आशिका: मलाही कोतबो: खानदानी बडी बहू

Submitted by आशिका on 1 September, 2014 - 03:33

हॅलो, हाssय, छे, हो, कसचे काय, आपले हाल कुत्रा पण खात नाय, हाय रे हाय'

आशिका, ऐक माझं, कधी कुठल्या घरची बडी बहू नको होऊ आणि झालीस तरी अशी उच्चकुलीन, खानदानी 'बडी बहू' तर नकोच नको गं बाई. का म्हणून विचारतेस, अगं काय सांगू माझी कर्मकहाणी. तुम्हा सार्‍यांना वाटेल की सुख टोचतं की काय हिला? पण नाही हो, नाही. माझ्याइतके दु:खी कुणीच नाही.

दिवसाचे चोवीस तास, त्याहून जास्त असते तर तेही तास या अशा भारी, भडक, चकाकणार्‍या जरदोसी साड्या नेसून, हातभर अन गळाभर दागिने घालून असे महालसदृश दिवाणखान्यात बसून रहायचे, मखरातल्या गणपतीसारखे, सोपे आहे का हो? गणपती तरी देव आहे हो, तो बिचारा सोसतो सारं भक्तांवरील प्रेमापोटी, पण मी ? मी का म्हणून सोसावं, कशासाठी? कुणासाठी?

अगदी भल्या पहाटे साखर झोपेतून मी उठते, तेव्हा सुद्धा माझ्या अंगावर याच अवजड साड्या, दागिने, हेअर डू, अगदी माझ्या केसाची एक बटही झोपेत इकडची तिकडे होत नसते, बरं का, की माझ्या मांगमधला सिंधूर कधी पुसलेला नसतो. छे, एकवेळ सूर्य उगवेल पश्चिमेला पण माझी सकाळ मात्र अशी आणि अशीच असणार, भले मी रात्रभर दारुड्या नवर्‍याची वट बघत जागले असेन की आजारी सासूबाईंच्या पायथ्याशी डुलक्या काढत बसले असेन पण मी अशीच... कडक, इस्त्रीतलीच दिसली पाहिजे.

त्यानंतर माझा दिनक्रम सुरु, म्हणजे बघा मी जर मराठी थोरली सून असेन तर तुळशीला पाणी घालून तिची पुजा करायची आणि हिंदी शिनेमा किंवा शिरियल असेल तर कृष्णाची भजने सुरेल आवाजात गायची. आयला... एक दिवस माझ्या नशीबात बेड-टी नाही, काय कामाचे एव्हढे नोकर-चाकर? पण नाही मी 'बडी बहू' ना? माझा हक्कच नाही या छोट्या-छोट्या सुखांवर.

किती वेळा असे वाटते गाडीतून फिरताना, दुकानांत लटकवलेले मस्त झिरझिरित गाऊन्स घालावेत. कुणाला बोलू नका हं...सिक्रेट सांगते, मी पण असाच एक झिरझिरीत गाऊन घेतला एकदा, झाली असतील ४-५ वर्षे, पण काय सांगू, एकदाही अंगाला नाही लावता आला हो... ते काय ना, या बड्या- बड्या खानदानांत आणि त्यांच्या महालांत, तुमच्या टीचभर फ्लॅटसना असतात तसे सेफ्टी डोअर्स, डोअर बेल्स कधी नसतातच हो, मेलं कुणीही, कधीही धाडकन घरात घुसतंय, आपल्याच घरात वावरण्याची चोरी ... शी बाई, मला तर वीट आलाय या सगळ्याचा.

