जीवावर बेतले पण निभावले …'ब्लॅक लेबल'वर ! - एक निदानचातुर्य कथा !

Submitted by SureshShinde on 24 February, 2014 - 11:29

जीवावर बेतले पण निभावले …'ब्लॅक लेबल'वर ! - एक निदानचातुर्य कथा !

blacklebal.jpg

मी ससून हॉस्पिटलमध्ये एमडी करीत असतांनाची म्हणजे सुमारे चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही …
बुधवारची संध्याकाळ. आमच्या युनिटचा इमर्जन्सीचा दिवस होता. चोवीस तास अव्याहत काम करणाऱ्या सीएमओ विभागात एक पेशंट आल्याचा निरोप आल्यामुळे मी आणि माझा ज्युनियर सहकारी डॉक्टर तिकडे निघालो. आमच्या युनिटचे प्रमुख तज्ञ डॉक्टर श्री सुळे यांची चिठ्ठी घेवून श्री मोहन भट नावाचे एक पेशंट आमची वाट पाहत थांबले होते. पन्नाशी ओलांडलेले आणि सुखवस्तू दिसणारे भट हे एक वकील असल्याचे त्यांनी पहिल्याच वाक्यात स्पष्ट केले. आधीच सरांचे खाजगी पेशंट आणि शिवाय वकील म्हटल्यामुळे आम्ही थोडे जास्तच सावधगिरीने ऐकू लागलो.
"आज सकाळपासून माझी तब्बेत बिघडली आहे. थोडा तापही वाटतो आहे, सारे अंग दुखते आहे. अंगावर तांबडे पुरळ उठले आहे. तोंडात देखील लाल काळे चट्टे दिसत आहेत. नाक शिंकरले तर रक्ताच्या गाठी पडताहेत."
त्यांना तपासल्यानंतर त्यांच्या पायावर पावलांपासून ते दोन्ही मांड्यांपर्यंत साधारणतः एक ते दोन मिलीमीटर आकाराचे हजारो लाल ठिपके दिसत होते. त्यातील काही ठिपके एकमेकांत मिसळल्यामुळे लालकाळसर असे मोठे धब्बे तयार झाले होते.

230px-Purpura.jpg

"सर, परप्युरा दिसतोय !" ज्युनियर माझी कानात पुटपुटला.
तोंडाच्या आतल्या भागात असेच लाल काळे चट्टे दिसत होते. नाकातून आत्तातरी रक्त येत नव्हते. पोटामध्ये लिव्हर आणि स्प्लीन वाढलेली हाताला जाणवत होती. शंभरपर्यंत ताप होता पण बीपी उत्तम होते. ते कोठलेही औषध घेत नव्हते. पण रोज रात्री तीनचार पेग व्हिस्की मात्र नित्यनेमाने अनेक वर्षे घेत आले होते.
"भटसाहेब, आपल्या शरीरातील प्लेटलेटस नावाच्या पेशी कमी झाल्या असाव्यात असे वाटते. ह्या पेशी आपल्या शरीरामध्ये रक्तस्त्राव झाल्यास तो थांबवितात. पण या पेशी प्रमाणापेक्षा जास्त कमी झाल्यास असा रॅश येतो. तुमच्या तोंडातील चट्टे अथवा नाकातून येणारे रक्तदेखील हेच दर्शवतात. आपल्याला हॉस्पिटलमध्ये दाखल होवून पुढील तपासण्या करून त्याप्रमाणे ईलाज करावे लागतील."

