मार्तंड जे तापहिन...

Submitted by अतुल ठाकुर on 30 November, 2015 - 23:56

a.jpg

ज्ञानदेव महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात समारोप करताना सुप्रसिद्ध पसायदान लिहिले आहे. त्यात त्यांनी संतांची तुलना ताप नसलेल्या सूर्याशी केली आहे. म्हणजे संत असे सूर्य आहेत जे प्रकाश देतात, उबही देतात मात्र काही वेळा लौकिक सूर्याचा जो असह्य ताप होतो तो मात्र यांच्यापासुन होत नाही. बाबाच्या पुस्तकातुन अनेकदा आईंबद्दल (डॉ. अनिता अवचट) वाचले आणि आता त्यांच्याबद्दल विचार करताना हिच उपमा आठवते. आपल्या विषयात त्या ज्ञानसूर्यासारख्या प्रखर होत्या. त्यांच्या वागण्यातुन अनेकांना प्रेरणा मिळत असे. आज अनेकजण फक्त आईंना शब्द दिला आहे म्हणुन निर्व्यसनी राहिले असतील. आईंबरोबर काम केलेली मंडळी आजही मुक्तांगणमध्ये त्यांच्या हकिकती एखाद्या देवाबद्दल बोलावे या तर्‍हेने सांगत असतात. आई म्हणजे अनेकांना प्रेरणा देणारा प्रकाश होता, त्यांच्या प्रेमाची उबही सर्वांना मिळाली. आणि माणसाचा स्खलनशील स्वभाव लक्षात घेऊन त्यांनी अनेकांना अनेकदा क्षमाही केले. त्यांनी सूर्यासारखी उब दिली, प्रकाश दिला मात्र त्यांच्यात इतरांना ताप होईल असा कठोर कोरडेपणा कधीच नव्हता. ज्ञानदेव महाराजांनी दिलेली संतांची उपमा मला आईंसाठी अगदी चपखल वाटते. त्यांच्या सौम्यतेचं आणि क्षमाशीलतेचं मला अपरंपार महत्त्व यासाठीदेखिल वाटतं कारण मी अनेक तथाकथित ज्ञानसूर्य पाहिले आहेत. ज्यांच्या विद्वत्तेच्या, आणि त्यामुळे आलेल्या अहंकाराच्या असह्य झळा मी स्वतः सहन केल्या आहेत आणि इतरांना देखिल सहन करताना पाहिले आहे. आणि सुदैवाने त्यांच्यापासुन कायमचा दूरही झालो आहे. मात्र आईंच्या सहवासात एकदा आलेला माणुस त्यांचा अक्षरशः भक्त बनुन गेल्याचं पाहिलं आहे.

