भावस्थिराणि जननान्तरसौहृदानि...

Submitted by अतुल ठाकुर on 2 November, 2015 - 18:07

11220834_740280209450387_220477391171205129_n_0.jpg

काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला... असे संस्कृत साहित्यात कविकुलगुरु कालिदासाच्या "अभिज्ञान शाकुंतलम्" ला नावाजले गेले आहे. एखाद्या सुंदर नाटकाचा तितकाच देखणा प्रयोग व्हावा अशा तर्‍हेने या नाटकावरील आज डॉ.गौरी माहुलिकरांचे व्याख्यान रंगले. मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागाच्या विभागप्रमुख हे पद भुषवलेल्या माहुलिकर मॅडमच्या व्याख्यानाला अनेक मंडळी मुद्दाम आली होती. सर्वसाधारणपणे नाटकाचा रसास्वाद वर्ग आणि त्यातील व्याख्यान म्हणजे नाटकाची कथा, त्यातील पात्रांबद्दल माहिती, नाटकाचे बलस्थान, त्यातील रस आणि अलंकाराच्या जागा अशी मांडणी असते. पण माहुलिकरमॅडम वेगळ्या वाटेने गेल्या. त्यांनी या अत्यंत लोकप्रिय नाटकाची कथा सांगण्यापेक्षा त्यातील सौंदर्यस्थळांबद्दल बोलण्याचे ठरवले, त्यामुळे त्यांनी "शाकुंन्तल" मधील निसर्गसौंदर्य, पात्रसौदर्य, वाक्सौंदर्य, भावसौंदर्य आणि रसध्वनिसौंदर्य उलगडुन दाखवत आमच्यासमोर शाकुन्तल उभे केले. या आगळ्यावेगळ्या प्रयोगात त्यांनी सौंदर्यस्थळांबद्दल बोलताना, कालिदासाने केलेली शब्दयोजना, त्याने केलेला व्याकरणाचा चपखल वापर, भाषेचे माधुर्य, सर्वश्रुत असे आणि सुभाषिताचे महत्त्व पावलेले श्लोक, नाटकातील, रस, एकेका श्लोकातुन निघणारे निरनिराळे ध्वनि, कालिदासाची पात्र योजना आणि त्याची मानवी स्वभावाची, मानसशास्त्राची असलेली सखोल जाण अशा अनेक महत्त्वाच्या विषयांना स्पर्श करीत हे विवेचन केले. एक अतिशय दुर्मिळ असा संगम या व्याख्यानात झालेला मला आढळला. माहुलिकरमॅडमनी शाकुन्तलचे रसास्वादाच्या दृष्टीने विवेचन करताना, व्याकरणासारख्या तांत्रिक गोष्टी बाजुला ठेवल्या नाहीत. मात्र त्याबद्दल बोलताना त्यांनी त्या प्रासादिक भाषेत खुलवुन सांगीतल्याने व्याख्यान जड न होता श्रोत्यांना नाटकाचे सौंदर्य घेण्याचा आणखि एक दृष्टीकोण मिळाला. वैचारिक आणि ललित या दोन बाबी साहित्यात वेगळ्या ठेवण्याचा परिपाठ आहे. येथे मात्र सौंदर्याचा आस्वाद घेताना त्याला शास्त्राची कसोटी लावुन मॅडमनी ते जास्त रेखिव करुन दाखवले.

