जान्हव्हीची आई, बोरकरांची बॉडी आणि पाण्याचा टॅंकर.

Submitted by Charudutt Ramti... on 20 December, 2015 - 14:48

" जान्हव्हीची आई, बोरकरांची बॉडी आणि पाण्याचा टॅंकर "

रात्रीचे साडे नऊ वाजले तसे क्लब-हाऊस मधे एक एक करत लोक जमा होऊ लागले. बोरकरांचे अप्पा आले. रीटायर्ड कर्नल खोत आले. सुनील फणसळकर आले. हे तिघे नेहमी प्रमाणे सर्वात आधी येऊन 'नीलकमलच्या' प्लास्टिक च्या खुर्च्या लावणे, सत्रन्ज्या पसरणे अशी 'स्वयंसेवकाची' कामे सुरू करतात न करतात तोवर क्लबहाऊसच्या पलीकडच्या बाजूने खिडकीतून "झू मधले प्राणी पहावेत" तसे काहीश्या टाचा उंचावून दामलेकाकू पाहत होत्या, कोणकोण प्राणी जमलेत ते. दामले बाईंना चोरून पाहाताना अप्पांनी पकडल. तश्या दामले बाई ओढून ताणून खोटनाटच हसत क्लब हाऊस मधे शिरल्या.

“बोरकर अप्पा, मी सांगत होते सव्वा नऊ नको, पावणे दहा ला मीटिंग बोलवा ” …. दामले बाई शाळेतल्या विद्यार्थ्याला समजावून सांगावे तसे समजवण्याच्या सुरात बोरकरांशी नजर न मिळवता अलगद बोलल्या.

“ ओss दामले बाई ss, जरा नीट आठवून पहा, गेल्या मीटिंग ला पावणे दहाचीच वेळ लिहिली होती नोटीस फिरवली तेंव्हा. पण तेंव्हाही दहा वाजायच्या आत कुणी फिरकल नव्हत क्लबहाऊस कडे ” गणिताच आलिंपिक भरवतात, तस ‘तुसडे पणान बोलण्या’ च ओलिंपिक जर भरवल गेल तर बोरकरांना 'पंच' म्हणून तुम्हीच यायच अस दरवर्षी निमंत्रण गेल असत. इतकी तुसडे पणान बोलण्यावर यांची मास्टरी होती.

“अजुन दहा मिनिट थांबा फक्त. त्या तुमच्या जान्हवि आणि खंडोबाच्या मराठी सिरियली संपल्या की येतील एक एक करत सगळे जांभया देत.” आप्पा स्वता:चा शालिन तुसडेपणा जपत मिरपुडिची धुरी दिल्या सारखे दामले काकून्वर वस्सकन पुन्हा एकदा खेकसले.

आमच्या सोसायटीचे स्वय्मघोषित नॉस्ट्राडेमस आप्पा बोरकरांच भाकित खर ठरल. पन्ध्राच मिनिटात टी-व्ही वरच्या सिरियली संपू लागल्या तश्या, सुमनताई आणि रामाणे बाई बोलत बोलत आल्या.

“काय हलकट आहे हो मेली...पण साडीचा पदर काय सुंदर होता नइई वहिनी…” सुमनताईन्नी एण्ट्रीलाच असा पंच दिल्यावर तिकडे माईक सिस्टीम अड्जस्ट करण्यात गुंग झालेले फणसळकर चकित झाले.

“कोण हो सुमन्ताई..कुणाला एवढ्या लाखोल्या वाहताय.” फणसळकरान्नी विचारणा केली.

“ कुणी नाही हो फणसळकर, आम्ही त्या टीव्ही सिरीयल बद्दल बोलत होतो ” सुमन्ताई शक्य तितक्या लडीवाळ पणे बोलल्या. पदरची मुलगी वयात आली तरी सुमन ताईंचा स्वता:चा अल्लड पणा काही अजुन जात नाही. सुमन्ताई भर वयात आल्या तेंव्हा रेडियो एफ्फेम असते तर रेडियोजॉकी चा जॉब नक्की मिळवला असता. ओठांचा चंबू करत “हाsssय मी सुsssमी....लssssव यू” वगरे अगदी लाडात येत स्त्रीपात्र रेडियो जॉकी बोलतात तेव्हा जेव्हडा असावा लागतो तेव्हडा सगळा निर्लज्जपणा त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात मिळाला असता.

