किल्ले कुर्डूगड, निसणीची वाट व ठिपठिप्या घाट.

Submitted by योगेश आहिरराव on 6 January, 2016 - 07:47

किल्ले कुर्डूगड, निसणीची वाट व ठिपठिप्या घाट.

यंदा नाताळची सुट्टी विकेंडला जोडून आल्यामुळे तीन दिवस हाताशी होते. साहजिकच अशावेळी ट्रेक तर होणारच. तीन दिवसांपैकी दोन दिवस ट्रेक आणि एक दिवस घरी असा समजोता झाला. मग दोन दिवस एक रात्र, एखादी चांगली घाटवाट आणि त्याला जोडून एखादा किल्ला असे मनात होते. बरेचसे पर्याय कागदावर उतरवले, नंतर आमचे सह्यमित्र घाटवाटांचे प्रमुख ‘मनोज भावे’ आणि ‘जितेंद्र बंकापूरे’ यांच्या सोबत चर्चा करून, ‘कुर्डूगड’ पाहून निसणीच्या वाटेने ‘धामणव्हळ’ मुक्काम करून ‘दापसरे’ जाऊन ठिपठिप्या घाटाने जिते गावात उतरणे हा प्लान फायनल करून टाकला. थोडक्यात दोन घाटवाटा,एक किल्ला असा छोटेखानी मस्त ट्रेक.
२५ तारखेला पहाटेच निघून कोलाड, विळे भागड मार्गे ‘जिते’ गावात गाडी लावली तेव्हा सकाळचे अकरा वाजून गेले होते. यावेळी साथीला होते ‘हेमंत गांधी’ आणि ‘विनायक डोडवाड’.

गावातून सह्याद्रीच्या मुख्य रांगेचे मोहक दर्शन झाले, ‘जिते’ हे कुर्डूगडाच्या दक्षिणेला सह्याद्रीच्या पायथ्याचे गाव पण तरी कूर्डगड मात्र इथून दिसत नाही. गावाच्या मागे एका मोठ्या टेकडीपलीकडे तो लपलेला आहे. गावात गाडी पार्कींगची सोय करून साखळेवाडीच्या दिशेने निघालो. डाव्या हाथाला मोठी टेकडी ठेवून वीसएक मिनिटांच्या चालीनंतर डावीकडूनच कुर्डूगडाच्या माचीवरून एक सोंड उतरली आहे. मधल्या शेताडीतून वाट काढत त्याच सोंडेवरून चढाई सुरू केली.

पुन्हा तेच भर दुपारी त्या उन्हात दमट वातावरणात सुरूवात केल्याने चांगलाच दम लागत होता. सुरूवातीची सोडेंवरची वाट ही खडी चढाईची त्या वाटेवर सावली देणारी मोठे वृक्ष ही नाहित. तासाभरात कुर्डूगडाच्या पठारावर आलो. समोरच सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेला कुर्डूगड दिसला.

पठारावरून गडाच्या दिशेने ठळक पायवाटेने अर्ध्या तासात गडाखालच्या कूर्डू पेठ वाडीत पोहचलो. वाडीतल्या कुर्डाई देवीच्या मंदिराजवळूनच वाट किल्ल्यावर जाते.

तिकडे गेल्यावर पहातो तर तंबू ठोकलेले दिसत होते, मग कळाले की ‘चक्रम हायकर्स’ संस्थेची सह्यांकन ची ही कूर्डपेठेतली छावणी.

छावणी जवळ गेल्यावर विचारपूस झाली. आम्हाला तिघांनाही आग्रहाने जेवणाला बसविले. साबुदाणा खिचडी, काकडीची कोशिंबीर, वटाणा बटाट्याची भाजी, चपाती असा मेनू. या छावणीचे शिलेदार होते, पराग ओक, उद्य पोवळे आणि मानसी देशमुख. गेली चार दिवस ते इथेच सह्यांकनच्या येणार्या चमुची व्यवस्था करत होते. चक्रमचे सह्यांकन हा तर एक वेगळाच विषय होईल, असो तर.
जेवण झाल्यावर आमचे सामान तिथेच ठेवून, पाण्याची बाटली घेऊन कुर्डूगडाकडे निघालो. मंदिराला डावीकडे ठेवून मळलेल्या वाटेने चढाईला सुरूवात केली. वर गेल्यावर डावीकडे पाण्याचे मोठे टाके दिसले व त्यातून खाली गेलेला एक पाण्याचा पाईप उन्हाळ्यात हेच पाणी कुर्डूपेठेत वापरले जाते.