शाकुन्तलचे वेगळेपण सांगताना त्यांनी कालिदासाच्या तीन नाटकांचा आणि त्यातील नायिकांचा उल्लेख केला. पहिले नाटक "मालविकाग्निमित्र" यातील नायिका ही संपुर्णपणे मानुषि होती. तर "विक्रमोर्वशीय"मधील उर्वशी ही स्वर्गिय अप्सरा असल्याने दैवी नायिका होती. "शाकुंन्तल" मध्ये शकुन्तला ही दैवी अप्सरा मेनका आणि मानवी ऋषी विश्वामित्राची कन्या असल्याने ही नायिका दैवी व मानुषि यांचे संमिश्र स्वरुप आहे असे त्या म्हणाल्या. जर्मन कवी गटे याने केलेले "शाकुन्तल"चे कौतुक सर्वश्रुत आहे. तो म्हणाला होता कि शकुन्तला म्हणजे स्वर्ग व पृथ्वी यांचे मिलन. याला हा दैवी आणि मानुषि असण्याचा संदर्भ असावा. मॅडमनी नाटकाच्या रसास्वादाची सुरुवात करण्याअगोदर रस आणि तो उपभोगण्याची क्षमता असणारे रसिक याबद्दल थोडक्यात विवेचन केलं. त्यासंदर्भात रसिकाला संस्कृतात सहृदय म्हणतात त्याचा अर्थ त्यांनी अभिनवगुप्ताचा दाखला देऊन सांगितला. अभिनवगुप्त हा संस्कृत काव्यशास्त्रातील महत्त्वाचा विचारवंत. त्याच्या मते ज्याने काव्याचे वारंवार अनुशीलन केले आहे, त्यायोगे ज्याचा मनरुपी आरसा स्वच्छ झालेला आहे त्याच्यात काव्यातील रसाशी तन्मयीभवन होण्याची क्षमता निर्माण होतो. त्याला सहृदय म्हणावे. माहुलिकरांनी याला एक सुरेख उदाहरणदेखिल दिले. सुकलेले शुष्क काष्ठ अग्नित टाकल्याबरोबर ज्याप्रमाणे अग्नि त्याला वेढुन घेतो त्याप्रमाणे सहृदय असलेल्या मनुष्याला काव्यातील रस वेढुन घेतो. रसिकाच्या संवेदनशीलतेबद्दल सांगतानाच रसिकता ही नेहेमीच उपजत असते असे नसुन ती अभ्यासानेदेखिल निर्माण करता येते, जोपासता येते हे सांगायला त्या विसरल्या नाहीत.

अभिज्ञान याचा अर्थ ओळख पटणे. दुष्यंताला विस्मृतीत गेलेल्या शकुन्तलेची ओळख पटते. हे सुरुवातीला सांगतानाच दुष्यंताला आपल्या पुत्राचीदेखिल ओळख कशी क्रमाक्रमाने पटत जाते आणि त्याचा देखिल या "अभिज्ञान" शब्दाशी कसा संबंध आहे आपण शेवटी विवेचन करणार आहोत याचे सुतोवाच त्यांनी केले. कालिदासासारखा नाटककार कुठेलेही "लूज एंड्स" सोडत नाही. त्याची शब्दयोजना चपखल असते. आणि एकही शब्द गरज नसताना त्याच्याकडुन वापरला जात नाही, प्रत्येक शब्दयोजना ही विचारपूर्वक केलेली असुन त्यामागे काही तरी कारण असते याचेच "अभिज्ञान" हे एक उदाहरण होते. दुसर्‍या महत्त्वाच्या गोष्टीला स्पर्श करताना मॅडम म्हणाल्या कि "शाकुन्तल" ची रचना करताना कालिदासासमोर दोन प्रमुख स्रोत असण्याची शक्यता आहे. पहिले महाभारत आणि दुसरे कठ्ठहर जातक. पद्मपुराण मात्र कालिदासाच्या नंतरचे असल्याने त्यामध्ये उल्लेखलेली शकुन्तलेची कथा ही कदाचित कालिदासाच्या शाकुन्तल वरुनच घेतली असण्याची शक्यता आहे असे मत त्यांनी वर्तवले. पैकी महाभारतातील शकुन्तला अत्यंत व्यवहारी आहे. आपल्यावर भाळलेल्या दुष्यंताची मनस्थिती अचुक ताडलेली शकुन्तला त्याला होकार देण्याआधी माझ्या संततीचा राज्याभिषेक तुला करावा लागेल अशी खणखणीत अट घालते. तर कठ्ठहारी जातकातला दुष्यंत शकुन्तलेला अंगठी देऊन जर मुलगी झाली तर ही अंगठी विकुन तिचे पालनपोषण कर पण मुलगा झाला तर ही अंगठी घेऊन त्याच्याबरोबर माझ्याकडे ये असे बजावण्याइतका पाषाणहृदयी आहे. थोडक्यात काय तर मुलगी झाली तर आपले तोंड मला दाखवु नको म्हणणारा दुष्यंत आणि माझ्या होणार्‍या मुलाचा तर राज्याभिषेक करशील तर मी तुझी होईन म्हणणारी शकुन्तला कालिदासासमोर आहे. कालिदासाने ही व्यवहारी शकुन्तला आणि निर्दयी दुष्यंत आपल्या प्रतिभेने पुसुन टाकला आहे.