"अग बाई पावणे दहा उलटून गेले तरी मीटिंग ला आपण सातच जण? ” रामाणे वाहीनींनी आपण स्वता: मीटिंगला अर्धा तास उशिरा आलोय हे विसरून पंचनामा घ्यायला सुरू केला.

“ अजेंडा शीट कुठाय ? गेल्या मीटींगचे मिनीट्स कुठेयत ? आपण ती बिल्डरला नोटीस पाठवणार होतो ती गेली का हो फणसळकर ? आणि आपण त्या सेक्यूरिटी गार्ड वाल्या एजेन्सी च बिल थकवणार होतो त्याच काय झाल ? आणि मीटिंगला सोसायटीच्या नियमा प्रमाणे अजुन किमान पाच जण हजर असावे लागतील. तरच कोरम पूर्ण होईल, नाही तर मीटिंग पुढे ढक्कल्लि आहे अशी नोटीस फिर्वा ”
उद्या जर लेडीटारझन चा रिमेक करायच रोहित शेट्टी ने वगरे मनात आणल तर, स्क्रीन टेस्ट घ्यायची गरज नाही. डोळे झाकून रामाणे बाईंना घ्यायच प्रमुख भूमिकेत.

अशा ह्या आमच्या 'कल्पद्रूम हौसींग सोसायटी च्या मीटिंगला जावे तरी पंचाईत आणि न जावे तरी पंचाईत. जाऊन फारसा फायदा नसतो. कुणीच कुणाच ऐकण्याच्या मनसस्थितीत नसतो तिथे. आणि न जावे तर 'आम्ही एवढ मरतोय ह्यांच्यासाठी पण हे मीटिंगा बोलावल्या तर साधे येत पण नाहीत अर्धातास’ वगरे वगरे या 'बॉडी वरल्या' लोकांच ऐकून घ्या. गंमत म्हणजे ‘हे वर्ष शेवटचे…पुढच्या वर्षी पासून तुम्ही तुमचे काय ते पाहून घ्या’ अस दर मीटिंग मधे पाच पाच वेळा घोकणारे सोसायटी ची ईलेक्षन लागली की फॉर्म भरायला रांगेत पहिले. वर आणि लष्करच्या भाकर्या, विकतची दुखणी, वगरे म्हणी ऐकवायला तयार. दर मीटिंग प्रमाणे या मीटिंग मधे ही ठराव सर्वानुमते पास होणार. अध्यक्ष ' खोत ', खजिनदार ' आप्पा बोरकर' आणि उपाध्यक्षा ' रामाणे वाहिनी' या तिघांना पटले की आमच्या सोसायटी मधे 'सर्वानुमते' अस म्हणायची फार जुनी परंपरा आहे. खोतांच त्यांची बायको एक सोडली तर सोसायटी मधले बर्यापैकी सगळे ऐकतात. आप्पांना त्यांच कोण ऐकतय आणि कोण नाही याची फारशी फिकीर नसते. पण या वेळी पास करायला ठेवलेला ठराव मात्र फारच जुलमी होता. मी नेहमी प्रमाण ठरवून ही विरोध करू शकलो नाही. आणि मी विरोध करू शकलो असतो तरी मी मांडलेल्या मताची तिस पस्तीस शकले उडवून, चारचौघात ‘जरा येडपटच’ आहेत नाही 'बी' बिल्डींग मधले' वगरे मला ऐकू येईल इतपत हळू आवाजात केलेली कुजबूज मी साने आणि सप्रे वहिनी यांच्या मधे पुर्वी एक दोनदा ऐकली आहे.

पण या वेळी ‘पाणी कपात’ असा जरा सेन्सिटिव विषय असल्या मुळे मी थोडा सावध पवित्रा घेतला. उगाच विरोधाला विरोध नको आणि प्रत्येक गोष्टीला होकार नको, जरा लवचिक पण गरज पडेल तो ताठर भूमिका घ्यायची ठरवून च मी मीटिंगला आलो होतो.