भटसाहेब खाजगी वार्डमध्ये ॲडमिट झाल्यानंतर थोड्याच वेळात सर्व प्राथमिक रिपोर्ट उपलब्ध झाले. भटांचा प्लेटलेट काऊंट जो नेहमी असतो पाच लाख तो केवळ दहा हजार होता ! त्यामुळेच त्यांना आपोआप त्वचा,नाक आणि तोंड येथे कोठलेही कारण नसताना देखील आपोआप रक्तस्त्राव होत होता ! ह्या प्लेटलेट बोनम्यारो म्हणजे अस्थिमज्जा किंवा हाडांच्या पोकळ भागात तयार होतात. प्लेटलेटच्या मूळपेशी तेथेच असतात व त्या आपण ज्याप्रमाणे सांडगे करताना तुकडे करतो त्याप्रमाणे स्वताच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे रक्तामध्ये सोडत असतात, ते तुकडे म्हणजे या 'प्लेटलेट' ! यांचे आयुष्य सुमारे दहा दिवस असते. रक्तामधील वृध्द झालेल्या सर्व प्रकारच्या पेशी 'स्प्लीन' म्हणजे पाणथरीमध्ये जावून मरतात. प्लेटलेट कमी होण्याची दोन कारणे असतात. एक म्हणजे मूळपेशी कमी झाल्याने त्यांचे उत्पादन कमी होते. कधीकधी काही कारणांमुळे प्लेटलेटच्या शरीरामधील प्रथिनांमध्ये बदल झाल्यामुळे त्यांची ओळख बदलते, त्यामुळे शरीरातील संरक्षण व्यवस्था, इम्यून सिस्टीम, त्यांचा मारून टाकते. भटांच्या बाबतीमध्ये बहुतेक असेच होत असावे कारण त्यांचे इतर सर्व रिपोर्ट नॉर्मल होते आणि, लिव्हर आणि मुत्रपिंड यांचे कार्य उत्तम चालले होते. आम्ही त्यांचे सर्व रिपोर्ट सुळे सरांना कळविले.
"सुरेश, श्री भट हे केवळ आपले पेशन्त्च नव्हे तर माझे मित्र आहेत. त्यांना डेंगीचा ताप असण्याची शक्यता आहे. त्यांना स्टेरॉइडचे इंजेक्शन सुरु करा आणि रात्रीतून एक फ्रेश ब्लडही द्या. उद्या सकाळी पुन्हा प्लेटलेट काऊंट पाठवा. मी त्यांना सकाळी पाहीन."

दुसर्या दिवशी सकाळी भट अगदी फ्रेश दिसत होते. रात्रभरच्या उपचारांनी चांगला परिणाम दिसत होता. नाकातील ब्लीडींग पूर्ण थांबले होते व अंगावरील पुरळ मावळताना दिसत होते. ताप निवला होता आणि आजचा ताजा प्लेटलेट काऊंट होता पन्नास हजार !
"अब आप खतरेसे बाहर है" मी आनंदाने ही बातमी भटांना सांगितली.
पुढील दोन दिवसांत त्यांची तब्बेत आणखीनच सुधारली, प्लेटलेट काऊंट झाला तीन लाख आणि पुढील दहा दिवसांत स्टेरॉइडच्या गोळ्या हळूहळू कमी करायला सांगून आम्ही भटांना घरी पाठवले.