माझी धाकटी जाऊ, नणंद माझ्याहून अगदी २-३ वर्षांनीच लहान, पण त्या कसेही कपडे घालू शकतात, वागू शकतात. पण मी नाही कधी मैत्रीणींबरोबर हॉटेलिंग, शॉपिंग करायचं. अयोध्येचा राजा राम , शरयू नदीत आत्मसमर्पण करण्याआधी 'मर्यादापालनाची' धुरा माझ्याच खांद्यावर देवून गेलाय, त्याच्या बायकोनी फेकून दिले हे जोखड आणि मारली जमिनीत उडी, पण मला तर तो ऑप्शनपण ओपन नाही हो, एक सिनेमा झाला की दुसरा आहेच नाहीतर सिरियल्सचा टीआरपी वाढवायचाय ना मला असे रडत, कुढत,सोसत राहून. भले माझा नवरा बाहेर पन्नास लफडी का करेना मी त्याला जाब नाही विचारायचा, माझी कार्टी अभ्यास वगैरे गोष्टी तुच्छ मानून दारुच्या पार्ट्या का झोडेनात की पोरी का फिरवेनात मी चकार शब्द नाही काढायचा थोबाडातून.

मी शिकले सवरले असेन तरी त्या शिक्षणाचा उपयोग नाही करायचा, पैसे कमवायची गरज नाही हो मला, पण मी माझं स्वतंत्र अस्तित्व नाही का हो जोपासू शकत? का नेहमी ताटाभोवती काढलेल्या रांगोळीसारखंच नटून, सजून, सुखी असल्याचा आव आणायचा? मला बाई फार म्हणजे फार हेवा वाटतो त्या 'नीता अंबानी, अंजली तेंडुलकरचा' कसं सगळं वैभव उपभोगतही स्वतः काहीबाही करतातच ना!

मला काही कुठल्या कंपनीची चेअर पर्सन नाही हो व्हायचं, माझी फार साधी अपेक्षा आहे करियर प्रोग्रेशनची, या घिसापिट्या 'बडी बहू' इमेजमधून बाहेर यायचंय मला, आमच्या डायरेक्टर साहेबांना विचारलेसुद्धा मी याबद्दल, तर उडवूनच लावले बाई मला त्यांनी, म्हणे तू जितकी जास्त सोसशील, रडशील, तेव्हढा महिला वर्ग खूष आणि आपला टी आर पी पुश !! एक बाईच दुसर्‍या बाईची शत्रू असते म्हणतात ना ते बाकी खरं हो.

हल्ली सगळेच तर २-३ वर्षांनी जॉब बदलतात, कमीत कमी, कामाचे स्वरूप बदलून घेतात, तसा मलाही चेंज हवाय हो, मला कधी हो असा रोल मिळेल, बिनधास्त जगणारी बडी बहू वगैरे?.... लोकांना हे असंच कायम वर्षानुवर्षे कसं काय आवडू शकतं बुवा? आणि कधी लोकांची आवड बदललीच तर मग माझे काय हो होणार? कळला ना तुम्हाला माझा प्रोब्लेम? म्हणूनच मला कुणाशीतरी बोलायचंय, मला अजुन एक दालन स्वतःसाठी उघडायचेय. आशिका, मी असं ऐकलंय की तुमच्या मायबोली या संकेतस्थळावर गणेशोत्सव अगदी उत्साहात साजरा होतो, बरेच उपक्रम आयोजित केले जातात. माझ्यासाठी जरा कुठे वशिला लावता आला तर बघशील का? मला ना, एक भन्नाट 'आयटम साँग' सादर करायचंय, त्यासाठी व्यासपीठ हवंय, मी कॉलेजात असताना बरेचदा बॉलीवूड डांस करून बक्षिसंही मिळवली आहेत. न जाणो कुणाला आवडलीच माझी कला तर त्यानुसार एखादा झटॅक रोल पटकन मिळून जाईल गं मला आणि या ' खानदानी बडी बहू' ला सुद्धा 'चिकनी चमेली, फेविकॉल गर्ल आणि बरंच काही बनता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुर्दैवाने असा परिणाम मी समाजात मुलींवर खरंच झाल्याचं बघते आणि या अशा मुली तर समजावण्याच्या पलिकडेच पोचलेल्या असतात. परवा अशीच एक मुलगी माझ्या नव-याकडे घटस्फोटासाठी विचारायला आली पण निर्णय होत नव्हता. हिंजवडीत आयटी मधे नोकरी करते. श्रीमंत सासर असावं ..अस काय पाहिलं देव जाणे नि घरच्यानी लग्न करून दिले. नवरा काही न करणारा, सास-यानी हिंजवडीजवळची जमीन विकून घर इ. बांधले म्हणून श्रीमंतीचा आव. तिचा नवरा तिला हयुंडाई गाडी देत नाही म्हणून मारतो, तर ही लिटरली त्याचे पाय दाबून इ. सेवा करते. शिवाय सतत तो रागावलेला, प्यालेला, नि ही मनधरणी करत असते. असे माहेरचे सांगतात. पुढचे पाऊल इ. नेमही बघत राहते नि रडत राहते. परमेश्वरा!! सिरियल्सचा इतका वाईट परिणाम मी कुठेच पाहिला नव्हता. शिकलेल्या मुली असे वागू लागल्या तर कसे व्हायचे! संस्कार होऊ देत पण मुलीना आत्मनिर्भर बनणे किती आवश्यक आहे, पैशानेच नव्हे तर मनाने पण!

