रिकामा कॉरिड़ॉर

Submitted by भारती.. on 12 January, 2016 - 04:46

रिकामा कॉरिड़ॉर

मेंदूच्या गजबजलेल्या डिपार्टमेंट्सच्या मागून एक रिकामा कॉरिड़ॉर वळत जातो मागल्या दारातून जे उघडतं एका सुनसान गल्लीत जिथे पिवळी उन्हं सांडली आहेत दुपारची तरीही झाडांच्या गर्द सावलीत कळत नाही वेळ तुझ्याबरोबर तिथेच फिरते आहे मी निरुद्देश तू म्हणजे जिवाजवळचं असं काही जे म्हणजे मी नाही बुटक्या इमारतींच्या वळचणीला फडफडती कबुतरं पहात जात आहोत आपण शांतपणे तिथून जिथे पांगाऱ्याचं लालभडक निमंत्रण अंथरलेले फूटपाथ उलगडतात पायाखाली आणि हे पार्क दिसतं आहे जिथे एका लहान दुखणाईत मुलीला तिचे वडील शिकवताहेत चालायला आणि ती म्हणतेय ‘’बाबा गाणं म्हणा ना चपातीचं किंवा रेनकोटचं‘’ तेव्हा तेही स्वत:ला विसरून रचतात गातात काहीबाही आपण खूप कौतुकाने पुढे जातो तर पुढच्या गल्लीत भर दुपारी एक काळोखलेली खिडकी दिसते कळतं त्या वयस्कर स्त्रीला जाळून मारलं आहे तिथे इस्टेटीसाठी जिवाच्या आकांताने आणखीही किती काळोख कुजबुजणाऱ्या खिडक्या आपण तिथून जातो वळून न पाहता त्यावेळी शरीर म्हणजे धडधडतं हृदयच आहे सर्वव्याप्त – मला असं सांगायचं असतं तुला पण तू कुठे आहेस बरोबर मी एकटीच आहे आता या भयाच्या गल्लीत निघाले पाहिजे आश्वासक असतं दुपारचं चढतं ऊन्ह चटके बसून भानावर येतानाच डांबरी रस्त्यावर चमचमतं मृगजळ त्या तरंगांजवळच तू आहेस पोचायला पाहिजे तिथे मग सगळं काही ठीक होईल पण नाही आता समोर एक वाहता हमरस्ता जिथे रहदारी अपरंपार दडपून टाकते वाहने थांबतच नाहीत कधी क्रॉस करणार मी हा रस्ता जन्म उलटेल का असाच पुन्हा दिसतं की सिग्नलजवळ तू आहेसच पण दुसऱ्याच कामात आहेस म्हणजे दुसऱ्याच जगात ठीक आहे मग मीच आहे मी म्हणजे असं काही ज्याला दुसरं कुणीही असायची सवलत नाही या वाहत्या रस्तावर शोधत कित्येक वर्षे पिवळ्या उन्हात न्हालेली सुनसान गल्ली पांगाऱ्याचं लालभडक निमंत्रण अंथरलेले फूटपाथ आणि तो मागचा कॉरिड़ॉर शांतशून्य, मेंदूच्या गजबजलेल्या डिपार्टमेंट्समधून अगदी नि:शंकपणे विसावलेला ..
-भारती बिर्जे डिग्गीकर
( 'नीलमवेळ ' मधून )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही !!!!! असेच एकामागून एक विचार माझ्याही डिपार्टमेन्ट मध्ये स्फोट करतात. एक कॉमन फॅक्टर आहे, तो म्हणजे 'तू' वेगळ्या जगातील. खूप दिवसांनी मनाला मस्त ट्रीट मिळाली.

भारती, हे आवडलं.. पण सहज सूचलं, आधीच्या अश्या प्रकारात, सर्वप्रथम मला गर्दी जाणवली होती, तसा इथे एखादा कॉरीडॉर जाणवला असता तर..

^^^^

हा प्रतिसाद माझ्यासाठी आहे का ? मला प्रश्नाचे प्रयोजन कळालेले नाही. यात स्त्री-पुरूषाचा काय संबंध ? ही कविता पूर्णपणे कवयित्रीचे रेखाटन आहे. त्या एकमेकात मिसळणा-या रेषात अनेक आकार दर वेळेला दिसतात. त्यातला एक पकडून त्या वेळचा दिलेला प्रतिसाद आहे. खरंच अवांतर आहे.

तुमच्या प्रतिसादाचा रोख जो मला कळाला त्यासाठी तुम्हाला ही कविता कशी कळाली हे मला जाणून घ्यावेसे वाटेल.
पूर्ण नाही, पण

"‘’बाबा गाणं म्हणा ना चपातीचं किंवा रेनकोटचं‘’ तेव्हा तेही स्वत:ला विसरून रचतात गातात काहीबाही आपण खूप कौतुकाने पुढे जातो तर पुढच्या गल्लीत भर दुपारी एक काळोखलेली खिडकी दिसते कळतं त्या वयस्कर स्त्रीला जाळून मारलं आहे तिथे इस्टेटीसाठी जिवाच्या आकांताने आणखीही किती काळोख कुजबुजणाऱ्या खिडक्या आपण तिथून जातो वळून न पाहताच"

हा भाग.

प्राजक्ता,बी,तुमच्या विनंतीस्तव इथे ही कविता देताना मला फार आनंद झाला.