त्यांच्या सहवासात येणारी माणसे शांत होत असत. त्यांच्यासमोर क्रोध शांत होत असे. त्यांच्याबद्दल जे काही वाचले आहे त्यावरुन असे वाटते कि त्यांना भीती हा शब्द माहितच नसावा. वॉर्डमधील प्रत्येक पेशंटचे त्यांच्याशी काही नाते होते. बाबांनी जी क्लासो, जेपी या त्यांच्या पेशंटची चित्रे रेखाटली आहेत त्यावरुन एकुण त्यांचे पेशंटशी निर्माण झालेले जवळचे नाते, त्यांचा एकमेकांवरील गाढ विश्वास, सुंदर नाते निर्माण व्हावे यासाठी त्या स्वतः करीत असलेले प्रयत्न हे सुद्धा त्यातुन दिसुन आलं आहे. चिवडेवाल्या माणसाशी नाते जोडल्यावर त्यांच्या वाढदिवसाला हे दम्पती जात असत. सामान्य माणसाशी नाते जोडण्याचे, ते टिकवण्याचे प्रयत्न करताना मी तरी फारसे कुणाला पाहिले नाहीय. मला या वृत्तीचे खरोखरच नवल वाटते. आमच्यासारखी माणसे मोठ्या माणसांच्या खिजगणतीतही नसतात. पण आईंच्या लेखी लहानथोर हा भेद नसावाच. मुक्तांगणला गेल्यावर त्यांच्या तालमीत तयार झालेली काही माणसे पाहिली. त्यावरुन आईंचे छोट्या छोट्या गोष्टींकडे असलेले लक्ष, हाताखालच्या माणसाला त्रास होऊ नये यासाठी त्या घेत असलेली काळजी, त्याचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी त्यांचे चाललेले प्रयत्न लक्षात आले. वायंगणकरसरांना पाकिट टाकायला पोष्टात पाठवल्यावर आपण तिकिटाचे पैसे द्यायला विसरलो हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एक रुपया देऊन तत्काळ माणुस मागे पाठवला. एक रुपयाचे काय एवढे, आल्यावर देऊ असा विचार त्यांच्या मनात आला आला नाही. सानेसरांचे लग्न व्यसनामुळे झाले नव्हते. मुक्तांगणमध्ये आल्यावर व्यसनमुक्त झाल्यावर वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी आईंनी साने सरांचे लग्न लावुन दिले. दत्तासरांना एका माणसाने लग्नानंतर दोनच दिवसांनी घर देतो सांगुन फसवले आणि सारे पैसे घेउन तो माणुस फरारी झाला. तेव्हा "तुला मी काही कमी पडु देणार नाही" हा आईंनी दत्तासरांना दिलेला शब्द पाळला. अगदी त्यांच्या पहिल्या मुलाचे बारसे मुक्तांगणमध्ये केले.

आईंच्या एकुण वागण्याचा विचार करताना मग गांधी आठवतात आणि आईंच्या वागण्याचा अर्थ कळु लागतो. अहिंसा हे तत्त्व गांधींनी आयुष्यभर पाळले पण त्याचा फार वेगळा अर्थ त्यांनी लावला. आपल्या माणसांच्या बाबतीत गांधी काही वेळा कठोर होत असत. महागड्या वस्तुंची आवड असलेल्या एका पेशंटला मुक्तांगणला दाखल होताना महागडी टुथपेस्ट वगैरे हवी होती तेव्हा हळदमिठाने दात घासण्याचे आईंनी सुनावले होते. कारण या माणसाने व्यसनात प्रचंड पैसा बर्बाद केला होता. अपरिग्रहाचेही तसेच. एकदा आयुष्यात दागिने देऊन टाकले आणि परत कधीही त्यांनी घातले नाहीत. जे नको त्याचा साठा करायचा नाहीच. पण जे हवे ते देखिल काटकसरीने वापरायचे. भेटवस्तुंसाठी पैसे खर्च करण्यापेक्षा स्वतः हाताने तयार केलेली वस्तु देण्यात त्यांना आनंद वाटत असे. हमालपंचायतीचा मोफत चालवलेला दवाखाना हे बहुधा आईंनी गांधी तत्त्वे कशा तर्‍हेने अंगिकारली होती याचं चालतं बोलतं उदाहरण असावं. तेथे फक्त आजारावरच उपचार होत नसत. तेथे त्या मशीन घेऊन बसत. आणि बाजुला कपड्यांचा ढीग पडलेला असे. गरीब हमालांची मुले फाटक्या तुटक्या कपड्यात आली की त्यांना समोर बसवायचे. बाजुला पडलेल्या जुन्या कपड्याच्या ढीगातुन त्या मुलांना नीट बसतील असे कपडे काढायचे आणि कुठे फाटले असल्यास ते मशीनवर नीट शिवुन त्यांना द्यायचे. डॉक्टर झालेली व्यक्ती असे काही करते आहे हे आजदेखिल मला नजरेसमोर आणणे कठिण वाटते. अगदी अलिकडेच जेव्हा वायंगणकरसरांनी मला आई बरेचदा त्यांच्याकडे चाफ्याची फुले देऊन त्यांना हार करायला सांगत आणि तो हार त्या त्यांच्या ऑफिसात असलेल्या गांधींच्या फोटोला घालत ही हकिकत सांगीतली तेव्हा मला त्यांच्या सार्‍या वागण्याची संगती लागली.