थोडे पुढे आल्यावर कातळात कोरलेल्या पायर्याने वर गेलो.

गडाचा कडा उजवीकडे ठेवून पुढे गेल्यावर मोठ्या निसर्गनिर्मित घळी पाशी आलो, आतमध्ये बराच दगडांचा खच पडलेला आहे.

समोरच दिसत होता आमचा पुढचा मार्ग निसणीची घाटवाट व धामणव्हळ. घळीच्या पुढे गेल्यावर पडकी तटबंदी.

पुढे कपारीतून वर चढून गेल्यावर पलीकडे टाके दिसले.

ही नैसर्गिक खिडकी.

तसे पाहिले तर कुर्डूगडाचा उपयोग टेहळणीसाठीच होत असावा. सह्याद्रीच्या मुख्य रांगेसमोर उभा असलेल्या इथल्या मोक्याच्या ताम्हाणी, देवघाट, लिंग्या घाट, निसणीची वाट आणि दक्षिणेकडील ठिपठिप्या घाट या महत्वाच्या घाटावांटावर लक्ष देण्यासाठीच. तसेच मराठा सरदार बाजी पासलकरांचे धामणव्हळ व कूर्डूगड हे विश्रांतीचे स्थान, म्हणूनच गडाला विश्रामगड असेही म्हणतात. एव्हाना अडीच वाजून गेले होते.

परत आल्यामार्गे उतरायला सुरूवात केली. गडावरून दिसणारी कुर्डूपेट आणि मंदिर
<
वाटेतल्या टाक्याचे पाणी भरून पंधरा मिनिटातच मंदिरात दाखल झालो.
चक्रम हायकर्सच्या आदरातिथ्याचा लाभ घेऊन पुढच्या वाटेला लागलो. कूर्डूपेठेतून आलेल्या विजेच्या तारांची सोबत घाटमाथ्यापर्यंत होतीच.

गडाला उजवीकडे ठेवत वाट पदरातून वळसा घेत पुढे सरकू लागली. अगदी मळलेली पायवाट त्यात चक्रम हायकर्सच्या सह्यांकनचा हाच मार्ग असल्यामुळे ठिकठिकाणी बाणाच्या खुणा होत्याच.

आता कुर्डूगड मागे पडला होता, अर्ध्या पाऊण तासाच्या चालीनंतर वाट जंगलातून चढणीला लागली.

कातळात ठिकठिकाणी पायर्या आहेत.

जसा सह्यमाथा जवळ येऊ लागला तसाच हवेत चांगलाच गारवा जाणवु लागला.

सायंकाळच्या उन्हात सह्याद्रीच्या मुख्य रांगेतले कातळपट्टे, मधला हिरवा झाडोरा, तीव्र उतार असलेल्या घळी, पदरातल्या मोठ मोठाल्या झाडी सर्वच सुंदर दिसत होते.

माथ्यावर पोहचल्यावर समोरच हा बहिरोबा देव आणि उजवीकडे लवासाने बांधलेले बॉम्बे पॉईंट नामक वॉच टॉवर.

वॉच टॉवर बाकी मोक्याच्या जागेवर बांधलाय. मनसोक्त फोटोग्राफी केली. पण सायंकाळचा तो भन्नाट बोचरा वारा मात्र प्रचंड गार, धामणव्हळ मध्ये कडाक्याची थंडी असणार जणू
हेच बजावून देत होता. खर सांगतो त्या वार्याला कंटाळून तिथून लवकरच काढता पाय घेतला.

पलीकडे धामणव्हळ गावापर्यंत वीजेच्या तारांची सोबत होतीच, दुरवर गाव नजरेतच होते.

गावात जाताना वाटेतले हे शिवमंदिर, सुर्यास्ताच्या आतच गावात दाखल झालो.

गावामध्ये श्री. विलास शेडगे यांच्या घरात मुक्काम टाकला. शेडगे भाऊ माळकरी (बुवा) त्यांच्या आणि विनायकच्या अध्यात्मिक गप्पा चांगल्याच रंगल्या.

