कूल कूर्ग

Submitted by आशिका on 22 November, 2015 - 07:18

दिवाळीनंतर कर्नाटकातील कूर्ग या थंड हवेच्या ठिकाणी फिरुन आलो. त्याविषयी थोडेसे...

दिवाळी सुरु होण्याच्या अगदी आठवडाभर आधी आमच्या सुट्ट्या मंजुर झाल्या. त्यामुळे हातात प्लॅनिंग, नेट सर्च करुन चांगली हॉटेल्स वगैरे तपासायला विशेष वेळ नव्हता. मग आम्ही फक्त फ्लाईट बुकींग केले आणि 'वीणा वर्ल्ड' या ट्रॅव्हल कंपनीला आमच्यासाठी 'टेलरमेड हॉलिडे' प्लॅन करण्यास सांगितले. आगदी काही तासांतच त्यांच्याकडून टूर प्लॅन आला. त्यात आम्ही हवे तसे फेरफार करुन त्यांनी सुचवलेली हॉटेल्स एकदा नेटवर बघून, रिव्हयूज वाचून आमचे कन्फर्मेशन दिले, तिथे ६ दिवस फिरण्यासाठी इनोव्हा बूक केली आणि आमची ६ दिवसांची टूर ठरली. पैकी ३ दिवस कूर्ग, २ दिवस म्हैसूर व १ दिवस बँगलोर असा आराखडा होता. बँगलोर आणि म्हैसूर याआधीही पाहिले असल्यामुळे यावेळचं मुख्य आकर्षण कूर्ग हेच होतं. लेकासाठी फक्त बँगलोर, म्हैसूरची एक धावती भेट ठरवली होती.

नियोजित वेळी सकाळी अकराच्या सुमारास बँगलोरला पोहोचलो. तिथून लगेचच ६ तासांचा प्रवास कूर्गसाठी करायचा होता. हा एकच मोठा प्रवास असणार होता आणि याबद्दलच जरा धाकधुक मनात होती कारण सा.बा. ही होत्या अमच्याबरोबर. पण तामिळनाडूत आलेल्या भीषण पावसामुळे असेल कदाचित हे सहाही दिवस आम्हाला कुठेही प्रखर ऊन लागले नाही. काही ठिकाणी तर तुरळक पाऊसही होता. त्यामुळे प्रवास अगदी सुखद हवेत, मस्त मजेत, हसत खेळत, दर दोन तासांनी थांबत झाला.

कूर्गच्या वाटेवर कुशलनगर या ठिकाणी एक तिबेटीयन लोकांनी वसवलेली बुद्ध मॉनेस्ट्री लागते. या बुद्ध मंदिराचा कळसाचा भाग सोन्याने मढवला आहे. त्यामुळे या मॉनेस्ट्रीला या भागातील 'गोल्डन टेंपल' म्हणूनच ओळखतात. शांत, विस्तीर्ण, निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेली ही वास्तू व तिथे आढळणारे साधु वेशातील तिबेटी लक्ष वेधून घेतात.

१. तिबेटीयन मॉनेस्ट्री

२. गोल्डन टेंपल

इथे काही वेळ थांबून पुढचा प्रवास सुरु केला. कूर्ग हे तसे खेडेगावच. त्यामुळे गावात असलेली हॉटेल्स अगदी साधी, लहानशीच. आम्ही बूक केलेले 'कडकणी रिव्हर रिसॉर्ट' खुद्द कूर्ग पासून बरेच लांबवर होते. रिसॉर्टवर पोहोचणारा रस्ता मात्र मंत्रमुग्ध करणारा होता. घाटांतून जाणारा वळणावळणांचा रस्ता. पण आपल्याकडे जसे घाटात एका बाजूस डोंगर कडे व दुसर्‍या बाजूस खोल दरी दॄष्टीपथात येते तसे इथे मात्र दोन्ही बाजूंना कॉफीची लागवड, क्वचित उतरणीवर दिसून येणारी लालभडक कौलारु घरे. हा नजारा अगदी मन मोहवून टाकत होता.

