तो

Submitted by हर्पेन on 6 January, 2016 - 23:43

बसलेले असतो आपण निवांत बिवांत
साजरा करत असतो उदाहरणार्थ कोणाचा तरी वाढदिवस, नवीन वर्ष वगैरे बिगैरे
ठरवत असतो नवीन योजना संकल्प ईत्यादी बित्यादी

अचानक एक फोन येतो मी कसा तू कसा असं बोलण होतंय न होतंय तोवर त्या बातमीचा बॉम्ब पडतोच आपल्यावर
जिवंतपणीच छिन्नविछिन्न करतो आपल्या मना-हृदयाला
काय झालंय हे कळल्यावर आधी तर हे असं काही नसेलच झालं असा विचार
आणि थोडं झिरपलं तर कसं झालं कधी झालं हे विचारण्याचे उपचार
असं होउ शकलं असतं का तसं झालं असत तर
अशा अनेक निरर्थक वांझ शक्यता बोलल्या जातात किंवा एखादवेळी राहतात मनातच
पण सत्य हेच असतं की डाव साधलेला असतो त्याने....

तो कसा आहे कोणास ठाउक. त्याला भेटलेला कधी सांगुच शकत नाही याबद्दल
आपण नेहेमी ऐकलेले की तो असतो जवळपासच आपल्या आणि आपल्यांच्या अवती भवती
कधीही कुठेही कोणासही गाठतो, सोडत नाही अजिबात
चांगल्याला तर म्हणे नक्कीच नाही
बोलावणाऱ्याकडे जाईलच असे नाही पण बोलावण नसतानाही खुश्शाल जायचे ही तर त्याची खासीयत

अटळच आहे तो... चुकवता नाहीच येत कोणासही
अत्यंत अशाश्वत अशा या जगात असलेली एकच शाश्वत गोष्ट
सगळं सगळं पाठ असतं... निरुपायाने का होईना मान्य करावच लागतं

मग आपणही होतो गाफील आणि बसलेले असतो निवांत बिवांत
साजरा करत असतो उदाहरणार्थ कोणाचा तरी वाढदिवस, नवीन वर्ष वगैरे बिगैरे
ठरवत असतो नवीन योजना संकल्प ईत्यादी बित्यादी
आणि मग तो येतोच न बोलावता, आपण,पुर्णपणे बेसावध आणि गाफील असताना
आणि साधतो डाव परत...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

..... !

सरता संचिताचे शेष | नाही क्षणाचा अवकाश |
भरता न भरता निमिष | जाणे लागे || (समर्थांचा दासबोध)

यथार्थ वर्णन केलेस हर्पेन!
_/\_

धन्यवाद पद्मावती, विशाल, जव्हेरगंज, भुई कमळ, सवाई माधाव, भारतीताई, चैतन्य आणि मी प्राजक्ता

चैतन्य समर्थांच्या श्लोकाबद्दल धन्यवाद __/\__
मी प्राजक्ता, दुर्दैवाने ही कल्पना नाही हे सत्य आहे Sad