(डावीकडून - अस्मादिक, विनायक आणि शेडगे भाऊ) रात्री जेवण झाल्यावर गावात चक्कर मारायला बाहेर पडलो तर कडाक्याची थंडी अक्षरश: काही वेळातच पुन्हा घरात येऊन शांतपणे झोपी गेलो.
सकाळी उठल्याउठल्या शेडगे भाऊंनी चक्क अंघोळीसाठी गरम पाणी समोर ठेवले. मग काय आम्ही थोडीच नकार देणार, भर थंडीत ट्रेकला सकाळी गरमागरम पाण्याने अंघोळ क्या बात है !
सकाळचा पोटभर नाश्ता करून नऊ वाजेच्या सुमारास पुढचा पल्ला दापसरे या गावी जाण्यासाठी निघालो.
शेडगे भाऊ थोड पुढे अचुक वाटेपर्यंत आम्हाला सोडायला सोबत निघाले. चालता चालता वाटेत विषय निघाला, धामणव्हळ हे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील ( नव्याने झालेल्या लवासा सिटी जवळचे पश्चिमेकडील) गाव. वरसगाव धरणाचा फुगवटा गावापर्यंत आला आहे. बाजी पासलकर या जलाशयाचे नाव त्यांचा जुना वाडा जमीन सर्व या धरणाच्या पाण्याखाली गेले आहे. गावातली बरीच तरूण मंडळी लवासात छोटी मोठी काम करतात. खुद्द शेडगे भाऊ सुध्दा लवासातच काम करतात. वीस पंचवीस वर्षांपूर्वी त्यांच्या जमीनी या प्रकल्पात गेल्या, आणि आता ही मंडळी तिथेच कामाला आहेत. गावात वीज सुध्दा हल्लीच सात आठ वर्षांपूर्वी आली. एकीकडे विकासाचे धोरण तर दुसरीकडे कुणाचे शोषण ? असो तर...
गावातून निघाल्यावर मोठा पुल पार करून उजवीकडे वाट टेकडीवर चढायला लागली. वाटेत बर्यापैकी झाडोरा होता.

थोडे वर आल्यावर मागे वळून पाहिले तर खाली वरसगाव धरणाचा फुगवटा आणि धामणव्हळ गाव. तीस ते चाळीस मिनिटात वर पठारावर पोहचलो.

त्या सकाळच्या वातावरणात पठारावर फारच रमणीय वाटत होते. स्वच्छ निळे आकाश, कालच्या तुलनेत आजचा सौम्य गार वारा, आजूबाजूचे जंगल. एकंदरीत मस्तच वाटचाल होती.

इथेच एके ठिकाणी आम्ही शेडगे भाऊंचा निरोप घेऊन, पुढच्या वाटेला लागलो. पुन्हा तेच पठारावरच्या भारावलेल्या वातावरणात चाल जरा मंदावली होती. लगेचच पुढचा पल्ला आठवत भानावर येत, न रेंगाळता तासाभरातच या मार्गावरची रेडे खिंड गाठली.

खिंडीत प्रचंड गारवा आणि छानपैकी जंगल. या पठारावरची वाट मला दुर्ग ते ढाकोबा या वाटेची आठवण करून देत होती. रेडे खिंड उतरल्यावर दहा मिनिटातच धनगराचा पाणवठा लागला.

बाटलीत पाणी भरून पुढच्या पाच मिनिटात धनगरपाडा गाठला. राम राम शाम शाम करून विचारपूस झाली. ‘ढेहबे’ कुटुंब या पाड्यात रहातात.

बोलता बोलता असे ही कळाले की, या पठारावरूनच एक वाट खाली जित्यात उतरते पण आत्ता कुणी वापरात नाही, वाटेला जंगल आणि गचपण वाढलय. जर ती वाट व्यवस्थित असती तर आम्ही वेळ वाचवून तिथूनच उतरलो असतो. नवीन वाटेने उतरल्याचे तेवढेच समाधान. पण ढेहबे काकांनी दापसरेत जाऊन, ठिपठिप्यानेच खाली उतरण्याचा सल्ला दिला. अर्थात आमचे नियोजनही तसेच होते. सरळ दापसरेची वाट धरली, पुढे काही वेळातच वाट उतरणीला लागली.

समोरच डोंगरावर घोळ कडे गाडी रस्ता आणि खाली दापसरे गाव दिसले. आता पठारावरून खाली घसार्यातली वाट उतरत.

मधला ओढा पार करून पानशेत - घोळ डांबरी रस्त्यावर आलो. तसेच पुढे जात एका दिशादर्शक पाटीच्या दिशेने दापसरे गावासाठी डावीकडे वळालो.

अंबी नदीच्या काठावरचे दापसरे हे पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील एक टुमदार गाव.