कालिदासाने आपल्यासमोर उभे केलेले दुष्यंत शकुन्तला हे आदर्श प्रेमाचे प्रतिक म्हणुन समोर येतात. त्यांचा विरह घडण्यास दुर्वास ऋषींचा शाप कारणीभुत होतो. दुष्यंताच्या आठवणीत बुडालेल्या शकन्तलेला दुर्वास आश्रमात आल्याचे लक्षात येत नाही आणि आदरातिथ्याची अपेक्षा असलेल्या तापट दुर्वासांना हा आपला अपमान वाटतो. ज्याच्या आठवणीत बुडुन तु मला विसरलीस तो ही तुला असाच विसरुन जाईल असा ते शाप देतात. शकुन्तलेला काय घडलंय हे देखिल लक्षात येत नाही इतकी ती दुष्यंताच्या चिंतनात गढलेली असते. मात्र तिची सखी प्रियंवदा हिला झालेला प्रकार कळतो आणि ती दुर्वासांची क्षमा मागुन उ:शाप मागते. दुष्यंताने दिलेली अंगठी त्याला जर पुन्हा दाखवली तर त्याला सर्व स्मृती परत येईल असा उ:शाप ते देतात. आता आभाळ मिकळे होते. कारण दुष्यंताकडे जाऊन ती अंगठी दाखवणे इतकेच करायचे असते. त्यामुळे शकुन्तलेला आणखि दु:ख नको यास्तव तिच्या सख्या ही शापाची गोष्ट तिच्यापासुन लपवुन ठेवतात. पुढे शकुन्तला गर्भार राहिल्यानंतर कण्वमुनि तिची पाठवणी दुष्यंताकडे करतात. ती अंगठी दुष्यंताकडे जाताना प्रवासात शकुन्तलेच्या बोटातुन गळुन पडते. परिणामी दुष्यंत तिला ओळखु शकत नाही. कठोर वचनांनी तिची निर्भत्सना करतो. अपमानित शकुन्तला दु:खाने परत फिरते. काही कालाने ती अंगठी दुष्यंताच्या हाती लागते आणि त्याला सारे आठवते. पण शकुन्तला निघुन गेलेली असते. पुढे काही वर्षे दुष्यंत पश्चात्तापाच्या आणि विरहाच्या अग्नित पोळुन निघतो. कालांतराने दोघांचे मिलन घडते. दुष्यंताला आपल्या पुत्राची, भरताची देखिल प्राप्ति होते. अशा तर्‍हेने कालिदासाची शकुन्तला आणि दुष्यंत हे नियतीच्या दुर्दैवी फेर्‍यात अडकुन विरह वेदना भोगणारे जीव आहेत. ते व्यवहार कठोर नाहीत. रसिकाला त्यांच्याबद्दल सहानुभुती वाटते आणि त्या दोघांइतकाच तोही त्यांचे मिलन घडावे म्हणुन आतुर होतो. आपल्या उत्तुंग प्रतिभेने कवी जणु काही नवीन सृष्टी कशी निर्माण करतो याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.

