फॅमिली क्रॉनिकल्स ३ : कौटुंबिक मिटींग

Submitted by रायगड on 14 January, 2016 - 01:19

"I want to have a family meeting today!" थोरल्याने मागणी केली.

कुठेतरी आयत्या वेळी जायचं ठरल्याने त्यांच्या स्क्रीन टाईम वर बाधा आलेली त्यामुळे एक तातडीची family meeting हवी – या प्रकरणाचा छडा लावण्याकरीता – अशी त्याची मागणी होती.

तशी रविवारची संध्याकाळ आमची कौटुंबिक मिटींगची वेळ. समस्त ईन-मीन-तीन-चार कुटंबिय जेवणाच्या टेबलाशी जमून एक-मेकांच्या officially उखाळ्या-पाखाळ्या काढायची हीच ती सुवर्णसंधी. एरवी काढतो त्या unofficially!

दर वेळी थोरल्या कुमाराचा एकच अजेंडा असतो - screen time वाढवून मागणे. दर वेळी ही त्याची मागणी रिजेक्ट होते तरी न डगमगता तो पुढच्या मिटींगला तिच मागणी घेऊन हजर असतो, एव्ह्ढच नाही तर बरेचदा शनिवार पासूनच मिटींग आज का नाही असे उसासे सोडू लागतो.

छोटूशेटांचं एक अजब विश्व आहे. त्या विश्वात थोरला बंधु आहे यावर ते तरून जातात. वास्तविक जास्तीचा screen time त्यालाही हवा असतो पण उगिच त्याकरीता कष्ट का करा? माणूस ठेवलाय ना त्याकरीता - तो भांडेल, मिळवेल - मिळाला तर आनंद, नाहीतर असो! अशी ठेविले अनंते तैसेचि रहावे ही वृत्ती. At times, तो व्हिडीओ गेम्स खेळायला देखील थोरल्याची नियुक्ती करतो, स्वतः नुस्ता तंगड्या पसरून बघण्याचं काम करतो. “तू का नाही खेळत रे?” याचं उत्तर – “I am watching him play” हे मिळतं. थोरला बंधु हा त्याची कामं करायला नेमलेला माणूस आहे असं त्याचं प्रामाणिक मत आहे, त्या कामात व्हिडीओ गेम्स खेळणं हे देखील आलंच की मग!

तर जेष्ठ कुमाराचा मिटींगकरीता तो एक ठरलेला अजेंडा तर याच्याकडे कधी काही अजेंडाच नसतो. "I don't have any issues" - हेच त्याचं दरवेळंचं म्हणणं. तेच ते – ठेविले अनंते - वृत्ती. मग त्याला मानाचा आग्रह होतो – बाबा, ठेव रे काही तरी अजेंडा ठेव. त्याच्यावतीने मग परत मोठे शेटच अजेंडा पुढे सारतात – तोच तो – अजून ज्यादा स्क्रीन टाईम!

दर मिटींग ला मी माझा पण अजेंडा घेऊन येण्याचं काम नियमित करते. यात युवराजांची शालेय प्रगती, आठवडयाच मेन्यु प्लानिंग, घरातल्या मोठया मेम्बरबद्दलच्या तक्रारी, एकंदरीत जगावरच्या तक्रारी - असं बरंच काही असतं पण यातलं काहीही चर्चेच्या गुऱ्हाळावर न येता चर्चा फक्त स्क्रीन टाईम याच विषयावर दरवळत रहाते. बऱ्याच चर्चेअंती आणि अनेक अटी, तह होउन त्या आठवड्याचा स्क्रीन टाईम ठरतो तो मागल्या वीक पेक्षा फार वेगळा असतो असं नाही पण युवराजाला आपण खूपच हुशारी दाखवली असा एक समज होतो, बराच वाद घालायला मिळाला हा एक साईड-फायदा. धाकट्या युवराजांना अजूनही काळ,काम, वेगाचं गणित कळत नसल्याने त्यांना तसाही काही फरक पडत नाही. आम्ही तहात बरीच चोअर्स करून घेण्याची आश्वासनं (तरी) मिळवतो. मिटींग त्या आठवड्यापुरती बरखास्त होते.

पण त्या दिवशी मात्र चक्क छोटूशेटानी एक अजेंडा पुढे सारला. अजेंडा काय तर म्हणे – घरात पू-पी आणि फार्ट सारखे "फनी वर्डस" हवे तेवढे वापरण्याची परवानगी असावी.

