किल्ले महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड.

Submitted by योगेश आहिरराव on 22 December, 2015 - 05:28

किल्ले महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड.

खेडच्या ईशान्येला अंदाजे २० किमी अंतरावर, सह्याद्रीच्या मुख्य रांगेला एक समांतर मोठी डोंगररांग आहे. याच रांगेवर महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड हे सुंदर दुर्ग त्रिकुट वसलेले आहेत. सलग डोंगरधारेवरून दोन तीन दिवसांच्या डोंगरयात्रेत या तिन्ही दुर्गांचे दर्शन घेण्यात आणि त्या पायपीटीतच खरी मजा आहे.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एके दिवशी 'झेनोश पटेल' या जातिवंत मुरलेल्या भटक्या मित्राचा मेसेज आला. 'महिपत रसाळ सुमार, डिसेंबर फर्स्ट वीक.' थोडा विचार करून, 'हरकत नाही, नंतर कळवतो' असा रिप्लाय देऊन टाकला. तसे पाहिले तर झेनोश आणि मी एकेमेकांना फक्त जी मेल, फेसबुक, व्हॉटस एप या माध्यमातूनच ओळखत होतो, कधी भेट होण्याचा प्रसंग आला नाही. पण आमच्यात साम्य होते ते फक्त ‘बाईक राईड’ आणि ‘डोंगर भटकंती’ म्हणजेच सह्याद्री प्रेम. पण मैत्र जुळायला ही गोष्ट पुरेशी होतीच. नाहीतरी मला भरपूर चांगला मित्रपरिवार या सह्याद्रीने मिळवून दिला आहे. ट्रेक ठरल्यावर, ज्येष्ठ सह्यमित्र ‘संजयसर अमृतकर’ आणि ‘साईप्रकाश बेलसरे’ यांच्या सोबत बोलणे झाले. त्याचा काही अंशी नियोजनात फायदाही झाला.
मग काय डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विकेंडला जोडून सुट्टी मिळवली. ठरल्याप्रमाणे शनिवारी पहाटेच झेनोश आणि मी (दोघेच) त्याच्या गाडीतून खेडच्या दिशेने निघालो. अकरा वाजेच्या सुमारास खेडला पोहचलो. तिकडेच ‘शेखर यादव’ या झेनोशच्या मित्राच्या बिल्डींग मध्ये गाडी ठेवण्याची व्यवस्था झाली. इथून पुढचा प्रवास एस टी ने आणि पायगाडीनेच घडणार होता.
१२ वाजेची ‘वाडी जैतापूर’ बस अर्ध्या तास उशिराने सुटली, तासाभरचा चढ उताराचा प्रवास करून वाडी जैतापूर गावात उतरलो. ‘वाडी जैतापूर’ हे महिपतगडाच्या पायथ्याचे एक गाव. भर दुपारी दिड वाजेच्या सुमारास चढाई सुरू केली. या वाटेने वर जाऊन गडाच्या घेर्यात असलेल्या वाडी बेलदार या गावी आजचा मुक्काम करून, दुसर्या दिवशी जास्तीत जास्त महिपतगड फिरून गडावर मुक्काम, तिसर्या दिवशी सकाळी लवकर निघून सुमारगड पाहून सायंकाळी रसाळगड पोहचणे, चौथ्या दिवशी गड पाहून मुंबईला परत, असे आरामशीर नियोजन होते.
गावातून महिपतगडाच्या दिशेला पाहिल्यावर डाव्या हाथाला मोठी डोंगरसोंड उतरली आहे, त्याच वाटेने चढाईला सुरूवात होते. हल्लीच वाडी बेलदार व पुढे गडाच्या मंदिरापर्यंत रस्ता तयार करण्याचे काम चालू आहे, गावकर्यांच्या सांगण्यानुसार पुढच्या वर्षापर्यंत गडावर रस्ता होणार. मनात लगेच विचार आला, गडावरची पवित्रता, शांतता भंग पावणार, पिकनीक छाप मंडळींची गर्दी वाढणार कचरा होणार.
वाट सुरूवातीला रस्त्याने जाऊन, सोडेंवरून चढून वरच्या टप्प्यातील धनगर वस्तीत पोहचलो.

थोडी विश्रांती घेऊन पुन्हा मुख्य सोडेंवरून चढाई सुरू केली, पूर्ण वाटेवर विजेच्या तारांची सोबत होतीच, तीच वीज वाडी बेलदार आणि गडावरच्या मंदिरात नेली आहे.


हळूहळू चढ तीव्र होत गेला.
वाटेत हे जूने शिवलिंग दिसले.


पुढे अर्ध्यावर वाट मुख्य सोडेंवरून आडवी आतल्या बाजूला वळून दुसर्या सोडेंवरून चढू लागली. वाटेत बर्यापैकी झाडोरा आहे, मध्येच येणारी वार्याची एखादी झुळूक भलतीच सुखावून जात होती. शेवटचा चढाईचा टप्पा पार करून, उजव्या हाथाचे छोटे टेपाड चढून आल्यावर पलीकडच्या बाजूला वाडी बेलदार मधली घरे दिसली.


भर दुपारी उन्हात,दमट वातावरणात चढाईला सुरूवात केल्यामुळे, वाटेत विश्रांती घेत पाठिवरचे अवजड सामान सांभाळत सायंकाळी साडेपाच वाजता गावात पोहचलो.


पोहचल्यावर समोरच्या घरात विचारपूस झाली, लागलीच चहा पण मिळाला.