सुमारे पंधरा दिवसांनंतर श्री भट पुन्हा त्याच तक्रारींसह पुन्हा ॲडमिट झाले. यावेळीस पुन्हा तीच औषधे सुरु केली पण त्यांच्या प्लेटलेट्स काही वाढेनात, त्या वीसतीस हजारापर्यंत स्थिरावल्या होत्या. बोनम्यारो टेस्टमध्ये प्लेटलेट्सच्या मूळपेशी तर चारपट वाढलेल्या दिसत होत्या. म्हणजे भटांच्या प्लेटलेट्स स्प्लीनमध्ये जावून मरत होत्या, त्यांना अँन्टीबॉडीज तयार झाल्या होत्या. त्यावेळी अशा अँन्टीबॉडीज मोजण्याची सोय नव्हती.
"सुरेश, भटांना आयटीपी दिसतोय आणि बरेच दिवस स्टेरॉइडस घ्यावी लागतील . भटांच्या प्लेटलेट्स का कमी होताहेत हे शोधले पाहिजे नाहीतर त्यांची स्प्लीन काढून टाकण्याखेरीज गत्यंतर दिसत नाही."
अँन्टीबॉडीजमुळे प्लेटलेट्स कमी होण्याच्या आजाराला आयटीपी असे म्हणतात. जंतुसंसर्गामुळे झालेला आयटीपी काही दिवसांत आपोआप बारा होतो पण इतर कारणांमुळे अँन्टीबॉडीजचे उत्पादन सतत चालूच राहिले तर स्टेरॉइडस किंवा सर्जरी शिवाय पर्याय नसतो. कधीकधी कांही औषधांची ॲलर्जी निर्माण झाल्यामुळे अशा अँन्टीबॉडीजचे उत्पादन सतत चालूच राहते आणि ते औषध बंद करणे हा त्यावर उत्तम उपाय असतो. आम्ही भटांची खूप चौकशी केली पण काही क्लू मिळेना.
एके दिवशी वार्डच्या मुख्य सिस्टरांनी मला बाजूला बोलावून सांगितले,
"सर, हा पेशंट रोज दारू घेत असतो. रोज सकाळी दाढी करायला येणाऱ्या न्हाव्याशी त्याने संधान जुळवले आहे. तो न्हावी त्याच्या फवार्याच्या बाटलीत दारू आणून त्यांना देतो असा मला दाट संशय आहे."
मी ही गोष्ट सुळे सरांच्या कानावर घातली. सरांचा चेहरा हसरा झाला.
"अरे मोहन, तू हॉस्पिटलमध्ये देखील तुझा कार्यक्रम चालू ठेवला आहे असे कळते. काय पितोस ?"
मोहन भट चांगलेच चपापले.
"डॉक्टर, मला त्याशिवाय जमतच नाही. बायको गेल्यापासून 'ब्लॅक लेबल'नेच मला सोबत केली आहे."
क्षणभर मला भटांची कींव आली.
पण सरांच्या मनात काही तरी वेगळेच विचार घोळत होते. सुळे सर हे उत्तम निदान करण्यासाठी प्रसिद्ध होते. सरांच्या टोपीमध्ये अनेक तुरे खोचलेले होते, 'पूना सिंड्रोम' हा त्यापैकी एक ! जुन्नरजवळच्या एका कुटुंबामधील सर्वांना प्रमाणापेक्षा खूपच लघवी होवू लागली. रोज पंधरावीस लिटर्स ! आपल्या अगस्ती मुनींना झाली होती त्याची आठवण करून देणारा आजार ! याला आम्ही डायबीटीस इंसीपिडीस म्हणतो. सरांनी शोधले की ह्या लोकांनी खाल्लेल्या बाजरीवर एक प्रकारची बुरशीचा रोग पसरला होता आणि त्यामुळे हा आजार झाला होता. अचूक निदान ही सरांची खासियत होती. एखाद्या पेशंटविषयी चौकशी करून झाली की सर डोळे मिटून दोन मिनिटे शांत विचार करीत थांबत आणि आम्ही आता सर काय बोलतात याची वाट पाहत थांबत असू. भगवान श्रीकृष्ण अंतर्यामी बघून ज्ञानकोश शोधत असत त्याची आठवण व्हावी ! आजही सर थोडा वेळ भटांच्या शेजारी अशाच ध्यानमग्न अवस्थेत उभे होते.
"भट, व्हिस्किमध्ये काय घालता, सोडा, पाणी की स्ट्रेट, 'ऑन द रॉक्स !"
भट जरा खुशीत आले,
"माझे काही मित्र ब्रिटीश काळातील आर्मीमधून रिटायर झालेले. त्यांना व्हिस्किमध्ये लागते एक स्पेशल पाणी, 'टॉनिक वॉटर'. हे जरा कडू असते पण त्याची मजा काही औरच !"
"मला दाखवता का ते तुमचे 'टॉनिक वॉटर' !"

