फुसके बार – १२ डिसेंबर २०१५

Submitted by Rajesh Kulkarni on 11 December, 2015 - 14:59

फुसके बार – १२ डिसेंबर २०१५
.
१) उच्च न्यायालयाने सलमानखानला निर्दोष घोषित केल्यामुळे आसारामच्याही सुटकेच्या आशा पल्लवित झालेल्या दिसतात. फरक एवढाच, की इतक्या वर्षात सलमानखान जवळजवळ तुरूंगात नव्हताच, तर आसारामच्या खटल्याची सुनावणीही नीटशी सुरू झालेली दिसत नाही तरी तो अजुनही आत आहे.

मात्र सलमानला वाचवू पाहणा-या शक्तींप्रमाणेच आसारामचीही वाटचाल चालू आहे. ती म्हणजे साक्षीदारांना नाहीसे करणे. सलमानखान प्रकरणावरून बोध घेताना प्रमुख साक्षीदारांची उलटतपासणीही होते की नाही याकडे सरकारपक्षाने लक्ष द्यावे. अन्यथा उलटतपासणी घेतली गेली नाही म्हणून साक्षीदाराच्या मृत्युनंतर त्याची आधीची साक्षच रद्द व्हायला नको.

२) गुगलने ड्रायव्हररहीत कार विकसित केली आहे. ती अजूनही चाचणी पातळीवर असून रस्त्यावर आलेली दिसत नाही. मात्र भारतात अशी गाडी २००२सालीच वापरात होती असे उघड झाल्याचे व्हॉट्सअपवर कळले आहे. हा प्रहार केवळ अपघाताने म्हणजे योगायोगाने उघड झाला आहे असे दिसते. आणि हा अपघातही शब्दश: अपघात होता. पण कोणत्याही ऑथॉरिटीजची परवानगी न घेता थेट लॅंडक्रुझरचे मॉडिफिकेशन करून भल्याभल्यांनाही न जमलेला हा शोध लावल्याबद्दल सलमानखानचे कौतुक करावे की त्याच्याविरूद्ध कारवाई करावी या संभ्रमात वाहतुक पोलिस खाते पडले आहे. पण चालू गाडीत चालवायला ड्रायव्हरच नसल्यामुळे कारवाई कोणावर करायची हा प्रश्नही त्यांच्यापुढे पडला आहे म्हणे.

शिवाय आपल्या गाडीत असे कोणते बदल केलेत की आपल्यालाही न जमलेले तंत्रज्ञान सलमानखान याने सहज आत्मसात केले, हे जाणण्याचा मोह टोयोटा कंपनीलाही झाल्याशिवाय राहणार नाही.

३) वरच्या दोन्ही फुसक्या बारांमध्ये सलमानखानचा उल्लेख असला तरी ही ‘फुसके बार’ची सलमानखान स्पेशल एडिशन नाही.

विषारी घटक असलेल्या पदार्थांचे प्रमाण खाण्याच्या पदार्थांच्या बाबतीत कसे ठरवले जाते? एखाद्या पदार्थात असलेला विषारी घटक समजा ५ ppm आहे व एखाद्याने त्या पदार्थाचे अतिसेवन केले, तर हा विषारी पदार्थ त्याच्या पोटात अधिक प्रमाणात जाईल. त्याचा त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तेव्हा अशी मर्यादा आणि व्यक्तीचा आहार यांचा काही संबंध लावला जाऊ शकतो का?

४) कॅशलेस विम्याच्या नावाखाली हॉस्पिटल्समध्ये चालणारा गोंधळ आता सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. कोणत्याही उपचारांकरता हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतल्यावर तुमचा आरोग्य विमा आहे का व तो कॅशलेस आहे हा प्रश्न आधी विचारला जातो. कॅशलेस विमा नसेल तर रूग्णाकडून कमी पैसे वसूल केले जातात व जर तो असेल तर ही रक्कम वाढवली जाते.

ही रक्कम अनेकदा स्वत:च्या खिशातून जात नसल्यामुळे रूग्णाला फरक पडत नाही. मात्र विमा कंपन्यांना त्यामुळे अधिक रक्कम हॉस्पिटलला द्यावी लागते. अशा व्यवहारांमुळे विमा कंपन्यांचे अधिक नुकसान होते असे समजले, तर हा प्रकार अधिकाधिक वाढत कसा चालला आहे? विमा कंपन्या हे कसे खपवून घेतात? यामागचे गौडबंगाल काय आहे?

