अहा... हा, शिशिरोत्सव!

Submitted by झुलेलाल on 1 January, 2016 - 10:40

अहा हा... शिशिरोत्सव!!

उगवतीची उन्हं अंगावर आली की जागं होऊन मावळतीकडे पळणाऱ्या सूर्याचा पाठलाग करीत दिवस ढकलणाऱ्या महानगरांना ऋतुकाळाचं भान तसं क्वचितच असतं. दिवसभराच्या दगदगीचं ओझं अंगावर वागवत घामानं चिपचिपलेलं अंग दिवसाअखेरी थंडशार शॉवरखाली झोकून दिल्यावरही, ती शहारून सोडणारी शिरशिरी अंगावर कधी उमटलेलीच नसते, त्यामुळे गारव्याचा गोडवाही या महानगरांना फारसा आठवत नसतो. पण अलीकडे वसुंधरेभोवती फेर धरलेल्या संकटांच्या जाणीवेनं जी काही थोडीफार जाग आलेली असते, त्यामुळे खरे ऋतुचक्र अनुभवण्याची आसही वाढीला लागली आहे. उसंत मिळताच, महानगराबाहेर शहरी खुणांमधून आपला जिवंतपणा जपण्याची कसरत करणाऱ्या निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःला झोकून देत तात्पुरत्या ताजेपणाची आणि आनंदाची शिदोरी सोबत घेऊन पुन्हा चिपचिपत्या गर्दीत मिसळून जाणं म्हणजेच जगणं असंच मानत आलेल्या महानगरांना ऋतुचक्राच्या त्या मोहमयी जादूची जाणीव तरी कशी अनुभवता येणार? आपल्या घराच्या खिडकीबाहेरच्या गॅलरीतल्या चारदोन कुंड्यांमधून फुलणारी फुलं आणि त्यामुळे आनंदानं लहरणारी कुंडीतली झाडं, हाच त्यांचा निसर्ग... खिडकीच्या चौकटीबाहेर दिसणारी चारदोन झाडाझुडुपांची हिरवाई पाहून मनाला फुटणाऱ्या उत्फुल्ल उकळ्यांमध्ये, काहीतरी गवसल्याच्या आनंदापेक्षा खूप काही गमावल्याची वेदना इतकी बेमालूम दडलेली असते, की अशा वेदनेची ठुसठुस मनाला झोंबत असल्याची जाणीवही सवयीनं बोथट होऊन जावी! कधीतरी वेगळंच काहीतरी घडतं आणि त्या गमावलेल्याच्या आठवणींनाही उजाळा मिळून जातो. हे असं आपण केव्हा तरी अनुभवलं होतं, याची जाणीव होते आणि अचानक हाती आलेल्या त्या आनंदाच्या अनुभवानं मनं मोहरू लागतात...
महानगरी मुंबईतील जगण्याला आजवर केवळ दोनच ऋतूंचा स्पर्श असायचा. अस्वस्थ, नकोसं करून सोडणारा, कधीमधी सुरक्षिततेच्या भयानं गोठविणारा आणि तुडुंब कोसळणारा पावसाळा, आणि त्यानंतर लगेचच, सवयीचा झालेला तो चिप्प उन्हाळा. मुंबई हे त्या अर्थाने खरोखरीच घाम गाळणाऱ्यांचं महानगर! इथे घाम कवडीमोलानं मोजला जातो. कारण घराबाहेर पडलं, की अंगे घामधारांनी चिंब होऊन जातात. उन्हाळा आणि पावसाळा यांच्या मध्ये एक मोसम असतो, असं मुंबईकरांना ऐकून माहीत असतं. पावसाळा संपला, की पानगळ सुरू होण्याआधी झाडाझुडुपांना वसंताचे वेध लागतात, आणि त्याआधी नव्या रूपानं ताजंतवानं होण्यासाठी आसपासच्या मोजक्या हिरवाईची लगबग सुरू होते, तेव्हा हिवाळा आला असं मानलं जातं. घराघरातल्या चित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरली शेकोटीची चित्र न्याहाळताना, थंडीच्या लाटेच्या बातम्या वाचताना आणि ऐकताना ती गमावलेपणाची वेदना जागी होऊ लागते आणि थंडीचा तो शहार, शहराबाहेरचा शिशिरस्पर्श अनुभवण्यासाठी मनाची तगमग सुरू होते. मग सलगपणे मिळणाऱ्या सुट्ट्यांचा मुहूर्त साधून