सुनो छोटीसी गुडिया की अजब कहानी...

Submitted by वर्षू. on 24 December, 2015 - 08:54

कालच यिन यिन ची मेल आली, त्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देत आहे..

२००९ मधे लोकसत्ता च्या चतुरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेला माझा हा लेख इथे पुन्हा टाकत आहे..
तेंव्हा माबो ची विशेष ओळख नसल्याने लिंक टाकली होती.. नंतर कळ्ळं कि लिंक टाकली तर उघडायचा कंटाळा करतात.. इन्क्लुडिंग मी Wink

चीनच्या वास्तव्यात ‘यिनयिन’ या एका गोड छोकरीमुळे चीनमधल्या चिमुकल्यांचं विश्व माझ्यासमोर आलं.
त्या विश्वाची ही ओळख-
गेली सात वर्षे चीनमध्ये राहात असताना प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन पाहायला, शिकायला मिळते हा माझा अनुभव आहे. या वास्तव्यात तेथील समाजात झपाटय़ाने घडून येणारे बदलही अगदी जवळून निरखता येतात. शेजाऱ्यांकडे कळत-नकळत लक्ष ठेवण्याच्या भारतीय सवयीमुळे अचानक लक्षात आले, की शेजारच्या घरात एक पिटुकली मुलगी प्रत्येक शनिवार- रविवार दिसते. बाकीचे दिवस कुठे असते, कोण जाणे! तशी तिच्या आईत आणि माझ्यात कुलुप उघडताना, लिफ्टमध्ये वर-खाली जाताना बारक्याशा स्मिताची देवाणघेवाण होत असते. तेवढय़ा आधारावर मी त्या गोड छोकरीच्या तितक्याच गोड आईला तिच्याबद्दल विचारले अन् माझ्यासमोर अतिप्रगत चीनमधील चिमुकल्यांचे अगदी वेगळेच विश्व उलगडले. या मुलीचे नाव आहे ‘यिनयिन’. या जानेवारीत नुकतीच पाच वर्षांची झाली आहे. एकुलतं एक मूल असलेल्या हजारो चिनी कुटुंबाप्रमाणे यिनयिनसुद्धा एकुलती एक पोर आहे आपल्या आई-बाबांची. इथल्या पद्धतीप्रमाणे तिची काळजी आजी-आजोबा घेत नाहीत. कारण ते क्वांग चौपासून लांब एका खेडेगावी राहतात. आई-वडील दिवसभर नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे वयाच्या अडीच वर्षांपासून यिनयिन सोमवार ते शुक्रवार पूर्णवेळ बालवाडीमध्ये राहते. मग शनिवार, रविवार आई-वडील

तिला घरी घेऊन येतात. ही पूर्णवेळ बालकमंदिराची कल्पना चीनमध्ये आता कॉमन झाली आहे. एक तर आई-वडिलांच्या कामामुळे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. दुसरं कारण म्हणजे त्यांनी आपल्या पोरासाठी निवडलेली शाळा घरापासून खूप लांबच्या अंतरावर असते. तिसरं कारण म्हणजे या शाळांमधून मुलांच्या सर्वागीण विकासासाठी भरपूर उपक्रम राबविले जातात. बालकमंदिरातच राहायची सोय असल्यामुळे या पोरांना विविध गोष्टी शाळेतच शिकता येतात. कारण वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या क्लासला घरी कोण घेऊन जाणार त्यांना? यिनयिनची आई चीनमधील शालेय शिक्षण पद्धतीवर खूश आहे. या शाळेत पाठांतरापेक्षा प्रयोगशील शिक्षणावर जोर दिला जातो. म्हणजे कोणत्याही गोष्टीमागचे कारण शोधायला शिकविले जाते. अडीच वर्षांची यिनयिन, सुरुवातीला दर सोमवारी शाळेत जायची वेळ आली, की रडून थैमान घालायची, मात्र आता सवय झाल्याने आता ती आनंदाने शाळेत जाते. तिची शाळेची दिनचर्या अशी, की रोज सात वाजता उठायचे, मग तोंड-हात धुवून मैदानावर इतर मुलांबरोबर धावायला जायचं. मग न्याहारी झाल्यावर १० मिनिटं इंग्लिशच्या क्लासला जायचं. या क्लासमध्ये सध्या फक्त शब्द बोलायला शिकवतायंत. यानंतर संगीताच्या वर्गामध्ये पियानो वाजवायला, नाही तर गाणी गायला शिकायचं. पुन्हा मैदानावर जाऊन सकाळच्या कसरती करायच्या आणि थोडं खेळायचं. नंतर वर्गात येऊन चिनी भाषा किंवा गणित तर कधी हस्तकला शिकायचं. वयाच्या चौथ्या वर्षांपासून यिनयिनने चिनी भाषा शिकायला सुरुवात केली. आता तिला काही अक्षरं लिहिता, वाचता येतात. वीसपर्यंतच्या अंकांची बेरीजही जमते. दुपारी १२ वाजता दुपारचे जेवण आणि विश्रांतीनंतर पुन्हा संगीताचा, गोष्ट सांगण्याचा आणि हस्तकला शिकण्याचा वर्ग असतो आणि परत मैदानावर जाऊन धावणं, लपंडाव असे खेळ खेळायचे. गोष्टीच्या तासाला बाई त्यांना सिंड्रेला, स्नो व्हाइटसारख्या पाश्चिमात्य परीकथा सांगतात. संध्याकाळी सहा वाजता रात्रीचं जेवण होते. जेवल्यावर आंघोळ करून कॉमनरूममध्ये इतर मुलांबरोबर टी.व्ही.वर कार्टुन्स पाहायचे किंवा काही खेळ खेळायचं आणि नऊ वाजता चिडीचूप झोपून जायचं. यिनयिनच्या आईला शाळेची ही शिस्त आवडते. यिनयिन गणित, भाषा, संगीतात प्रगती करीत आहे. याशिवाय ती इतर मुलांबरोबर राहात असल्यामुळे सहनशीलता, मिळून मिसळून राहणं, आपल्या वस्तू, खेळणी, खाऊ शेअर करायलाही ती शिकत आहे. तिच्या आईला शाळेची एकच गोष्ट खटकते ती ही की शाळेकडून प्रत्येक मुलावर द बेस्ट पियानो प्लेअर, गायक बनण्यासाठी खूप दबाव आणला जातो. त्यामुळे यिनयिन, शनिवारी घरी आली, तरी दोन्ही दिवस ती जिद्दीने पियानोची प्रॅक्टिस करते. याऐवजी तिने जरा आपल्या मित्रमंडळींबरोबर भांडण किंवा मारामारी करून त्यांच्याशी पुन्हा बट्टी कशी करायची, ते शिकली असती तर अधिक छान, असं माझ्या भारतीय मनाला उगीच वाटून गेलं. यिनयिन मला आता उत्साहाने सांगत होती की, तिला वीकएण्डला आई-बाबांबरोबर, बगीच्यात जायला, निसर्गचित्रं काढायला खूप आवडतं. याशिवाय कॉम्प्युटरवर गेम्स खेळायलाही आवडतं. इतर लहान मुलांप्रमाणे तिला मॅकडोनाल्ड बर्गर्स आणि कोक हा मेनू मनापासून आवडतो. चिनी आई-बाबा आपल्या मुलांसाठी अमेरिकन पद्धतीचं खाणं-पिणं, खेळणी, कार्टुन्स, सिनेमे, गोष्टींची पुस्तकं , परिकथा, बाहुल्या, कपडे इत्यादी गोष्टी पसंत करतात. तिच्या आईला मी जरा न राहवून विचारलंच, की बाई गं, तू मुलीला कोणती मूल्ये शिकवत आहेस? तर ती अभिमानाने म्हणाली, की मी तिला आरोग्याचे, सुखी परिवाराचे व शिक्षणाचे महत्त्व वेळोवेळी पटवत असते. यिनयिनच्या आई-वडिलांची इच्छा आहे, की तिनेही मोठे झाल्यावर त्यांच्याप्रमाणे नामांकित आर्किटेक्ट व्हावं.
आता गेल्या पाच महिन्यांपासून यिनयिन माझ्याकडे इंग्लिश शिकायला दर शनिवारी आणि रविवारी येते. आमची छान गट्टीही जमली आहे. इतकी छान, की ती आता माझ्या हातचा नि मी भरवलेला वरण-भातही आवडीनं खायला लागली आहे.

