...अजुनही माझ्या घराला दार नाही...

Submitted by बाळ पाटील on 12 January, 2016 - 23:37

काजव्यांना मी असा भुलणार नाही
सूर्य जेथे बघ तिथे अंधार नाही

झटकिली थोडी खिशाची धूळ त्याने
तेवढा मोठा तुझा संसार नाही

बोलक्या डोळ्यात तिचिया प्रेम होते
एवढा कळला मला व्यवहार नाही

त्या तिथे जमलीत सारी ही भुते पण
तो कुण्या स्वर्गातला अवतार नाही

बापही कोठे दिवे लावून गेले
या पिढीवरती म्हणे संस्कार नाही

भोवती सजलेत सारे कैदखाने
अजुनही माझ्या घराला दार नाही

-- बाळ पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाळ पाटीलजी,
गझल छान आहे!
क्षमस्व,पण इतर शेरांच्या मानाने,मला मतला इतका भावला नाही!
संसार,संस्कार,दार...आवडले!
अवतार...खासंच!

धन्यवाद सत्यजीतजी ! लिहीण्याच्या ओघात घडते असे. मतला बदलूनच टाकला.

छान.

पियू | 15 January, 2016 - 04:54
सॉरी.. मला वाटले कि आपण शनीशिंगणापुरला राहता. >>>.

........
भावभक्तीची समाधी ना कळाले
शुक्र आहे , हा शनीचा वार नाही. .... बाळ पाटील

....... पियुजी, प्राजक्ताजी धन्यवाद !

भोवती सजलेत सारे कैदखाने
अजुनही माझ्या घराला दार नाही<<< छान शेर!

बाकीच्या शेरांमधील आशय अधिक स्वच्छपणे यायला हवा व अधिक गहिरा व्हायला हवा असे वाटून गेले.