मुंबईबाहेर सैर करण्याचे मनसुबे आकार घेऊ लागतात, आणि वीकेन्डला जवळपासची थंड हवेची ठिकाणं गर्दीने ओथंबून जातात. कुणी उत्तरेच्या गोठविणाऱ्या थंडीत बर्फाचे गोळे अंगावर झेलण्याच्या इराद्याने सफरीच्या योजना आखतो आणि अशा तऱ्हेनं, रोजच्या आयुष्यातला तो हरवलेला ऋतू मनात साठविण्याची सुप्त इच्छा पूर्ण करून घेतो. त्याच वेळी अचानक, एखादी थंडगार शिरशिरी आणणारी झुळूकही आगांतुकासारखी दाखल होते, आणि मुंबईकर सुखावतो. या गार वाऱ्यातच तो शिशिरातला शहार शोधू लागतो, आणि संधिकाळाची हुरहुरी लावणारी वेळ साधून समुद्राच्या काठावर आपल्या स्वप्नासमवेत बसून हरवलेल्या त्या आनंदाचा क्षणक्षण साठविण्यासाठी धडपडू लागतो...
अशी मधूनच जाणवणारी एखादी थंड वाऱ्याची झुळूक हा आजवरचा मुंबईकरांचा हिवाळा... या गारव्यातच विरंगुळा शोधणारा मुंबईकर अशा झुळुका जाणवू लागताच, कपाटात गुंडाळलेल्या स्वेटर-शाली अंगाभोवती लपेटून घेऊन बोचऱ्या पहाटवाऱ्याच्या शोधात बाहेर पडू लागला, की थंडीचा मोसम सुरू झाला असे समजायचे. कुठेतरी एखाद्या रात्रपाळी करणारा पहारेकरी त्याच्या इमारतीबाहेरच्या रस्त्यावर चारदोन फळकुटं गोळा करून शेकोटी पेटवून त्याची ऊब घेताना आढळला, की काहीतरी अप्रूप अनुभवल्यासारखी भराभर त्याची छायाचित्रे काढून ती समाजमाध्यमांतून आणि टीव्ही-वर्तमानपत्रांतून घरोघर पोहाचवून गुलाबी थंडी आल्याची वर्दी दिली जाते आणि अशा बातम्या वाचता-ऐकताना, आपणही अशी थंडी अनुभवावी अशा आशा अधिकच पालवतात. गुलाबी थंडीची दुलई पांघरून मोहरलेल्या महानगरांची वार्ता बाहेरही पोहोचते आणि कमाईच्या आशेनं शाली-स्वेटरांचे व्यापारी शहरात कानाकोपऱ्यावर दुकानांची पथारी पसरू लागतात, तोवर ते थंड वारे गायब होऊ लागतात. पुन्हा उन्हाच्या झळांनी महानगर भानावर येतं, आणि हिवाळा हरवल्याच्या जाणीवेनं हिरमोड होऊ लागतो.
अशी नुकती चकविणारी चाहूल देऊन अचानक हूल देणारा हा हिवाळा कधी सगळा, भरभरून अनुभवताच येत नाही हा महानगरी मुंबईचा अनुभव अलीकडे शहरीकरणाच्या वेगवान वाऱ्याबरोबर इतरत्रही पसरू लागला आहे. कालपरवापर्यंत गोठविणाऱ्या थंडीची वर्णने करून मुंबईकरांना वाकुल्या दाखविणाऱ्या शहरांनाही शिशिरस्पर्शाचे वावडे सुरू झाले आहे. ग्लोबल वॉर्मिंग, वातावरणातील बदल आणि अल-निनो सारख्या शब्दांचा तर अलीकडे निसर्गानेही धसकाच घेतला आहे. या शब्दांच्या नुसत्या चाहुलीनं जणू ऋतू पळून जातात, असं वाटत असताना यंदा मात्र, अनपेक्षितानंच धक्का दिलाय. मुंबईला हुडहुडी भरली, महाबळेश्वराच्या गारव्यालाही मुंबईनं मागे टाकलं, आणि शिशिरस्पर्शाच्या दुरावलेल्या आनंदाची जणू निसर्गानं महानगरावर बरसात करून टाकली. गेल्या आठवडाभरात महानगरी मुंबई हिवाळ्याच्या जाणीवेनं मोहरून गेली आहे. शाली स्वेटरांच्या उबेचा खरा आनंद मुंबईकराला मिळू लागला आहे, आणि मुख्य म्हणजे, घामाचा एखादाही थेंब अंगावर उमटला नाही, ही नकळणारी जाणीवही बऱ्याच वर्षांनंतर बहुधा पहिल्यांदाच सुखावून सोडणार आहे.
