ख्वाडा

Submitted by संदीप आहेर on 27 October, 2015 - 00:39

आज पर्यंत असंख्य सिनेमातून समोर दिसलेली गोष्ट, एक कुटुंब... खत्रुड बाप, कष्टमय आई, भाऊ.. वहिनी.. त्यात एक हिरो त्याचं लग्नाचं वय, त्यात एक हिरोईन, रोमान्टिक स्वप्न. जर हेच सगळं आहे तर हा सिनेमा एवढा गौरवला का गेला? भारतीय सिनेमाची सुरुवातच मुळी परीकथाचं चलचित्र रुप म्हणून झाली. मनोरंजनाचं साधनं म्हणून ते योग्यच होतं. पुढे हे केवळ मनोरंजनाचं साधन न राहता एक समाजमाध्यम म्हणून नावारुपाला आलं, स्त्री, पुरुष, श्रीमंत, गरीब, गुंड, सदगृहस्थ, शहरी, ग्रामीण, त्यात समाजातील सर्वांचीच योग्य दखल घेण्याचा प्रयत्न झाला. तो प्रशंसनीय असला तरीही अपूर्ण होता कारण त्यात त्रयस्थाच्या दृष्टीने आपण ती कहानी पहाणं होत होतं. थोडक्यात एका स्त्रीच्या प्रसुती-कळांच्या वेदना पुरुषाने शब्दबद्ध कराव्यात.

Khwada-Marathi-Movie-working-stills.jpg

भाऊराव कर्‍हाडे दिग्दर्शित ख्वाडा बघताना हे क्षणोक्षणी जाणवतं... सर्वकाही किती अस्सलं आहे. असं राकट, गावरान ह्या सिनेमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारा भाऊराव त्याच मातीतला असणं हे महत्वाचं... तरीही ख्वाडा फक्त त्याच मातीतल्या प्रेक्षकांना भावतो असं मात्र नाही स्टोरीचा प्लॉटच वैश्विक आहे. ख्वाडाला सर्वांनाच भिडतो... हे दिग्दर्शकाचं कसब आणखी वाखाणण्याजोगं आहे. हा सिनेमा हेच अधोरेखित करतो की अस्स्लं काही सादर करताना ते कंटाळवाणं होणं टाळलं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आशय नि विषयासहित पोहचण्यास सोपं जातं.

शेळ्या-मेंढ्यां पाळणारे सर्वंच धनगर अशी सर्वसामान्य समजूत दिसते. पण तसं नाही आहे, पुणे-अहमदनगर मधील स्थानिक (ज्याच्याकडे चांगली २०-२५ एकर शेती आहे) अश्या दुष्काळी भागातील बहुत्वांश लोकांचा हाच मुख्य व्यवसाय (जोड-धंदा नव्हे) आहे (होता). शेतीला पाणी नाही आजुबाजुला विस्तीर्ण डोंगर त्यावर माजलेला चारा ह्या भाडंवलावर चागंल उत्पन्न देणारा हा व्यवसाय धोक्यात आला तोच मुळी सरकारच्या चांगल्या धोरणामुळे. नापीक-पडीक जमीन वन क्षेत्र म्हणून ताब्यात घेऊन त्यावर वृक्ष लागवड करण्यात यावी हे ते धोरण. खरचं चागलं होतं, पण नेहमी प्रमाणे कागदावर चागलं वाटणारं धोरण प्रत्यक्षात राबवताना सरकारीबाबूंनी मनमानी केली. अनेक कुटुंब उध्वस्त केली... अनेक संसार देशोधडीला लागले, त्यातच एक रघु कर्‍हे.