रिसॉर्टही निसर्गाच्या सान्निध्यात, आजुबाजुला पर्वतराजी, एक लहानशी रिसॉर्टमधूनच वाहणारी नदी आणि तिच्या अवतीभवती, वेगवेगळ्या लेव्हल्सवर वसवलेली टुमदार बंगलेवजा कॉटेजेस. कॉटेजेसची नावेही फुलांची आणि त्या-त्या फुलांची लागवड त्या त्या कॉटेजभोवती. बाहेर अंगणात केनचे डायनिंग टेबल-खूर्च्या, आत प्रशस्त लिव्हिंग रूम, गोल वळण घेत जाणारा नागमोडी लाकडी जिना आणि वर २ बेडरूम्स, किचन, पॅसेज. या रिसॉर्टमधेही आम्ही खूप हिंडलो, फिरलो. मजा केली.

दुसरा दिवस कूर्ग साइटसिईंगचा होता. रिसॉर्टमध्ये नाश्ता करून आम्ही निघालो. सर्वप्रथम मी काय केले असेल तर ड्रायव्हरला गाडीतला ए.सी. बंद करून खिडक्या उघडण्यास सांगितल्या. त्या आसमंतात भरून राहिलेला तो निसर्गगंध मन प्रसन्न करीत होता. हवा अगदी आल्हाददायक होती. प्रदुषणविरहीत, शुद्ध, ताजी हवा, कोवळे ऊन आणि कॉफी प्लांटेशनमधून गेलेली वळणावळणांची वाट मनाला मोहवत होती. तिथे मिरीचे वेलही मोठ्या प्रमाणात आढळले.

सर्वांत पहिला टूरिस्ट स्पॉट होता - तळ कावेरी अर्थात कावेरी नदीचे उगमस्थान. त्यामुळे अर्थातच आणखी उंचावर. जवळजवळ तास- दीड तासाने आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. कावेरी नदी म्हणजे या राज्याची जीवनदायिनी आणि म्हणून हिला देवीच्या रुपात इथे पुजले जाते. खालील फोटोत जे गोमुख दिसते आहे त्याच्या दोन्ही बाजूंनी पाण्याचा एक-एक प्रवाह दिसतो आहे, हेच कावेरीचे उगमस्थान.

३.कावेरी नदीचे उगमस्थान

या प्रवाहांच्या रुपातच ती इथे अवतीर्ण होते त्याआधी तिचा प्रवाह डोंगरात कुठेही नजरेस पडत नाही. इथून ती एका तळ्याच्या स्वरुपात साठवली गेली आहे आणि इथून पुन्हा ती गुप्त होते ती थेट प्रगटते खूप दूर अंतरावर सपाट जमिनीवर. इथून पुढे तिचा मार्ग सुरु होतो. या कोडागू प्रांतातील अनेकजण व्रतबंध वगैरे धार्मिक कॄत्ये इथे येऊन करतात. इथे या गोमुखापाशीच कावेरी नदीचे मंदीर असून चांदीच्या देवीच्या मूर्तीरुपात ती इथे पुजली जाते. तिच्यावर षोडषोपचार अर्पण केले जातात.

इथेच हे एक पुरातन शिवमंदीर आहे.

४.पुरातन शिवमंदीर (बाहेरुन)

५. पुरातन शिवमंदीर (गाभारा व शिवलिंग)

इथून पुढे साधारण साडे-तीनशे पायर्‍या चढून गेल्यावर वरून आजुबाजूच्या परिसराचे विहंगम दॄष्य नजरेस पडते.

६. तळ कावेरीवरुन

७. तळ कावेरीवरुन

८. तळ कावेरीवरुन

९.तळ कावेरीवरुन

१०. तळ कावेरीवरुन

११. तळ कावेरीवरुन

यानंतर आम्ही खाली उतरलो. तिथे जवळच अ‍ॅब्बी फॉल्स नामक धबधबा आहे. गाडी रस्ता संपून साधारण ३०० मीटर्स कच्ची पाऊलवाट उतरून गेल्यावर हा धबधबा नजरेस पडतो. खळाळता, फेसाळत्या दूधासारखा शुभ्र प्रपात!. तिथेच एक झुलता पूल बांधला आहे पर्यटकांना जवळून धबधबा पहाता यावा, फोटोज काढता यावेत म्हणून. मी आणि सा.बा. काही तिथे गेलो नाही. त्या हलत्या-डुलत्या पुलावर पाय टाकायची माझी काही हिंमत झाली नाही. नवरा आणि लेक तिथे जाऊन आले.