काही माणसांकडे इतरांना आकर्षुन घेण्याची शक्ती असते. आईंकडेही ती असावी. आईंकडे असं काय होतं कि ज्यामुळे लोक त्यांना देवासमान मानत यावर मी अनेकदा विचार केला आहे. मात्र यात मला काही गुढ वाटले नाही. हे तपाचं आणि चारित्र्याचं सामर्थ्य आहे अशी माझी नम्र समजुत आहे. आपल्या विषयात पारंगत होऊन त्याचा सर्वस्वी उपयोग दुसर्‍यांसाठी करायचा, त्यात स्वतःला झोकुन द्यायचे, लोकसेवा हेच आपलं ध्येय मानायचं, त्यासाठी स्वखुशीची फकीरी पत्करायची, हे करीत असतानाच मोठं काम उभारायचं, त्यासाठी माणसं जमवायची, त्यांना नुसतंच कामात तयार करायचं नाही तर त्यांच्या आयुष्याला आकारही द्यायचा हे तप आईंनी आयुष्यभर केलं. ते करीत असताना त्यांच्या चारित्र्याला देखिल धार येत गेली. दागिने घातले नाहीत. ग्रेसफुल साधेपणा त्यांच्या राहण्यात होता. आपल्या पेशंटना व्यसन सोड हे सांगण्याआधी स्वतः चहा कायमचा सोडला. सतत सामन्यांची सेवा करण्याचा ध्यास घेतला आणि त्यांच्यातच त्या रमल्या. अशा तर्‍हेने आयुष्य जगणार्‍या व्यक्तींमध्ये तपःपूत म्हणतात तसा एक अधिकार आपोआपच येत असतो असे मला वाटते. आणि तो त्यांच्या सार्‍या व्यक्तीमत्वात उतरुन समोरच्या माणसाला आपोआप जाणवतो. अशा माणसांबद्दल आपल्याला आदरयुक्त धाक वाटत राहतो. आपल्या पुराणांमध्ये तप करणार्‍या ऋषींना सिद्धी प्राप्त होण्याच्या कथा आहेत. त्याचप्रमाणे समाजासाठी झिजणार्‍या माणसांच्या चारित्र्याचं स्वतःचं असं एक बळ असतं आणि त्याचा परिणाम लोकांवर निश्चितपणे होतो अशी माझी समजुत आहे. आईंच्याही बाबतीत हेच होत असावे असे मला ठामपणे वाटते. पुढे हा गांधीध्यास इतका वाढला असावा कि त्याची परिणीती गांधीतत्वांची गुंफण मुक्तांगणच्या उपचारांमध्ये करण्यात झाली असावी. मुक्तांगण उपचारपद्धतीला दिलेली गांधीतत्वांची जोड हे आईंच्या प्रतिभेचं सोनेरी पान वाटतं मला. संशोधनाच्या दरम्यान याविषयावर काम करण्याची संधी मिळाली.