‘सीताराम विठ्ठल जाधव’ हे त्या घरातल्या आजोबांचे नाव, त्यांच्याच अंगणात आमचा बाड बिस्तरा मांडून टाकला. सीताराम आजोबा मोठे मिश्कील, गावाबद्दल, त्यांच्या रोजच्या दिनक्रमाबद्दल बोलत असताना मध्येच मला म्हणाले "ईथे आहे कोण ? सर्व मढी आहे, मढी."
मी: "मढी म्हणजे ?"
आजोबा: "मढे म्हणजे, हे सगळे मराया टेकलेल म्हातारे आहेत इथ."
ऐकून विचित्रच वाटले, गावातली सर्व तरूण मंडळी पोटापाण्यासाठी मुंबईत स्थायिक झाली आहेत. खऱच त्या दहा पंधरा घरांच्या वाडीत आम्हाला मायेने विचारपूस करणारी वृध्द मंडळीच दिसली.
गावातल्या मारूतीरायांचे दर्शन घेऊन.

शेजारच्या ‘जीजाबाई’ आजी कडे रात्रीचे जेवण केले. मग जरा अंगणात गप्पा मारत बसलो, हळूहळू थंडीचा जोर वाढू लागला.

बोलता बोलता आजीने सांगितले की दोन दिवसांपूर्वी रात्री एका कुत्र्याला वाघाने ( बिबट्याने ) पळविले. पण गावकर्यांच्या सांगण्यानूसार जंगलात हल्ली बिबट्यांचा व रानडुकरांचा बराच वावर आहे. गप्पा आवरत झोपायला गेलो, दिवसभराचा प्रवास आणि डोंगर चढाई यामुळे पाठ टेकताच झोप लागली.
दुसर्या दिवशी सकाळी चहा नाश्ता करत असताना मुळ विषयाला हाथ घालत उद्या सुमारगड करून रसाळगड जायचे आहे. गावातले कोणी सोबत येणार का ? सुमारगडाचे नाव काढताच तिकडे जमलेली मंडळी नकारघंटा वाजवू लागली, लय अडचण, मोप गवत वाढलय, घसारा पण हाय, आमच्यापैकी सध्यातरी कुणीबी जात नाय. मागल्या वेळी पुण्याचा एक जण गेला, पोलिस पंचनामा वगैरे लय त्रास झाला. एकंदरीत सर्वच निरूत्साही होते. आम्ही आशेने सीताराम आजोबांकडे पाहिले, ते म्हणाले बघू कुणी नाही तर मी येईल संगतीला. आश्चर्य म्हणजे, तेवढ्यात तिथे 'राया' धनगराचे आगमन झाले. रात्री त्यांचे जनावर वाट चुकले होते, त्यांना शोधत ते वाडी बेलदारला आले होते.

हेच ते 'राया' धनगर ज्यांचे नाव फार पूर्वीपासून ऐकून होतो. अगदी २५-३० वर्षांपूर्वीच्या ट्रेकींगच्या पुस्तकात सुध्दा रायाचा उल्लेख आहे. या भागातील सर्व खडानखडा माहिती असलेले ज्येष्ठ विश्वसनीय व्यक्तिमत्व. विनंतीपूर्वक आग्रह करून, राया आमच्या सोबत. सुमारगड रसाळगडसाठी तयार झाले. आता आमची उद्याची चिंता मिटली होती.
झाडीभरल्या माथ्याचा महिपतगड !
मग आम्ही सीताराम आजोंबाना घेऊन गडाकडे निघालो. कारण १२० एकरचे क्षेत्रफळ लाभलेल्या, तसेच माथ्यावर दाट जंगल असलेल्या महिपतगडावर त्यांच्या सोबत शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त मनसोक्त भटकायचे होते.

अन्यथा इथल्या जंगलात, दाट रानात सर्व काही स्वत: पहाणे अवघड आहे. चढणीच्या वाटेतली विहीर, उन्हाळ्यात याच बारामाही विहीरीचे पाणी वाडी बेलदारचे गावकरी वापरतात.

सुरूवातीला उभ्या दांडावरची चढण पार केल्यावर हा बुरूज दिसला.

डावीकडे वळून बुरूजावर गेलो, खाली वाडी बेलदार गाव आणि आम्ही काल वर आलो ती वाट दिसली.

बुरूज पाहून आल्या वाटेने पुन्हा वर चढू लागलो, वाटेत ही विहिर व पुढे पाणी अडवण्यासाठी जुनी बंधाराची भिंत दिसली. आणखी वर गेल्यावर डाव्या बाजूने दहिवलीतून गडावर येणारी वाट या वाटेला मिळाली झाडी भरल्या गडाच्या वाटेवरून पुढे जात
उजवीकडच्या वाटेला वळालो. थोडे पुढे गेल्यावर हे जुने अवशेष दिसले.

तसेच आणखी पुढे गेल्यावर मारूती व गणपतीचे जुने मंदिर.

पुन्हा माघारी फिरून मुख्य वाटेला लागलो, थोडे अंतर चालल्यावर हे झोलाई देवीचे ठाणे दिसले.

त्या अलीकडेच गडावरचे मुख्य पारेश्वर महादेव मंदिर आहे.

मंदिरात वीज होतीच, आम्ही आमचे अवजड पाठपिशव्या मंदिरात ठेवून दिल्या. मंदिराच्या चारही बाजूला छान जंगल आहे, मध्ये थोडे मोकळे मैदान आणि समोरच विहीर. लगेच सीताराम आजोबांसोबत गडफेरीसाठी निघालो. कोतवाल दरवाज्याचा दिशेने जात असताना वाटेतली मारूतीरायांची मुर्ती.

दाट जंगलातून वाट काढत उत्तरेला कोतवाल दरवाजाच्या मार्गात आलो, दरवाजाचे अवशेष शोधणे महाकठिण काम, फक्त खालची व बाजूची दगडांची रचाई आणि वाटेतला झाडीभरला बुरूज नजरेस पडतो.