१२. अ‍ॅब्बी फॉल

इथून निघताच आम्ही जेवण घेतले आणि 'राजा'स सीट नामक स्थळाकडे मार्गस्थ झालो. पण एव्हाना पाऊस भुरभुरु लागला होता. कोडागू प्रांताच्या राजाने येथे एक महाल बांधला होता (जो आतमधून पहाण्यासाठी उपलब्ध नाही). आजुबाजुला छानसा बगिचा फुलवला होता. या बगिच्यात तो सायंकाळी राणीवशासह येऊन बसत असे आणि सुर्यास्ताचा नजारा पहात असे, म्हणून या स्थळाला राजा'स सीट म्हणतात. इथून खाली नजर टाकली की सभोवारचा देखावा फार सुंदर दिसतो. पण पाऊस रिमझिमत असल्यामुळे आम्हाला फक्त दरीत अवतीर्ण झालेली ढगांची दुलई बघायला मिळाली.

१३. राजा'स सीट

फोटोत दिसणारे घुमटाकार बांधकाम म्हणजे राजा'स सीट

१४. राजा'स सीटवरुन दिसणारा देखावा

राजा'स सीटजवळ एक टॉय ट्रेन होती. लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही. त्या ट्रेन राईडमधूनही आजुबाजुचा परिसर दिसत होता. ही राईडही घेतली आम्ही.

इथे कूर्गचे साइटसिंईंग संपले. तिसरा दिवस आमच्यासाठी मोकळा होता. शॉपिंग, हिंडण्या-फिरण्यासाठी. त्या दिवशी मी कूर्ग गावच्या मार्केटमध्ये भटकत होते आणि तिथे एक मसाल्यांच्या पदार्थांचे होलसेल प्रशस्त - मॉलवजा दुकान दिसले. आत शिरताच मसाल्यांचा सुगंध नाकात दरवळला. अतिशय शुद्ध दर्जाचे, ताजे मसाले पोत्या-पोत्यांनी भरलेले पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. चहा, कॉफी आणि काळी मिरी ही इथली मुख्य पीकं. इतर मसालेही इथे होतात. धणे, जीरे, खसखस, लवंग, दालचिनी, खोबरेल तेल आणि काय काय.प्रत्येक पदार्थाचा नमुना दिला जातो, चव घ्यायला, वास घ्यायला. मला अक्षरशः काय घेऊ अन काय नको असे होऊन गेले. बरेचसे घेतलेही. आता इथून पुढे काही दिवस आमच्या घरी आलेल्यांना कूर्गची कॉफी, चहा आणि गरम मसाला मारके केलेले चमचमीत पदार्थ हे आणि हेच फक्त मिळेल. :lol:

तर असे हे आमचे मंत्रमुग्ध करुन टाकणारे तीन दिवस, मसाल्यांच्या / कॉफीच्या पुरचुंडीप्रमाणेच सुखद आठवणींच्या कोषांत गुरफटून ठेवलेत. आठवणींची पुरचुंडी उघडण्याचाच अवकाश, की दरवळलीच स्मॄतीसुमने.

अशीच ही वाट या छान आठवणींच्या प्रदेशात - कूर्गच्या वाटेवर घेऊन जाणारी.....

१५.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग बाई! नजर तृप्त झाली.:स्मित: अजून फोटो असतील तर जरुर टाक. असेच सौख्य तुला भरपूर मिळो.

ए ट्रिपला खर्च किती आला ते जमल्यास लिही, नवख्याना प्लॅनिन्गला तेवढेच बरे.

अग बाई! नजर तृप्त झाली.स्मित अजून फोटो असतील तर जरुर टाक.
+७८६

वृत्तांत अजून वाचला नाही, आता वाचतो.

वाचला, मस्त !

वर्णन वाचून खुप हरखलो.. अनेक वर्षांपासून तिथे जायचा विचार करतोय. आमचे एकेकाळचे शेजारी आहेत तिथे.. आता मात्र फारच प्रबळ ईच्छा होतेय.

कूर्ग गाव म्हणजेच माडिकेरी आहे का?परतीसाठी पुन्हा बंगलोर गाठावे लागले का अथवा मंगळूरकडे गेलात?कार बुक केली की ते पुन्हा मूळ ठिकाणी सोडतात वेळ फुकट जातो.

आशिका, मस्त वृत्तांत. फोटोही छान. आपल्या जिप्स्या टाकतो तसे मसाल्याच्या पोत्यांचेही (आतल्या दालचिनी, मिरी, लवंगा, वेलच्या वगैरे) फोटो जवळून काढून टाकायचेस. कश्यातही सौंदर्य असू शकते हे त्याच्या फोटोंमुळेच मला कळले आहे.