व्यसनमुक्ती ही औषधे देऊन, सक्ती करुन, निव्वळ समुपदेशन करुन होत नाही हे आईंनी ओळखलं होतं. व्यसनमुक्तीसाठी एक विशिष्ट जीवनशैली अंगीकारावी लागते. व्यसन हा कधीही उलटु शकणारा आणि बरा न होणारा आजार असुन त्याला आटोक्यात ठेवण्यासाठी ही जीवनशैली आवश्यक असते. गांधीवाद जगत असलेल्या आईंना ही जीवनशैली व्यसनमुक्तीसाठी योग्य वाटली आणि त्यांनी ती अतिशय कौशल्याने मुक्तांगणच्या उपचारांमध्ये आणली. त्यात त्यांच्या मानसोपचार तज्ञ म्हणुन प्रदीर्घ अनुभवाचाही भाग होताच. त्यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये नाड्या नसलेले लेंगे घालुन हिंडणारे पेशंटस पाहिले होते. नाडीचा उपयोग गळफास म्हणुन करु नये यासाठी ती खबरदारी घेतली जात होती. पण त्यामुळे ते लेंगे घसरु नयेत म्हणुन सतत पकडुन केविलवाणेपणाने फिरावे लागत असे. मुक्तांगणमध्ये आईंनी पांढरास्वच्छ लेंगा आणि टिशर्ट हाच वेष सर्वांसाठी ठेवला. श्रीमंतांसाठी वेगळे वॉर्ड ठेवले नाहीत. श्रीमंतांना जास्त पैसे देऊन काही सोयी मिळतील असा प्रकार ठेवला नाही. त्यामुळे एमडी डॉक्टर आणि रिक्षावाला हे बाजुबाजुच्या कॉटवर झोपु लागले. कारण आईंच्या लेखी ते दोघेही व्यसनी आहेत हीच त्यांची मुक्तांगणमधली ओळख होती. अगदी परवाच मी मुक्तांगणमध्ये गेलो असताना एका पेशंटने आपल्या नातेवाईकाकडुन बाहेरुन हेअरडाय मागवला. तो वापरायची तर सोडाच पण जवळ बाळगण्याचीदेखिल परवानगी नाकारण्यात आली. आईंना मुक्तांगणचं वातावरण गांधी आश्रमासारखंच ठेवायचं असणार. यामुळे कुठलिही सक्ती न करता गांधींची आश्रमातील राहणी सावकाशपणे येथील रुग्णांच्या आयुष्यात झिरपत जाते. आणि ते ही त्यांच्या लक्षात न येताच. एकत्र राहण्याने गरीब श्रीमंत समोरासमोर येतात. व्यसनाला वर्ग नसतो, जात नसते हे ही लोकांच्या लक्षात येते. व्यसनातुन बाहेर यायचे तर सहनशीलता अंगी बाणवायला हवी हे तर या उपचारांच्या दरम्यान माणुस शिकतोच. घरी सर्व काही हातात मिळत असेल, नोकर चाकर असतील पण येथे स्वतःचं ताटवाटी, कपडे स्वतःच धुवावे लागतात. किचनमधली भांडी घासावी लागतात, भाज्या चिराव्या लागतात. जीवनशैली ही अशी कळत नकळत घडवण्याचा आईंचा मानस असावा.

बारकाईने पाहिलं असता हे लक्षात आलं कि निव्वळ व्यसनमुक्ती हे आईंचे ध्येय नव्हतेच. त्यांना माणसाला व्यसनमुक्त करुन सर्वांगिण माणुस घडवायचा होता. अन्यथा व्यसन सुटल्यावर त्यांनी आपल्या माणसांच्या इतर समस्या सोडवण्याची तसदी घेतलीच नसती.समस्या सोडवण्याची त्यांची स्वतःची अशी अहिंसक पद्धत होती. मुक्तांगणचे ढवळे सर त्यांच्या हाताखाली तयार झाले. आईंनी त्यांना व्यसना दरम्यान दूर गेलेल्या आपल्या सर्व मित्रांना पत्र लिहायला सांगीतले होते. फार थोड्यांनी उत्तरे पाठवली. आईंनी पुन्हा पत्र लिहायला सांगीतले. आणि निराश न होता चिकाटीने ढवळे सरांनी प्रयत्न केले. एक वेळ अशी आली कि त्यांची सारी मित्रमंडळी त्यांना भेटण्यास आली. नुसतं व्यसन सुटलं तर माणुस "ड्राय ड्रंक" होतो म्हणतात. दारु शरीरातुन जाते. मनातुन जात नाही. अशावेळी ही संयम राखायला लावणारी जीवनपद्धती उपयोगी येते. कमी वस्तु जवळ ठेवायच्या हा अपरिग्रह, व्यसनमुक्त राहण्यासाठी सतत शिकत राहायचे हे ब्रह्मचर्य, कुणाच्याही वस्तुवर डोळा ठेवायचा नाही, त्याचा हव्यास बाळगायचा नाही हे अस्तेय, व्यसनमुक्त राहुन राग, द्वेष कमी करायचा, कुणालाही दुखवायचं नाही ही अहिंसा, आपल्या समुपदेशकाशी, आपल्या माणसांशी आणि पर्यायाने अखिल जगताशी सत्यच बोलायचे ही सत्याची उपासना आपल्याला मुक्तांगणची उपचारपद्धती शिकवते. किंबहुना आईंच्या या उपचार पद्धतीची खुबी अशी आहे कि या गोष्टी माणुस जितक्या जास्त अंगी बाणवुन घेईल तितकी त्या प्रमाणात त्याची सोबराईटी चांगली राहिल. आईंना सोबराईटीच्या कालावधीइतकाच सोबराईटीचा दर्जाही महत्त्वाचा वाटत असणार.