tonicwater.jpg

भटांनी तातडीने कपाट उघडून एक बाटली काढून सरांच्या हातात दिली आणि स्मितहास्य करीत उभे राहिले.
"अगदी बरोबर ! या मुळेच, या पाण्यामुळेच तुमच्या प्लेटलेट्स कमी होत आहेत."
सर काय बोलताहेत यावर क्षणभर भटांचा आणि इतर कोणाचाही विश्वास बसेना.
"डॉक्टर, मी दारू सोडावी म्हणून तुम्ही असे सांगत असाल तर त्याचा काही उपयोग नाही." भट.
"दारू पिणे हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. पण तुमच्या तक्रारी ह्या टॉनिक वॉटरमुळेच आहेत याची मला खात्री आहे." सर.
"माफ करा, सर पण तुम्ही म्हणता याला पुरावा काय ?" भटांमधल्या वकीलाने प्रश्न केला.
सुळे सर थोडेसे गंभीर झाले आणि मला म्हणाले,
"सुरेश, पटकन दोन काचेचे ग्लास मागवून घ्या."
भटांनीच लगेच कपाटातून दोन ग्लास काढून दिले. सर आता काय करणार असा विचार करीत आम्ही सर्वजण उभे होतो.
सरांनी एका ग्लासमध्ये काठोकाठ 'टॉनिक वॉटर' भरले आणि दुसर्यात साधे पाणी. ते दोनही ग्लास न सांड्वता खिडकीमध्ये भर उन्हात ठेवले.
"आपण दुसरे पेशंट पाहून येईपर्यंत हे ग्लास असेच राहू द्या. आम्ही पंधरा वीस मिनिटात परत येतो असे सिस्टरना सांगून आम्ही बाहेर पडलो. पुन्हा परत येईपर्यंत आता काय जादू दिसणार याचाच आम्ही सर्वजण विचार करीत होतो.
परत येवून पहिले तर ते दोन्ही ग्लासेस तसेच दिसत होते, काहीच फरक दिसत नव्हता.
"सुरेश, सर्वजण जवळ येवून पाळीपाळीने असे बाजूने दोन्ही ग्लासमधील पाण्याच्या पृष्ठभागाकडे नीट पहा."
मी सर्वप्रथम पहिले. 'टॉनिक वॉटर' च्या ग्लासातील पृष्ठभागाच वरील पाव इंच जाडीचा थर निळसर होवून चमकत होता. आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो, अगदी भटदेखील !
"आता या टॉनिक वॉटरच्या बाटलीवरचे लेबल वाचा." सर.
"इंडियन टॉनिक वॉटर - कंटेन्स 'क्विनाईन' " वाचतावाचताच माझी ट्यूब पेटली. भटांना क्विनाईनची ॲलर्जी होती आणि त्यामुळेच त्यांच्या प्लेटलेट्स कमी होत होत्या.
टॉनिक वॉटरमधील क्विनाईनच्या रेणुंवर दुपारच्या कडक उन्हातील सुर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट किरण पडल्यामुळे चमकणारे 'फोटॉन्स' तयार होतात व त्यामुळेच तो नीळा रंग दिसला होता.
ते टॉनिक वॉटर पिणे बंद केल्यानंतर काही दिवसांतच भटांच्या प्लेटलेट्स वाढून पूर्ववत नॉर्मलला आल्या. सुळे सरांनी सज्जड पुरावा दिला होता. भटांनी मात्र या प्रसंगाचा एव्हडा धसका घेतला की ब्लॅक लेबल ऑन-द-रॉक्स घ्यायला सुरवात केली !

-----------------------------------------

सूर्याच्या प्रकाशामध्ये, विशेषतः दुपारच्या रखरखीत उन्हामध्ये भरपूर अल्ट्राव्हायोलेट किरण असतात जे आपल्या त्वचेला घातक असतात. त्वचेमधील डीएनए ला इजा पोहोचवितात. हा डयमेज रिपेअर करण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. काही व्यक्तींमध्ये असलेल्या जनुकीय दोषामुळे त्यांना हा डीएनए रिपेअर करता येत नाही त्यामुळे त्यांच्या त्वचेला खूप ईजा होवून काळे धब्बे पडतात, कालांतराने डोळे आंधळे होतात आणि शेवटी त्वचेचा कर्करोग होतो. अशा genetic DNA repair disorder चे नाव आहे 'xeroderma pigmentosa'. काही दिवसांपूर्वी अशी एक फ्यामिलीचे मी निदान केले होते.
सनस्क्रीन आणि काही औषधांमुळे त्याचे आयुष्य सुखकर करता येते. त्या फ्यामिलीमधील एकच हा फोटो ….

xeroderma.jpg

सूर्यकिरण वातावरणामध्ये प्रवेशताना वातावरणातील ओझोन वायूचा थर हे अल्ट्राव्हायोलेट किरण नष्ट करतो. पण दुपारच्या वेळी सुर्यकिरणे सरळरेषेमध्ये पृथ्वीवर आल्यामुळे त्यात अल्ट्राव्हायोलेट किरण जास्त प्रमाणात असतात. या उलट सूर्याची कोवळी किरणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात. असो !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिंदेकाका, छान आहे लेख. सकाळचे किती वाजताचे वा वाजेपर्यंतचे उन शरिराला चांगले असते?