आप्पा बोरकरांनी , सरासरी परजन्यमान, पर्जन्य छाये खालील प्रदेश, धरण क्षेत्र म्हणजे काय धरणग्रस्त म्हणजे कोण, याबदद्ल मूळ विषयाशी काहीही संबंध नसतानाही, सोळा सतरा मिनिट व्याख्यान दिल. सरतेशेवटी मूळ मुद्दा फक्त अडीच मिनिटात संपवला. मुद्दा असा होता की “कॉर्पोरेशनच्या पाणी कपातीच्या निर्णया नंतर आता सोसायटी मधेही पाणी कपात सुरू केली आहे. चोवीस तासांनएवजी आता रोज सकाळी फ्क्त दीड तास आणि संध्याकाळी एक तास पाणी सोडण्यात येईल.” लेबनॉन च्या किंवा जॉर्डन च्या हुकुमशहा ने काढावा तसा फतवा व्याख्यानाच्या आप्पा बोरकरांनी शेवटी काढला. तसही बोरकर आप्पा CNN किंवा BBC वर दिसतात तश्या तालिबान किंवा आयसिस चे स्वयं घोषित पुढारी असावेत तसेच वा गतात बर्याच वेळेस. हल्ली तर त्यांच्याच सारखे वट हुकुमही सोडू लागलेत. 'गाज़ा' च्या पट्टीवर डांबून उंटाच्या पायी तुडवला पाहिजे याला असे हिंसक विचार माझ्या मनात येऊन गेले. जणू काही गाज़ा ची पट्टी माझ्या पितरान्नि सात-बारा चा उतारा बदलून घेऊन माझ्या नावे बक्षीस पात्र केली असावी आणि उंट तर आमच्या पाचपाच पिढ्या पाळत आल्या होत्या. असे खुनशि विचार मनात येऊ लागले की 'नानाबुवान्च' नामस्मरण करा, अस हीनं बजावून ठेवलय. हीनं त्याना गुरू केलय. आणि मी हिला.

पाणी कपात म्हन्टल्यावर देसाईंनी कान उंच केले. “ सकाळ चे दीड तास कोणते ते आधी सांगा ”.
बोरकर आणि टोळी तयारीनीशी आली होती. सकाळ आणि संध्याकाळच सोमवार बुधवार आणि शुक्रवार ई. ई. शेड्युल त्यानी रामरक्षा म्हणावी तसे घडा घडा वाचून काढले.

एव्हाना हॉल चांगला पूर्ण नाही पण अर्ध्याच्या वर भरला होता. बहुतेक सगळ्या सिरीयल संपून दहाच्या बातम्या सुरू झाल्या असाव्यात टीव्ही वर.
पाणी सकाळी कधी येणार याचे शेड्यूल वाचून झाल्यावर मागच्या लाईनितून थोडी कुजबूज ऐकू आली.

“अहो हे पाणी सोडण्याच शेड्युल तर बोरकर आणि फणसळकरांच्या बायकोच्या ऑफीस च्या टायमिंग ला सूट होईल अस बनवलय”
प्रस्थापितानविरुद्ध बंडाची नांदी आणि निशाण फडकावणे, शन्ख फुंकणे वगरे सुरू झाल होत. पाषाणकर आणि देसाई गट थोडा आक्टिव झल्यासारखा वाटत होता. मागच्या वर्षी च्या सोसायटी च्या एलेक्षन मधे मार पडलेले पाषाण कर आणि देसाई, कोणत्याच सभेत बोरकर गटाला धुण्याची संधी ईतक्या सहजा सहजी सोडत नाहीत.

'ओ बोरकर आणि खोत..! आमच्या सारख्या ‘शिफ्ट’ मधे ड्यूटीला जाणार्यानी काय परोश्यान ड्यूटीवर जाव अस तुमच्या 'बॉडी' च म्हणण आहे काय. देसाई आता पेटले. इतर वेळी चोवीस तास पाणी होत तेव्हाही दुपारी बारा बारा वाजे पर्यंत आंघोळ न करणारा पाशाणकर आज मात्र पहाटे उठून शुचीरभूत होऊन आंघोळीच महत्व काय अस्त ते रात्री दहा वाजता पेन्गूळून गेलेल्या सदस्यांना सांगू लागला.