मुक्तांगणमध्ये संशोधनासाठी जायला लागलो त्याच्या कित्येक वर्षे आधी आईंनी जगाचा निरोप घेतला होता. मात्र मुक्तांगणमध्ये त्यांचे अस्तित्व मला नेहेमी जाणवले. मुक्तांगणच्या उपचार पद्धतीत त्यांचे द्रष्टेपण दिसले. त्यांच्या बरोबर काम केलेल्या मंडळींना मी भेटलो. त्यांच्याकडुन आई आणखी कळल्या. मात्र त्यांना जाणण्यासाठी आपल्याला आणखी खोल उतरावं लागणार हे देखिल लक्षात आलं. आणि त्यासाठी आपल्यालाही त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा लागेल हेही कुठेतरी जाणवलं. कधीकधी असं वाटतं कि येथे यायला उशीर झाला. आधी येऊ शकलो असतो तर त्यांच्या हाताखाली काम करायला मिळलं असतं. पण ठिक आहे. मुक्तांगणमध्ये येऊ शकलो, येथे काम करण्याची संधी मिळाली यासाठीदेखिल मी फार कृतज्ञ आहे. आईंचे अस्तित्व येथे आहेच. त्यांच्या उपचार पद्धतीतुन त्यांच्याशी संवाद साधता येतो. त्यांचे विचार काय असतील याचा अंदाज बांधता येतो. यामुळे प्रत्यक्ष आईंबरोबर काम करायला मिळलं नसलं तरी एक प्रेरणा मिळत राहते. दुदैवाने शैक्षणिक क्षेत्रात बोलघेवडे विद्वानच जास्त पाहायला मिळाले. या विद्वानांना स्कॉलर्सच्या सर्कलमध्ये मिळणारा मान, त्यांचा वचक, त्यांच्यासमोर झुकणारी माणसे याचे मलादेखिल आकर्षण वाटु लागले होते. त्यामुळे सैरभैर झालो होतो. मात्र आईंसारख्या माणसांकडुन विचारांना एक दिशा मिळाली. मन शांत होऊ लागले. आता त्या रॅटरेसमध्ये मी नाही. तसली विद्वान माणसे माझ्यासारख्यांवर करीत असलेल्या टिकेचाही आता मनावर फारसा परिणाम होईनासा झाला आहे. दोन डिसेंबर हा आईंचा जन्मदिवस. यादिवशी त्यांच्या पायावर डोकं ठेवुन त्यांच्याकडे काही मागावसं वाटतं. त्यांच्यासारखं होण्याची क्षमता आणि कुवत माझ्यात नाही. मात्र त्यांच्या हृदयात सर्वांविषयी वसत असलेल्या करुणेचे काही अंश माझ्यातही उतरावेत हेच देणे आईंनी मला द्यावे.