नेहमीप्रमाणे छान कथा! मला रोग, टेस्टस् ह्याबद्दल प्रचंड भिती आहे. वाचू की नको अश्या आवस्थेत एक कथा वाचली अन फॅन झाले अन वाचतच गेले... तुमची शैली खूप आवडते. धन्यवाद!

अ‍ॅलर्जी बाबतीत माझाही विचित्र अनुभव आहे. वर्षानुवर्षे वापरात असलेल्या एका पदार्थाची मला अचानक अ‍ॅलर्जी झाली आहे. तो पदार्थ खाणे दूरच व चुकुन वास हुंगला तरी कान लाल होतात व शरीरावर लाल चट्टे उठतात.

कोणताच डॉक्टर एकदम पिनपाँईट करु शकला नाही. व हेच स्पष्टीकरण दिले की शरीर कधी कधी असे करु शकते. अचानक अ‍ॅनटायबॉडीज होतात.

बाकी, अमेरीकेत असताना डॉक्टर कायम हाच प्रश्ण विचारतात, लेट मी क्नो युअर डिसिजन?( हा खूपच गोंधळात टाकणारा प्रश्ण आहे, ते डॉक्टर्स मात्र कायद्याने आपली सुटका करतात... कारण सिस्टमच तशी आहे.
असो, सहज आठवलं म्हणून लिहिलं.
आतच्च भारतात डॉक्टरांच्या मिमांसेचे(वेळ घेवून सुद्धा चुकीची मिमांसा) नुकतेच दोन भितीदायक(मरणदायक) अनुभव घेतलेत, तेव्हा चांगला निदान करणारा डॉक्टर भेटणे म्हणजे देवच पावणे असे समजावे. Happy

(भारत व अमेरीका वाद नकोय.)

(कोणाला उद्देशून व कोणा डॉक्टरला हि दुखवायचा हेतु नाहीये पण एक वरची गोष्ट वाचून आता आठवले व वाटले की अचूक निदान करणारे, तेवढा वेळ देणारे/घालवणारे डॉक्टर्स भेटणे आपले (रोग्याचेच) नशीब आहे.)

झंपी अनुमोदन. तुझी पोस्ट मला पटली.

अचूक निदान करणारे, तेवढा वेळ देणारे/घालवणारे डॉक्टर्स भेटणे आपले (रोग्याचेच) नशीब आहे. ++१११

अहो नशीब वगैरे आणू नका हो मधे. विज्ञानाची कास धरा.
उगा इथेही तुम्ही नशीब वगैरे आणलेत तर त्यामागे ज्योतिष/कुंडली/देव-धर्म/प्रार्थना वगैरे येईल, अन पाठोपाठ लायसेन्स्ड शिकारी कुत्र्यांप्रमाणे कायद्याची कवचकुन्डले लाभलेले शिकारी अन्निस/बुप्रावाले येतिल अन येथिल चांगल्या विषयाचा/अचर्चेचा पार चोथा करुन अंधश्रद्धानिर्मुलनाची दहशत इथे पसरवतील. तेव्हा इथे "नशिब" वगैरे नकोच.
की अ‍ॅडमिनना सान्गुन नशिब हा शब्दच ब्यान करुन घ्यायचा माबोवरुन? Wink

मस्तच ! तुमच्या अफाट लिखाणशैलीमुळी वैद्यकीय माहितीबरोबरच डिटेक्टीव्ह चातुर्यकथा वाचल्याचा आनंद मिळून जातो. नेहमीच !

मस्तच ! तुमच्या अफाट लिखाणशैलीमुळी वैद्यकीय माहितीबरोबरच डिटेक्टीव्ह चातुर्यकथा वाचल्याचा आनंद मिळून जातो. नेहमीच ! >>>>+११११११

डॉ सुळ्यानी जर पेशंट मित्राला असा सल्ला दिला असता की बाबा रे ब्लॅक लेबल ही दारु आहे शेवटी. ती बंद कर आता. नाही तर तुझे काही खर नाही. तर त्याने तो ऐकला नसता याचा अंदाज डॉक्टरांना होता.
निदान कथा आवडली. पेशंटच्या खाण्यापिण्याच्या सवयी दिनचर्या अशा बाबी विचारात घेणारे डॉक्टर कमी असतात हल्ली. पेशंटलाही ती खाजगी बाब वाटते.

Pages