५) पतीपेक्षा उंच असलेल्या पत्नीचा व आता जाड असलेल्या पत्नीचा विषय असलेले सिनेमा येऊन गेले. आता पती-पत्नीमधील कोणत्या विसंगतीचे उदाहरण पुढचा सिनेमा करण्यासाठी घ्यावे?

६) दिल्लीमध्ये यापुढे कोणत्याही प्रकारच्या डिझेलवर चालणा-या वाहनांची नोंद करू नये असा आदेश हरित लवादाने दिला आहे. हा आदेश अतिशय स्वागतार्ह आहे. दिल्लीच्या शेजारी असलेल्या राज्यांमध्ये मात्र अशा गाड्या वापरात येतच राहतील व त्यांना दिल्लीत प्रवेश करण्यास प्रतिबंध नसेल. तरीही या निमित्ताने सुरूवात झाली हे महत्त्वाचे.

भयंकर प्रदुषणामुळे दिल्लीत थंडीच्या दिवसात श्वसनाशी संबधित आजारांचे स्वरूप गंभीर होते हे खरे असले तरी हा हरित लवाद केवळ दिल्लीमध्येच एवढा जागरूक का आहे हे कळत नाही. पुण्या-मुंबईतील प्रदुषणाची पातळी दिल्लीएवढी होईपर्यंत आपण जागे होणार नाही आहोत का? आधीच आपल्याकडे प्रदुषणाच्या दृष्टीने होणा-या वाहनांच्या देखभालीची बोंब आणि त्यात डिझेलवर चालणा-या सहा आसनी रिक्षा, सार्वजनिक वाहतुकीच्या बसेस अशा कित्येक वाहनांतून होणारे प्रदुषण विक्राळ रूप धारण करत आहे.

डिझेलमधल्या सल्फरच्या मात्रेमुळे हे प्रदुषण कार्बन मोनॉक्साइडशी संबंधित प्रदुषणामध्ये आणखी भर घालते.

७) गौडबंगाल या वर उल्लेख केलेल्या शब्दावरून आठवले, की या शब्दाचे मूळ कोठे आहे? उदाहरणार्थ, गौडबिहार का नाही?

८) कित्येक ठिकाणी गुळ तयार करताना त्याचा रंग पिवळा रहावा म्हणून त्यात अनेक घातक रसायने घातली जातात. त्यांचा आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याशिवाय रहात नाही. वेगवेगळ्या ठिकाणी अशा गुळाचे उत्पादन झाले तरी त्यावर कोल्हापूरचा शिक्का मारला की तो गुळबाजारात खपणे सहज शक्य होते.

कितीही रसायने घातली तरी हा गुळ हवेशी संपर्कात आला की काळा पडतोच. मात्र त्यामुळे वेगळीच अडचण निर्माण होते. एरवी काळा गुळ हा रसायनविरहीत समजला जाई. पण या प्रकारामुळे कोणता गुळ सुरक्षित हेच कळेनासे होते.

आपल्याकडे एफ.डी.ए. या सरकारी खात्याचे अस्तित्व जवळजवळ नसल्यामुळे त्यांचे याकडे लक्ष जाणार नाही.

त्यामुळे आगामी काळात गु-हाळावर जाऊन आपल्या नजरेखाली ऊस गाळून त्याचा गुळ करून घेण्याकडे कल वाढला किंवा तशी पद्धत चालू झाली तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे त्यादरम्यान कोणतीही रसायने घातलेली नाहीत याची खात्री करून घेता येईल. या युक्तीचा शेतक-यांनीही व्यवसाय म्हणून उपयोग करून घ्यावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

When I read that Salman Khan has been declared innocent by the courts I was reminded of a quote in John Grisham's novel The Chamber which said, "Weird things happen within our absurd judicial system. Courts rule this one day and the other way the next."

फुसक्या बारात छान विचार मान्डलेत.

<<सलमानला १३ वर्ष तरी रखडवला, अंबानीच्या मुलाने तर पोलीस चौकिचं तोंडहि पाहिलं नाहि, गो फिगर...>>
----- अम्बानीच्या मुलाने काय केले ? कुठेच बातमी दिसत नाही.

<<<<<<<अम्बानीच्या मुलाने काय केले ? कुठेच बातमी दिसत नाही.>>>>>>

म्हणे अंबानी च्या मुलाच्या गाडीने एका होंडा सिटीला धडक दिली. कोणाला काही झाले नाही.

असे म्हणतात की २ दिवसात त्या होंडा सिटीच्या जागी औडी का बी. एम .ड्ब्ल्यु उभी होती. त्यामुळे दोन्ही बाजुच्या पार्ट्या खूषच होत्या.