सुंदर!
कुर्गची बहुतेक रिसॉर्टस ५ ते ७ कि.मी. दूर जंगलात आहेत.. पण अप्रतिम आहेत.

कूर्ग गाव म्हणजेच माडिकेरी आहे का? >>> हो.

परतीसाठी पुन्हा बंगलोर गाठावे लागले का अथवा मंगळूरकडे गेलात? >>> दोन्ही पर्याय आहेत.. पैकी मंगळूर जवळ साडे चार तासा वर तर बंगळूर ६ तासा वर आहे.

कडकणी ची साईट पाहिली फारच महाग तर आहेच पण एक दोन रिव्य्हू फारच वाईट आहेत. बहुसंखय चांगलेच आहेत. कधी कधी फाईव्ह स्टारमध्येही भिकार आणि कामचलाऊ सेवा असतेच म्हणा....

पांदी करी व कोरी रोट्टी खाल्ली का?

मसाले मस्त तिथले. कडकणी नाव विनोदी वाट्ते. लिक द्या भाउ.

कूर्गचा सीझन आत्ता आहे का? मला वातते कूर्गचा निसर्ग मॉन्सूनम्ध्ये एन्जॉय करण्यासारखा आहे. या वर्षी श्रीलंकेपासून पावसाची बोम्ब असल्याने पावसाळी डेस्टिनेशनला यंदा तरी काही मजा नाही असे दिसते...

सगळ्या प्रतिसादकांना धन्यवाद.

रश्मी, ॠन्मेष - अजुन काही फोटोज अ‍ॅड केले आहेत.

दिनेशदा - हो, तुमच्या कुर्ग प्रांतातील शेजारणीबद्दल वाचल्याचे मला आठवले, कुर्गच्या विशिष्ट पारंपारिक पद्धतीने साडी नेसणार्‍या बायका बघताक्षणीच आणि तुम्ही इथे दिलेली कुर्गची रेसिपीही आठवली.

srd - कूर्ग म्हणजेच मढिकेरी. इंद्रधनुष्यने सांगितले ते बरोबर. मंगलोर ते कूर्ग - साडे चार तास आणि बंगलोर ते कूर्ग - साडेपाच ते सहा तास लागतात. मी वर लिहिल्याप्रमाणे आम्ही केसरी आणि वीणावर्ल्ड या दोन्हींना विचारले असता ते बंगलोरहूनच ट्रीप प्लॅन करत असल्याचे सांगितले, टेलरमेड हॉलिडेजसुद्धा. तसेच बंगलोरला सकाळच्या वेळेस फ्लाईटस जास्त उपलब्ध असतात, मंगलोरपेक्षा. कूर्गहून निघून आम्ही म्हैसूरला गेलो जो प्रवास २ तासांचा आहे आणि तिथे २ दिवस राहून बंगलोर. त्यामुळे मंगलोरचा ऑप्शन आम्ही ट्राय केला नाही.

अश्विनी- कश्यातही सौंदर्य असू शकते - अगदी अगदी. मसाल्यांच्या दुकानात शिरताच काय घेऊ, किती घेऊ आणि कोणासाठी काय घेऊ या विवंचनेत फोटो काढायला सुचलेच नाही बघ. आता परत कधी गेले तर फोटो आधी काढेन आणि मग खरेदीकडे मोर्चा वळवेन.

रॉबीनहूड - हो साईटवर निगेटिव्ह रिव्ह्यूज आम्हीही वाचले होते. मात्र आम्हाला फार छान अनुभव आला. स्टाफची वर्तणूक, आगत्य, कॉटेजेसमधील स्वच्छता- सर्वच बाबतीत. कूर्गला जाण्यासाठी बेस्ट सिझन नोव्हेंबर ते फेब्रुवारी हाच आहे, असे आम्ही नेटवरच वाचल्याचे आठवतेय. पावसातही वेगळीच मजा अनुभवता येईल नक्की. मात्र पावसामुळे अ‍ॅब्बी फॉल, राजा'स सीट अशा ठिकाणची वाट निसरडी होते. अ‍ॅब्बी फॉल्स पहायला आम्ही पोहोचलो तेव्हा पाऊस नुकताच पडून गेला होता आणि वाट निसरडी झाली होती. त्यामुळे वयस्कर मंडळींना जपूनच न्यावे लागते..

अमा- हो कुर्गचे पारंपारीक जेवण जेवलो एकदा, पण नाव आठवत नाही आता.

पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.