(दोन डिसेंबर, आईंचा (डॉ. अनिता अवचट) जन्मदिवस. या वर्षीपासुन मुक्तांगणमध्ये हा दिवस "आनंदयात्री दिन" म्हणुन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त त्यांना वाहिलेली ही आदरांजली)

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या अप्रतिम लेखाकरता अनेकानेक धन्यवाद ... Happy

मात्र त्यांच्या हृदयात सर्वांविषयी वसत असलेल्या करुणेचे काही अंश माझ्यातही उतरावेत हेच देणे आईंनी मला द्यावे.>>>>>>>> अगदी अगदी...

डॉ. सुनंदाआईंचे अनेक गुण फार सुंदररीत्या विशद करुन सांगितले आहेत ..
या लोकविलक्षण करुणामयीच्या चरणी सादर, सप्रेम नमन.... ___/\___

लेख खूप छान उतरलाय आपल्या लेखणीतून.

डॉ. अनिता अवचट यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

व्यसन हा कधीही उलटु शकणारा आणि बरा न होणारा आजार असुन त्याला आटोक्यात ठेवण्यासाठी ही जीवनशैली आवश्यक असते.
<<

आयुष्यभर एकाच ध्यासाने काम करित राहण्याचे व्यसन म्हणावे, की वसा, ही ग्रेट माणसं कशी काय सांभाळू शकतात, याचं मला नेहेमीच आश्चर्य वाटत राहिलेलं आहे. अनलिमिटेड मॅटर्नल इन्स्टिंक्ट हे याचं एक उत्तर असावं कदाचित..

खूप सुरेख लिहीलंय अतुलजी! तुमच्या प्रत्येक लेखातील शब्दा शब्दातून व्यक्त होणारी तुमची मुक्तांगणवरची, अवचट कुटुंबियांवरची श्रध्दा, प्रेम, आपुलकी थेट पोचतेय ..... धन्यवाद!

नतमस्तक व्हावं असंच व्यक्तिमत्व, वर तुम्ही फार सुंदर शैलीत लिहिलं आहेत.

लेखाचं शीर्षक खासच!

सुंदर लेख.
करुणा ही एक खूप मोठी प्रेरणा असते.
आणि महात्म्यांमध्ये करुना हा गुन असतोच असतो.
सुनंदाताईंच्या स्मृतीस अभिवादन.

छान लेख, पसायदानातल्या या ओळीचा जोडलेला संदर्भहि सुंदर.>>+१११

ही अशी व्यक्तिमत्व फार intriguing वाटतात मला. शिस्तप्रिय, तत्वनिष्ठ आणि तरी ही प्रेमळ, सहृदयी अशा seemingly polar गुण एकाच व्यक्तीत कसे असू शकतात ह्याचं कुतूहल वाटत रहातं! ज्ञानेश्वरांच्या उपमेला तोड नाही. तापहीन मार्तंड ही कल्पनादेखील किती दुर्लभ आहे!

सुंदर लेख..

खुप अभिमानाची गोष्ट आहे कि मुक्तांगण चे कार्य पुढेही चालूच राहिले, आणि जोपर्यंत व्यसने आहेत तोपर्यंत त्याची गरज राहणारच आहे.

सर्वांचे मनःपूर्वक आभार Happy

साती, धनवन्ती, शशांकजी, आशिका, वैजयन्ती, मुक्तेश्वरजी, जिज्ञासा, मंजुताई, स्विट टॉकर, पियु, शब्दाली, हीराजी, पद्मावती, दिनेशदा...खुप खुप आभार Happy

दीमा, प्रतिसादाबद्दल आभार, खरंच तुम्ही सांगीतलेली शक्यता आहेच.

सुरेखच लेख अतुल.

लागे दिवा दिव्याने
ठेवा मिळे पिढीला
अशी व्यक्तिमत्वे ही. उण्यापुऱ्या आयुष्यात पहाडाएवढे काम करून गेलेली. डोळस आदर तुमच्या शब्दांतून खूप छान व्यक्त झालाय.

Pages