माझ्या दोन(च) गद्य-कवितांपैकी ही पहिलीच. तिच्यात वात्सल्याच्या ,प्रेमाच्या,स्नेहाच्या आठवणी, भयं,स्वप्नरंजन ,भ्रमनिरास यांचे मुक्त रंग एकमेकांत मिसळलेले आहेत.कोलाहलाविषयी कोलाहलात केलेलं चिंतन आहे.. मेंदूत गजबजलेल्या या सगळ्याला वेटाळून एक शांतशून्य कॉरिडॉरही आहे,मागल्या दारातून रिकाम्या गल्लीत उतरत जाणारा. हे मागलं दार जणू अंतर्मनातून गतकाळात उतरतं .पिवळी उन्हे , लाल फुलांचे सडे हे त्या गतकाळाचं अजाण सौंदर्य फार काळ टिकत नाही. नंतरच्या भयाकारी अनुभवांनी त्या निरागसपणावर आक्रमण केलंय .स्व ची ओळख आणि पत्ता हरवलाय ,पण शोध चालू आहे..पुन: रितं होऊन त्या रिकाम्या कॉरिडॉरकडे परतायचं आहे.. सर्व कोलाहलात आता जाणतेपणाने शांतीचा अनुभव घ्यायचा आहे.

दिनेश,मला हा कॉरिडॉर अगदी स्पष्ट दिसतो आहे.. कारण या कवितेत ( माझ्या इतर कवितांच्या तुलनेत )आत्मनिवेदनात्मक खूप भाग आहे. तो वाचकापर्यंत तसाच पोचेल असं नाही.

कापोछे ,तुम्हालाही कदाचित हेच कळलं आहे..

आभार सर्वांचे,रसिकतेने समजून घेण्यासाठी.

धन्यवाद भारती !!! हा कॉरिडॉर निजानिज झाली कि हळूच डोक्यात येतो. कापोचे, ही कविता गतकाळातल्या छान आठवणी व कोणीतरी एक अनामिक तू बद्दल आहे. प्रत्येकासाठी हा तू वेगळा असला तरी ज्याच्या त्याच्या जवळचा आहे. हा तू त्या ठिकाणी म्हणजे बाळाला खेळवणारा पप्पा गाणे म्हणत असताना जी प्रतिक्रिया देतो किंवा भयानक वाटणा-या जागेवर तुम्हाला धीर देतो. मला वाटते कि अश्या रिकाम्या कॉरिडॉरमध्ये अश्या कित्येक आठवणी एकामागुन एक येत रहातात. पण मुलांना विचारलं तर त्यांना मागचं काही आठवतच नसतं. म्हणून विचारलं, पुरूषांचे विचार असे एकाच गोष्टीवर एकामागुन एक बाहेर पडत नाहीत का ते !!!

धन्यवाद भारती !!! हा कॉरिडॉर निजानिज झाली कि हळूच डोक्यात येतो. कापोचे, ही कविता गतकाळातल्या छान आठवणी व कोणीतरी एक अनामिक तू बद्दल आहे. प्रत्येकासाठी हा तू वेगळा असला तरी ज्याच्या त्याच्या जवळचा आहे. हा तू त्या ठिकाणी म्हणजे बाळाला खेळवणारा पप्पा गाणे म्हणत असताना जी प्रतिक्रिया देतो किंवा भयानक वाटणा-या जागेवर तुम्हाला धीर देतो. मला वाटते कि अश्या रिकाम्या कॉरिडॉरमध्ये अश्या कित्येक आठवणी एकामागुन एक येत रहातात. पण मुलांना विचारलं तर त्यांना मागचं काही आठवतच नसतं. म्हणून विचारलं, पुरूषांचे विचार असे एकाच गोष्टीवर एकामागुन एक बाहेर पडत नाहीत का ते !!!

भारती परत परत वाचली आणि अजून अजून आवडत गेली. गद्य कविता ही टर्म आवडली अगदी.

बादवे, ह्या तुझ्या कवितेचे विडंबन वाचले की? तू त्या धाग्यावर जातही नसशील कदाचित. पण विडंबन केले की मुळ कवितेचे नाव तरी द्यायला हवे होते लेखिकेने Sad

बी अरे नाव दिले आहे की मी अगदी स्पष्ट लिहीले आहे सुरूवातीलाच. आता आणखी काय अजून स्पष्ट लिहायचे?

भारती विडंबन केले आहे वाङमयचोरी नाही. http://www.maayboli.com/node/49536?page=8#new
इथे वाचता येईल. मायबोली वरच्या कोलाहला विषयी कोलाहलात केलेले विडंबन आहे समजा. Happy

हह ,विडंबन छान केलं आहे,विडंबन म्हणण्यापेक्षा एक variation आहे. ते करणं सोपंही आहे या फॉर्ममध्ये Happy

पण विडंबन केले की मुळ कवितेचे नाव तरी द्यायला हवे होते लेखिकेने >> या बी च्या प्रश्नावर मी लिहीले आहे की नाव लिहीले आहे (कवितेचे!)
मी ते वाहत्या बीबी वर गंमत म्हणून पोस्ट केलेलं त्यामुळे तुमचे (कवयित्रीचे) नाव द्यायचे डोक्यात आले नाही. यापुढच्या विडंबनात नक्की देईन.