रघु (शशांक शेंडे) त्यांची बायको, तीन मुले, मोठा पांडा त्याच लग्न झालेलं आहे, मधवा फक्त संर्दभात येतो नंतर नाही, धाकला बाळू (भाऊ शिंदे) ज्याचं लग्न जमवायचं चाललं आहे. तोही चांगलाच लग्नाळू आहे. त्याची रोमाण्टिक स्वप्न खुसखुशित पणे समोर येतात. हे सगळं होत असतं अगदी उघड्यावर... कारणं ह्या कुटुंबाला साधं राहायला घरही नाही आहे. शेळ्या-मेंढ्यां घेऊन त्यांची भटकंती. टेक्नॉलॉजी अगदी ह्या रिमोट भागातही आपलं अस्थित्व दाखवते. त्याच बरोबर शहरी प्रेक्षकांच्या अगांवर येतात त्या शिव्या. दोन तीन वाक्यांचे साधेशे फॅमिली संवादही शिवी शिवाय पूर्ण होत नाहीत... पण तेच वास्तव आहे. पुढे वास्तव आणखी जळजळित होतं जातं, इतर सधन काहिसा शिक्षित समाज जेव्हा ह्या विस्थांपितांचं उरलं सुरलं ओरबडू पाहतो. सरपंच अशोकदादा (अनिल नगरकर) त्या वाईटाचं प्रतिनिधित्व करतो. प्रेम, संघर्ष, बाप-लेकाचं नातं, दोन पिढ्यांची बदलती मानसिकता, शिक्षणाची ओढ, अश्या बर्‍याच गोष्टी अगदी छोट्याश्या प्रसंगातून पण व्यवस्थित पणे सामोर्‍या येतात. सगळंयात एक पॉझिटिव्हपणा दाखवला आहे तो उल्लेखनिय.

दोन-चार दृश्यांची लांबी कमी करता आली असती तर अजून धारधार झाला असता सिनेमा. काही ठिकाणी बजेट कमी असल्याचं खरचं वाईट वाट्तं राहतं. खोगीर न वापरता बेछूट उधळलेले पाच-पाच घोडेस्वार सहाही कोनातून टिपता यायला हवे होते... हायलाईट ठरले असते.

बर्‍याच आघांड्यावर सिनेमा उत्कृष्ट झाला आहे (प्रथम प्रयत्न असूनही), त्यातून उल्लेखनिय म्हणजे साऊंड रेर्काडींग (महावीर सबन्नवार). बेस्ट ऑडीओग्राफीचं नॅशनल अ‍ॅवार्ड का मिळालं असेल हे पाहायचं तर सिनेमा ऐका. संपूर्ण सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेण्यांचं काम ह्या ऑडीओग्राफीचं. मोकळं माळरान, उघड्यावर होणारा स्वयंपाक त्या वार्‍यानिशी आपल्या पर्यंत पोहचतो. घोड्यांचं उधळणं... शेळ्या-मेढ्यांच वाघुरीतलं मेमणं... दूध-भाकर ओरपून जेवणं.. मिसं झालं असतं.

बर्‍यापैकी परिचित चेहरा (शशांक शेंडे) ह्या गावरान टीम मध्ये बेमालूम पणे मिसळतो त्यांच्या आभिनयाबद्द्ल विशेष कॉतुक, भाऊ शिंदेंचे सगळे एक्सप्रेशन्स निव्व्ळ भन्नाट. अनिल नगरकरांचा सरपंच तितक्याच ताकतीचा.
सगळ्यात वरचढ आहेत संवाद... लय म्हणजे लय भारी.

नाविन्याचा आनंद घेण्यासाठी पहा हा सिनेमा. कला खरचं दूर खेडोपाडी पोहचली आहे... एकलव्या प्रमाणे कोणी शिकवणारं नसतानाही केवळ ध्यास ती कला किती उत्तमरित्या आत्मसात करून दाखवू शकतो.. त्याचा प्रत्यय घेण्यासाठी पहा हा सिनेमा. आज खरंच मराठी सिनेमा समृद्ध होतो आहे, त्याचा आनंद घेण्यासाठी पहा हा सिनेमा.

ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
http://www.cinemavishwa.com

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'ख्वाडा' अप्रतिम आहे. जरूर बघा. याच आठवड्यात बघा, म्हणजे त्या बळावर चित्रपट अजून एक आठवडा चित्रपतगृहात राहू शकेल.

चांगलं परीक्षण. Happy

छान लिहिलंय. सगळीकडे चांगलं वाचायला मिळतंय या सिनेमा बद्दल (आजकाल अनेक मराठी सिनेमांबाबत असं म्ह्णता येतं ही एक फार चांगली गोष्ट). नक्की पाहणार.

छान लिहिलंय..

'ख्वाडा' जबरदस्त ताकदीचा सिनेमा आहे. इतर सारे येतात तसा हाही टीव्हीवर येईलच, पण तेव्हा या सिनेम्याने अनेक अर्थांनी केलेली बंडं तितक्या ताकदीने अंगावर येऊन अस्वस्थ व्हायला होणार नाही. काही सिनेमे मोठ्या पडद्यासाठीच असतात त्यातला एक ख्वाडा..