झालं असं होतं – आदल्या दिवशीच दोघं त्यांच्या टॉयरूममध्ये खेळत होते. थोड्या वेळातच अर्थातच जोरदार आरडा-ओरडी, गडबड ऐकू येऊ लागली. सर्व काही रोजचच चालू असल्याने निर्ढावलेले आम्ही चेहेर्‍यावरची माशीही हलू न देता शांतपणे आमच्या खोलीत आमचं महत्वाचं वेबसर्फिंगचं काम करत होतो. मोठेशेट खोलीत अवतीर्ण झाले.

"आई, आई - रिषभ अजीत सुरेश पंढरीनाथ धारकर is saying all the dirty pee and poop words."

"हे असं समस्त कूळाचा उद्धार करण्याची काय गरज?", मी!

"oh I just wanted to make sure that you guys are not confusing him with any other Rishabh."

"Wow! How very thoughtful of you! " , आमच्या आजूबाजूला अनेक रिषभ पसरलेले असून हा नेमका कोणत्या रिषभ विषयी बोलतोय हे आम्हाला कळणार नाही म्हणून घेण्यात आलेली खबरदारी बघून मी उपकृत झाले.

“बरं, तू कधीपासून संतपदाला पोहोचलास की, तुला हे शब्द बोललेले आवडेना झाले? अरे, त्याचा या विषयावरचा आद्यगुरू तूच ना?"

"Yeah but aai, he says all those words at school too. He is going to get in trouble."

अच्छा!...how to say these words but still not get in trouble या विषयावर अजून घरातल्या मास्तरांचा तास झाला नव्हता तर!

"बरं जा, रिषभ अजीत सुरेश पंढरीनाथ धारकरला बोलाव."

रिअसुपंधा यांचे आगमनच तारसप्तकातल्या रूदनाने झाले.

मग त्यावर अतितार सप्तक लावून त्याला विचारलं - "बाबारे, तुला हे पी-पू-फार्ट वर्डस फार आवडतात का?"

"Yeah those are funny words".

"हं..but do you realize you can't say those words in public just for fun? जा आत्ता खुर्ची आण, बस त्यावर नीट आणि बोलत बस हे शब्द - हवे तेवढा वेळ!”

यात काही sarcasm नावाचा प्रकार असेल असं मनातही न आणता त्याने तत्काळ खुर्ची आणली त्यावर आपलं बूड टेकवून पू-पू,पी-पी, फार्ट, पूपूहेड, पूपूपँटस असा केशवाय नमः, माधवाय नमः च्या चालीत मंत्रघोष चालू केला. यथेच्छ बोलून झाल्यावर मगच त्यानी तिथून बूड हलवलं.

पण एकंदरीत हा प्रकार पटलाच वाटतं त्याला. कारण हे घरी असे राजरोस "फनी वर्डस" बोलायला परवानगी मिळावी आणि त्याकरीता एक मानाची वेळ मिळावी, असा त्याचा अजेंडा पुढल्या मिटींगला घेऊन तो हजर झाला. तो मान्य करण्यावाचून गत्यंतर नव्हते अर्थातच. बाहेर शाळेत, टीचर्स समोर हे शब्द पारजण्यापेक्षा घरी बरे - असा विचार!

आता घरी रोज 'फनीवर्डस' ची पारायणं ऐकू येतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol Lol Lol

तीन्ही क्रॉनिकल मध्ये हे सर्वात जबरी आहे.
रिषभ अजीत सुरेश पंढरीनाथ धारकर ग्रेट !!

पू-पू,पी-पी, फार्ट, पूपूहेड, पूपूपँटस असा केशवाय नमः, माधवाय नमः च्या चालीत मंत्रघोष
झालं आता केशवाय नमः ऐकलं की हे आठवून फसकन हसू येणार.

भारी आहेत सर्व पात्रं.

“I am watching him play”
छोटूशेट चांगले मॅनेजर होणार असं दिसतंय.

:-d

Rofl

पू-पू,पी-पी, फार्ट, पूपूहेड, पूपूपँटस असा केशवाय नमः, माधवाय नमः च्या चालीत मंत्रघोष>>>>>>>>> Rofl

काय वयं आहेत दोघांची?

Lol भारी.
आमच्याकडे हळूच शाळेत s-वर्डस (म्हणजे अनुक्रमे स्टुपिड आणि सिली) बॅन आहेत त्याची आईला वारंवार आठवण करुन देण्यात येते. आईने कसलाही बोधपर उपदेश मनावर न घेतल्यावर ' यू रियली युज टु मेनी बॅडवर्डस आई' असे उलट ऐकविले जाते.

बाकी पुपु, पीपी- आवडते विषय अस्तात नाही या वयात.

Pages