थोडे पुढे गेल्यावर खाली दुरवर कोतवाल गाव आणि ईशान्येला प्रतापगड दिसला. तर पूर्वेला सह्याद्रीतल्या मुख्य रांगेतला मकरंदगड सहज ओळखता आला.

त्याच झाडीभरल्या मधल्या वाटेने पूर्वेकडे वर चढून गेलो,

इथूनच पुसाटी दरवाजाची वाट जाते. परत आल्या वाटेने उजव्या बाजूने फिरून मंदिरात आलो. नंतर मंदिरासमोरील उजव्या बाजूने आग्नेय दिशेला मुख्य वाटेने यशवंत बुरुजाकडे निघालो.
वाटेत बिबट्याची विष्ठा ? दिसली.

हिच वाट पुढे वळसा घालून पलीकडे वडगावात उतरते. समोर सह्याद्रीची अजस्त्र रांग न्याहाळत बसलो.

एव्हाना सुर्य डोक्यावर आला, पुन्हा माघारी मंदिरात आलो. सीताराम आजोबांना निरोप दिला, दुसर्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे ते आम्हाला राया धनगराच्या झापा पर्यंत सोबत येणार होते.
गडावर आता आम्ही दोघेच होतो. निवांत वेळ होता, विहीरीच्या गार पाण्याने अंघोळ करून फ्रेश झाल्यावर दुपारचे जेवण केले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास पुन्हा भटकायला निघालो, मंदिराच्या मागील टेकडी वर जायचे होते, वाटेत एके ठिकाणी भरपूर फुलपाखरे दिसली. टेकडीवर जाण्यासाठी वाट अशी नाहीच, कसातरी मार्ग काढत वर जाण्याचा प्रयत्न केला.
दक्षिणेला सायंकाळच्या सुर्यप्रकाशात सुमारगडाचा माथा चांगलाच उठून दिसत होता.

दाट जंगल व भयंकर गचपण वाट वर न जाताच, उजवीकडे वळून एका पायवाटेला लागली. बहूतेक पोलादपूरच्या दिशेला ? पुसाटी बुरूजाच्या दिशेने एक वाट जाते, ही तीच वाट असावी. त्या वाटेने जंगलातले चढ उताराचे एक एक टप्पे पार करत बरेच अंतर चालत गेलो. सुर्यास्त होत आला होता, वेळेअभावी पुन्हा माघारी फिरून मंदिरात आलो.

फ्रेश झाल्यावर मस्तपैकी सुप तयार केले. रात्रीचे जेवण झाल्यावर मंदिरासमोरच्या अंगणात आकाशातले चम चमणारे तारे पहात बसलो. थंडीचा कडाका वाढू लागला, आत जाऊन लवकरच झोपी गेलो.
रात्री साडेबारा एक च्या सुमारास बाहेरून कुणीतरी मंदिराचे दार ठोकत होते. थोडे दचकायला झाले, आवाज दिल्यावर कळले ते, अनंतबुवा जे मंदिरात पुजाअर्चेसाठी येतात. आश्चर्य म्हणजे ते एकटेच रात्री बेलदारहून आले होते. थोड्या गप्पा झाल्या, श्रावणात तर महिनाभर गडावर ते एकटेच रहातात.
सकाळी ठरल्याप्रमाणेच भल्या पहाटे उठलो. कारण आजचा पल्ला लांबचा होता. आमच्या जी पी एस नुसार पारेश्वर महादेव मंदिर ते झोलाईदेवी मंदिर रसाळगड हे क्रो फ्लाय अंतरच ८ किमी च्या आसपास होते.

झटपट पोहे तयार केले. पूर्वेला नुकतेच उजाडत होते, सकाळी पक्ष्यांची किलबिलाट ते थंडगार वातावरण एकदमच छान.

सर्व सामान आवरून सात वाजेच्या सुमारास मंदिरातून खाली वाडी बेलदारच्या दिशेने निघालो.

उतरताना डावीकडे सुमारगडाचा ऊंच माथा नजेरत भरला. रसाळगड तर पार त्याच्यामागच्या डोंगररांगेत हरवला होता. हि पूर्ण डोंगरवाट पार करायची आहे हे, मनाला आणि शरिराला बजावून सांगितले.
अर्धा पाऊण तासात सीताराम आजोंबाच्या घरी पोहचलो.

त्यांच्या सोबत ‘आठ’ वाजता बेलदारहून निघून समोरच्या दांडाने सुमारगडाच्या दिशेने समोरचे ऊंच टेपाड चढून चाळीस मिनिटात राया धनगरांच्या झापावर पोहचलो.

पूर्वेला महिपतगडाचा यशवंती बुरूज खासच दिसत होता.झापाची जागा पण एकदम मस्त.

रायांनी आम्हाला बसायला जमिनीवरच चादर आंथरली. राया त्यांच्या गुरांची व्यवस्था व सकाळची कामे आवरण्यात मग्न होते. काय माहित पण, मला आपल उगीचच पुढच्या वाटेची आणि वेळेची चिंता विनाकारण भेडसावत होती. मी थोडा घाई करून रायांना म्हणालो, "राया चला लवकर उशीर होतोय." यावर राया मला शांतपणे म्हणाले, " याच्या आधी तुम्ही सुमारगडला गेला आहात का ?"
मी: " नाही, म्हणून तर सांगतोय जरा लवकर आवरा"
राया: " तुम्ही शांत बसा तुम्हासनी सुखरूप नेणार, बरोब्बर रसाळगडावर पोहचविणार"
मला असे उत्तर मिळाल्यावर, मी विचारच सोडून दिला. रायांनी आश्वासन दिल्यावर त्यांच्याबद्दल आदर अधिकच वाढला, माझा आत्मविश्वासही चांगलाच वाढला.

झेनोश मात्र मस्तपैकी फोटोग्राफी करत होता. रायांनी मस्तपैकी दही खायला दिले.