माहुलिकरांनी शाकुन्तलमधील निसर्गसौंदर्याचे वर्णन करताना अनेक सुंदर उदाहरणे दिली. काळा कुळकुळीत, गुंजन करणारा भुंगा, भ्रमर हे शाकुन्तलमधील एक पात्रच आहे. हा भ्रमर शिरिषकुसुमाच्या परागाच्या टोकाचे हलकेच चुंबन घेतो असे वर्णन कालिदासाने केले आहे. आश्रमातील वातावरणाचे वर्णन करताना तेथिल स्थिर, शांत, निस्तब्ध, सैलावलेली स्थिती, हरिणांचे नि:शंकपणे बागडणे, हे सारे पाहुन त्याचा दुष्यंतावर आपोआपच परिणाम होतो आणि आपल्या धनुष्याची दोरी कुणालातरी मारण्यासाठी ताणण्याऐवजी या तणावमुक्त वातावरणात ती सैल करावी अशीच त्याला इच्छा होते. भ्रमराचा पात्र म्हणुनच त्यांनी उल्लेख केला. हा भ्रमर शकुन्तलेचा विरोध न जुमानता तिच्या डोळ्याजवळ, कानाजवळ आणि ओठांजवळ गुंजन करुन जणुकाही तिचे चुंबन घेतो आणि हे सारे आडुन पाहात असलेला दुष्यंत असुयेने म्हणतो हा भ्रमर पाहा किती निर्धास्त आहे , नाहीतर आम्ही....मुर्खासारखे विचार करीत बसलो कि ही ब्राह्मणी आहे का? हीच्याशी बोलणे योग्य होईल का वगैरे वगैरे...कालिदासाने पात्रयोजना करताना निसर्गाचे मानवीकरण कसे केले आहे याचेदेखिल विवेचन त्यांनी केले. आश्रमातील आसन्नप्रसवा मृगीची काळजी शकुन्तलेला वाटते. म्हणुन ती दुष्यंताकडे जाताना तीची काळजी घेण्यास सांगते. शकुन्तलेला आभरणे देणार्‍या वनदेवता, ती जाणार म्हणुन उदास होणारे मुक प्राणी यामधुन निसर्गाशी तद्रुप झालेली शकुन्तला डोळ्यासमोर उभी राहते. कालिदासाच्या साहित्यातील वैदर्भि शैलीचे माधुर्य सांगताना माहुलिकरांनी मानवी मनाची सूक्ष्म आंदोलने टिपणारा कालिदासदेखिल विस्ताराने वर्णिला. भावस्थिराणि जननान्तरसौहृदानि... कातरवेळी आपण कासावीस होतो, कारण नसतानाच, संबंध नसताना काही प्रसंग, काही माणसे आपल्याला कातर करुन सोडतात. मात्र आपल्याला जरी याची कारणे माहित नसली, आठवत नसली तरी पूर्वायुष्यात, गतजन्मी या गोष्टींचा कुठेतरी आपल्याशी संबंध असतो त्यामुळे आपली अशी अवस्था होत असते असे कालिदासाने शाकुन्तलमध्ये प्रतिपादन केले आहे. माहुलिकरांचा हा सर्वात आवडता श्लोक. शकुन्तलेकडुन होकार येणार हे माहीत असुनसुद्धा जोवर ती प्रत्यक्ष तो होकार देत नाही तोवर दुष्यंताची झालेली तगमग कालिदासाने सुरेख दाखवली आहे. कालिदासाच्या पात्रयोजनेत विदुषक आहेच. पण त्याला योग्य ठिकाणी बोलावले आहे आणि योग्य ठिकाणी घालवले देखिल आहे. त्याला बोलवण्यालादेखिल कारण आहे आणि घालवण्याला देखिल. त्यामुळे घडणारी कुठलीही घटना ही तर्कविसंगत वाटत नाही. अतिशय घट्ट बांधणीचे असे हे नाटक आहे.