थोडक्यात आम्ही मुळशी तालुक्यातून आता वेल्हा तालुक्यात प्रवेश केला होता. गावात जाताच, धोंडीबा मोरेंचे घर शोधून त्यांच्या अंगणात विसावलो. वेळ पाहिली तर बारा वाजून गेले होते.

धोंडीबा मोरे- एकदम भारी माणुस, सदैव हसतमुख, थट्टा म्हस्करीत पटाईत. पण घोळ, खानु, दापसरे या भागाची सखोल माहिती असणारे व्यक्तिमत्व. पुण्याचा जितेंद्र बंकापूरेने तुमचा पत्ता दिला हे सांगितल्यावर हशा पिकला व काही क्षणातच आमच्यात मैत्रीचे नाते जोडले गेले. त्यांच्याच घरात सोबत आणलेला सुका खाऊ खायला बसलो, तेवढ्यातच शुध्द गावराण ताक समोर हजर. थोडी पेटपुजा जरा वेळ आराम करून बरोब्बर दुपारी एकच्या सुमारास तिथुन निघालो. ठिपठिप्या घाटाची सुरूवातीची वाट दाखवायला, अर्थातच धोंडीबा मोरे सोबत होतेच.

वाटेत पुढे जाताना हे निगवण्ययाचे पाणी लागले. इथूनच पश्चिमेकडच्या टेकडीवर चढत वाट पुढे डावीकडे सरकू लागली. पुढे पठारावरून चालत, वाटेतला छोटा ओढा पार करून घाटमाथ्यावर पोहचलो.

अलीकडे घोळ गावातून परस्पर घाटामाथ्यावर येणारी वाट धोंडीबा मोरे मामांनी दाखवली. घाटमाथ्यावर स्वागताला वारा हजर होताच.

(डावीकडून - विनायक, मोरे मामा आणि हेमंत गांधी)
वायव्येला कुर्डूगडाचे दर्शन झाले. खाली कोकणात सरळ रेषेत साखळेवाडी आणि जिते सहज नजरेत येत होते. .

येथेच ठिपठिप्या घाटाची सुरूवात होते. आता मोरे मामांचा निरोप घेण्याची वेळ आली होती, वरूनच आम्हाला वाट समजावून सांगितली.

सुरूवातीचा कातळकडा सावकाश उतरून नाळेत दाखल झालो.

नाळेची सुरूवात ही भोरांड्याच्या दारा सारखीच वाटली.
नाळेत झाडांची काहीच कमी नव्हती. भर दुपारी त्या उन्हात सुध्दा काही ठिकाणी खाली सुर्यप्रकाश पोहचु शकत नव्हता.

अर्ध्या तासात नाळेतला तो तीव्र दगडधोंड्याचा उतार पार करून वाट उजवीकडे कातळाला चिकटून वळाली, बाजूच्या कातळावरून ठिप ठिपनारे पाणी या खालच्या कुंडात पडते म्हणून हा ठिपठिप्या घाट.

कुंडाच्या आजूबाजूला मधमाश्या घोंघावत होत्या, वर पाहिले तर भले मोठे पोळ लगेचच तिथून सटकलो. पुढे त्या अरूंद वाटेने कातळावरून उजव्या बाजूने वळसा घालून पलीकडे गेलो तर पुन्हा सामोरा आला तो कुर्डूगड.

पुढे वाट उतरून पुन्हा जंगलात शिरली. मळलेल्या पायवाटेने पुन्हा एका पदरात बाहेर आल्यावर सरळ साखळेवाडीची दिशा धरली.

मागे वळून पाहिले तर आमचा उतरणीचा मार्ग दिसत होता. मध्ये एका मोठ्या कोरड्या ओढ्याज॒वळ चक्क पंधरा वीस मिनिटे ताणून दिली. त्या वेळी त्या छोट्याशा ब्रेक नंतर चांगलेच फ्रेश झालो. बरोब्बर पावणेपाच वाजता पुर्ण ठिपठिप्या घाट उतरून साखळेवाडीत आणि दहा मिनिटांत जिते गावात पोहचलो.

गाडी उभी केलेल्या ठिकाणी आलो, थोडे अलीकडे जाऊन छानसा फोटो घेतला.

आता आमच्या समोर होता तो आम्ही केलेला दोन दिवसांचा सुंदर असा सह्याद्रीतला चढाई आणि उतराईचा प्रवास.

योगेश चंद्रकांत आहिरे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा थांबवत नाही वाचताना. मजा आली. एका फोटोत तुमच्या पाठीवरच्या सॅकमधे नारळासारखे एक झाड आहे. ते नारळाचे रोप आहे का? घरी लावले का?

https://lh3.googleusercontent.com/-4wmpZtVax_o/VozaWEHSOOI/AAAAAAAAFZY/7...