Happy Lol Proud

जबरी Lol

बडी बहूसाहिबा एक काम करा. तुमची कथा इतके दिवस चालली आहे की कथालेखकाला मधे बराच रायटर्स ब्लॉक येत असणार (काही एपिसोड्स तो सुरू असतानाच लिहील्या सारखे वाटतातच नाहीतरी). त्याला अशा एखाद्या वेळेस गाठा. आणि या कथेत तुमच्या नवर्‍यापेक्षा एक मोठा भाऊ असतो व तो कोठेतरी गेलेला अचानक बायकोमुलांसह परत येतो, आणि त्याची बायको ही मग बडी बहू होते असे काहीतरी नाट्य निर्माण करा. पाहिजे तर घरातील एका मोठ्या प्रसंगात तुमचा काहीतरी मान दर्शवणारा सीन असतानाच ते येतात, मग ड्रम्स चे आवाज, सर्वांच्या प्रतिक्रिया, सगळ्यांना संसर्गजन्य पद्धतीने बसलेले धक्के, चॅनेल ९ ला लाजवणारे अठरा कॅमेर्‍यांच्या अ‍ॅंगल्स मधून घेतलेले सेम सीन चे सुपर स्लोमो शॉट्स, हे यथासांग होऊन मग तुम्ही मोठ्या मनाने अंगावरचे दागिने वगैरे काढून तिच्या अंगावर घालता व दु:खी चेहर्‍याने मधल्या किंवा छोट्या बहू होऊन राहता वगैरे ष्टोरी घालायला सांगा. आपोआप ही जबाबदारी दुसर्‍या कोणाच्या तरी गळ्यात पडेल व तुम्ही झिरझिरीत कपडे, फेविकॉल वगैरे वापरायला मोकळ्या.

माझं दु:ख समजून घेऊन प्रतिसाद दिलात त्याबद्द्ल सर्वांचे धन्यवाद.
@ फारएंड - आपली कल्पना नक्की कळवेन लेखक/दिग्दर्शकांना, मालिकेची लांबी वाढायलाही हातभार लागेल त्यामुळे.

हे मस्त लिहिलं आहे. Happy

>>> आशिका, मी असं ऐकलंय की तुमच्या मायबोली या संकेतस्थळावर गणेशोत्सव अगदी उत्साहात साजरा होतो, बरेच उपक्रम आयोजित केले जातात. माझ्यासाठी जरा कुठे वशिला लावता आला तर बघशील का? मला ना, एक भन्नाट 'आयटम साँग' सादर करायचंय, त्यासाठी व्यासपीठ हवंय, मी कॉलेजात असताना बरेचदा बॉलीवूड डांस करून बक्षिसंही मिळवली आहेत. न जाणो कुणाला आवडलीच माझी कला तर त्यानुसार एखादा झटॅक रोल पटकन मिळून जाईल गं मला आणि या ' खानदानी बडी बहू' ला सुद्धा 'चिकनी चमेली, फेविकॉल गर्ल आणि बरंच काही बनता येईल.<<<

म्हणे तू जितकी जास्त सोसशील, रडशील, तेव्हढा महिला वर्ग खूष आणि आपला टी आर पी पुश !!

खरच हेच चालू आहे सध्या मस्त लेख Happy