जवळपास अर्ध्या तासानंतर, एक छोटी शाल, डोक्यावर टोपी आणि पाठिमागे कोयता अडकवून राया तयार झाले.

इथेच आम्ही सीताराम आजोबांचा निरोप घेतला.

(डावीकडून- सीताराम आजोबा, राया, अस्मादिक आणि झेनोश)
सुमारगडाच्या दिशेने चालायला सुरूवात केल्यावर वाट डावीकडून वळसा घेत पुन्हा वर चढू लागली, बर्यापैकी जंगल त्यामुळेच वातावरणात चांगलाच गारवा होता. पाऊण तासाच्या सलग चालीनंतर सुमारगडाच्या अलिकडे डोंगराखाली असलेल्या अरूंद अशा गुर खिंडीत पोहचलो. इथून सरळ जाणारी वाट सुमारगडाला डावीकडे ठेवून सरळ रसाळगडाला जाते. खिंडीतली उकरलेली माती दाखवून राया म्हणाले डुकरांचा त्रास लई वाढलाय.
खिंडीतून डावीकडे सुमारगडाची चढाई सुरू केली.
साहसाची अनुभुती देणारा सुमारगड !
मध्ये वाटेत अवजड पाठपिशव्या ठेऊन, फक्त पाण्याची बाटली, थोडा सुका खाऊ आणि सोबत रोप घेऊन पुढे निघालो. गवताळ आणि मुरमाड घसार्याच्या वाटेने तिरके वर चढत छोट्या पठारावर आलो,
समोरच सुमारगडाचे दर्शन झाले.

तर पाठिमागे आमचा कालचा सोबती महिपतगड.

इथून पुन्हा गडाच्या दिशेने अरूंद सोंडेने चढाई सुरू केली. सुमारगडाचा कातळमाथा दरडावूनच आमच्याकडे पाहत होता कि काय ? आमची उत्सुकता पण वाढली होती,असो तर.

दाट झाडीतल्या आडव्या वाटेने गडाच्या जवळ जाऊ लागलो.

अत्यंत बारिक, अडचणीतल्या, दरीकाठच्या वाटेने कातळमाथाला डावीकडून वळसा घेत पुढे गेलो.


ही आडवी (ट्रेव्हर्सी) अडचणीतली वाट अत्यंत सावकाश आणि शांतपणे पार केली.

वाटेत दोन ठिकाणी भुयारासारखे कातळात आतल्या बाजूला पाण्याचे टाके आहेत.
आम्हा ट्रेकरच्या भाषेत सांगायचे झाले तर, काही ठिकाणी अक्षरश: एक टप्पा आऊट चा मामला आहे.
तसेच आस्तेकदम पुढे जात, सुमारगडाच्या ५०-६० फूट ऊंचीच्या प्रसिध्द कातळकड्याजवळ पोहचलो.

हल्लीच गावकर्यांनी दोन छोट्या शिड्या ठेवल्या आहेत.

आणि माथ्यावर असलेल्या झाडाला एक केबल वायर बांधून सोडली आहे.

अगदी व्यवस्थित होल्ड घेत सावकाशपणे वर पोहचलो सुध्दा. केबल वायरचा उपयोग फक्त मानसिक आधाराला, त्यावर कितपत अवलबूंन रहाता येईल, काहिच सांगता येत नाही. ( थोडक्यात त्यावर पूर्ण पणे विसंबून चढाई करू नये, कातळरोहणाचा थोडा पूर्वानुभव हा हवाच. अन्यथा स्वत: जवळ असलेला रोप वापरावा, आम्ही वापरला नाही कारण आम्हाला गरज भासली नाही.)
वर गेल्यावर समोरच हे देवाच ठाण दिसले.

काही जुण्या मुर्ती ठेवल्या आहेत.

पाठिमागेच पाण्याची मोठी टाकी.

डावीकडे कातळातले शिवमंदिर.

आतमध्ये जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. थोडे पुढे पिण्याच्या पाण्याचे टाके, सोबतचा सुका खाऊ खाऊन पुन्हा पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.

टाकाच्या डावीकडून वळसा घालून माथ्यावर टेपाड चढून गेलो. कुणीतरी आधीच माथ्यावरचे गवत जाळून टाकलेले होते. हे जूने अवशेष.

गडाचा माथा नावाप्रमाणेच सुमार आहे, पण नजारा बाकी अफलातून.

उत्तरेला महिपतगड आणि आम्ही आलो तो गुर खिंडीचा मार्ग, पूर्वेला सह्यशिरोधारेवरचे मकरंदगड, पर्वत, चकदेव उठावले होते. वेळेचे भान ठेवून निघालो. पुन्हा सावकाशपणे कातळकडा उतरायला सुरूवात केली.

उतरताना समोर दरी असल्याने थोडे दृष्टीभय होतेच, पण शांतपणे तो टप्पा पार झाला.

पुन्हा ती अरूंद आडवी वाट पार करून मोकळ्या डोंगरसोंडेवर आलो.

पुन्हा एकदा मागे वळून पाहिले,दुर्गम अशा सुमारगड जाऊन आल्याचे समाधान वाटले.

आल्यामार्गे घसार्याची वाट उतरून गुर खिंडीत पोहचेपर्यंत दुपारचा एक वाजला होता.
थोडक्यात वाडी बेलदारहून निघून सुमारगड पाहून परत येण्यासाठी आम्हाला पाच तास लागले होते.
थोडी विश्रांती घेऊन पुढच्या मार्गाला लागलो, वाट पुन्हा उजव्या बाजूने दाट झाडीत शिरली. काही ठिकाणी तर खुपच गचपण अक्षरश: खाली वाकून जावे लागत होते, तरी राया कोयत्याने बाजूला सारत होते. थोड्या अंतराने वाट छोट्या मोकळ्या पठारावर आली,

सुमारगड आता आमच्या उत्तरेला पाठिमागे होता. इथुन सुध्दा एक वाट सरळ सोंडेवरून चढून उजवीकडे वळसा घेऊन सुमारगडाच्या कातळकड्याखाली जाते, पण फार वापरात नसलेली हि वाट धोकादायक आहे.
पुढे काही पावलांवर देवीची जुणी मुर्ती दिसली.