२०१२ पर्यन्त तिने इंग्लिश विषयात चांगल्यापैकी प्रगती केली. माझ्या आग्रहावरून तिचे आई वडिल तिला
क्वांगचौ मधील एका इंटरनॅशनल शाळेत पाठवायला कबूल झाले आणी इंटरव्यू मधे यिन यिन पास ही झाली.
आता ती घरी आई वडिलांबरोबर राहाते त्यामुळे खूश असते आणी तिला (कोकाटे यांचे) फाडफाड इंग्लिश बोलताना पाहून आई बाबा पण !!! Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे! रेसिडेन्ट स्कूल्स इतक्या लहान वयात ! इतक्या लहान वयात आईबाबांच्या लाडाऐवजी शिस्तीचं रुटीन - सगळे रोबॉटच तयार व्हायचे अशाने Sad
तिला (कोकाटे यांचे) फाडफाड इंग्लिश बोलताना पाहून आई बाबा पण !!! फिदीफिदी >>>> Lol

प्रतिक्रियांबद्दल सर्वांना थांकु !!

पूर्णवेळ बालकमंदिराची संकल्पना इंडोनेशियातही राबवली जाते,पण चीन मधे हे प्रमाण जास्त आहे,कारण आई बाबा दोघेही सकाळ ते संध्याकाळ/ रात्र कामात बिझी असल्याने कदाचित!!!
नाही म्हणायला अगदी तान्ही मुलं असलेल्यांच्या किंवा ज्यांना पूर्णवेळ बालकमंदिरात घालणे परवडत नसलेल्या घरी आई चे आई वडील येऊन राहतात. मग मुलं सांभाळण्यापासून स्वैपाक, बाजारहाट्,साफसफाई अशी सर्व कामांची जबाबदारी त्यांच्याच अंगावर असते.आठवली ना, मेरे अपने' मधली मीनाकुमारी?? Happy
पण सर्व कामांचा व्याप अगदी सहज आणी हसतमुखाने सांभाळत असताना पाहिलेत तिकडले आजी आजोबा, चिडचिड नै कि धूसपूस नाही!!

@ मैत्रेयी.. तुला कोकाटे यांचे 'ते' पुस्तक आठवले ना..हाहाहाहा.. कित्ती नॉस्टेल्जिक Biggrin

खुपंच गोड लेख वर्षुताई. मीना प्रभु ह्यांचं ' चिनी माती' हे पुस्तक आठवलं. परत वाचायला हवं.

चीनमधे 'लिम' हे पण एक आडनाव आहे. माझी चुलतवहीनी चिनी आहे आणि तिचं हे आडनाव आहे Happy .

सुरेख लिहिलं आहेत!

अडीच वर्षं म्हणजे फार कमी वाटतात खरी, पण मुलांमध्ये राहाण्याचा advantage आणि आई-बाबांपासून दूर राहाण्याचा disadvantage यांची फिट्टम् फाट होत असावी आणि चांगली well balanced मुलंच या सिस्टिमनी तयार होत असावीत असं मला वाटतं.

Pages