कौतुकाला शब्दच पुरे पडत नाहीत..
त्याचबरोबर "हेवाही" वाटतो. Wink
पण तुम्ही जाऊन आलात, अन इथे सगळा तपशील फोटोसहित देता आहात, त्याबद्दल धन्यवाद. Happy

अतिशय सुरेख वर्णन व फोटोही छानच...

अवांतर - एखादा कच्चा का होईना, पण तुमच्या या भ्रमंतीचा नकाशा असता सोबत तर फार बरे झाले असते.. Happy

जिप्सी आणि इंद्रा प्रतिसाद आवडला. धन्यवाद !

@ बी, नाही ते नारळाचे रोप नाहिये. ते बहूतेक खजुराचे ? झाड होते. त्याची पाने खुपच कोवळी होती. आमच्या ग्रुप मधील हेंमतला त्या पानापासून फुले तयार करायची होती. पण उतरताना जो मोठा रिफ्रेशमेंटला ब्रेक घेतला. तिथेच हेंमत ते विसरला.

लिंबूटिंबू, विजय, संदिप एस, पुरंदरे शशांक आणि प्रविण खुप खुप धन्यवाद !

@ पुरंदरे शशांक, तुम्हाला नक्की कोणता नकाशा अपेक्षित आहे ?
तसा एखादा कच्चा नकाशा मी देण्याचा प्रयत्न करीन.

योगेश, विशेष नाहीरे, फक्त जसे मी पुण्यात / पिंचिमधे रहातो, तर त्या अनुषंगाने पुणे/मुंबईच्या सापेक्श तुम्ही नेमके कुठे गेला होतात, तो गड नेमका कुठे आहे ते नकाशावर दाखवले तरी भरपुर होईल. बरोबर ना शशांक?
जसे की राजगडला जायचे तर पुणे ते सातारा रस्ता दाखवुन, नसरापुर फाटा... वगैरे दाखवित सिंहगड, तोरणा, राजगड अशी स्थळे बघता आली तर वाचकास नेमका भूप्रदेश चटकिनी कळू शकतो.
अन्यथा, मित्र "चित्रकुटास" जाणारे रविवारी, तर आजही माझ्या नजरेसमोर आख्ख्या भारताच्या नकाशात "चित्रकुट" नेमके कुठेशिक आले ते नजरेसमोर न येताच चाचपडायला होते.

मस्त. मजा आली वाचताना. पण खरंच एखादा नकाशा दिलात किंवा अगदी गूगल अर्थवर प्लॉट करून दाखवलंत तरी आवडेल. Happy

अर्रे यार, थोडक्यात आपली भेट चुकली म्हणजे.. २५ लाच सह्यांकनची माझी बॅच सकाळी कुर्डुपेठ कँप सोडून ताम्हिणीकडे कूच करती झाली होती. सकाळी लवकर आला असतास तर भेट झाली असती.
लेख, माहिती व फोटो मस्तच .. आवडलं बॉस!

@ तात्या - अगदी बरोबर. घोळ गाव कोकणदिव्याजवळच आहे.

दिनेश, वर्षूताई, अमितव, नरेश आणि वरदा प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद !

यो , नुसते मस्तच म्हणू नकोस. पुढच्या वेळी तू पण चल.

@ हेम साहेब, मला माहिती होते. तुम्ही २५ ला कुर्डूपेठेत असणार. वर छावणीत भेट झाल्यावर मी पराग ओक यांना पहिला प्रश्न तोच विचारला कि हेम कुठे आहे ? थोडक्यासाठी भेट हुकली. असो तर.
मेळाव्यात भेट होईलच.

अगदी बरोबर शशांक साहेब.

शशांक, वरदा आणि लिंबूटिंबू
कच्चा नकाशा, माहितीसाठी देण्याचा प्रयत्न केलाय.

शशांक, छान, गुगलबाबा कृपेने मी पण शोधले. हे बघ...

untitled2.JPGuntitled3.JPG

होप सो की आता आपापल्या शहर/गावापासून हे ट्रेकचे ठिकाण कुठे, किती दूर आहे ते समजुन येईल.
(योगेशच्या पोस्ट्स नंतर बघितल्या.. )

योगेश - तुम्ही दिलेल्या कच्च्या नकाशातले काहीच दिसत नाहीये - कृपया, साईज मोठा करुन टाकणार का ?

Pages