शाकुन्तलमधील शकुन्तलेची पाठवणी आणि त्यावेळी कण्वमुनिंची झालेली कातर अवस्था हा या नाटकातील जगप्रसिद्ध असलेला भाग. मी वनात राहणारा ब्रह्मचारी असुन, नगरातील सांसारिक जनांचा कसलाही संपर्क नसलेला, संसाराचा अनुभव नसलेल्या मलादेखिल या वनात वाढवलेल्या कन्येच्या पाठवणीच्यावेळी विरहाचे दु:ख अनावर होते आहे. तर पोटच्या मुलिची पाठवणी करताना पित्याला काय दु:ख होत असेल असे कण्व म्हणतात. या विरागी मुनिला अश्रु आवरत नाहीत. कौटुंबिक वात्सल्याचे, वात्सल्यभावात गुंतलेले नातेसंबंध दाखवणार्‍या आणखि काही जागा शाकुन्तलमध्ये आहेत. दुष्यन्ताला आपल्याला पुत्र नसल्याचे दु:ख सलत असते. तो ज्यांची लहान मुले धसमुसळेपणाने येऊन आपल्या मळकट पायांनी आपल्या मात्यापित्यांचे कपडे मलिन करतात ते मातापिता धन्य होत असे म्हणतो. पुढे आपल्या व्याख्यानाचा उत्कर्ष बिंदु गाठताना दुष्यंताला आपला पुत्र भरत याची कशी क्रमाक्रमाने ओळख पटते हे माहुलिकरांनी सविस्तर सांगितले. दुष्यंताच्या मनात हळुहळु खात्री पटत जाते कि हा आपलाच पुत्र आहे. मात्र कालिदासाने हे "अभिज्ञान" घडवताना प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली आहे. अगदी व्याख्यानात देखिल माहुलिकर हा प्रसंग रंगवित असताना श्रोते रंगुन गेले होते. शाकुन्तलमध्ये कालिदासाने उत्कट प्रेमाचे प्रतिक म्हणुन उभे केलेले मृग आणि मृगीचे उदाहरण हे माहुलिकरांचे अत्यंत आवडते प्रतिक. त्यांचा विद्यार्थी असताना मी देखिल हे त्यांच्या तोंडुन ऐकलेले. स्थिर असलेल्या कृष्णमृगाच्या शिंगाच्या टोकावर आपला डावा डोळा घासणारी हरीणी हे ते प्रतिक. तो जरा जरी हलला तरी तिला जखम होईल. आपल्या प्रियेसाठी तो स्थिर उभा आहे. आणि ती हरीणी देखिल नि:शंकपणे त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकुन आहे. गाढ प्रेमाच्या या प्रतिकाचे वर्णन करुन हे व्याख्यान त्यांनी समारोपाला आणले. पुढे सुरुवातीला दाखवलेले, बावरलेले, जीवाच्या भीतीने धावणारे, सतत मान वेळावुन पाहणारे हरीण हे शकुन्तलेचे प्रतिक, तर तिच्याभोवती गुणगुणणारा भ्रमर हे दुष्यंताचे प्रतिक वाटते अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली. व्याख्यानाचा समारोप करताना त्यांनी टागोरासारख्यांचे दाखले देऊन "प्रथमदर्शनी प्रेमाची" कथा असलेल्या या नाटकात कालिदासाने या शारीर प्रेमाचे उन्नयन कसे केले, दैवाने घडवलेल्या विरहाग्नित दुष्यंत शकुन्तलेचे प्रेम तापवुन त्यातले शारीर, हिणकस विषय काढुन टाकले आणि आदर्श अशा अशारीर प्रेमाचे प्रतिक जगासमोर ठेवले असा एक सिद्धान्त मांडला जातो त्याचीदेखिल त्यांनी चर्चा केली. शेवटी एखाद्या जमलेल्या सुरेल मैफिलीचा समारोप व्हावा अशातर्‍हेने हे जमलेले व्याख्यान संपले. "काव्यात नाटक, नाटकात कालिदासाचे शाकुन्तल" असे शाकुन्तलचे महत्त्व सांगताना म्हटले जाते. हे व्याख्यान ऐकल्यावर याच धर्तीवर "..आणि अशा नाटकावर डॉ. गौरी माहुलिकरांचे व्याख्यान" असेच म्हणत या रसास्वादात रंगलेले श्रोते परतले असतील.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह वा! खुप छान लिहिलेत तुम्हीही...
ही ओळख येथे आम्हाला करून दिल्याबद्दल अनेक आभार अतुलजी!

या अतिशय जमलेल्या सुरेल मैफिलीचा लाभ आम्हा सार्‍यांना घडवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ....... Happy

या अतिशय जमलेल्या सुरेल मैफिलीचा लाभ आम्हा सार्‍यांना घडवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ..... +१

"या अतिशय जमलेल्या सुरेल मैफिलीचा लाभ आम्हा सार्‍यांना घडवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ....." अगदी सहमत.
सुंदर लेख.

संस्कृत नाटकांवर प्रेम करणार्‍या प्राध्यापकांकडून त्या बद्दल ऐकणे ही पर्वणीच असते.
अन तो अनुभव तुम्ही मांडला ही छान आहे.

अभिनवगुप्त हा संस्कृत काव्यशास्त्रातील महत्त्वाचा विचारवंत. त्याच्या मते ज्याने काव्याचे वारंवार अनुशीलन केले आहे, त्यायोगे ज्याचा मनरुपी आरसा स्वच्छ झालेला आहे त्याच्यात काव्यातील रसाशी तन्मयीभवन होण्याची क्षमता निर्माण होतो. त्याला सहृदय म्हणावे.
सहृदय चा हा नवीन अर्थ कळला. सुंदर आहे.

सुकलेले शुष्क काष्ठ अग्नित टाकल्याबरोबर ज्याप्रमाणे अग्नि त्याला वेढुन घेतो त्याप्रमाणे सहृदय असलेल्या मनुष्याला काव्यातील रस वेढुन घेतो.
हे तर आपण वारंवार अनुभवत असतोच. मला वाटतेर आपण सारेच कधी आवडलेल्या गाण्यात सहृदय झालेलो असतो. त्यामुळे हे अगदी चपखल आहे.