वाघोबा देवी असे नाव रायांनी सांगितले. आता वाट डावीकडून वळसा घेत पुढे सरकू लागली. तासाभराच्या

चालीनंतर उजवीकडे एका ओढ्याजवळ छोटा पाणवठा दिसला. मग काय तिथेच सोबत असलेले संत्रे, काकडी, बॉईल अंडी, गुळ चिक्की खाऊन, पाणी भरून निघालो.
आता वाट जंगलातून मोकळ्या पठारावर आली, वाटेत हे जूने अवशेष दिसले.

पुढे उतरत उजवीकडे वळसा घेत, घोणेमाळ वर आलो. इथे एक धनगरवाडा आहे.
नितांत सुंदर रमणीय रसाळगड !
थोडे पुढे उजवीकडे गेल्यावर पहिल्यांदा रसाळगडाचे दर्शन झाले.
एव्हाना साडेचार वाजत आले होते, आता रायांना निरोप देण्याची वेळ आली होती. रायांनी आम्हाला पुढची वाट समजावून सांगितली.
<

क्षणभर मनात विचार आला, खऱच किती मोठ्या मनाची हि माणसं, परत अंधार पडायच्या आत त्यांच्या धनगरवाड्यावर पोहचतील का ? जवळ ना खाऊ, ना पाण्याची बाटली. पायात जुणी स्लीपर घालून हा माणुस आरामात न कचरता घसरड्या गवतावरून, मुरूमावरून सहज जातो. आम्ही मात्र शहरीकरणाला सरावून चांगले शुज, चांगली पाठपिशवी, खाण्यासाठी सुकामेवा आणि पाण्याचा भरपूर साठा घेऊन ट्रेक करतो. प्रत्येक गोष्टीत कारणे शोधत बसतो. खऱच हि माणसे म्हणजे जंगलाचे राजेच म्हणावे. झेनोशने त्याच्या जवळची नवीन टॉर्च रायांना दिली.
राया घेत नव्हते, पण आग्रहाने दिली.
नंतर म्हणाले, " मला फोटो पाठवा"
मी: "कसे पाठवू सांगा"
राया: " पत्ता देतू की "
पटकन हाथात आलेल्या कागदाच्या चिरोट्यावर रायांचा पत्ता लिहून घेतला.

फोटो पाठविण्याचे वचन देऊन कमालीच्या भावुक अवस्थेत रायांचा निरोप घेतला.
पुढचे दहा पंधरा मिनिटे मी आणि झेनोश काहीही न बोलताच चालत होतो, दोघेही सुन्न झालो होतो.
रसाळगड जरी समोर दिसत असला तरी आम्हाला मधली खिंड उतरून पलीकडच्या टेकडीला वळसा घालून जायचे होते. वाट उतरायला लागली,

पुन्हा ते सुकलेले घसरडे गवत, हळूहळू खिडींत उतरून डावीकडून वाट पुन्हा पलीकडे उजव्या बाजूला उतरली. आणखी थोडे उतरून आम्ही एका पठारावर आलो.

मळलेल्या वाटेने अर्ध्या तासात तांबडवाडी- घेरा रसाळगड या गडासमोरच्या गावात पोहचलो.
गावात चहापाण्यासाठी विचारपूस झाली, फार विलंब न लावता आभार मानून छोट्या सोडेंवरून छोटी चढाई करून रसाळगडाच्या पहिल्या दरवाजा समोर आलो.

खाली उजव्या हाथाला निमणी गाव आणि वर आलेला गाडी रस्ता तर डाव्या बाजूला रसाळवाडी.
पाच मिनिटात गडाचा पहिल्या दरवाजा गाठला.

मागे वळून पहाता विश्वासच बसत नव्हता एवढ्या दुरून जंगलातले चढ उतार पार करत, डोंगर पायपीट करून ठरविलेले लक्ष्य गाठले होते.

दोघेही प्रचंड उत्साहात होतो. दुसर्या दरवाजाकडे जाताना तटात मारूतीरायाचे दर्शन झाले.

दुसरा दरवाजा पार करून सरळ झोलाई देवीच्या मंदिरात गेलो तेव्हा साडेपाच वाजून गेले होते.

पुन्हा जी पी एस वर चेक केले, तर क्रो फ्लाय अंतर ८.४ किमी आणि पारेश्वर मंदिर ते झोलाई देवी मंदिर हे अंतर १७ किमी.
सामान मंदिरात ठेवून लगेच गडदर्शनासाठी निघालो.

मंदिरासमोरच भली मोठी दिपमाळ लक्ष वेधून घेते. अलीकडेच तोफ दिसली.

मंदिर खुपच प्रशस्त असुन विजेची सोय आहे.
मंदिराच्या पाठिमागे तलाव आणि एक छोटे शिवमंदिर आहे.

तलावाच्या मागच्या बुरूजावर पुर्नबांधणीचे काम केल्यासारखे दिसले. पुढे काही टाकी आणि वाड्यासारखे अवशेष, तसेच बाजूलाच दगडी कोठार.

सुर्यास्त होत आला होता, सायंकाळचा सुर्यप्रकाशात समोरच्या सह्यधारेवर पर्वत आणि चकदेव खुपच सुंदर दिसत होते, पुन्हा पुन्हा मागच्या वेळी केलेली भटकंती आठवत होती.
सुर्यास्त मंदिराच्या पाठिमागच्या कट्ट्यावरून पाहिला, रसाळगडावरची ती सायंकाळ खुपच भावली.