नकोशा वाटणाऱ्या उकाड्यानं मुंबईत बारमाही ठाण मांडलेलं असतं. तो नकोसा वाटला तरी झिडकारता येत नाही हे प्राक्तन निमूटपणे भोगणाऱ्या मुंबईसारख्या महानगराला गारव्याचा हा गोड अनुभव तसा नवाच असला, तरी अपरिचित नाही. एरव्ही या अनुभवासाठी शहराबाहेर पळायची सवय झालेला मुंबईकर आता घरबसल्या या आनंदाची लयलूट करणार आहे. या आनंदात अनेक स्वप्नं फुलतील, नव्या जाणीवा जाग्या होतील, आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे, नव्याने येणाऱ्या वसंताच्या स्वागतासाठी सज्ज होणाऱ्या हिरवाईसारखी टवटवी मनामनांवर मोहरून उठेल. हा बदल इतका सहज असेल, की कदाचित तो जाणवणारही नाही. उलट, कधीच सवयीचा नसलेल्या हिवाळ्याच्या या अचानक आक्रमणानं साथीचे आजार तर फैलावणार नाहीत ना, नवे आजार तर उद्भवणार नाहीत ना, या भयाचं एक सावटही मोहरलेल्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यावर दाटलेलं दिसेल. पण ही भीती फार काळ टिकणार नाही. कारण हिवाळ्याच्या ऋतूमध्ये मनाबरोबरच शरीरालाही नवं बळ मिळतं, असं म्हणतात. नको असलेल्या आजारांना परतवून लावण्याची हिंमतही हा ऋतू शरीरात रुजवतो. म्हणूनच, यंदाच्या या आनंददायी पाहुण्याचं मुंबईनं भरभरून स्वागत केलं आहे. योगायोगही असा, की सणासुदीच्या, वर्षअखेरीच्या आणि नववर्षाच्या स्वागतोत्साहाच्या आनंदाची झालर महानगरीवर चढत असतानाच, उत्साहाचे वारे घेऊन हा शिशिरोत्सव दाखल झाला आहे. या उत्साहाच्या धुंदीला मोहरवून सोडणाऱ्या थंडीची साथ मिळाली, तर यंदा मुंबईकर या योगायोगाचं सोनं करणार, यात शंका नाही.
तसंच झालं काल!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सहा ऋतु कळत नाहीत या ऋतुंचे म्हनजे ग्रीष्म, हेमन्त ,शिशीर, वसंत, शरद,(सहावा आठव्त नाही ) यांची वैशिष्ट्ये, ते कधी सुरू होतात कधी संपतात. निसर्गाची स्थिती तेव्हा कशी असते. या बद्दल माहिती हवी आहे. आपले ढोबळ ऋतु म्हणजे हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा यांच्याशी यांचे फेजिंग कसे असते? मला फक्त ग्रीष्म म्हनजे उन्हाला एवढेच कळते पण उन्हाळा चार महिन्याचा असतो त्यात दोन उपऋतु बसायला हवेत. ते कोणते?
शरद्संपात म्हनजे काय?

लेख वाचून बा. सी. मर्ढेकरांची कविता आठवली त्या काळातील' माघातली मुंबई ' कशी असेल ते अनुभवता येतेय बरयाच कालावधीनंतर ….
त्यातल्या या ओळी ,
'सचेतनांचा हुरूप शीतल
अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळुनी दोन्ही
पितात सारे गोड हिवाळा !'............