसाने गटारावर जी सिमेंटची लादी झाकण असते ना ती उचलली आणि वाडीतल्या मुलाच्या डोक्यातच घातली. त्या अनपेक्षित हल्ल्याने आमच्या तोंडुंन काही चित्कार्, हुंकार निघाले असतील म्हणुन त्या माणसाने वळुन आवाजाच्या दिशेने बघितले. आणि त्यावेळेस जी हालत झालेली आमची ती शब्दात सांगु नाही शकत. पटकन खिडकी लावुन काहीवेळ तरी आम्ही एकमेकींना चिकटुन शांत बसुन होतो Proud

थोडावेळ वाट बघितली की तो माणुस आमच्याकडे येतोय का कारण तळमजल्यावर घर असल्यामुळे खिडकी सहज बाहेरुन पण उघडु शकत होती. आमचे नशिबपण एव्हढे खराब होते की ती खिडकी लॉकपण होत नव्हती नाही म्हणायला ग्रील होती बाहेरुन पण खिडकी उघडुन आम्हाला धमकावणे सहज शक्य होते. पन तो काही आला नाही हुश्य:

जरा सावरल्यावर बघितलं तर नवरी मैत्रीण थरथर कापत रडत होती आणि तिचं अंग पण गरम झालं होतं. तिला समजावलं की तुझं लग्न आहे उद्या, आजारी पडलीस तर कसं होईल. ती म्हणाली, बाहेर तो मेला असेल तर , पोलीस आपल्याला पकडुन नेतील चौकशीला, माझं लग्न कसं होईल Proud मग आपण ही गोष्ट कुणालाच सांगायची नाही या शपथेवर गपचुप झोपलो सगळ्याजणी. Proud

आता तुम्ही ईथे ती गोष्ट फोडलीत.
आता तिच्या लग्नावर गडांतर आले तर? ती पुन्हा थरथर कापुन रडायला लागेल ना ?

आता तिच्या लग्नावर गडांतर आले तर? ती पुन्हा थरथर कापुन रडायला लागेल ना ? >> नाही नाही त्या मेल्याला काहीच झालं नव्हतं आमची रात्र फुकट वाया घालवली Lol

ती लग्नानंतर परत जेव्हा माहेरी आलेली तेव्हा आम्ही सगळयांना सांगितलेलं आणि तिला खुप चिडवलही होतं. Lol
अजुनही कधी एकत्र आलो का तो विषय होतोच आमचा आणि तेव्हा मात्र फुल टु धमाल. कोण जास्त घाबरलेलं यावरुन एकमेकींना चिडवणं चालु होतं Biggrin

निल्सन भारी किस्सा... पण...

<<< त्या अनोळखी माणसाने गटारावर जी सिमेंटची लादी झाकण असते ना ती उचलली आणि वाडीतल्या मुलाच्या डोक्यातच घातली.>>>>
<<< नाही नाही त्या मेल्याला काहीच झालं नव्हतं आमची रात्र फुकट वाया घालवली>>>>

हे मुनशिपालटीचे कॉन्ट्रॅक्टर सिमेंटच्या जागी चुना रेती घालतात की त्या सिमेंटमध्येच जान होती म्हणून तो नाही मेला ..

कापोचे अर्धेच वाक्य कोट करून बरं ठीक काय म्हणत आहात,

<<त्याबाबत मी अजून गोंधळात आहे. म्हणजे माझा पहिला चोरीचा लेख तुम्हाला खरा वाटतो की खोटा किमान हे तरी सांगा.>>

हा त्यापुढचा गोंधळ तर क्लीअर करा. कारण तुमच्या एका विधानानुसार तो लेख तुम्हाला खरा वाटतोय तर एका विधानानुसार तुम्ही त्याला खोटे ठरवत आहात Happy

Pages