संधीप्रकाशात गडावरचे वातावरण खुपच खास, चांगल्या भटकंतीचा शेवट रमणीय रसाळगडावर क्या बात है! भटकंतीचा तिसरा दिवस नियोजणाप्रमाणे पार पडला होता.
सर्व काही आलबेल असताना, पुढे मात्र एक नाट्यमय घटना घडली.झाले असे की, सुर्यास्तानंतर आम्ही दोघेही सुप पिऊन, झाल्यावर जेवणाची तयारी करण्याआधी घरी फोन करण्यासाठी मोबाईल स्वीच ऑन केला. सुदैवाने रसाळगडावर रेंज मिळत होती, मागचे दोन दिवस रेंज नसल्यामुळे बोलणेच झाले नव्हते. निवांतपणे घरी खुशाली कळवून फोन ठेवला, नंतर पहातो तर बॉटरी लो मुळे माझा मोबाईल स्वीच ऑफ झाला. साधारण पाच दहा मिनिटानंतर झेनोशच्या फोनवर अनोळखी नंबरहून कॉल आला, पलीकडची व्यक्ती मोठमोठ्याने काहीतरी बोलत होती.
झेनोशला काही समजत नव्हते, त्याने फोन मला दिला.
मी : बोला, कोण बोलतय.
व्यक्ती : अहो, आहात कुठे तुम्ही ?
मी : आपण कोण ?
व्यक्ती : मी शेखर यादव, हा माझ्या मित्राचा मोबाईलवरून कॉल केलाय.
मी : बोला शेखर.
( हे तेच शेखर यादव ज्यांच्या बिल्डींग मध्ये खेडला आम्ही गाडी ठेवली होती.)
शेखर : तुम्ही आहात कुठे, दोन दिवस झाले तुम्हाला फोन ट्राय करतोय.
मी : अहो, आत्ताच रसाळगडावर पोहचलो, पुर्ण दिवस सुमार करून महिपत ते रसाळ ( अत्यंत कौतुकाने सांगत होतो.)
शेखर : अरे बापरे !
अहो काल सकाळी कुणीतरी लहान मुलाने तुमच्या गाडीला हाथ लावला, अचानक गाडीतून ट्याव ऽऽ ट्यावऽऽऽ आवाज यायला लागलाय. काय तो सिक्युरीटी अलार्म वाजतोय कधीचा. बिल्डींग मधले सगळे लोक प्रचंड वैतागलेत, मला सांगत होते पोलिस कंपलेंट करनार आहोत.