तिकडे दामले बाईनी हळूच वाटायला गुळगुळीत कागदावर छाप्लेली पॉमप्लीट आणली होती ती एकेक करत सरकवायला चालू केली. त्यातल हळूच मलाही एक पॉमप्लीट मिळाल. सरळ करून वाचून पाहतो तो काय. त्यानी चक्क 'लॉफ्ट टॅंक बसवून मिळतील' अशी त्यांच्या धाकटया भावाच्या प्लमबिंग व्यवसायाच्या जाहिरातीच वाटपच सुरू केल होत. मी मनोमन दामले बाईनच्या 'व्यावहारीक' पणाच कौतुक केल. जाहिरातीच्या खाली 'लाइक अस ऑन फेस्बूक' अस वाचल्यावर तर मी चाटच पडलो. मुन्शीपालटी च्या पाणी टंचाई करिता पर्यायी सोय म्हणून बाथरूम मधे बसवायच्या टाकीला फेस्बूक वर लाइक करायला लावणार्या दामले बाई म्हणजे मला क्षणभर उगाचच गो-एयर च्या एयर होस्टेस्स ना ट्रेन करणार्या ‘मौरिन वाडीया’ सारख्या “सेक्सी आणि गिनीयस” वाटू लागल्या. मी बोजड दामले बाईंना 'मौरिन' सारखे तन्ग कपडे घातल्यावर त्या कशा दिसतील अशी मनात एक फॅण्टसी पण करून पहिली.

“बसा मग बोम्बलत” बोरकरांच्या त्या भसाड्या वाक्यामुळे माझी फॅण्टसी भन्ग पावली. किल्ला बोरकरांच्या हातून सरळ सरळ जात असताना होणारा आनंद देसाईन्च्या चेहेर्यावर लपून राहत नव्हता.
“काय करायचय ते करा….मरा” बोरकरांनी कधी नव्हे तो शस्त्रे खाली ठेवली.

देसाईंनी त्यांच्या कुठल्या तरी सरकारी ओफिसर असलेल्या मेव्हण्याशी लगेचच फोन वरुन संभाषण करून सोसायटीला दर आठवड्याला टीन टॅंकर सप्लाय मिळवून देतो अशी हमी मिळवली. त्यामुळे आजच्या मीटिंगचे देसाई एकदम 'हिरो' झाले होते. सगळ्या जमा झालेल्या बायका अगदी कृत-कृत्य भावनेने देसाईन्च्या दाढीचे खुंट वाढलेल्या चेहरया कडे पाहत होत्या.

"हो ना मग, काय, सकाळी कित्त्ति कित्त्ति गडबड असते...कसे काय जमले असते ह्या बोरकरांच्या बॉडी ने दिलेल्या शेडूल प्रमाणे. " - शेवडे वाहिनी. शेवडे वाहीनींना बोरकरांची बॉडी कधीच आवडली नाही. देसाईनची बॉडी एकदम छान होती अस त्या उघड पणाने म्हणायच्या. शेवडे वाहिनी देसाईंच्या बॉडी बदद्ल तोंड भरून बोलू लागल्या की मिस्टर शेवडे बिचारे मीटिंग मधे अंग चोरून बसायचे.

" मी देसाईंना पहिल्या दिवसापासून सांगत होते...तुम्ही लक्ष घाला...तर सगळ नीट होएल, अगदी तस्सच झाल." साखरे वाहिनी.
आता येवढ बोलून थांबायच की नाही. पण नाही.
“ बोरकरांना नाही हो झेपत...”

हे वाक्य बोरकर वाहीनींना ऐकू गेल आणि मग मात्र खंडेरायची बानू आणि जांन्हवी आणि तिची आई या सगळ्या एकत्रित परवडतील पण बोरकर वाहिनीन्ना आवरा असा एपिसोड पुढचे पंचवीस मिनिटे सोसायटी मधे सुरू राहिला.

महाराष्ट्र टॅंकर मुक्त कधी होणारे ते देवच जाणे, आमची सोसयटी मात्र आज पासून टॅंकर-युक्त झाली...!

चारूदत्त रामतीर्थकर
21 डिसे. 15 (पुणे)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy
अस हीन बजावून ठेवलय. हीन त्याना गुरू केलय. >>:)असं, हीनं (या शब्दांच्या शेवटी अनुस्वार द्या, मी विचार करून थकलो, नक्की काय म्हणायचंय असं Wink Proud )

दिनेश जी आनि Harshalc >>> तुम्ही सांगितलेल्या सुचनान्प्रमाणे दुरुस्ती केलेली आह. योग्य सूचना केल्या बदद्ल धन्यवाद. वरील अभिप्रयांबदद्ल ही आभार.

भारी !!!!