मंथन - मराठी साहित्याचे इ-प्रसारण

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

"तुमची पिढी वाचतच नाही."

मी अमेरिकेतल्या एका प्रतिष्ठीत मध्यमवयीन मराठी गृहस्थांशी फोनवरुन बोलत होतो, तेव्हा त्यांनी हा बॉम्ब टाकला. मी हबकलोच. त्या गृहस्थांविषयी मला आदर होता (आणि आहे). अमेरिकेतून निघणारं एक मराठी मासिक तरुण मंडळी का वाचत नाहीत या विषयावर आम्ही फोनवरुन बोलत होतो.

मी त्यांच्या या विधानाने खरच गडबडून गेलो होतो. माझा अनुभव मात्र बराच निराळा होता. अनेक संकेतस्थळावर मी आणि माझ्या इतर मित्रांनी लिहिलेल्या लेखनाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. बहुतेकशी वाचक मंडळी २५ ते ४० या वयोगटातील होती. अनेक मराठी नवीन मराठी संकेतस्थळं दिवसामाजी उगवत होती. त्यांची वाचकसंख्या दिवसेंदिवस वाढत होती. मग घोडं कुठे अडत होतं?

बऱ्याच विचाराअंती मी दोन निष्कर्ष काढले.

१) तरुणांना मराठी लेखन ज्या माध्यमातून हवंय - इंटरनेट - त्या माध्यमातून ते दिले गेले पाहिजे.
२) तरुणांना मराठी लेखन ज्या पद्धतीचं आवडतं - त्या पद्धतीचं, त्यांच्या भाषेत - आजकालच्या मराठीत दिलं गेलं पाहिजे.

या विचारसरणीतूनच मंथन या उपक्रमाचा जन्म झाला. इंटरनेट या माध्यमाचा मराठी साहित्याच्या प्रचारा - प्रसारासाठी वापर करायचा हे ठरवून महाराष्ट्र मंडळ, लॉस एंजलिसने कंबर कसली. आजकाल इंटरनेटवर मराठी अनुदिनी (ब्लॉग) असणारी संकेतस्थळे बरीच आहेत परंतु मराठी साहित्य पॉडकास्ट स्वरुपात किंवा ध्वनिमुद्रित स्वरुपात उपलब्ध नव्हतं. ज्या लेखकांचं साहित्य ध्वनीमुद्रित स्वरुपात उपलब्ध होतं ते इंटरनेटवर नव्हतं - ते फक्त सीडी किंवा कॅसेटच्या स्वरुपात फक्त महाराष्ट्रात उपलब्ध होतं. हा धागा पकडून एक मराठी पॉडकास्ट सुरु करायचं ठरवलं. नाव निवडलं - मंथन (http://mmla.org/mmla/ManthanHome).

पॉडकास्ट हे माध्यम बऱ्याच मराठी लोकांना अजूनही माहीती नाही. थोडक्यात समजवून सांगायचं झालं तर पॉडकास्ट म्हणजे एक ध्वनीमुद्रित फाईल. ही फाईल आयट्यून्स मधून वितरीत केली जाते - फुकट अथवा पैसे देऊन. आयट्यून्स मधून ती तुमच्या आयपॉडवर घालता येते. एकदा का ती फाईल तुमच्या आयपॉडवर आली की मग तुम्हाला ती हवी तिथे ऐकता येते. आयट्यून्स जी लोकं वापरत नाहीत त्यांच्या सोयीसाठी ह्या फाईल आम्ही मंडळाच्या संकेतस्थळावरही ठेवतो. तिथून त्या डाउनलोड करुन ऐकता येतात. एका भागाची एक mp3 फाईल. असे आतापर्यंत आम्ही ७ भाग प्रकाशित केले आहेत. हे सातही भाग मंडळाच्या संकेतस्थळावर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. मराठी साहित्याचा इंटरनेटवरुन प्रसार करणे हे उद्दिष्ट असल्याने, मंथन अर्थातच मोफत उपलब्ध आहे.

ध्वनीमाध्यम हे लिखित माध्यमापेक्षा जास्त परिणामकारक होऊ शकतं असा आमचा अनुभव आम्हाला सांगतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात गाडी चालवत असताना, व्यायाम करत असताना किंवा लोकलमधून प्रवास करत असताना जवळ आयपॉड किंवा तत्सम साधन असेल तर हे पॉडकास्ट ऐकता येईल. बहुतेक सर्वच कंपन्यांच्या फोनमध्ये आजकाल mp3 फाईल ऐकण्याची सोय उपलब्ध असते. असा फोन असेल तर हे पॉडकास्ट घेउन आपल्याला कुठेही जाता येईल आणि कुठेही ऐकता येईल.

आतापर्यंत प्रकाशित झालेल्या भागात उत्तर अमेरिकेतील प्रथितयश साहित्यीक आणि नवोदित साहित्यीकांच्या कथा आणि कविता आहेत. कथा आणि कविताव्यतिरिक्त सुधीर गाडगीळ, संदिप खरे, सुबोध भावे, गाभ्रीचा पाऊसचे दिग्दर्शक सतीश मनवर अशा नावाजलेल्या व्यक्तींच्या मुलाखतीही आहेत. साहित्याच्या अनुषंगाने ज्या माध्यमात साहित्य वापरलं जातं - नाटक, सिनेमा अशा क्षेत्रासंबंधित गोष्टींचाही आम्ही मंथनमध्ये समावेश करणार आहोत. या व्यतिरिक्त मंथनचा वापर नवोदित मराठी लेखकांसाठीचं व्यासपीठ म्हणूनही करणार आहोत. लेखकांनी विशेषत: उत्तर अमेरिकेतील लेखकांनी आपले साहित्य आम्हाल manthan@mmla.org या पत्त्यावर पाठवावे.

आमच्या या अभिनव उपक्रमाला सर्वांकडूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रसिद्ध इंटरनेट रेडिओ इ-प्रसारणनेही मंथनचे भाग प्रसारीत करायला सुरुवात केली आहे.

मंथन हा नुसताच एक उपक्रम नसून एक चळवळ आहे. साहित्य प्रेमींची - मराठी वाचणाऱ्या लिहिणाऱ्या आणि ऐकणाऱ्यांची. या चळवळीत आपणही सहभागी व्हाल अशी आशा आहे!

विषय: 
प्रकार: 

छान उपक्रम वैभव. अश्या चांगल्या उपक्रमांचा प्रसार आणि प्रचार व्हायला हवा म्हणजे त्याची लोकप्रियता वाढेल. त्यासाठी तुमचे मराठी मंडळ जी कामगिरी करतेय ती उल्लेखनीय आहे.