मी : एक मिनिट थांबा, मी झेनोशला फोन देतो.
पुढे दोन तीन मिनिटे त्या दोंघाचे बोलणे झाले आणि झेनोशचा पण मोबाईल स्विच ऑफ झाला. दुर्दैव असे की दोंघापैकी कुणीही चार्जर आणला नव्हता. दोघांचे फोन बंद, आता आमच्या हातात काही नव्हते. हे तर वेगळेच प्रकरण झाले होते.
कुठे तीन दिवसांची दमदार भटकंती करून आनंदात असणारे आम्ही त्या फोन नंतर तणावात आलो होतो.
उत्साहाचे वातावरण क्षणात सुतकात बदलले गेले.
क्षणभर मलाही हसावे की रडावे तेच कळत नव्हते.
मनात वेगवेगळे विचार येऊ लागले, बिल्डींग मधल्या लोकांनी गाडीची काच फोडली तर, गाडीचे नुकसान केले तर, जेव्हा गाडी घ्यायला जाऊ तेव्हा स्वागतला बिल्डींग मधले लोक काठ्या दंडे घेऊन तर येणार नाही ना. बरेच विचार डोक्यात येऊन गेले.
त्यावेळी अंधारात गड उतरून निमणीहून मिळेल ती गाडी पकडून खेडला जाणे, हा पर्याय होता.
पण खऱतर दिवसभराची झालेली दमछाक आणि पुन्हा अर्धा पाऊण तास चालत जाऊन रात्री निमणीतून काही वाहन मिळेल याची काही शाश्वती नव्हती. मग विचार करून निमणीतून सकाळी खेडला जाणारी पहिली एस टी पकडायचे ठरविले.
बराच वेळ तणावात गेला, शांतपणे झेनोशला सांगितले, " leave it now, let's see what happens". सरळ केरीमेट उचलून मंदिराच्या अंगणात पसरले, त्या निरभ्र आकाशात तारकांची रांगोळी पाहत जरा वेळ विसावलो.
रात्रीचे जेवण करून लवकरच झोपी गेलो. सकाळी सहा वाजताच गड सोडला. सरळ डांबरी रस्त्याचा उतार पार करत पाऊण तासात निमणीत पोहचलो, दुर्दैव असे की पहिली एस टी पाच मिनिटासाठी हुकली.
गावात दुसरी काही सोय होते ते पहायला गेलो तर सर्व गाव अजुनही झोपेत होते की काय एकदम शांत निवांत, सकाळच्या थंडीतल्या वातावरणात कोणीच घराबाहेर नव्हते.
मग काय तसेच पुढे निघालो, जरा वेळाने वाटेत एकाने सांगितले, निव्याच्या वाडीपर्यंत चालत जा, तिकडून तळ्याकडून येणारी बस मिळेल.
चला तर, आलिया भोगासी असावे सादर! दोघेही त्या कंटाळवाण्या डांबरी रस्त्याने चालू लागलो. सकाळी वातावरणात चांगलाच गारवा होता हीच काय जमेची बाजू. मुख्य म्हणजे आजुबाजुला झाडी जंगल ही बर्यापैकी, एक गोष्ट मात्र खरी या भागात बरेच जंगल टिकून आहे आणि ते असेच शाबुत राहो. या बाबत खेड वन विभागाचे कौतुक करायला हवे. सहा सात किमी ची पायपीट करून गवळीवाडी या घेरा रसाळगडाच्या पायथ्याच्या गावात आलो.
एका घरासमोर रिक्षा उभी दिसली, लगेच विचारपूस केली, कळाले की रिक्षावाले तयार होत आहेत थोडा वेळ लागेल. नाहीतरी डांबरी रस्त्यावर चालून चालून दमलो तर होतोच, त्यात निव्याची वाडी जिथून बस मिळण्याची शक्यता होती ती तर अजून तीन चार किमी अंतरावर होती.
शांतपणे त्या घराच्या अंगणात बसलो. आश्चर्य म्हणजे पाच मिनिटांत चक्क चहा समोर आला. मी तर मनोमन जाम खुष झालो. गावातली माणुसकी, दुसरे काय. वाह ! एकतर सकाळी सकाळी या भानगडीमुळे काहीही न खाता पिता तडक चालायला सुरूवात केली होती. पण चहा पिऊन चांगलीच तरतरी आली. लागलीच त्यांच्या बागेत असलेल्या नळावर हात पाय तोंड धुवून फ्रेश झालो, आता जरा माणसात आल्या सारखे वाटत होते.
पंधरा वीस मिनिटात रिक्षावाले काका आले आणि आम्ही खेडच्या दिशेने निघालो.
नऊ साडेनऊच्या सुमारास खेड मध्ये पोहचलो. बिल्डींगच्या जवळ जात असताना, परत डोक्यात विचार आला काय होणार, लोकांच्या रोषाला सामोरे तर जावेच लागणार. बिल्डींग समोर रिक्षा उभी केली, झेनोश गाडीजवळ पळतच गेला. सर्व दरवाजे, बोनट उघडले तरी तो आवाज बंद होईना. तोपर्यंत मी रिक्षातून सामान बाहेर काढून गाडीजवळ आलो. आम्हाला गाडीजवळ पाहून बाजूलाच उभ्या असलेल्या टेम्पोतले काका आले. त्यांनी लगेचच त्या बर्झरची वायर पल्ग मधुन काढली, आणि तो आवाज एकदाचा बंद झाला. मी गाडीच्या चारही बाजूला फिरून पाहिले तर पाठच्या एका टायराची हवा काढली होती, तेवढे तर अपेक्षितच होते, नशिबाने फुटपंप होता तात्पुरती हवा भरून घेतली.
जसा आवाज बंद झाला तसे बिल्डींगमधले रहिवाशी बाहेर आले. सर्वांचे बोल गपगुमाण ऐकून, आमच्याकडून अजाणतेपणे झालेल्या चुकीची माफी मागून, स्पष्टीकरण देऊन निघालो. सुरूवातीला गाडीला धक्का द्यावा लागला, ते तर होणारच होते. चक्क पुन्हा टेम्पोवाले काका मदतीला आले. गाडी एकदाची सुरू झाली, पहिले काम केले गाडीतल्या चार्जरवर मोबाईल चार्जींग ला ठेवले,पुढे थेट भरणे नाक्याला नाश्ता करायला थांबलो ते पण गाडीचे इंजिन चालू ठेऊनच, न जाणो परत बंद पडली तर.
तिथूनच पहिला फोन लावला तो शेखर यादव यांना, फोन नॉट रिचेबल.
मग त्यांच्या घरी फोन केल्यावर कळाले की पहाटेच ते मुंबईला गेले.
पुढे वाटेत शेखर यादवाचा फोन आला.
शेखर : अहो काय तुम्ही
मी : आम्ही निघालो,मघाशी तुम्हाला फोन केला होता. सॉरी, आम्ही खरे तर गाडीची चावी तुमच्याकडे द्यायला हवी होती. घाईगडबडीत मोठी चुक झाली. जर चावी तुमच्याकडे असती तर एवढे प्रकरण झालेच नसते.
शेखर : ते जाऊ द्या आता, तुमचा फोन काल रात्री मी पुन्हा ट्राय केला पण स्वीच ऑफ येत होता. नाहितर मी गाडी घेऊन तुम्हाला घ्यायला रसाळगडावर येणार होतो. अहो दोन रात्र त्यांची झोप नाही, लोक फार चिडले होते.
(खरच शेखरचे हे बोल ऐकून खुपच शरमल्यासारखे वाटले.)
मी : होय आम्ही पाहिले, पण झाली मोठी चुक झाली आमच्याकडून.
शेखर : असु दे. तुम्ही मुद्दाम थोडी केले, झाली गडबड काय करणार. सावकाश जा, पुन्हा भेटू.
मनोमन शेखरचे खुप आभार मानले, आमच्यामुळे त्यांना नाहक त्रास सोसावा लागला होता.
चार दिवसांच्या कसदार भटकंतीचा शेवट वेगळ्याच नाट्यमय प्रकरणाने झाला.
सर्व प्रचि : झेनोश पटेल
योगेश चंद्रकांत आहिरे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महिपत, रसाळ आणि सुमार ह्या दुर्गत्रयीची सफर घडवून आणल्या बद्दल धन्यवाद.

काही फोटो तर खासच आहेत. _/\_

काही ठिकाणी अक्षरश: एक टप्पा आऊट चा मामला आहे. >> +१

बाकी गाववाल्यांनी गाडीला काही केलं नाही ह्यातच सगळं आला Happy

पुढील मोहिमेस शुभेच्छा

@योगेश... पायाला खाज सुटली रे. मस्तच लिहिल आहेस. फोटो सगळे धमाल आल्येत. सुमारगडाचे फोटो तर मस्तच.

@योगेश... पायाला खाज सुटली रे. मस्तच लिहिल आहेस. फोटो सगळे धमाल आल्येत. सुमारगडाचे फोटो तर मस्तच.

मस्तच रे योगेश. फोटो आणी लेख नेहेमीप्रमाणेच उत्तम.
अजून भटकत रहा आणी आम्हाला उत्तमोत्तम लेखांची मेजवानी देत रहा.

क्या बात ही योगेश !! साईच्या याच ट्रेकच्या भन्नाट ब्लॉगनंतर अत्यंत सुंदर फोटोज आणि वर्णनाने सजलेला "शुध्द ढासू ट्रेक" चा ब्लॉग !! शेवटचे गाडीचे प्रकरण भन्नाटच !!

काय भारी लोक्स आहात तुम्ही !!! कस्ली मस्त भटकंती आणि ती ही सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर ...

जाधव आजोबा आणि राया ---- दोघांनाही दंडवत ....

गाडीचा किस्साही भारीच - बरेच काही शिकवून गेला ... Happy Wink

इंद्रा, सूनटून्या, स्वच्छंदी, सह्याद्रीमित्र तुम्ही खऱच एकदा जाऊन या.

सृष्टी, पुरंदरे शशांक धन्यवाद !
खऱच गाडीचा किस्सा बरेच काही शिकवून गेला.

योगेश, आधी फक्त मोबाईल वर वाचला होता म्हणून प्रतिसाद नव्हता दिला.

अप्रतिम झालाय ट्रेक, असं वाट्लं कि सोबतच केलाय आपण हा ट्रेक.

गाडीचा किस्सा- मात्र लेसन्स लर्न्ड म्हट्ला पाहिजे, त्यांना उगाच त्रास झाला आपल्यामुळे, याच कारणा मुळे मी बझर अनप्लग्ड ठेवलाय ऑलरेडी Happy
अवांतर Happy सेम घडलय माझ्यासोबत पण मी रहात असलेल्या सोसायटी मधेच Happy
सकाळी सकाळी कोणाच्या तरी गाडीचा बझर वाजतोय सहा वाजेपासून आणी मी सात वाजता आरामात ऊठल्यावर बायकोला बोलतोय की काय लोकं असतात स्वतःच्या गाडीचा बझर पण ओळखता येत नाही आणी बंद पण करत नाही.. खाली गेल्यावर बघतो तर माझीच गाडी.. गुप्चूप वरती आलो आणी खिडकीतूनच रिमोट ने गाडी लॉक केली नंतर गाडी धुणार्याला झापला चांगल्लाच कारण त्यानेच दरवाजा ऊघडायचा प्रयत्न केल होता. शेवटी बझर डिस्कनेक्ट करणे हाच उपाय योग्य वाटला.
असो ट्रेक मस्तच झाला तुझा एकंदरीत Happy

खासच झाला तुमचा ट्रेक
फोटोसहित वर्णनामुळे वाचताना मजा आली

आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद

योगेश,
मस्तच ट्रेक आणि वृतांत!!!
महीपतसाठी एक दिवस ठेवून चांगला न्याय दिलात. महीपतच्या पूर्वेला अशक्य भन्नाट सह्याद्री आहे.
सुमारला शिड्या लावून कातळारोहण थ्रीलची मजा घालवली नाहीये ना?
रायासारखा उमद्या मनाचा वाटाड्या उभ्या सह्याद्रीत नाही भेटायचा. तुम्हालाही रायाची भेट झाली, आनंद वाटला.
आगामी ट्रेक्ससाठी शुभेच्छा!!!

संदिप - अगदी बरोबर गाडीचा किस्सा मात्र लेसन्स लर्न्ड.

स_ सा, विजय आंग्रे, शैलजा प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Discover सह्याद्री - खुप खुप धन्यवाद !
महिपतगड भटकंतीत मजा आली, अजुनही जुने अवशेष, काही वाटा, संशोधनास वाव आहे.
सुमारगडाच्या शिड्या लहान आहेत, पण मानसिक आधार तर नक्कीच देतात. खऱ थ्रील तर दृष्टीभय, दुर्गमता, गचपण, काट्याकुट्याची वाट यातच आहे.
बाकी रायासारखा उमद्या मनाचा वाटाड्या उभ्या सह्याद्रीत नाही भेटायचा +१ सहमत.
सह्याद्रीत भटकंतीतील वाटाडे हा तर वेगळाच विषय होईल. खरच ही तर खुप मोठ्या मनाची माणस.

वाह… दमदार ट्रेक आणि मस्त वर्णन…
शेवटी गाडीचा किस्सा ऐकून सुन्न झालो… २ दिवस त्या बिल्डींग मधल्या रहिवाश्यांची काय दयनीय अवस्था झाली असेल ह्याचा विचार करूनही अंगावर काटा आला… असो … गडबडीत होतात असे प्रकार पण त्यामुळेच हा ट्रेक आयुष्यभर स्मरणात राहील तुझ्या Happy
बढीया…

सुमारगडाविषयी पहिल्यांदाच एवढी माहिती मिळाली त्यासाठी तुमचे खुप आभार. विनंती होती की सुमारगडाचे तुम्ही काढलेले सर्व फोटो मिळाले तर खुपच मदत होईल. सुमारगडाच्या धोकादायक वाटेचे किस्से खुप ऐकण्यात आलेत.
shindesamird@gmail.com वर फोटो मिळावे ही नम्रविनंती.
धन्यवाद.

shindesamird@gmail.com वर फोटो मिळावे ही नम्रविनंती. >>> मझ्या लेखातील सर्व फोटो झेनोश नावाच्या मित्राने काढलेले आहेत. त्याला विचारून नक्की प्रयत्न करतो.

shindesamird@gmail.com वर फोटो मिळावे ही नम्रविनंती. >>> मझ्या लेखातील सर्व फोटो झेनोश नावाच्या मित्राने काढलेले आहेत. त्याला विचारून नक्की प्रयत्न करतो.